मीराबाई चानू : वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं रौप्य, बांबूने सराव करून गाठले यशाचे शिखर

भारताची स्टार वेटलिफ्टर खेळाडू मीराबाई चानूने वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं आहे. 48 किलो वजनी गटात तिनं ही कामगिरी केली.

याआधी मीराबाई चानूने 2017 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड आणि 2022 मध्ये सिल्व्हर मेडल आपल्या नावावर केलं होतं.

मीराबाईने एकूण 199 किलो वजन उचललं. तिने स्नॅचमध्ये 84 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलून सिल्व्हर मेडल जिंकलं.

याच वर्षी ऑगस्ट महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मीराबाईने गोल्ड मेडल जिंकलं होतं.

मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्येही सिल्व्हर मेडल आपल्या नावे केलं होतं.

सलग दोन वर्षे ती 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इअर'ची विजेती राहिलेली आहे. तिने 2021 आणि 2022 मध्ये बीबीसीचा हा पुरस्कार जिंकला होता.

कॉमनवेल्थमध्ये पटकावलं सुवर्णपदक

मीराबाई चानूने 2018 मध्ये इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं होतं.

त्यावेळी चानू सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाने खेळताना दिसली होती. तिने एकूण 201 किलो वजन उचललं होतं. तिने स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलले. ती क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलताना दिसली. या प्रकारात तिने विक्रम केला होता.

तिने पहिल्याच प्रयत्नात 84 किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात 88 किलो वजन उचलून वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली होती.

त्याच वर्षी मीराबाई चानूनं 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर' या पुरस्कारावरही आपलं नाव कोरलं होतं.

टोकिया ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदकावर नाव कोरलं होतं. महिलांच्या 49 किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच प्रकारात 87 तर क्लिन अँड जर्क प्रकारात 115 किलो वजन उचललं होतं.

टोकियोत कोरोना नियमावलीचं पालन करत ऑलिम्पिक स्पर्धेचं उदघाटन झालं होतं. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन भारताचं 28 सदस्यीय पथक सोहळ्यात सहभागी झालं होतं.

सलामीच्या दिवशी मीराबाईने रौप्यपदकावर नाव कोरत भारताला दमदार सुरुवात करून दिली होती. त्यापूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाईला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. तो कटू अनुभव, दुखापती हे अडथळे बाजूला सारत मीराबाईने पदकाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं.

"पदक पटकावल्याने प्रचंड आनंद झाला आहे. संपूर्ण देश माझा सामना पाहत होता. देशवासीयांच्या अपेक्षा माझ्यावर केंद्रित झाल्या होत्या. मी थोडीशी दडपणात होते. पण सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा निर्धार मी केला होता. या पदकासाठी मी अविरत मेहनत घेतली आहे.

सुवर्णपदकावर नाव कोरण्याचा कसोशीने प्रयत्न केला. सुवर्णपदक जिंकू शकले नाही. पण मी सगळे प्रयत्न केले. मी दुसऱ्यांदा वजन उचललं तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं पदक पक्कं झालं", अशा शब्दात मीराबाईने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

26 वर्षं वयाच्या आणि 4 फूट 11 इंच उंचीच्या मीराबाई चानूनं ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ स्पर्धेतही भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं.

स्नॅच राऊंडमध्ये 80, 84 आणि 86 किलो वजन उचलत मीराबाईने देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं. यासोबतच तिने स्वत:चा विक्रम मोडला होता.

यानंतर क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये तिने 103 किलोग्राम वजन उचललं होतं. त्यानंतर मात्र मीराबाईने मागील कॉमनवेल्थ स्पर्धेचा 103 किलोग्राम वजन उचलण्याचा स्वत:चा विक्रम मोडीत काढत 107 किलोग्राम वजन उचललं. तिसऱ्यांदा मीराबाईंने 110 किलोग्राम वजन उचलत इतरांपेक्षा 13 किलोग्राम अधिक वजन उचलत बढत मिळवली होती.

दुसऱ्या स्थानावर मॉरिशिसची मारिया हानिट्रा रोलिया आहेत. ज्यांनी 170 किलो इतकं वजन उचललं होतं.

बांबू वापरून वेटलिफ्टिंगचा सराव

8 ऑगस्ट 1994 ला मणिपूर इथल्या छोट्या गावात मीराबाईचा जन्म झाला.

इंफाळपासून तिचं गाव 200 किलोमीटर दूर होतं. त्याकाळी मणिपूरच्याच महिला वेटलिफ्टर कुंजुरानी देवी स्टार होत्या आणि अथेन्स ऑलिम्पिकसाठी खेळायला गेल्या होत्या.

त्यांचा आदर्श मीराबाईने घेतला आणि सहा भावंडांत सर्वांत छोटी असलेल्या मीराबाईने वेटलिफेटर बनण्याचा निश्चय केला.

मीराबाईंच्या जिद्दीपुढे आई-वडिलांनाही माघार घ्यावी लागली. 2007मध्ये त्यांनी सराव सुरू केला तेव्हा लोखंडाचा बार नसल्यानं ती बांबूच्या बारनं सराव करत असे.

गावात प्रशिक्षण केंद्र नसल्यानं सरावासाठी तिला 50-60 किलोमीटर दूर जावं लागायचं. जेवणात चिकन आणि अंडी लागायची. पण सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मीराबाईला तेही शक्य नव्हतं. पण यामुळे मीराबाई थांबली नाही.

वयाच्या 11व्या वर्षी मीराबाई अंडर 15 चॅम्पियन होती आणि 17व्या वर्षी ज्युनियर चॅम्पियन. ज्या कुंजुरानी यांना बघत मीराबाईच्या मनात चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जागृत झालं त्याच कुंजुरानी यांचा 12 वर्षं जुना विक्रम मीराबाईने मोडीत काढला. 192 किलो वजन उचलून.

असं असलं तरी प्रवास सोपा नव्हता. कारण मीराबाईच्या आई-वडिलांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र न झाल्यास खेळ सोडावा लागेल, अशी परिस्थिती उद्भवली होती.

पण ही वेळ आली नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिप सोडून मीराबाईने ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं होतं.

वेटलिफ्टिंगशिवाय मीराबाईला डान्स करायला आवडतो. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, "सरावानंतर कधीकधी मी खोलीचं दार बंद करून डान्स करते आणि मला सलमान खान आवडतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)