You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘लग्न कधी करणार’ या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी म्हटलं, मुलगी 'अशी' हवी...
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. ‘लग्न कधी करणार’ या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी म्हटलं, मुलगी 'अशी' हवी...
“माझा लग्नास विरोध नाही. चांगली मुलगी मिळाली की लग्न करणार आहे,” असं विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरु असलेली ‘भारत जोडो’ यात्रा शेवटच्या टप्प्यात प्रवास करत आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधींनी एका यूट्युब चॅनेलला मुलाखत दिली.
फूड युट्यूबर कामिया जानी यांना दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींनी त्यांना खायला काय आवडतं? आतापर्यंत कधी नोकरी केली का? लग्न कधी करणार? पंतप्रधान झाल्यास काय करणार? अशा प्रश्नांना मोकळेपणानं उत्तरं दिली.
लग्न कधी करणार या प्रश्नाला उत्तर देताना राहुल यांनी म्हटलं की, चांगली मुलगी मिळाली की लग्न करेन. लग्नाबद्दल काही अटी आहेत का, असं विचारल्यावर राहुल यांनी म्हटलं की, “मुलगी प्रेमळ आणि हुशार हवी. माझ्या आई-वडिलांचं लग्न सुंदर झालं होतं.”
राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते काश्मीर दौऱ्यात चर्चेत राहिलं ते त्यांचा टी-शर्ट आणि वाढलेली दाढी. पण, ही कापण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर खूप दबाव टाकण्यात येत आहे, असं राहुल गांधींनी या मुलाखतीत सांगितलं.
लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
आपल्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडींबद्दल बोलताना राहुल यांनी सांगितलं, “मांसाहारीमध्ये चिकन टिक्का, सीख कबाब, ऑम्लेट खाणे आवडतं. दररोज सकाळी कॉफी पितो. बाहेर खायला जायचं असल्यास जुन्या दिल्लीत जातो.”
2. कोण एसआरके ते एसआरकेचा मला फोन आला होता- हेमंत बिसवा सरमांचा यूटर्न
‘कोण शाहरुख खान? मी नाही ओळखत. मला त्याच्याविषयी आणि त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाविषयी काहीही माहीत नाही’, अशी तिरकस टिप्पणी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी शनिवारी (21 जानेवारी) केली होती.
शाहरुख आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. आसाममध्ये बजरंग दलाने या चित्रपटाला विरोध केला असून काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी एका चित्रपटगृहात घुसून या चित्रपटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याबाबत सरमा यांना पत्रकारांनी शनिवारी येथे विचारले असता त्यांनी वरील टिप्पणी केली.
‘यासंदर्भात हिंदी चित्रपटसृष्टीतील काही जणांनी मला फोन केला आहे. शाहरुखने मात्र अद्याप मला फोन केलेला नाही. त्याने फोन केला तर त्याच्या तक्रारीत लक्ष घालेन,’ असे सरमा म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
त्यानंतर काही तासांत हिमंत बिस्वा सरमा यांनी एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं की, शाहरुख यांचा मला फोन आला होता. त्यांनी गुवाहाटीमध्ये चित्रपटगृहात घडलेल्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही राज्याची आहे, असं सांगत मी त्यांना आश्वस्त केलं.
3. आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार?
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज (23 जानेवारी) युती होणार असल्याची शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत शिवसेनेच्या वतीनं आणि वंचितच्या प्रकाश आंबेडकरांच्याकडून देण्यात आले आहेत. दुपारी 1 वाजता यासंबंधित एक पत्रकार परिषद होणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीनं आज राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. हाच मुहूर्त साधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली जाऊ शकते.
दुसरीकडे आज विधीमंडळामध्ये राज्य सरकारच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात येणार आहे.
आमचं मनातून सगळं ठरलं आहे, आता फक्त घोषणा बाकी असल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई म्हटलं. तर माझी युती ही फक्त शिवसेनेसोबत असेल, महाविकास आघाडीमधील इतर दोन सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल काय ठरवायचं ते नंतर पाहू, असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
4. शिंदे-फडणवीस सरकारला आता तिसरं इंजिन लागणार? अब्दुल सत्तार यांचं सूचक विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (19 जानेवारी) दोन दिवसांपूर्वी मुंबईत दौरा झाला होता. या दौऱ्यादरम्यान ‘डबल इंजिन सरकार’ असा उल्लेख केला होता.
एकीकडे केंद्रात भाजपचं सरकार आहे, तर राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीचं सरकार आहे. याच अनुषंगाने पंतप्रधानांनी ‘डबल इंजिन सरकार’ असा उल्लेख केला होता. मात्र, सध्याच्या डबल इंजिन सरकारला आता आणखी एक इंजिन जोडलं जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अब्दुल सत्तार यांच्या सूचक विधानामुळे ही चर्चा सुरू आहे.
“महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील डबल इंजिन सरकार चालू आहे. शिंदे-फडणवीस ज्या इंजिनाबाबत निर्णय घेतील तेच इंजिन या डबल इंजिनला लागेल”, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
टीव्ही9 मराठीने ही बातमी दिली आहे.
5. राज्यघटना हीच देशात सर्वोच्च- किरेन रिजिजू
सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटना ‘हायजॅक’ केली आहे, या उच्च न्यायालयाच्या एका माजी न्यायाधीशाने व्यक्त केलेल्या मताचे कायदा मंत्री किरेन रिजीजू यांनी समर्थन केले.
न्यायाधीश पदावरील नियुक्ती प्रक्रियेवरून केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजियम यांच्यात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रिजीजू यांनी एका व्हीडिओ प्रसिद्ध करत भूमिका मांडली आहे.
कायदामंत्री रिजीजू यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर. एस. सोधी यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला.
‘न्यायाधीशांची नियुक्ती स्वत:च करण्याचा निर्णय घेत सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटना ‘हायजॅक’ केली आहे. बहुतांश लोकांचे असेच म्हणणे आहे,’ असे मत मांडत असताना न्या. सोधी हे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
त्यांच्या या भूमिकेचे समर्थन करताना रिजीजू यांनी, ‘खरोखरच अनेक जणांचे असेच मत आहे,’ असे ट्वीट केले आहे. ‘‘राज्यघटनेच्या तरतूदींकडे आणि जनतेने दिलेल्या कौलाकडे दुर्लक्ष करणारे काही लोक स्वत:ला राज्यघटनेहून वर मानतात.
जनता ही त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून स्वत:वरच राज्य करत असते. निवडून दिलेले लोक जनतेचे हित लक्षात घेऊन कायदे करतात. आपली न्यायपालिका स्वतंत्र आहे आणि राज्यघटना सर्वोच्च आहे,’’ असे रिजीजू यांनी म्हटले आहे.
सकाळने ही बातमी दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)