सीताराम येचुरी: सर्वसमावेशक भारताच्या संकल्पनेला वाहून घेतलेल्या नेत्याचा राजकीय प्रवास

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नीरजा चौधरी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
सीताराम येचुरी यांचं 72 व्या वर्षी दिल्लीतल्या एम्समध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्याबद्दल लेखिका नीरजा चौधरी यांनी लिहिलेला हा लेख.
अर्धं शतक कम्युनिस्ट राहून देखील सीताराम येचुरी यांच्यात टोकाची तत्त्वनिष्ठा किंवा हेकेखोरपणा नव्हता. ते नेहमीच एक मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्ती राहिले.
येचुरी यांनी 1975 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला होता. त्याच वर्षी आणीबाणी लागू झाली आणि इंदिरा गांधींनी त्यांना तुरुंगात टाकलं. पुढे एक मोठा प्रवास करत 2015 मध्ये ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस झाले.
1992 पासून ते पॉलिटब्युरोचे सदस्य असले तरी त्यांची जडणघडण नेमस्त विचारसरणीच्या नेत्यांमध्ये झाली. ते मवाळ होते आणि कायम मध्यम मार्ग स्वीकारणारे होते.
सीताराम येचुरींचा विचार करताना अनेक गोष्टी माझ्या मनात येत आहेत. ते एक विद्वान, चिंतनशील, अभ्यासू, लेखक होते जे सातत्याने विचारांमध्ये गुंतलेले असायचे.
1977 मध्ये त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) मधील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला तेव्हा जेएनयूची परिस्थिती वादळी होती. ते जनरल बॉडी मीटिंग घेत आणि या बैठका रात्री उशिरापर्यंत चालायच्या.
ते अतिशय फर्डे वक्ते होते. ते श्रोत्यांची नस ओळखून असत आणि एखादा मुद्दा श्रोत्यांना पटवून देण्यासाठी काय बोलावं याचा ते नीट माग घेत असत.
जेव्हा येचुरी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते तेव्हा सी. राजा मोहन सरचिटणीस होते. ( सी. राजामोहन हे आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे ख्यातनाम प्राध्यापक आणि लेखक आहेत.)
मोहन सांगतात, “गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची त्यांच्याकडे हातोटी होती. ते उत्तम संयोजक होते पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे लोकांचं मन जिंकण्याची ताकद त्यांच्यात होती.”
भारतासारख्या गरीब आणि विकसनशील देशात त्यांचा पक्ष कधीही मुख्य प्रवाहात प्रभावशाली बनू शकला नाही.
केरळ, पश्चिम बंगाल आणि त्रिपुराचा अपवाद वगळता त्यांचा पक्ष इतर राज्यात यशस्वी का होऊ शकला नाही हा आजदेखील एक चर्चेचा मुद्दा आहे.
सर्वसमावेशक भारताच्या संकल्पनेसाठी कटिबद्ध असलेला प्रमुख डावा नेता एवढीच त्यांची मर्यादित ओळख राहणार नाही तर राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणारे नेत म्हणून त्यांना ओळखलं जाईल.
1989 ते 2014 या काळात भाजपला पर्याय म्हणून उभे राहण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र आणण्यात त्यांनी जी भूमिका बजावली तिचं विशेष स्मरण ठेवलं जाईल.


दुसरे हरकिशन सिंह सुरजित
त्यांचे जवळचे मित्र-मैत्रीण आणि सहकारी त्यांना त्यांच्या नावातील पहिल्या दोन अक्षरांवरुन म्हणजेच 'सीता' म्हणून हाक मारत असत.
इतर राजकीय पक्षांशी मतभेद असले तरी त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचे काम ते करू शकत.
कधी-कधी तर त्यांना 'आणखी एक हरकिशन सिंग सुरजीत' देखील म्हटलं जायचं.
सुरजीत 1992 ते 2005 या काळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस होते.
सुरजीत यांचं राजकीय राजकीय कौशल्य आणि पडद्यामागील सुत्रं हलवण्याची त्यांची हातोटी यामुळे 1989 मध्ये त्यांनी विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या रूपात काँग्रेसला एक राष्ट्रीय पर्याय उभा करुन दिला होता.
सुरजीत यांच्याप्रमाणेच येचुरींनी देखील 1996 मध्ये संयुक्त आघाडी स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच 2004 मध्ये UPA आघाडी स्थापन करण्यात आणि 2023 मध्ये INDIA आघाडी स्थापन करण्यात देखील त्यांनी सहकार्य केले.
इंडिया आघाडीमुळे 2024 च्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्यात अडचण निर्माण झाली.
1996 मध्ये संयुक्त आघाडी आणि 2004 मध्ये यूपीएसाठी किमान समान कार्यक्रम ठरवण्यात देखील महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली होती.
त्या ऐतिहासिक चुकीची जेव्हा त्यांनी आठवण करुन दिली
1996 मध्येच त्यांच्या पक्षाने केलेल्या ‘ऐतिहासिक चुकीची कथा’ नंतरच्या काळात सांगितली होती. 1996 मध्ये पहिला मार्क्सवादी पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती. ती कशी आणि का घालवली होती याची आठवण त्यांनी सांगितली होती.
1996 मध्ये भाजपला संसदेत बहुमत मिळवता आलं नाही आणि त्यांचं सरकार कोसळलं. त्यानंतर संयुक्त आघाडीने सरकार स्थापनेच्या हालचाली केल्या. त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांना पंतप्रधानपद भूषवण्यासाठी आमंत्रण दिलं.
मात्र पक्षाच्या केंद्रीय समितीने हा प्रस्ताव नाकारला. ही एक ‘ऐतिहासिक चूक' होती असं नंतर बसू यांनी सांगितलं होतं. ज्या तीन चतुर्थांश सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता त्यात येचुरींचाही समावेश होता.
नंतरच्या काळात त्यांचं मतपरिवर्तन झालं की नाही माहिती नाही, पण त्यावेळी हरकिशन सिंह सुरजीत आणि ज्योती बसू यांच्याबरोबर कर्नाटक भवनला गेले होते.
तिथे एच.डी.देवेगौडा, चंद्राबाबू नायडू. लालूप्रसाद यादव हे संयुक्त आघाडीचे नेते चिंताग्रस्त चेहऱ्यांनी आणि आतुरतेने त्यांची वाट होते.

फोटो स्रोत, Getty Images
पक्षाशी अनेक वेळ असहमती तरी पक्षाची साथ दिली
सीताराम येचुरी यांनी संसदेतही आपली छाप सोडली होती. ते उत्तम संसदपटू होते. ते 12 वर्षं राज्यसभेवर होते. त्यांनी संसदेत केलेल्या उत्कृष्ट भाषणासाठी त्यांना कायमच लक्षात ठेवलं जाईल. त्यांना केवळ एक कुशल संसदपटू म्हणून ओळखलं जाणार नाही तर भाजपविरोधी पक्षांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न देखील आठवणीत राहतील.
एक संसदपटू म्हणून त्यांना नियमांची जाण होती आणि त्याचा आधार घेत ते योग्य मुद्दे उचलत असत.
जेव्हा ते राज्यसभेतून निवृत्त झाले तेव्हा अनेक पक्षांच्या खासदारांनी येचुरींना त्यांच्या पक्षाने पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवावं अशी इच्छा व्यक्त केली.
पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी कायम पक्षाचे काही निर्णय अमान्य असून देखील पाळले. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर भारत अमेरिका अणू कराराबद्दल तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह अतिशय आग्रही होते आणि डाव्या पक्षांचा या कराराला विरोध होता.
मात्र या करारासाठी सरकारचं अस्तित्व पणाला लावण्याचीही मनमोहन सिंह यांची तयारी होती. तेव्हा डाव्या पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढला होता. या निर्णयाला येचुरींचा विरोध होता.
त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात आणि येचुरी यांचे मतभेद सर्वज्ञात होते. करात आणि येचुरी हे प्रतिस्पर्धी होते तरी ते सहकारी होते.
भारतात ज्या नेत्यांच्या जोड्यांनी आपली छाप सोडली (उदा. नेहरू-पटेल, वाजपेयी-अडवाणी, मोदी-शाह) त्यात करात आणि येचुरी यांचाही समावेश होता.

फोटो स्रोत, Getty Images
कठीण काळात पक्षाचे नेतृत्व
आधी सोनिया आणि नंतर राहुल गांधी यांच्याशी त्यांचं नातं एक मित्र आणि मार्गदर्शकासारखं होतं. देशाच्या भविष्याच्या संबंधी येचुरी यांच्याशी तासनतास चर्चा झाल्याची आठवण राहुल गांधींनी देखील काढली.
काँग्रेसची 2004-2014 मध्ये जेव्हा सत्ता होती तेव्हा यूपीएच्या त्या कठीण दिवसात काँग्रेस आणि डाव्यांमध्ये काही अडचणी आल्या तर सोनिया गांधी येचुरींकडे यांच्याशी सल्ला मसलत करत असत.
सीताराम येचुरींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी त्याच काळात आली, ज्यावेळी भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदींच्या शक्तिशाली नेतृत्वात केंद्रात सरकारमध्ये होता. त्यावेळी देशाच्या राजकारणात खूप मोठा बदल होत होता.
हा असा काळ होता जेव्हा सीपीएम आपली प्रासंगिकता टिकवण्यासाठी संघर्ष करत होता. पण त्यांनी भाजपला आव्हान देऊ शकेल अशा सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणत इंडिया आघाडीला एका व्यासपीठावर आणलं.
निर्णायक काळात भारतातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात पडद्यामागचे सूत्रधार म्हणून त्यांची भूमिका कायमच लक्षात राहील.
म्हणूनच ज्यावेळी सीपीएम पक्ष त्यांना दीर्घकाळासाठी साथ देणाऱ्या 'कॉम्रेड'ला निरोप देईल त्याच वेळी सर्व भारतीय देखील देशाच्या या सुपुत्राची आठवण मनात जपतील.
सीताराम येचुरी देशाची लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष परंपरा कायम ठेवण्यासाठी झटलेच, मात्र त्याचबरोबर गरीब जनतेला उद्याचा दिवस पाहायला मिळावा यासाठी जीवाचं रान केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











