'मुसोलिनी एक चांगला राजकारणी', असं म्हणणाऱ्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींचा राजकीय प्रवास

    • Author, पॉल किर्बी
    • Role, बीबीसी न्यूज

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या जगभरातील सर्वांत प्रसिद्ध राजकारण्यांपैकी एक आहेत.

सध्या G-7 गटाची परिषद सुरू आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारणावर महत्त्वपूर्ण चर्चा होत आहे.

या निमित्ताने जॉर्जिया मेलोनी कोण आहेत आणि त्यांचा राजकीय क्षितिजावर कसा उदय झाला यावर बीबीसी न्यूजने 2022 मध्ये ही बातमी लिहिली होती. त्यांची ओळख करुन देणारा हा लेख या ठिकाणी देत आहोत.

मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. त्यांचा पंतप्रधानांपर्यंतचा प्रवास हा तसा अभूतपूर्व मानला जातोय.

2012मध्ये स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन करून अवघ्या 10 वर्षांत म्हणजे 2022मध्ये त्या पंतप्रधानपदी पोहोचल्या आहेत.

कॉलेजमध्ये शिकत असतानाच मेलोनी यांनी राजकारणात उडी घेतली.

तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवास नेतृत्वाच्या पातळीवर यशस्वी ठरला आणि त्या यशाचं शिखर गाठत राहिल्या.

आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर आईने वाढवलेल्या मेलोनी यांचा आजवरचा प्रवास कसा होता, हे आपण या लेखातून जाणून घेऊयात. पण त्याआधी त्यांचं बालपण आणि त्यांचा उजव्या विचारसरणीकडचा प्रवास समजून घेऊ.

डाव्या विचारांचा प्रभाव असलेल्या वस्तीत जन्म

5 जानेवारी 1977 रोजी दक्षिण रोममधील गार्बॅटेला या भागात जॉर्जिया यांचा जन्म झाला.

रोममधील मोठा कामगार वर्ग या भागात राहतो. त्यामुळे याठिकाणी पारंपारिकपणे डाव्या विचारांच्या पक्षाचा प्रभाव राहिला आहे.

आजही इथे जॉर्जिया मेलोनींच्या पक्षाला फार मतं मिळत नाहीत.

कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांपासून इटालियन सामाजिक चळवळीच्या (Italian Social Movement) युवा शाखेकडे तरुण जॉर्जिया वळल्या.

बेनिटो मुसोलिनीच्या अस्तानंतर म्हणजे 1946मध्ये इटलीमधील फॅसिस्ट विचारसरणीच्या काही नेत्यांनी एकत्र येऊन ही चळवळ सुरू केली होती.

वयाच्या 19 व्या वर्षी म्हणजे 1996मध्ये नॅशनल अलायन्स पक्षाच्या कार्यकर्त्या या नात्याने जॉर्जिया यांच्यावर एक व्हीडिओ रिपोर्ट केला होता.

फ्रान्सच्या एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं होतं. त्यानंतर त्या प्रकाशझोतातही आल्या होत्या.

1996मध्ये प्रसिद्ध झालेल्या या व्हीहिओमध्ये जॉर्जिया यांची आईही दिसते. पण आपण मुलीला उजव्या विचारसरणीकडे झुकण्यास उद्युक्त करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचं आई तेव्हा सागंते.

मुसोलिनी यांच्या काळात सुरू झालेल्या इटालियन सामाजिक चळवळीचं पुढे नॅशनल अलायन्स पक्षातमध्ये रूपांतर झालं. तिथंही जॉर्जिया यांनी विद्यार्थी शाखेचं नेतृत्व केलं होतं.

वयाच्या 11 व्या वर्षी जॉर्जिया यांनी जे. आर. आर. टॉल्कीनचे फॅन्टसी क्लासिक ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ ही पुस्तके वाचली होती.

एवढंच नाही तर या पुस्तकात वर्णन केलेल्या हॉबिटप्रमाणे कपडे घालायला त्यांना आवडायचं.

त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरही या पुस्तकांचा प्रभाव पडला आहे.

2008 मध्ये जेव्हा त्या युवा मंत्री झाल्या तेव्हा त्यांनी टॉल्कीनच्या पुस्तकातील पाच जादूगारांपैकी एक असलेल्या गँडाल्फच्या पुतळ्याजवळ एका मासिकासाठी पोझ दिली होती.

मेलोनी यांनी त्यांच्या एका निवडणूक प्रचारसभेत टॉल्कीन युद्धाच्या भाषणाचा संदर्भ दिला होता.

"मला वाटतं की टॉल्कीन आपल्यापेक्षा अधिक चांगलं बोलू शकतात, ज्यावर पुराणमतवादी विश्वास ठेवू शकतील," अंस त्यांनी अलीकडेच न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

नशिबाने साथ दिली आणि पंतप्रधानपद मिळवलं

जॉर्जिया मेलोनी कॉलेज जीवनापासून राजकीय कार्यकर्त्या म्हणून सक्रिय राहिल्या आहेत.

रोममधील नॅशनल अलायन्स पक्षातील युवा मोर्चाची कार्यकर्त्या म्हणून मलोनी यांनी पहिल्यांदा सक्रीय राजाकारणात उडी घेतली. पण पुढे जाऊन त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला.

सप्टेंबर 2022मध्ये वयाच्या 45 व्या वर्षी त्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधानाचा पदभार हाती घेतला तेव्हा त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाला सर्वाधिक मते मिळाली होती.

पण त्यांच्या सरकारमध्ये केवळ चार महिलांना मंत्रिपद देण्यात आलं होतं, यावरून मात्र त्यांना टीकेला सामोरं जाव लागलं होतं.

तसं पाहायला गेलं तर नशिबाने साथ दिल्यामुळे मेलोनी आज इटलीच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचल्या आहेत.

कारण, फेब्रुवारी 2021मध्ये इटलीमध्ये मारियो द्राघीच्या यांचं सरकार स्थापन झालं, तेव्हा जॉर्जिया मेलोनी यांना युनिटी सरकारमध्ये सामील होऊन मंत्रिपद घेण्याची संधी होती.

पण तेव्हा मेलोनी आणि त्यांच्या ब्रदर्स ऑफ इटली पक्षाने मात्र विरोधकाची भूमिका साकरण्याचा निर्णय घेतला.

तेव्हा इतर पक्षांनी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पण एकट्या मेलोनी यांनी कट्टर विरोधकाची भूमिका बजावली.

शेवटी त्यांना त्याचं फळ मिळालं आणि त्या 2022मध्ये देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. त्याही कट्टर उजव्या विचारसरणी असलेल्या पक्षातून.

मेलोनी यांनी त्यांनीच स्थापन केलेल्या ब्रदर्स ऑफ इटली (Fratelli d'ITALIA) पक्षाचं तब्बल 10 वर्षं नेतृत्व केलं आहे.

तर 2008 ते 11 मध्ये बर्लुस्कोनी यांच्या सरकारमध्ये इटलीच्या सर्वांत तरुण मंत्री म्हणून कामही केलं आहे.

सप्टेंबर 2022च्या निवडणुकीनंतर त्या पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांच्या पक्षाला 26% मतांसह विजय मिळाला होता. पण त्याआधीच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला केवळ 4.3% मतदान झालं होतं.

2022मध्ये त्यांचा विजय निश्चित झाला तेव्हा त्यांनी जनतेला उद्देशून एक भाषण केलं होतं.

“इटलीच्या नागरिकांनी उजव्या विचारसरणीच्या ब्रदर्स ऑफ इटली पक्षाला स्पष्ट संकेत दिले आहेत,” असं म्हणत यापुढे इटलीत उजव्या विचारसरणीचं राजकीय, सामाजिक आणि आर्थिक धोरण राबवलं जाणार असल्याचं जाहीर केलं.

मेलोनी यांनी माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांच्या अतिउजव्या लीगमधील आणि उजव्या पक्षातील तिच्या इतर मित्र पक्षांना एकत्र करत देशात एक मजबूत सरकार स्थापन केलं आहे.

जून 2021मध्ये त्यांनी स्पेनमध्ये एक भाषण केलं होतं. तेव्हा त्यांच्या राजकीय विचारांची झलक मिळाली होती.

"नैसर्गिक कुटुंबाचा पुरस्कार करा, LGBT लॉबीचा नाही, इस्लामी हिंसाचाराचा धिक्कार करा, आपल्या सीमा सुरक्षित करा. बेसुमार स्थलांतराचा विरोध करा,” असे मुद्दे त्यांच्या भाषणात होते.

त्यांच्या कॅबिनेटमध्ये कुटुंब नियोजनमंत्री आहेत त्यांचं नाव आहे, युजेनिया रोसेलाला. या मंत्र्याचा गर्भपाताला आणि समलिंगी पालकांसाठी तीव्र विरोध आहे. तसंच त्यांना याआधी दिलेले अधिकार रद्द करण्याची धमकीच दिली होती.

पण सत्तेत आल्यानंतर मेलोनी यांनी ‘सर्वांसाठी प्रशासन’ (governance for everyone) असा नारा दिला होता.

याशिवाय आपल्या युरोपसोबतच्या परराष्ट्र धोरणात कोणताही बदल होणार नाही, अशीही हमी दिली होती.

पण त्यांच्या सरकारमध्ये मॅटेओ साल्विनी आणि सिल्व्हियो बर्लुस्कोनी दोन नेते आहेत. ते दोघेही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रशंसक आहेत. त्यामुळे युतीचं सरकार चालवताना मेलोनी त्यांना किती मोकळीक देतील की नाही या गोष्टीकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष होते.

"जॉर्जिया मेलोनी या अति-उजव्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आल्या आहेत. पण अलीकडेच त्यांनी अतिशय संयमी भूमिका घेतल्याचं दिसत आहे. युक्रेनबद्दल आधीच्या सरकारने घेतलेलं धोरण बदलणार नाही," त्यांनी स्पष्ट केलं होतं.

त्यामुळे सरकारमध्ये रशियाधार्जिणी नेते असतानाही मवाळ भूमिका घेणं महत्त्वाची गोष्ट मानलं गेलं.

याविषयी इटलीच्या राजकारणाचे अभ्यासक प्रा. रॉबर्टो डी'अलिमोंटे यांनी बीबीसीला सांगितले की, "युतीच्या सरकारमध्ये आपणच पतंप्रधानपदाचे भक्कम दावेदार कसे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी आपली भूमिका काही प्रमाणात मवाळ केली आहे."

गोष्ट मेलोनींनी स्थापन केलेल्या पक्षाची

मोठी राजकीय महत्त्वकांक्षा असलेल्या जॉर्जिया यांनी डिसेंबर 2012च्या हिवाळ्यात त्यांनी ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाची स्थापना केली.

तेव्हा आपल्या पक्षाचा मुसोलिनी यांच्या फॅसिझमसोबत काहीही संबंध नसल्याचं जाहीर केलं होतं. पण त्यांच्या पक्षाचे काही सदस्य मुसोलिनीसाठी आजही कँडल मार्च काढतात.

मुसोलिनीच्या समाधीवर जाऊन श्रद्धांजली वाहतात. तसंच मुसोलिनीच्या पक्षाच्या चिन्हाप्रमाणे मेलोनी यांच्या पक्षाच्या झेंड्यात ज्योतीचं चिन्ह आहे.

मेलोनी सरकारच्या सिनेटचे सभागृह अध्यक्ष इग्नाझियो ला रुसा यांना फॅसिस्ट स्मृतीचिन्ह गोळा करण्याचा छंद आहे. याशिवाय त्यांच्या भावाचं निधन झालं तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्कारात इग्नाझियो यांनी फॅसिस्ट सलामी देताना दिसले होते.

प्रा. डी'अलिमॉन्टे यांच्या मते, "पक्षाच्या विचारधारेचा गाभा अजूनही उजवा आहे. पण मेलोनी यांना पाठिंबा देणारे नवीन मतदार त्याच विचारधारेचे नाहीयेत.

पक्षाला आणखी लोकाभिमुख करायचं असेल तर मेलोनी आणि त्याच्या सहयोगी नेत्यांना मधला मार्ग स्वीकारावा लागणार आहे.

सध्या इटलीमध्ये समलिंगी जोडप्यांना इतर अनेक युरोपीय देशांपेक्षा कमी अधिकार आहेत. तशाप्रकारचे कायदे रद्द करण्याची मेलोनी यांची कोणतीही योजना नाहीये.

मात्र LGBT जोडप्यांनी मुलांना दत्तक घेण्याला आणि या समुदायाने सरोगसीचा वापर करण्याला ठाम विरोध आहे.