You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'हिटलर चांगला होता हेही ऐकायला मिळतं', जर्मनीचे तरुण अतिउजव्या विचाराकडे झुकत आहेत का?
- Author, जेसिका पार्कर, क्रिस्टीना वोल्क
- Role, बर्लिन प्रतिनिधी
"स्वतःच्या देशात कोणत्याही भितीशिवाय आणि शांततेत जगायचं असं माझ्या आई-वडिलांनी मला शिकवलं आहे. त्यामुळं मला अशा देशात राहायला आवडेल, जिथं मला घाबरण्याची गरज नाही." असं 19 वर्षीय निक सांगत होता.
सॅक्सनीमधील एक्स-मायनिंग टाउन फ्रायबर्गमधील एका छोट्याशा बारमध्ये मी त्याला भेटलो. तिथं तो डार्ट्स खेळतो.
फेब्रुवारी महिन्यातल्या एका थंड, धुक्याच्या रात्री आमची भेट झाली. जर्मनीच्या निवडणुकीला आता अवघे दोन आठवडे उरले आहेत.
निक आणि त्याचा मित्र डॉमिनिक हे अल्टरनेटिव्ह फॉर ड्यूशलँड (AFD) या राजकीय पक्षाप्रती सहानुभूती बाळगणारे 30 वर्षांचे तरुण आहेत. हा पक्ष जर्मनीमध्ये काही काळापासून मतदानात सातत्याने दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
जर्मनी आणि युरोपमधील काही भागांमध्ये या पक्षाची अतिउजवी विचारसरणी तरुणांना आकर्षित करत आहे. विशेषतः पुरुष वर्ग या पक्षाचा मोठा समर्थक आहे.
निक आणि त्याच्यासारखे इतर अनेक जर्मन पुरुष सांगतात की, जर्मनीमध्ये आश्रय मागणाऱ्या स्थलांतरितांची त्यांना भीती वाटते. कारण जर्मनीत जे जीवघेणे हल्ले झाले, त्यातील बहुतांश घटनांमध्ये स्थलांतरितांवर संशय आहे.
यातील सर्वात अलीकडील घटना म्हणजे ॲस्चाफेनबर्गच्या बव्हेरियन शहरातील एका उद्यानात एका लहान बाळाची आणि एका व्यक्तीची हत्या झाली होती.
त्यामुळं स्थलांतरित नागरिक हा निक आणि डॉमिनिकचा चिंतेचा मुख्य विषय बनला आहे. पण तरीही दोघांचा स्थलांतरितांना सरसकट विरोध नाही.
"जे लोक इथं येतात, शिकतात, काम करतात त्यांच्याबाबत मला काहीही अडचण नाही," असं डॉमिनिक म्हणतो. पण तरीही तो अशा लोकांवर टीका करतो, जे या आश्रय प्रक्रियेचा फायदा घेतात.
डॉमिनिक म्हणतो की, "हल्ली अशा प्रकारच्या वक्तव्यांकडं विरोधी दृष्टीनं पाहिलं जातं. तुम्हाला 'नाझी' म्हटलं जातं. कारण याला जर्मनीचा भूतकाळ कारणीभूत आहे."
एएफडीला दीर्घकाळापासून स्थलांतरविरोधी वक्तव्यं आणि भूमिकेसाठी ओळखलं जातं. सोशल मीडिया 'एक्स'चे प्रमुख इलॉन मस्क यांचं एएफडीला समर्थन आहे.
मस्क यांनी पक्षाच्या नेत्या ऍलिस वायडेल यांच्याबरोबर एक लाईव्ह चर्चासत्र आयोजित केलं होतं. पार्टीच्या रॅलीतही ते सहभाग झाले होते.
आता, आगामी निवडणुकीत कट्टरतावाद्यांची कामगिरी कशी राहिल याकडे संपूर्ण जर्मनीचं लक्ष लागलं आहे.
प्रश्न हा आहे की, इथला तरुण पुरुष वर्ग कट्टर उजव्या विचारांकडे का आकर्षित होत आहे, आणि ज्या देशाचा भूतकाळ नाझी राजवटीचा होता, त्या देशावर काय परिणाम होतील?
उजव्या विचारांकडे झुकणारे तरुण
2024 मध्ये प्यू रिसर्चच्या संशोधनात असं आढळून आलं की, 26% जर्मन पुरुषांचे एएफडी (AfD) विषयी सकारात्मक मत आहे. ते महिलांपेक्षा 11% जास्त आहे, आणि 2022 पासून पुरुषांमधील या मताचं प्रमाण 10 टक्क्यांनी वाढलं आहे.
2024 च्या युरोपियन संसदेच्या निवडणुकीत, जर्मन एक्झिट पोल्सनुसार, जर्मनीतील 24 वर्षांखालील तरुण-तरुणींमध्ये एएफडीला मतदान करणाऱ्यांचं प्रमाण 16 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. जे 2019 पासून 11 टक्क्यांनी वाढलं आहे.
जर्मन जनरेशन रिसर्च संस्थेच्या अलीकडील अभ्यासानुसार, तरुणांमध्ये चिंतेचा स्तर वाढलेला आहे आणि नेमकं त्याच काळात हे घडत आहे. त्यामुळं तरुणांची विचारसरणी बदलताना दिसत आहे.
सर्व्हेमध्ये 16 ते 25 वयाच्या 1000 जर्मन नागरिकांचं मत जाणून घेण्यात आलं. त्यात ज्यांना जास्त चिंता किंवा काळजी वाटत होती, ते लोक स्वतःला उजवे मानणारे होते. तर इतर नागरिकांमध्ये चिंतेचा स्तर सर्वात कमी दिसून आला.
महिला त्यांच्या स्वतःच्या आणि अल्पसंख्यांक गटांच्या हक्कांसाठी अधिक चिंतेत होत्या. तर पुरुषांमध्ये पारंपारिक मूल्यांबद्दल अधिक चिंता दिसून आली, ती हक्कांवर कमी आधारलेली होती.
जर्मन थिंक टँक इन्सिटट्यूट फॉर जनरेशनल रिसर्चचे डॉ. रुडिगर मास म्हणतात की, डावे पक्ष सातत्यानं स्त्रीवाद, समानता आणि महिलांच्या अधिकारांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करत असतात.
ते म्हणाले, "एकंदरीतच, पुरुष यात स्वत:ला पाहत नाहीत. आपल्यासाठी तिथं काही नाही असं त्यांना वाटतं. त्यामुळं जास्तीच्या अधिकारांसाठी उजव्या पक्षांना मत देण्याकडे त्यांचा कल असतो."
फ्रान्स, ऑस्ट्रिया, नेदरलँड, पोलंड, स्पेन आणि इटलीसारख्या देशांमध्येही कट्टर उजव्या विचारांच्या पक्षांनी चांगली कामगिरी केली आहे.
"युरोपीय संघातील देशांमध्ये 30 वर्षांखालील 60 टक्के तरुण पुरुष अति उजव्या पक्षांना मत देण्याची शक्यता वर्तवतात.
हे प्रमाण महिला वर्गाच्या तुलनेत खूप जास्त आहे," असं प्रोफेसर अबो-चाडी यांनी 2024 च्या युरोपीयन निवडणूक अभ्यासावर आधारित विश्लेषणात म्हटलं आहे.
सोशल मीडिया, इन्फ्ल्यूएन्सर्स आणि राजकीय पक्षांचे विचार
लिंग (जेंडर), स्थलांतर आणि आर्थिक मुद्द्यांसोबतच सोशल मीडियादेखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. टिकटॉकसारखे प्लॅटफॉर्म्स राजकीय गटांना मुख्य प्रवाहातील पारंपारिक माध्यमांना बाजूला ठेवून आपले विचार मांडण्याची देण्याची संधी देतात.
इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक डायलॉगचे (ISD) मॉरिशस डॉर्न म्हणतात की, इतर जर्मन पक्षांच्या तुलनेत एएफडीने (AfD) टिकटॉकवर वर्चस्व राखलं आहे.
त्यांच्या पार्लमेंटरी अकाऊंटचे 5,39,000 फॉलोअर्स आहेत. तर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी (SPD) ज्यांच्याकडे सध्या जर्मन संसदेत सर्वाधिक जागा आहेत, त्यांचे 1,58,000 फॉलोअर्स आहेत.
"केवळ अधिकृत अकाऊंट्स नाहीत, तर अनाधिकृत फॅन पेजेसची संख्या देखील मोठी आहे. जे पक्षाचा कंटेट, विचार आपल्या अकाऊंटवरुन किंवा पेजेसवरुन प्रसारित करण्यात मदत करतात," असं डॉर्न म्हणाले.
त्यांनी दहा वेगवेगळ्या व्यक्ती आधारित प्रोफाइलचे अकाऊंट्स शोधले, "जे यूझर उजव्या पक्षाच्या बाजूचे आहेत, त्यांना एएफडीचा कंटेंट खूप दिसतो. तर डाव्या विचारांच्या युजर्सला विविध प्रकारचा राजकीय कंटेंट जास्त दिसतो."
आम्ही राजकारणातील उजवे, डावे असा कधीच भेद करत नाही. चुकीच्या माहितीचा सामना करण्यासाठी आम्ही नेहमी पुढं राहू, असं टिकटॉकनं या चर्चांच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट केलं आहे
अन्य पक्षांनी टिकटॉकसारख्या साइट्सला फार उशिरा ओळखलं. त्यामुळं त्यांना या प्लॅटफॉर्मवर आपलं अस्तित्व निर्माण करण्यास खूपच उशीर झाला, असं निरीक्षण डॉर्न यांनी नोंदवलं आहे.
आम्ही सेलिना ब्रायचसी या 25 वर्षीय एएफडी इन्फ्ल्यून्सरला भेटलो. तिचे टिकटॉकवर 1,67,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यापैकी 53 टक्के पुरुष आणि 76 टक्के फॉलोअर्स हे 18 ते 35 वर्ष वयोगटातील आहेत.
ती प्रामुख्यानं डान्स, ट्रेंड आणि लाइफस्टाइल व्हिडिओज शेअर करते. पण त्यासोबतच ती एएफडीच्या बाजूनं पोस्टही करत असते.
सेलिना सांगते की, एएफडीला प्रमोट करुन मला पैसे मिळत नाहीत. परंतु, ते ज्या कारणांसाठी राजकारणात आहेत. तो संदेश मला सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे.
देशात पुन्हा लष्कराचा हस्तक्षेप असावा. घरी राहू इच्छिणाऱ्या मातांना मदत केली जावी, देशाच्या सीमारेषा मजबूत असाव्यात, अशी सेलिनाची काही राजकीय मतं आहेत.
ती बहुसांस्कृतिकतेला नाकारते का? असा प्रश्न मी तिला विचारला तेव्हा तिनं नाही असं म्हटलं. परंतु, लोकांनी एकत्र यावं, यावर आपला विश्वास असल्याचं ती म्हणाली.
"इथं असेही काही लोक आहेत जे आमच्या जर्मन लोकांमध्ये सामावले जाऊ शकत नाहीत," असं ती म्हणाली. परंतु, याचा अर्थ आपण वर्णद्वेषी आहोत असं नाही याचा ती वारंवार उच्चार करत होती.
या बातम्याही वाचा:
एएफडीचे नेते, समर्थक काय म्हणतात?
पुरुष आणि स्त्रियांच्या पोशाखाबाबत सेलिनाचे विचार वेगळे आहेत.
लिंग विचारधारेविरोधातील (Gender Ideology) प्रतिक्रिया हा आणखी एक मुद्दा असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठातील युरोपीय राजकारणाचे अभ्यासक तारिक अबो-चाडी यांना आढळून आले आहे. उजव्या पक्षाच्या समर्थक तरुणांचा याला पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.
त्यांनी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांना एलजीबीटीक्यू (LGBTQ) समूहाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर सर्वाधिक सहमती दिसून आली. या मतदारांमध्ये बहुतांश जण एएफडीला समर्थन देण्याच्या मानसिकतेत होते.
याबाबतचा कायदा हटवल्यास हे प्रतिगामी पाऊल ठरेल, असं जेव्हा मी सेलिनाला म्हटलं. तेव्हा ती म्हणाली की, "जैविकदृष्ट्या सांगायचं तर आपण पुरुष आणि स्त्री आहोत" आणि लोकांनी त्यानुसारच राहिलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे.
राजकीय मतांमुळं मी माझे अनेक मित्र गमावले आहेत. आता मी बहुतांश वेळ समविचारी लोकांबरोबरच घालवते, असंही ती म्हणाली.
एएफडी ही एक धोकादायक चळवळ आहे, असं जे लोक म्हणतात, त्यांच्या मताशी ती सहमत नाही. एएफडीला व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणायचे आहेत, असं ती म्हणते.
तू कट्टर उजव्या विचारांची आहेस का? असा प्रश्न जेव्हा तिला विचारला. तेव्हा तिनं गुन्हेगारी आणि सीमारेषेसारख्या काही मुद्द्यांवर 'होय' असं होकारार्थी उत्तर दिलं.
हे धक्कादायक उत्तर आहे. कारण एएफडीच्या समर्थकांसह, पक्षाच्या नेत्या ऍलिस वायडेल, हे त्यांच्या पक्षावरील 'फार-राइट' (अति उजव्या) हा टॅग नाकारतात. आम्ही रुढीवादी आणि स्वातंत्र्यवादी चळवळीसाठी आग्रही आहोत, हे त्या आक्रमकपणे सांगतात.
भूतकाळातील नाझींचा रक्तरंजीत भयावह इतिहास ऐकत एएफडी पक्षासोबत मोठी झालेली एक पिढी आहे. याच एएफडी पक्षाचा पहिला खासदार 2017 मध्ये संसदेत पोहोचला होता.
उजवी विचारसरणी अधिक सामान्य झाली आहे, "आता ते इतकं टोकाचं वाटत नाही," असं प्रोफेसर अबो-चाडी यांना वाटतं.
एएफडी पक्षाचे ब्योर्न हॉक यांना गेल्या वर्षी नाझी घोषणा दिल्याबद्दल दोनदा दंड ठोठावण्यात आला. त्यांनी अनेक घोटाळे केले आहेत. तरीही ते उजव्या विचारधारेच्या समर्थकांच्या गळ्यातील ताईत आहेत.
एएफडीला तीन जर्मन राज्यांमध्ये सरकारनं कट्टर उजवा गट म्हणून वर्गीकृत केलं आहे. यात सॅक्सनीचा देखील समावेश आहे. एएफडीनं सॅक्सनीमधील न्यायालयात याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता.
सॅक्सनी राज्याच्या स्थानिक गुप्तचर विभागानं गेल्या वर्षी 2015 पर्यंतच्या माहितीच्या आधारे एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात उजव्या विचारसरणीच्या कट्टर समर्थकांच्या संख्येनं नवा उच्चांक गाठला असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
जर्मनीतल्या युवकांचं काय मत आहे?
सॅक्सनीतील केम्निट्झ शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये, आम्ही काही तरुण मुलांच्या गटाला भेटलो. त्यांनी ऑन रेकॉर्ड बोलण्यास नकार दिला. परंतु, आम्ही उजव्या विचारसरणीचे असल्याचे ते म्हणाले.
काळे कपडे परिधान केलेल्या या युवकांची केसांची रचना एकसारखी होती. त्यांनी समलैंगिक संबंध चुकीचे असल्याचं म्हटलं. वाढत्या स्थलांतरितांमुळं जर्मन वंश धोक्यात येईल अशी त्यांना भीती आहे.
त्यांनी देशाच्या भूतकाळाबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्याचा संदर्भ हा नाझी युगाशी होता.
डायना श्विताल्ला आठ वर्षांपासून इतिहास आणि समाजशास्त्र शिकवत आहेत. त्या म्हणतात की, त्यांना वर्गात होलोकॉस्ट नाकारण्याच्या प्रसंगाचा सामना करावा लागला. त्यांना अनेकवेळा त्रासदायक टोमणेही ऐकावे लागले.
"दुसरं जागतिक महायुद्ध ही खरंतर एक चांगली गोष्ट होती, असं आम्ही इथं ऐकतो. त्या वेळी इतकी लोकं मरण पावण्यामागं एक चांगलं कारण असावं आणि हिटलर हा एक चांगला माणूस होता असं वर्णन केलं जातं," असं श्विताल्ला यांनी सांगितलं.
त्या म्हणतात, "बरेच विद्यार्थी म्हणतात की, आम्ही कोणाला मतदान करणार यानं काहीच फरक पडत नाही. 'वर'चे जे करतील ते आम्ही करु असं ते सांगतात. पण 'ते वरचे' कोण असा त्यांना प्रश्न विचारला तर ते उत्तर देत नाहीत."
आम्ही श्विताल्ला यांची दोन वेळा भेट घेतली. त्यात फ्रायबर्गमधील एका व्होकेशनल महाविद्यालयात पूर्वीच्या नाझी छावणीच्या ठिकाणी आम्ही बसलो होतो. ऑश्विट्जमधून आणलेल्या ज्यू महिलांना इथं गुलामासारखं वागवलं जात असत. त्यांच्याकडून विमानाचे सुटे भाग तयार करुन घेतले जात.
आम्ही तिथं जर्मनीमध्ये स्थलांतरितांना विरोध आणि राष्ट्रीय अभिमानाच्या काही चर्चा ऐकल्या.
ज्यादिवशी आम्ही श्विताल्ला यांना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीकडे आकर्षित करण्याचा एक मार्ग म्हणून फ्लोहा येथील कॉलेज विद्यार्थ्यांसाठी निवडणुकीचे प्रात्यक्षिक आयोजित केलं होतं. फ्लोहा हे फ्रायबर्गपासून 15 मैलांवर आहे.
आम्ही 18 वर्षीय कोरा, मेलिना आणि जॉए यांच्याशी बोललो.
कोरा म्हणते की, तिने तिच्या वयाच्या मुलांनी महिलांनी घरात राहावं अशी इच्छा व्यक्त करताना ऐकलं आहे. त्याचबरोबर "महिलांनी मुलांची काळजी घ्यावी आणि पती कामावरून घरी येतो तेव्हा त्याच्यासाठी अन्न तयार करावं, असं ऐकलं आहे. या अशा पारंपारिक जेंडर भूमिका पार पाडणाऱ्या महिलांना तिने "ट्रॅड वाइफ" अशी उपमा दिली आहे.
कोरा आणि मेलिना महिलांचे हक्क कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करतात. ज्यात गर्भपाताचा हक्क आणि मतदानाचा हक्क देखील समाविष्ट आहे. "अद्यापही राजकारणात यावर चर्चा होत नाही," असे मेलिना म्हणते, "पण मी ऐकलं आहे की, महिलांना निवडणुकांमध्ये मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही."
दुपारच्या वेळेत काही विद्यार्थ्यांचा एक लहान गट मतदान करण्यासाठी रांगेत उभा होता. आम्ही पाहिलं की, निकालात "डाय लिंक" आघाडीवर होते. हा पक्ष डाव्या विचारांचा आहे. तुलनेने तरुणांमध्ये हा पक्ष प्रसिद्ध आहे, परंतु देशपातळीवर या पक्षाला केवळ पाच टक्के मतदान पडते.
या निवडणुकीत एएफडी (AfD) दुसऱ्या स्थानी राहिले. ज्यामुळं प्रोफेसर अबो-चाडी यांनी सांगितलेल्या गोष्टीला पुष्टी मिळाली की, "तरुण लोक मध्यवर्ती पक्षाच्या तुलनेत अति डाव्या किंवा अति उजव्या पक्षाकडे जातात"
'विरोधी मत म्हणून पाहू नका'
एएफडीकडे सुरक्षा, सीमारेषा आणि स्थलांतरितांचे गुन्हे यांसारखे मुख्य मुद्दे आहेत. ते आता "रिमिग्रेशन" या संकल्पनेला स्वीकारत आहेत. हा यूरोपच्या उजव्या पक्षांमधला एक चर्चेतला शब्द आहे. याचा अर्थ मोठ्या प्रमाणावर हद्दपार करणं असं समजला जातो.
जर्मनीतील लोकांशी बोलताना, असं दिसून आलं की, एएफडीला पाठिंबा म्हणजे एक प्रकारचा निषेध किंवा विरोधी मत म्हणून पाहता येणार नाही. जर्मनीत सत्ताधारी पक्षांबद्दल असंतोष असला तरी, सेलिना, डॉमिनिक, निक आणि इतरांशी आम्ही संवाद साधला. तेव्हा जाणवलं की, एएफडी पक्षच जर्मनीला क्रांतिकारी बदलाच्या मार्गावर नेऊ शकेल असा विश्वास या युवकांना आहे.
अद्यापही इतर पक्ष एएफडीसोबत युती करण्यास इच्छुक नाहीत. परंतु, जानेवारी महिन्यात जर्मन संसदेत पहिल्यांदाच एएफडीच्या मतांनी एक ठराव मंजूर करण्यात आला.
दीर्घकाळाच्या दृष्टीने पाहिल्यास आणखी मोठे बदल येत्या काळात होऊ शकतात, असा विश्वास प्रो. अबो चाडी यांना आहे.
"अशीही शक्यता आहे की, बहुतेक युरोपियन देशांमध्ये येत्या काळात अति उजवे पक्ष त्या देशातील प्रमुख पक्ष ठरतील. काही ठिकाणी तर ते सत्तेतही आहेत," असे ते म्हणाले.
एएफडीसारख्या पक्षांनी लोकांच्या नजरेत स्वतःला सामान्य बनवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत.
जर्मनी आणि युरोपमध्ये असे काही लोक आहेत जे अति उजव्या पक्षाला लोकशाही विरोधी शक्ती मानतात. परंतु हे स्पष्ट आहे की, आपला पक्ष सामान्य आहे, हे सिद्ध करण्यासाठी ते खूपच प्रयत्न करत आहेत. विशेषतः त्यांना तरुणांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करायचं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)