सतलज नदीकाठी सापडलेला 'हा' धातू संपूर्ण भारताला आणखी 'श्रीमंत' बनवू शकतो

टॅंटलम

फोटो स्रोत, Getty Images

पंजाबच्या सतलज नदीत एक असा धातू सापडलाय जो भारताला इलेक्ट्रॉनिक उद्योगातलं एक जागतिक केंद्र बनवू शकतो.

एवढंच काय हा धातू एवढा मौल्यवान आहे की याच्या जोरावर एका देशात एक खूप मोठं युद्धही लढलं गेलंय.

आयआयटी रोपर मधील संशोधकांना सापडलेल्या टॅंटलम नावाच्या या धातूचा वापर करून कोणकोणत्या वस्तू बनवल्या जातात? टॅंटलमच्या नावाचा आणि ग्रीक पुराणाचा काय संबंध आहे?

भारताला एक ग्लोबल हब बनवण्यात याची कशी मदत होऊ शकते? जाणून घेऊ सविस्तर -

टॅंटलम म्हणजे काय?

टॅंटलम हा एक अतिशय दुर्मिळ धातू आहे. करड्या रंगाचा हा धातू अतिशय कठीण असून नैसर्गिक कारणांमुळे हा धातू गंज प्रतिरोधक बनलाय.

म्हणजे काय तर इतर धातूंप्रमाणे तो लवकर गंजत नाही. हवेशी संपर्क आला की त्यावर आपोआप एक ऑक्साइडचा थर तयार होतो आणि मग टॅंटलम काहीकेल्या गंजत नाही.

टॅंटलम

फोटो स्रोत, Getty Images

टॅंटलम म्हणूनच सुरुवातीला तो पाण्याच्या टाक्या आणि पूल बनवायला वापरला गेला, पण 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्याची ऊर्जा साठवण्याची क्षमता उलगडू लागली, आणि मग त्यापासून उत्तम कार्यक्षमतेचे कॅपॅसिटर्स बनवले जाऊ लागले.

आजही तुमच्याआमच्या हातात असलेले फोन्स, लॅपटॉप्स, हार्ड ड्राइव्ह्स पिटुकले करणं याच टॅंटलममुळे शक्य झालं.

टॅंटलमचा शोध कधी लागला?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1802 मध्ये पहिल्यांदा अँडर्स गुस्ताफ एकेनबर्ग या स्वीडिश रसायनशास्त्रज्ञाने या धातूचा शोध लावला.

सुरुवातीला हा एक नवीन धातू आहे हे कुणीही मान्य केलं नव्हतं, टॅंटलमसारखा दिसणाऱ्या निओबियमचा हा एक वेगळा प्रकार असू शकतो असं अनेकांना वाटत होतं.

ग्रीक पुराणात टॅंटलस नावाचा एक अतिश्रीमंत पण दुष्ट राजा होता. झ्यूस या ग्रीक देवाने टॅंटलसला आजन्म गुडघाभर पाण्यात उभं राहण्याची शिक्षा दिली होती.

त्याच्या डोक्यावर एक झाड होतं, जेव्हा टँटलस त्याची फळं खायचा प्रयत्न करायचा, ते झाड ती फांदी वर ओढायचं आणि जेव्हा पाणी प्यायचा प्रयत्न करायचा, तळ्यातलं पाणी आटून जायचं.

आणि टँटलसच्या याच गोष्टीमुळे या धातूला टॅंटलम असं नाव पडलं, कारण हा धातू प्रदीर्घ काळ ॲसिडमध्ये टिकून राहू शकतो.

अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने दिलेल्या माहितीनुसार टॅंटलममध्येही प्रदीर्घ काळ ऍसिडमध्ये टिकून राहण्याचे गुणधर्म आहेत आणि म्हणूनच या धातूला हे नाव देण्यात आलं.

निओबियम या टॅंटलम या दोन धातूंचं मिश्रण असणारा कोल्टन हा एक धातू आहे. याचे साठे कांगोमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

त्यामुळे याच कोल्टन धातूचा वापर करून तेथील बंडखोरांनी कांगो युद्धाला पैसे पुरवले होते. बहुसंख्य बेकायदेशीरपणे उत्खनन केलेले कोल्टन त्यावेळी चीनला विकलं जायचं.

टॅंटलमचे उपयोग काय आहेत?

इलेक्ट्रॉनिक उद्योगामध्ये टॅंटलम प्रामुख्याने वापरला जातो. टॅंटलमपासून बनवलेले कॅपेसिटर इतर कोणत्याही प्रकारच्या कॅपेसिटरपेक्षा जास्त वीज साठवतात आणि त्यामुळेच छोट्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

या धातूचा मेल्टिंग पॉइंट म्हणजे ज्या तापमानाला धातू वितळतं, तो खूप जास्त आहे, साधारण 3017 डिग्री सेल्सियस, त्यामुळे याचा वापर अनेकदा रासायनिक संयंत्र, अणुऊर्जा प्रकल्प, विमाने आणि क्षेपणास्त्रांचे घटक बनवायलासुद्धा केला जातो.

काही ठिकाणी हा महागड्या प्लॅटिनमला पर्याय म्हणूनही वापरला जातो. अर्थात तो गंजप्रतिरोधक (corrosion resistant) असल्यामुळे मानवी शरीरात Hip Replacement सारख्या शस्त्रक्रियांसाठी वापरला जातो, जिथे तुमच्या शरीरात एखाद्या धातूचा पार्ट टाकण्याची गरज असते.

सेमीकंडक्टर

फोटो स्रोत, Getty Images

ज्या आयआयटी रोपडच्या टीमने हा धातू सतलज नदीत शोधलाय, त्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ रेस्मी सेबॅस्टियन यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना आशा व्यक्त केलीय की यावर पुढे आणखी संशोधन होईल.

कारण तसं झाल्यास याचे आणखी साठे आढळू शकतात, ज्याचा फायदा फक्त पंजाबलाच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला होऊ शकतो.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)