यती नरसिंहानंद कोण आहेत? अमरावतीत त्यांच्या वक्तव्यामुळे दगडफेक का झाली?

धर्मगुरु यती नरसिंहानंद

फोटो स्रोत, @bulandshahrpol

फोटो कॅप्शन, धर्मगुरु यती नरसिंहानंद
    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

उत्तर प्रदेशातील यती नरसिंह आनंद सरस्वती यांनी विशिष्ट धर्मा विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद अमरावतीत उमटले. या वक्तव्याच्या निषेधार्थ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यात जमलेल्या जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली.

रात्रीच्या वेळी शेकडो लोकांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यामुळे, अमरावतीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

घटनेत पोलीस स्टेशनचं नुकसान झालं असून, पोलीस व्हॅनसह दुचाकीचेही नुकसान झाले आहे. दगडफेकीत काही पोलिस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तर नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मध्यरात्री 12 नंतर इथली परिस्थिती नियंत्रणात आली.

अमरावती

जवळपास 400 ते 500 लोकांचा जमाव नागपुरी गेटकडं चालून आला होता. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

शुक्रवारी (4 ऑक्टोबर) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच पोलीस आयुक्त नरेशचंद्र रेड्डी यांनी या परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विशिष्ट समाजातील नागरिक नागपुरी पोलीस स्टेशनला दाखल झाले होते.

दरम्यान, जमावातील काही युवकांनी अचानक पोलीस ठाण्याबाहेर येऊन दगडफेक करायला सुरवात केली.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्याने जमाव आक्रमक झाला, आणि त्यांनी दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेत पोलीस स्टेशनते नुकसान झाले आहे. मध्यरात्री 12 नंतर काहीशी परिस्थिती आली नियंत्रणात आली आहे.

अमरावती शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका शांतता राखा असं आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केलं आहे.

1200 लोकांवर गुन्हे दाखल

नागपूरी गेट पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या जमावातील एकूण 1200 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दगडफेक, पोलिसांना मारहाण करणे, पोलीस ठाण्याची तोडफोड करणे, पोलीस व्हॅन फोडणे प्रकरणी पोलिसांकडून गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

गुन्हे दाखल झालेल्यापैकी 26 जणांची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांच पथक रवाना झालय.

पोलीस ठाण्यावर झालेल्या दगडफेकीत 21 पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, 10 पोलीस व्हॅनची तोडफोड झाली आहे.

नागपुरी पोलीस स्टेशन

अफवांवर विश्वास ठेवू नये

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी म्हणाले की, "काही संघटनांचे लोक उत्तर प्रदेशातल्या यती नरसिंह आनंद सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी घेऊन आले होते. एकूण चारशे ते पाचशे लोक रात्री आठ ते सव्वा आठच्या सुमारास पोलीस ठाण्यात आले होते.

पोलिसांनी त्यांना सांगितलं की आधीच एक तक्रार यासंदर्भात दाखल करण्यात आली आहे आणि त्यावर कारवाई सुरु आहे. पोलिसांनी सुरुवातीला या जमावाला समजावून परत पाठवलं होतं. पण नंतर आम्हाला समजलं की त्यातील काही लोकांनी व्हिडिओ व्हायरल करून जमाव गोळा केला. आणि हा जमाव पोलीस ठाण्यावर चालून आला."

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी
फोटो कॅप्शन, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी

रेड्डी म्हणाले की, "पोलिसांनी जमावाला परत जाण्याची विनंती केली पण जमावाने पोलिसांवरच दगडफेक सुरु केली. यामुळे परिसरात जाळपोळ सुरु झाली. त्याही परिस्थितीत सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त आणि कर्मचाऱ्यांनी संयम ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यात आम्हाला यश आलं आहे. या प्रकरणी आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत. हिंसक जमावावर कारवाई करत आहोत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अमरावतीमध्ये सध्या शांतता आहे."

कोण आहेत यती नरसिंहानंद?

यती नरसिंहानंद सरस्वती गाझियाबाद जिल्ह्यातील डासना गावातील देवी मंदिराचे 'पीठाधीश' (प्रमुख) आहेत. तसेच ते 'जूना आखाड्या'चे महामंडलेश्वरही आहेत.

याच देवी मंदिराच्या गेटच्या बाहेर मोठ्या अक्षरांमध्ये 'इथे मुस्लिमांना प्रवेश नाही' असे लिहिण्यात आले आहे.

2022 मध्ये हरिद्वारमध्ये झालेल्या धर्मसंसदेदरम्यान त्यांनी मुस्लिमांविरोधात प्रक्षोभक भाषण केलं होतं.

त्यांनी म्हटलं होतं की, "मुस्लिमांना मारण्यासाठी तलवारीची गरज भासणार नाही, कारण तलवारीचा वापर केल्यास ते तुमच्याकडून मरणार देखील नाहीत. तुम्हाला त्याबाबत टेक्निकमध्ये त्यांच्याही पुढे जायला हवं."

यती नरसिंहानंद याआधीही आपल्या वक्तव्यांमुळे तसेच कामामुळे अनेकदा वादग्रस्त ठरले आहेत.

त्यांच्यावर मुस्लिमांविरोधात अपमानास्पद भाषेचा वापर करण्याचाही आरोप झालेला आहे.

यती नरसिंहानंद सरस्वती
फोटो कॅप्शन, यती नरसिंहानंद सरस्वती

एप्रिल 2021 मध्ये आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी यती नरसिंहानंद यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांचा असा आरोप होता की, यती नरसिंहानंद यांनी एका विशिष्ट धर्माविरोधात अपमानास्पद भाषेचा वापर केला आहे.

तक्रार दाखल करुन झाल्यावर एका दिवसानंतर दिल्ली पोलिसांमध्ये अमानतुल्लाह खान यांच्याविरोधातही यती नरसिंहानंद यांना कथितरित्या धमकवण्याबाबतची तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची स्वत: दखल घेत यती नरसिंहानंद यांच्याविरोधात देखील एफआयआर दाखल केला आहे.

2022 च्या मार्चमध्ये डासनाच्या देवी मंदिरातील नळाचे पाणी पिण्यास गेलेल्या एका मुस्लीम मुलाला निर्दयीपणे मारहणा करण्यात आली होती. या मारहाणीचा व्हीडिओदेखील व्हायरल झाला होता. त्यानंतर यती नरसिंहानंद यांनी मुलाला झालेली मारहाण योग्य ठरवली होती आणि या मुलाने मंदिराचा अपमान केला, असंही वक्तव्य केलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)