शिवाजी महाराजांचं नाव घेत 'तिनं' अवघ्या 7 व्या वर्षी सर केले 121 किल्ले

फोटो स्रोत, Jiten Mhatre
- Author, विशाखा निकम
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
तुम्ही एखादा गडकिल्ला सर करण्यासाठी गेला आणि दोन वेण्या असलेली एक छोटी गोड मुलगी काटेरी झुडुपं, झाडी यांना कापत पुढे जात असेल तर समजायचं की ती शर्विकाच आहे.
कारण सात वर्षांच्या या चिमुकलीने आतापर्यंत 121 किल्ले सर केले आहेत. इतकंच नाही, तर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' असा जयघोष करत ती आणखी किल्ले सर करण्याच्या तयारीत आहे.
शिवाजी महाराजांचे नाव ऐकून एक वेगळीच ऊर्जा मिळत असल्याचं ती सांगते. आज (19 फेब्रुवारी) शिवजयंती निमित्त तिची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सध्या जगभरात ट्रेकिंगची क्रेझ वाढली आहे. महाराष्ट्रातही अनेक ट्रेकर्स (गिर्यारोहक) आपल्याला पाहायला मिळतात. पण, या 7 वर्षांच्या चिमुरडीसारखे ट्रेकर्स तर अभावानेच पाहायला मिळतात.
तिने सह्याद्रीच्या कुशीतल्या 121 किल्ल्यांवर झेंडा रोवला आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जरी ती एकाच किल्ल्यावर परत गेली तरी तो किल्ला ती एकदाच मोजते.
शर्विका जितेन म्हात्रे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर सर करणारी सर्वांत लहान गिर्यारोहक आहे. अनेक रेकॉर्डस तिनं आपल्या नावावर केले आहेत.
एवढंच नाही तर तिची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड', 'आशिया बुक ऑफ रेकॉर्ड', 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड', 'डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड'मध्येही नोंद झाली आहे.
शर्विकानं वयाच्या अवघ्या अडीचव्या वर्षी पहिला किल्ला सर केला. महाराष्ट्रातील सर्वात कठीण किल्ल्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पनवेल-कर्जतजवळील कलावंतीण सुळका किल्ला सर करणारी ती महाराष्ट्रातील पहिली मुलगी ठरली आहे.
या व्यतिरिक्त वयाच्या तिसऱ्या वर्षी तिनं सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच असा नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ला सर केला.
वयाची साडेतीन वर्षं देखील पूर्ण होत नाहीत, त्याआधी शर्विकाने महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाईदेखील सर केलं. गुजरातमधील सर्वात उंच गिरनार शिखर तिनं वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी सर केलं.
वयाच्या सातव्या वर्षापर्यंत तिने राजगड, रायगड, तोरणा, सिंहगड, साल्हेर, श्रीमलंग गड, भैरवगड, लिंगाणा, तैल बैला, पारगड, माहुली, हरिहर, धर्मवीर गड, भुदरगड, हरिश्चंद्रगड, वैराट गड, कमळगड, पांडवगड, केंजळगड, रोहिडा, पुरंदर, कैलासगड असे महाराष्ट्रातील सर्वात कठीण आणि सर्वाधिक गिरिदुर्ग असे तब्बल 121 किल्ले यशस्वीपणे सर केले.
अडीच वर्षांची असताना केली ट्रेकिंगला सुरुवात
अडीच वर्षांची असताना शर्विकाने सर्वांत आधी रायगड सर केला. आपल्याला ट्रेक करायला खूप आवडतं आणि ट्रेकिंग करताना शिवाजी महाराज दिसतात, असं शर्विकानं बीबीसी मराठीला सांगितलं.
ती पुढे सांगते, "शिवाजी महाराजांच्या कथा तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या गोष्टी ऐकून मला छान वाटतं आणि एक वेगळीच ऊर्जा मिळते."


अवघ्या 7 वर्षांची शर्विका जेव्हा अनेकांसाठी आदर्श ठरते
एका ट्रेकसाठी गेले असताना काही लोकांची हिंमत खचली; मात्र, जेव्हा शर्विकाला त्या सगळ्यांनी पुढे जाताना बघितलं, तेव्हा त्यांनीही गडाचा शेवटचा टप्पा सर करायला सुरुवात केली.
ती गडाच्या टोकावर पोहोचली, तेव्हा कुणीतरी कौतुकानं तिचा व्हीडिओ काढला आणि फेसबुकवर शेअर केला. त्यानंतर म्हात्रे कुटुंबीय घरी पोहोचेपर्यंत शर्विका सोशल मीडियावर राज्य करू लागली होती, असं शर्विकाचे वडील जितेन म्हात्रे सांगतात.

फोटो स्रोत, Jiten Mhatre
पहिल्यांदा रायगड किल्ला सर केल्यानंतर गडकिल्ल्यावरील तिचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेलं, असंही त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
शर्विकाचे आई-वडील गिर्यारोहक आहेत. दोघांनाही ट्रेकिंगची आवड आहे. कदाचित, त्यामुळेच शर्विकालाही गिर्यारोहनाची आवड निर्माण झाली, असं तिची आई अमृता म्हात्रे सांगतात.
लहानपणापासूनच मोबाईल आणि टीव्हीपासून लांब
शर्विकाला कधीच टीव्ही-मोबाईलचा छंद नव्हता. तिच्या आई-वडिलांनी तिला या सगळ्यापासून लांब ठेवलं. शारीरीक व्यायाम आणि मैदानावरील खेळांमध्ये तिला जास्त मज्जा येते.
शर्विका ट्रेकिंगसोबतच सध्या रॉक क्लाईंबिंगमध्ये तिचं करियर बनवू पाहतेय.

फोटो स्रोत, Jiten Mhatre
किल्ले सर करणं आता तिचा छंद झाला आहे. यातून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना आनंद मिळतोय. तिला इतिहासाची आवड निर्माण झाली आहे. शिवाजी महाराजांचे गड-किल्ले सर करताना तिला इतिहास जवळून पाहायला मिळतोय.
'किल्ले जिंकण्यासाठी मावळ्यांनी रक्त सांडवलं ते या मातीत आहे'
तिनं प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याची माती गोळा केली आहे. तिचा विश्वास आहे की, या मातीत मावळ्यांचे परिश्रम आहेत. तिनं ही माती गोळा करून एका पितळाच्या गडव्यात साठवली आहे आणि त्यावर त्या-त्या किल्ल्याचं नाव लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Jiten Mhatre
बीबीसी मराठीची टीम तिला भेटली, तेव्हा तिनं तिला तोंडपाठ असलेल्या मावळ्यांच्या कथा आम्हाला सांगितल्या.
आग्र्याच्या किल्ल्यातून शिवाजी महाराजांची झालेली सुटका ते हिरकणीची शूर कथा या सगळ्या गोष्टी तिला अगदी लहानपणापासून पाठ आहेत. तिच्याकडे शिवाजी महाराजांच्या गोष्टींची अनेक पुस्तकं आहेत.
रॉक क्लाईंबिंगमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्याचा मनोदय
हे सगळं करत असतानाच शर्विकाच्या वडिलांनी तिला रॉक क्लाईंबिंगचे धडे देण्याचं ठरवलं. त्यासाठी म्हात्रे कुटुंबीय खास अलीबागहून पुण्यात स्थायिक झालंय. शर्विकाला रॉक क्लाईंबिंगमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करायचं आहे.
दोन वर्षांपूर्वी निसर्गरम्य अलीबाग सोडून शर्विकासाठी पुण्यात शिफ्ट झालो, असं जितेन म्हात्रे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं. शर्विकाला ट्रेकिंगची आवड आहे. त्यामुळे त्याच्याशीच निगडीत एखादा खेळ निवडावा असं त्यांना वाटलं आणि त्यांनी शर्विकाला रॉक क्लाईंबिंगकडे वळवलं.

शर्विकाचे प्रशिक्षक अमोल जोगदंड यांना विश्वास आहे की, शर्विका इतिहास रचणारच. ते म्हणाले की, जेव्हा त्यांनी शर्विकाला पहिल्यांदा क्लाईंबिंग करताना पाहिलं तेव्हा त्यांना विश्वास बसत नव्हता. एवढीशी मुलगी इतकं चांगलं क्लाईंबिंग कसं करू शकते, असं त्यांना वाटलं.
मात्र, तिचा सराव घेताना कळलं की, तिच्यात क्षमता आहेत आणि ती जागतिक स्तरावर आपलं नाव मोठं करू शकते.
'शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं संवर्धन व्हावं'
शर्विकाला गड-किल्ले सर करण्याची आवड आहेच; मात्र, महाराष्ट्राला लाभलेला हा ठेवा आहे तसाच रहावा आणि त्याचं संवर्धन व्हावं. पुढच्या पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास जवळून पाहता, अनुभवता यावा यासाठी ती लहान लहान पावलंही टाकतेय.
गड किल्ल्यांवरील साफसफाई मोहिमांमध्ये ती सहभागी होते. यासोबतच प्रत्येक ट्रेकदरम्यान दिसत असलेला कचरा, प्लास्टिकच्या बॉटल्स, वेफर्सची पाकिटं ती गोळा करत ट्रेक करते. ट्रेक करून झालं की गोळा केलेला कचरा कचराकुंडीत टाकते.
ती असं का करते विचारल्यावर तिनं पटकन म्हटलं, "आपले गड-किल्ले जिंकताना शिवाजी महाराजांच्या अनेक मावळ्यांनी आपलं रक्त सांडवलं आणि आपण त्या गडकिल्ल्यावर काय करतो?"
"खालून पाण्याच्या भरलेल्या बॉटल्स घेऊन येऊ शकतो, तर त्या खाली नेऊन कचराकुंडीत टाकू शकत नाही? जिथे महाराजांचा इतिहास अनुभवता येतो, तिथे आपण कचरा का करायचा?" असा प्रश्न ती विचारते.

फोटो स्रोत, Jiten Mhatre
तिनं सरकारलाही आवाहन केलं आहे. ती म्हणते, "मी सरकारला आवाहन करते की, जे लोक गड किल्ल्यावर येऊन दगडांवर, तेथील पवित्र वास्तूंवर स्वत:ची नावं कोरतात, प्लॅस्टिक टाकतात अशांसाठी नियम कडक करण्यात यावेत."
शर्विकाचे वडील म्हणतात, "फक्त गड-किल्ले सर न करता जर तरुण पिढीनं किल्ल्यांची डागडुजी आणि संवर्धनासाठी हातभार लावला, तर भविष्यात महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना सोन्याचे दिवस यायला वेळ लागणार नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












