अमेरिकेत जातिभेदाविरोधात कायदा तर आरएसएस म्हणतं, ‘भेदभाव असेपर्यंत आरक्षण चालू ठेवा’

आरक्षण आणि जातिभेदावरून सध्या फक्त भारतातच नव्हे तर अमेरिकेतही चर्चा सुरू आहे. कॅलिफोर्निया हे जातीभेदावर बंदी आणणारं अमेरिकेतलं पहिलं राज्य ठरलं आहे.

तर भारतात आरक्षण सुरु ठेवण्याला भारतीय स्वयंसेवक संघा (RSS)चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

कॅलिफोर्नियाच्या विधिमंडळात एक विधेयक संमत करण्यात आलं, ज्यानुसार तिथल्या दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांना जातिभेदापासून संरक्षण मिळू शकेल. या विधेयकावर आता तिथले गव्हर्नर सही करतील.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या स्टेट सिनेटर आएशा वहाब यांनी मांडलेलं हे विधेयक 31 मतं विरुद्ध 5 मतांनी संमत झालं.

त्या म्हणाल्या की लोकांना लिंग, वर्ण, धर्म आणि अपंगत्वाशिवाय आता त्यांच्या जातीच्या आधारे कुठल्या भेदभावाला सामोरं जावं लागू नये, म्हणून हे पाऊल कामी येईल.

त्या म्हणाल्या, “लाखो लोकांच्या हातांवर जातिभेदाच्या अदृश्यं बेड्या असतात.आम्ही हजारो वर्षांपासून चालत आलेल्या अशा अदृश्यं भेदभावावर आज प्रकाश टाकला आहे.”

वहाब या कॅलिफोर्नियाच्या विधिमंडळात निवडून गेलेल्या पहिल्या मुस्लीम आणि अफगाण अमेरिकन महिला आहेत.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सिॲटल हे जातिभेदाविरोधात कायदा आणणारं अमेरिकेतलं पहिलं शहर ठरलं होतं.

हा कायदा आणण्यात पुण्यात जन्मलेल्या, मुंबईत शिकलेल्या आणि आता अमेरिकेच्या सिॲटल शहराच्या सिटी काऊन्सिलच्या सदस्य क्षमा सावंत यांची भूमिका महत्त्वाची होती.

अमेरिकेत जातिभेद हा तितका मोठा विषय नाही, असं काही हिंदू संघटनांचं म्हणणं आहे.

त्यामुळे हिंदू अमेरिकन फाउंडेशननं सोशल मीडियावर लिहिलंय की, “हे विधेयक एकप्रकारे दक्षिण आशियाई लोकांना जातिभेद करणारं म्हणून लक्ष्य करतं. गव्हर्नरनं त्याला मंजुरी द्यायला नको.”

मात्र काही दलित नेत्यांनी हे दावे फेटाळत म्हटलंय की ते स्वतः अमेरिकेत जातिभेदाला सामोरे गेले आहेत.

दरम्यान डेमोक्रॅट पक्षाचे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम म्हणाले की, ते हे विधेयक त्यांच्याकडे आल्यावर त्याचं मूल्यमापन करून निर्णय घेतील.

एकीकडे अमेरिकेत जातिभेदावरील कायद्याची चर्चा असताना तर दुसरीकडे भारतात आरक्षण सुरू ठेवण्याला सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाठिंबा दिलाय.

"जोपर्यंत समाजात विषमता आहे तोपर्यंत आरक्षणाची व्यवस्था सुरू ठेवावी", असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी व्यक्त केलं.

नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात भागवत म्हणाले की, "समाजात असमानता अदृश्य स्वरूपात अस्तित्वात असली तरी ती अजूनही आहे."

ते म्हणाले, "आम्ही आमच्या सोबतच्या माणसांना समाजव्यवस्थेत मागे ठेवलं. आम्हाला त्याची पर्वा नव्हती आणि हे 2000 वर्षं चाललं.

जोपर्यंत आम्ही त्यांना समानता देत नाही, तोपर्यंत काही विशेष उपाययोजना कराव्या लागतील, आरक्षण त्यापैकी एक आहे.''

मोहन भागवत म्हणाले, “जोपर्यंत असा भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण चालू ठेवावं. भारतीय संविधानात दिलेल्या आरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण पाठिंबा आहे."

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)