पैलवान सिकंदर शेखला अटक का झाली? त्याच्यावरच्या आरोपांवर वडिलांचं म्हणणं काय?

'महाराष्ट्र केसरी' विजेता पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्रांच्या तस्करी प्रकरणात अटक केली आहे.
राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिंकदरचे संबंध असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
मोहाली पोलिसांच्या सीआयए पथकानं अंतरराज्यीय शस्त्रपुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून त्या टोळीतील चार सदस्यांना अटक करण्यात यश मिळवलं आहे.
अटक केलेल्या आरोपींकडून पाच अवैध शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत.
अटक झालेल्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पैलवान सिकंदर शेख आणि आणखी तीन जणांचा समावेश आहे. ही टोळी शस्त्र पुरवठा, खून आणि खंडणीसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी आरोपींकडून चार पिस्तुल (.32 बोर), एक पिस्तुल (.45 बोर), काडतुसे, रोकड आणि दोन लक्झरी गाड्या जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी काय सांगितलं?
मोहालीचे एसएसपी हरमनदीप सिंग हंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की उत्तर प्रदेशातील रहिवासी दानवीर आणि बंटी हे मोहालीत सिकंदर शेख नावाच्या व्यक्तीला शस्त्रं पुरवण्यासाठी येत आहेत.
त्यानंतर मोहाली सीआयए पथकानं सापळा रचून या तिन्ही आरोपींना शस्त्रांसह अटक केली.

चौकशीत त्यांनी सांगितलं की, ही शस्त्रं मोहालीतील नव्या गावातील कृष्णकुमार नावाच्या व्यक्तीला (उर्फ हॅपी गुर्जर) पुरवली जाणार होती.
त्यानंतर पोलिसांनी चौथा आरोपी कृष्णकुमारलाही अटक केली.
सिकंदरचे वडिल काय म्हणाले?
महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याच्या अटकेनंतर त्याचे वडील रशीद शेख यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "माझ्या मुलाला फसवण्याचा प्रयत्न केला जातोय. तो एक प्रामाणिक, मेहनती खेळाडू आहे. त्याने कुस्तीच्या मैदानावर महाराष्ट्राचं नाव उंचावलं, पण आता त्याला गुन्हेगारी प्रकरणात ओढलं जातंय."

रशीद शेख यांनी पंजाब पोलिसांना हात जोडून विनंती केली की, "कृपया माझ्या मुलावर अन्याय करू नका, तो निर्दोष आहे. गरीबाच्या मुलावर अन्याय होऊ देऊ नका."
त्यांनी सांगितलं की सिकंदरचं आयुष्य खेळासाठी झटण्यात गेलं आहे, आणि पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचे आरोप खोटे आहेत.
रशीद शेख यांनी न्याय मिळावा आणि सत्य बाहेर यावं, अशी मागणी करत मुलाच्या सुटकेसाठी समाजाने आणि शासनाने पुढे यावं, असंही आवाहन केलं आहे.
कोण आहे सिकंदर शेख?
नोव्हेंबर 2023 मध्ये, पैलवान सिकंदर शेखनं 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धा जिंकली होती.
सिकंदर शेख कोल्हापुरातल्या गंगावेश तालमीतला पैलवान आहे. लहान वयातच अनेक मातब्बर पैलवानांना चित केल्यामुळे सिकंदर प्रसिद्धीच्या झोतात आला.
सिकंदरचं मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ गाव. त्याचे आई वडील आणि मोठा भाऊ अजूनही तिथेच राहतात. सिकंदरच्या कुस्तीचा तालीम मोहोळमधूनच सुरु झाल्या. घरी हालाखीची आर्थिक परिस्थिती असूनही त्याच्या आई-वडिलांनी त्याला पैलवान होण्यासाठी प्रोत्साहित केलं.

सिकंदरचे वडील रशिद शेख स्वत: पैलवान होते. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते हमाली काम करु लागले.
सिकंदर नऊ-दहा वर्षांचा असताना मोहोळमधल्या फाटे तालमीत त्याचा कुस्तीचा सराव सुरु झाला.
सिकंदर शेखनं बीबीसी मराठीला त्याचा प्रवास सांगितला होता.
"मोहोळमध्ये चंद्रकांत काळे माझे वस्ताद होते. पहिल्यांदा मी फाटे तालमीत होतो. त्यानंतर सिद्ध नागेश तालमीत गेलो. मला तालमीत पाठवायचं हा माझ्या आई-वडिलांचा निर्णय होता. माझे वडील हे चांगले कसलेले पैलवान होते. त्यांनी हा निर्णय घेतला. पहिलेपासून आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती.
ते तिशीत आल्यावर त्यांनी पैलवानी सोडली. पण जेव्हा ते पैलवानी करत होते तेव्हा पण हमाली करत होते. खुराक-पाण्यासाठी पैसे नसायचे त्यामुळे पैलवानी करता करता ते हमाली करायचे," असं सिकंदरने सांगितलं.
2018 पासून कोल्हापुरातून पैलवानीला सुरुवात
मोहोळमध्ये सिकंदरचा सराव सुरु होता. पण त्याच्या बरोबरीचे पैलवान तालमीत नव्हते. बाकी मुलं ही लहान होती. त्यामुळे सिकंदरच्या वडिलांनी आणि त्याच्या वस्तादांनी त्याला कोल्हापुरातील गंगावेश तालमीत पाठवायचा निर्णय घेतला. तेव्हा तो अठरा वर्षांचा होता.
सिकंदरच्या सांगण्यानुसार त्याच्या खऱ्या पैलवानीला गंगावेश तालमीत आल्यापासूनच सुरुवात झाली.
"माझा योग्य डाएट गंगावेश तालमीत आल्यापासूनच सुरु झाला. विश्वास हरगुळे हे माझे कोच आहेत. इथे आल्यानंतर 2018 साली मी पहिली स्पर्धा जिंकली," असं सिकंदर म्हणतो.

2018 साली सिकंदरने कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक कुस्तीची स्पर्धा जिंकली. यामध्ये त्याने काही नामांकित पैलवानांचा पराभव केला. या स्पर्धेचं बक्षिस म्हणून त्याला एक बुलेट गाडी आणि एक लाख रुपये रक्कम मिळाली.
यानंतर आठ दिवसांनी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात कुस्तीच्या स्पर्धा झाल्या. यातही सिकंदर विजयी झाला. यानंतर त्याची राज्यात आणि पंजाब, हरियाणामधल्या कुस्तीच्या स्पर्धांमध्ये घोडदौड सुरु झाली.
त्याने 2020 साली महान भारत केसरी ही स्पर्धाही जिंकली . सिकंदरच्या सांगण्यानुसार त्याने आतापर्यंत जवळपास 200 स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
"2019 च्या सुरुवातीला मी गोल्ड मेडल जिंकलो. राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मला मेडल मिळाली. आतापर्यंत मी 200-250 स्पर्धांमध्ये तरी खेळलो असेन. मी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जॉर्जियामध्ये अंडर 23 मध्ये भाग घेतला होता," सिकंदरने सांगितलं होतं.
सिकंदर शेखने 2024 मध्ये पंजाबमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत 'रुस्तम-ए-हिंद' हा मानाचा किताब जिंकला आहे. हा किताब जिंकणारा सिकंदर शेख महाराष्ट्रातील चौथा पैलवान ठरला.
महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, हिमाचप्रदेश, जम्मू, उत्तर प्रदेश सह अखंड भारतातील प्रसिद्ध कुस्ती मैदानात सिकंदरने जिंकली आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











