आई वडिलांना चष्मा असेल तर त्यांच्या मुलांनाही लहान वयातच चष्मा लागतो का?

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

डॉक्टर आमच्या मुलांना चष्मा तर लागणार नाही ना? आम्हा दोघांना लहानपणापासून चष्मे आहेत, आता आमच्या मुलालाही लहान वयातच चष्मा लागणार नाही ना? अशी भीती पालक नेहमी व्यक्त करत असतात.

आपले डोळे आणि मुलांचे डोळे याबद्दल सतत चिंता व्यक्त होत असते. मात्र त्याबद्दल वेळीच पावलं उचलली जात नाहीत. मुलांच्या डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी त्यांच्या अगदी सुरुवातीपासून प्रयत्न करावे लागतात.

चुकीची जीवनशैली अंगिकारल्यास हा धोका वाढतो. फक्त चष्मा लागण्यापुरता ही भीती राहात नाही तर दृष्टीवर दीर्घकाळ परिणाम होण्याचीही शक्यता असते.

गेल्या अनेक वर्षांत लहान मुलांमध्ये चष्मा लागण्याचं प्रमाण वाढलं आहे. प्रत्येक देशांनी याचा अनुभव घेतला आहे. 1980 ते 1990 या काळात एका चिमुकल्या देशात मात्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.

हा देश भराभर प्रगती करत होता. नव्या पिढीला शिक्षणाची दारं उघडी होऊन भराभर विकास होत होता, प्रगती होत होती. परंतु एक गोष्ट मात्र चिंताजनक होती ती म्हणजे दिवसेंदिवस मुलांना मायोपियाचं निदान होत होतं.

लांबचं न दिसण्याचा हा त्रास वाढतच होता. आणि कोणालाच काही करता येत नव्हतं. या चिमुकल्या देशाचं नाव आहे सिंगापूर. सिंगापूरमधील आज प्रौढांमध्ये 80 टक्के लोकांना मायोपिया असल्याचं दिसतं.

सिंगापूर नॅशनल आय सेंटरचे वरिष्ठ कन्सल्टंट ऑड्री चिया 2022 मध्ये म्हणाले होते, "आम्ही या प्रश्नाशी 20 वर्षे झगडत आहोत आणि थिजून गेलो आहोत. सिंगापूरमध्ये जवळपास प्रत्येकजण मायोपिक आहे."

हीच परिस्थिती आता जगभरात सर्वत्र दिसत आहे. अमेरिका आणि युनायटेड किंग्डमसारख्या प्रगत मानल्या देशांमध्य़े हे प्रमाण जास्त आहे तसंच ते भारतामध्येही आहे.

अमेरिकेत 1971 साली 25 टक्के प्रौढांना मायोपिया असल्याचं निदान झालं होतं. तो आकडा आता 40 टक्क्यांवर गेला आहे. अशीच स्थिती युनायटेड किंग्डममध्येही आहे. दक्षिण कोरिया, चीन आणि तैवानमध्ये ही स्थिती त्याहून भयंकर झाली आहे. अशीच गती राहिली तर जगातील अर्धी लोकसंख्या 2050 साली मायोपियाग्रस्त असेल. ही गती दरवर्षी वेगानं वाढतच आहे असं दिसून येतंय.

चिया सांगतात, चीनमध्ये मायोपिया अतिशय नाट्यमयरित्या वाढला आहे. शाळेत जाणाऱ्या मोठ्या मुलांपैकी 76 ते 90 टक्के मुलांना मायोपिया असल्याचं ते सांगतात.

वरकरणी मायोपिया हा लहानसा आजार वाटू शकतो. याला काय चष्मा वापरला की झालं असं वाटू शकतं. पण तज्ज्ञ सांगतात मायोपियाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, दृष्टी जाणं किंवा कायमचं अंधत्व येण्याचं ते एक कारण बनू शकतं.

मायोपिया कसा ओळखायचा?

आता आपल्या मुलाला मायोपिया आहे हे वेळीच ओळखणं अत्यंत आवश्यक असतं. कारण वेळीच डॉक्टरांकडे जाऊन मुलांची तपासणी होणं गरजेचं असतं.

तसं झालं तर मुलांच्या प्रगतीमधला अडथळाही वेळीच बाजूला करता येतो. प्रिमॅच्युअर बेबीजच्या पालकांनी तर याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे.

मायोपियाची लक्षणं साधारणतः 6 ते 13 या वयोगटातल्या मुलांमध्य़े दिसतात. ही लक्षणं त्याहून लहान मुलांमध्येही दिसतात आणि प्रौढ व्यक्तींमध्येही दिसतात.

  • या लक्षणांमध्ये मुलांना वाचताना अडथळे येताना दिसून येतं
  • विशेषतः शाळेमध्ये फळ्यावर लिहिलेलं वाचताना मुलांना त्रास होतं.
  • ही मुलं टीव्ही, कॉम्प्युटरच्या जवळ जाऊन बसतात, फोन अगदी डोळ्यांजवळ धरुन वापरतात.
  • या व्यक्तींचं डोकंही वारंवार दुखायला लागतं.
  • मायोपियाचा त्रास असलेली मुलं वारंवार डोळे चोळतात.

जर याकडे लक्ष दिलं नाही तर काही वर्षांमध्ये याचा त्रास वाढतो आणि नवी गुंतागुंत निर्माण होते.

मायोपिया होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. यातील महत्त्वाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे प्रिमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे मुदतीपूर्वी प्रसुतीत जन्मलेल्या बाळांना याचा धोका जास्त असतो. तसेच अगदी जवळून करायची कामं गेल्या काही वर्षात वाढली आहेत. अशी कामं करणाऱ्यांना मायोपिया होतो.

घराबाहेरची कामं, वावर कमी होणं हे सुद्धा याचं एक कारण आहे. घरातच, अंधाऱ्या जागी राहाणं, अंधाऱ्या जागेत काम करणं, डिजिटल यंत्रांचा वापर जास्त वाढणं हे सुद्धा त्याचं एक कारण आहे.

मायोपियाबद्दल समज आणि गैरसमज

मायोपिया या दृष्टीदोषाची माहिती असली तरी समाजामध्ये याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. याबद्दल आम्ही एएसजी आय हॉस्पिटलचे ग्रुप सीओओ डॉ. विकास जैन यांच्याशी संपर्क केला. त्यांनी मायोपियाबद्दल असणाऱ्या अनेक शंकांची उत्तरं दिली.

भरपूर मायोपिया असेल तर लग्न करू नये किंवा मुलं होऊ देऊ नयेत?

डॉ. विकास जैन सांगतात, याला कोणताही वैद्यकीय आधार नाही. मायोपिया गंभीर असेल तर त्याचा डोळ्यांच्या समस्यांवर परिणाम होतो. पण त्याचा विवाहाशी, मूल होण्याशी किंवा मुलांना वाढवण्याशी काही संबंध नाही.

आईवडिलांना मायोपिया असेल तर त्यांच्या मुलांना मायोपिया होण्याचा धोका असतो मात्र वेळीच डोळ्यांची तपासणी, दररोज मोकळ्या हवेत खेळणं, बाहेर जाणं तसेच डोळ्यांची काळजी घेतली तर त्यांना मायोपिया होण्याचा धोका टळू शकतो किंवा लांबवू शकतो.

चष्मा वापरल्यामुळे मायोपिया अधिक गंभीर होतो?

हा एक मोठा आणि सतत विचारला जाणारा प्रश्न आहे असं डॉ. विकास जैन सांगतात. ते म्हणतात, चष्म्यामुळे मायोपिया गंभीर होत नाही. पण चष्मा न वापरल्यामुळे डोळ्यावरचा ताण वाढू शकतो, धूसर दिसू लागते. तसेच अंँब्लोपिया होऊ शकतो. शाळेत मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो.

वय वाढेल तसा मायोपिया गंभीर होत जातो?

डॉ. विकास जैन सांगतात, बहुतांश लोकांच्याबाबतीत मायोपिया लहान वयात सुरू होऊन तो विशीच्या सुरुवातीला स्थिर होतो.

अर्थात काही लोकांमध्ये अतिरिक्त स्क्रीनवापर आणि हायमायोपियामुळे तो प्रौढावस्थेच्या सुरुवातीला वाढू शकतो. डॉक्टरांच्या मदतीने योग्य उपचार, शिस्त पाळल्यामुळे त्याची वाढ संथ करता येते. मायोपिया कंट्रोल ग्लासेसमुळे मायोपियाची वाढ संथ करण्यास मदत होते.

मायोपिया अनुवंशिक आहे का?

हा प्रश्न आम्ही डॉ. मिनल कान्हेरे यांना विचारला. डॉ. मिनल या कॉर्निया, मोतिबिंदू आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आहेत. त्या चेंबूरमधील डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलच्या आयुष आय क्लिनिकमध्ये कार्यरत आहेत,

डॉ. मिनल कान्हेरे सांगतात. "डोळ्यांचा मायोपिया किंवा दूरदृष्टीदोष हा रिफ्रॅक्टिव्ह एररचा प्रकार आहे. बुब्बुळाचा आकार ताणला जाणे किंवा त्याच्या वक्रतेत बदल झाल्यामुळे यामुळे अंधुक दिसू लागते. या दोषात अनुवांशिकतेचा वाटा सुमारे 60 ते 90 टक्क्यांपर्यंत असतो."

त्या पुढे सांगतात, "दोन्ही पालकांना मायोपिया असल्यास धोका अधिक वाढतो. पण केवळ अनुवांशिकतेमुळेच नाही तर मोबाइल, संगणक यांसारख्या डिजिटल स्क्रीनकडे जास्त वेळ पाहणे आणि बाहेर कमी वेळ घालवणे यांसारखे जीवनशैलीशी संबंधित घटक मायोपिया निर्माण होण्यास आणि वाढण्यास कारणीभूत ठरतात.

थोडक्यात सांगायचे झाले तर अनुवांशिक मायोपिया पालकांकडून मिळतो. पण त्याचा विकास आणि वाढ जीवनशैली व पर्यावरणीय घटकांवर अवलंबून असते."

मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे कन्सल्टंट ऑप्थॅलमॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. जान्हवी मेहता यांचंही आम्ही मत विचारलं.

त्या म्हणाल्या, "अनुवंशिकतेचा मायोपियात वाटा असतो. पण ते एकमेव कारण वाही. पालकांपैकी एकाला किंवा दोघांनाही मायोपिया असेल तर मुलाला मायोपिया होण्याचा धोका वाढतो. पण सध्याच्या नवीन अभ्यासांतून जीवनशैलीविषयक घटकांचा याच्याशी जास्त संबंध असल्याचं दिसून आलं आहे."

डॉ. मेहता सांगतात, "घराबाहेर कमी जाणं, बाहेर कमी खेळणं, डोळ्यांना विश्रांती न देणं अशा घटकांमुळे मुलांमध्ये मायोपियाचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. इतकंच नाही तर घराबाहेर मोकळ्या जागेत दिवसभरात एक दोन तास घालवण्यानं मायोपियाचा धोका कमी झाल्याचं दिसलं आहे."

त्या पुढे म्हणतात, "सोप्या शब्दात सांगायचं तर जनुकं मायोपियाची गोळी बंदुकीत भरतात मात्र या बंदुकीचा चाप इतर कारणांमुळे ओढला जातो. मुलांनी दररोज घराबाहेर एक ते दोन तास खेळल्यास मायोपिया दूर ठेवता येईल."

मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य कसे राखायचे?

डॉ. जान्हवी मेहता सांगतात, मुलांची दृष्टी टिकून राहावी यासाठी पालक नक्कीच चांगली भूमिका बजावू शकतात. त्या काही उपायही सुचवतात.

त्या म्हणाल्या, "स्क्रीन टाइम कमी करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. विशेषतः 5 वर्षांच्या आतील मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित असलाच पाहिजे. प्रत्येक काम करताना दर 20 मिनिटांनी 20 फूट दूर अंतरावरील दृश्याकडे 20 सेकंद दृष्टी नेली पाहिजे.

हा नियम पाळल्यास डोळ्यांना आराम पडतो. दररोज एक ते दोन तास घराबाहेर खेळणं आवश्यक आहे. वाचताना योग्य पुरेसा उजेड आहे का हे पाहावे, सर्व प्रकारच्या स्क्रीन्स आणि पुस्तकं डोळ्यांपासून 30 ते 40 सेंटीमिटर अंतरावर ठेवावीत. तसेच झोपून वाचू नये. डोळ्यांची तपासणी नियमित करुन घ्या."

डॉ. कान्हेरे सांगतात की, "मुलांच्या वाढीच्या काळात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवणे हे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी आवश्यक ठरते. त्यामुळे विकासाच्या या टप्प्यात तरी पालकांनी मुलांच्या दृष्टीचे रक्षण करण्यासाठी काही व्यवहार्य पावले उचलली पाहिजेत."

मुलांच्या डोळ्यांच्या तपासणीबाबत डॉ. कान्हेरे म्हणाल्या की, "मुलाला दर सहा महिन्यांनी तरी नेत्रतज्ज्ञाकडे नेऊन डोळ्यांची तपासणी करून घ्या. यामुळे चष्म्याचा योग्य नंबर ठरवता येतो, वर्षागणिक नंबर किती वाढतो आहे ते लक्षात ठेवता येते आणि डोळ्यांचे इतर कोणते विकार आहेत का ते तपासता येते. लक्षात ठेवा, फक्त चष्म्याचा नंबर तपासण्यासाठी मुलाला ऑप्टिशियनकडे नेणे हितकारक नाही."

याबरोबरच काही चांगल्या सवयीही घरामध्ये सुरू केल्या पाहिजेत. डोळ्यांची नीट काळजी घेणं, सतत एकच काम करत असाल तर अध्येमध्ये डोळ्यांना विश्रांती देणं. घरात पुरेसा उजेड असणं, आवश्यक असेल तर चष्मा वापरणं असे बदल करू शकतो.

मुलांना डोळ्यांची काळजी कशी घ्यायची ते शिकवता येईल, हात धुणे, संसर्ग टाळणे यासाठी आवश्यक बदल करता येतील. डोळे किंवा दृष्टीसंदर्भातील त्रास असणाऱ्या मुलांना भावनिक पाठबळ, धीर देणंही गरजेचं असतं.

मुलांकडे असं लक्ष द्या

मुलांना मायोपिया होण्याआधीच त्यांच्या वर्तनाकडे कसं लक्ष द्यायचं याबद्दल डॉ. मिनल कान्हेरे माहिती देतात.

त्यांनी काही उपाय सांगितले आहेत. ते पुढीलप्रमाणे

  • मुलाच्या शालेय प्रगतीवर लक्ष ठेवा आणि शिक्षकांच्या संपर्कात राहा. यामुळे डोळ्यांचा नंबर वाढल्यासारख्या समस्या लवकर ओळखता येतात आणि वेळेवर उपचार करता येतात.
  • घरात पालकांच्या लक्षात न येणाऱ्या अडचणी शाळेत दिसून येऊ शकतात. अभ्यासात मागे राहणे हे डोळ्यांच्या समस्येचे लक्षण असू शकते. यासाठी तपासणी आवश्यक करून पुढील उपचार आवश्यक असू शकतात.
  • मुलाच्या डोळ्यांच्या दिसण्यात काही बदल जाणवल्यास त्याकडे बारकाईने लक्ष द्या. डोळे वाकडे दिसणे (तिरळेपण) यासारख्या समस्या फक्त निरीक्षणातून ओळखता येतात. डोके वाकवून बघणे, डोळे बारीक करून किंवा चोळून बघणे, वस्तू खूप जवळ धरुन वाचणे किंवा टीव्हीजवळ जाऊन बसणे ही सर्व लक्षणे डोळ्यांचा नंबर वाढल्याची चिन्हे असू शकतात. अशा वेळी लगेच तपासणी करून योग्य उपचार करणे आवश्यक आहे, नाहीतर 'लेझी आय' म्हणजेच 'अॅम्ब्लायोपिया' होण्याचा धोका वाढतो.

डॉ. जान्हवी मेहता याबद्दल सांगतात की, "भारतात काही आधुनिक साधनांद्वारे मायोपियाचं निदान लवकर व्हावं आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मदत होत आहे. काही साधनांद्वारे अगदी 3 वर्षे वयाच्या मुलांमधील मायोपियाची लक्षणं समजतील अशी साधनं उपलब्ध आहेत. काही डोळ्यांचे ड्रॉप्स, विशेष मायोपिया कंट्रोल लेन्स, नाइट टाइम लेन्सेस यामुळे निदान लवकर करण्यास मदत होते."

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांची आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.