‘मुंबईत घर घेताना मला लैंगिकदृष्ट्या सक्रिय आहेस का, असं विचारण्यात आलं’

- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, दिल्ली
भारतात मुलींना कायम एक चांगली पत्नी, आई होण्याची शिकवण दिली जाते आणि लग्न हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे ध्येय असते.
पण अलीकडील काळात अनेक स्त्रिया एकटे राहण्याचा निर्णय घेऊन आपली स्वतंत्र वाट निवडत आहेत.
रविवारी, दक्षिण दिल्लीतील कॅरेबिअन लाउंजमध्ये दोन डझन स्त्रियांच्या एका स्नेहभोजन समारंभाला मी उपस्थित होते. त्या रुममध्ये गप्पागोष्टी आणि हसणे-खिदळणे सुरू होते.
या सर्व स्त्रिया स्टेटस सिंगल या कम्युनिटीच्या सदस्या आहेत. भारतातील शहरी भागांत राहणाऱ्या सिंगल स्त्रियांची ही कम्युनिटी आहे.
"आपण स्वतःला विधवा, घटस्फोटिता किंवा अविवाहित असे लेबल लावणे सोडून देऊ", असे लेखिका व या कम्युनिटीच्या संस्थापक श्रीमयी पिऊ कुंदू उपस्थितांना म्हणाल्या. आपण स्वतःला प्राउडली सिंगल म्हणू या."
उपस्थित स्त्रियांनी टाळ्या वाजवल्या व जल्लोश केला.
लग्नाबद्दल अत्यंत आग्रही असलेल्या या देशात एकटे राहण्याकडे आजही कलंक म्हणून पाहिले जाते.
ग्रामीण भारतात एकटी स्त्री ही त्या कुटुंबासाठी ओझे म्हणूनच समजली जाते. अविवाहित महिलांना फार निर्णय घेता येत नाहीत आणि वृंदावन किंवा वाराणसीसारख्या तीर्थस्थळांवरून हजारो विधवांना हाकलून देण्यात येते.
दिल्लीतील पबमध्ये भेटलेल्या कुंदू आणि इतर स्त्रिया मात्र वेगळ्या होत्या. त्या बहुतेकींची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आहे. यात शिक्षक, डॉक्टर, वकील, प्रोफेशनल, उद्योजिका, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका व पत्रकार आहेत. काही विभक्त किंवा घटस्फोटिता किंवा विधवा आहेत तर काही अविवाहित आहेत.
वृंदावनमधील विधवा
भारतात 7.14 कोटी सिंगल वुमेन म्हणजेच एकल स्त्रिया आहेत. यात अविवाहित, घटस्फोटित आणि विधवा स्त्रियांचा समावेश होतो.
श्रीमंत शहरी सिंगल स्त्रियांकडे आर्थिक संधी म्हणून पाहिले जाते. बँका, दागिने घडविणारे, गृहपयोगी वस्तूंच्या कंपन्या आणि ट्रॅव्हल एजन्सींना त्या संभाव्य ग्राहक म्हणून पाहिले जाते.
क्वीन किंवा पिकुसारख्या हिंदी चित्रपटात आणि फोर मोअर शॉर्ट्ससारख्या वेब सीरिजमध्ये चार सिंगल स्त्रियांच्या या कथेला व्यावसायिक यशही प्राप्त झाले.
ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व महिलांच्या बाजूने एक निकाल दिला. या निकालानुसार कोणत्याही महिलेला म्हणजे अविवाहित महिलेसहित इतर महिलांनाही गर्भपात करण्याचा समान अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने एकल महिलांच्या अधिकारांना मान्यता दिली.
पण इतके सगळे बदल होऊनही समाजाचा दृष्टिकोन मात्र बदललेला नाही आणि कुंदू म्हणतात, "उच्चभ्रू महिलांसाठीही एकटे राहणे तितके सोपे नाही आणि त्यांच्याबद्दल कायम पूर्वग्रह बाळगले जातात."
"मला एकटी स्त्री म्हणून अनेकदा भेदभाव व अपमान सहन करावा लागला आहे. जेव्हा मी मुंबईत घर भाड्याने घेऊ इच्छित होते तेव्हा मी मद्यपान करते का, लैंगिकदृष्ट्या सक्रिय आहे का, असे प्रश्न मला विचारण्यात आले."

फोटो स्रोत, Getty Images
त्यांची भेट स्त्रीरोगतज्ज्ञाशी झाली. त्यांना तर कुंदू यांच्या खासगी आयुष्यात डोकावून पाहण्याची सवय होती. काही वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्या आईने एका उच्चभ्रमू विवाह नोंदणी वेबसाइटवर जाहिरात टाकली तेव्हा एक पुरुष त्यांना भेटायला आला आणि पहिल्या पंधरा मिनिटांतच त्या व्हर्जिन आहेत का, असे त्याने विचारले.
"म्हणजे एकल स्त्रीला कायम प्रश्न विचारले जातात", असे त्या म्हणाल्या.
खरे तर ज्या देशात 2021च्या जनगणनेनुसार 7.14 कोटी एकल स्त्रिया आहेत, त्या देशात 'सिंगल शेमिंग' म्हणजेच एकटे असल्याबद्दल अवघडलेपणा वाटण्याची काहीज गरज नाही. ब्रिटन किंवा फ्रान्सच्या संपूर्ण लोकसंख्येहून ही संख्या जास्त आहे.
2001मध्ये ही संख्या 5.12 कोटी होती. म्हणजे 10 वर्षांत 39% वाढ झाली आहे. 2021 ची जनगणना कोव्हिडमुळे लांबली. पण कुंदू यांच्या मते, एकल महिलांची संख्या आता 10 कोटींहून अधिक झाली असेल.
भारतात लग्नाचे वय वाढणे, हेही या मागचे एक कारण असू शकेन. म्हणजे एकट्या स्त्रियांपैकी मोठे प्रमाण किशोरवयीन मुलींचे किंवा विशी-चोवीशीच्या तरुणींचे आहे. यात विधवांचीही संख्या जास्त आहे. स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा अधिक असल्यामुळे असे घडते.
पण कुंदू म्हणतात, "अलीकडील काळात अधिकाधिक महिला परिस्थितीमुळे नाही तर आपल्या इच्छेने सिंगल राहण्याचा निर्णय घेतात. आणि एकलपणाच्या या नव्या चेहऱ्याची दखल घेणे महत्त्वाचे आहे."
"मी अनेक स्त्रियांना भेटते. ज्या स्वतःच्या इच्छेने सिंगल आहेत. त्यांना लग्न ही संकल्पना मान्य नाही. कारण ती पितृसत्ताक संस्था आहे आणि या व्यवस्थेमध्ये स्त्रियांवर कायम अन्याय होतो आणि त्यांच्यावर दडपशाही होते."
स्टेटस सिंगलच्या सदस्यांचे व्ही फॉर व्हिक्टरी चिन्ह
त्यांची आई 29 व्या वर्षी विधवा झाली. त्यानंतर त्यांना सोसाव्या लागलेल्या भेदभावामुळे त्यांनी आपले लक्ष एकल स्त्रियांवर केंद्रित केले.
"मी मोठी होत असताना मला दिसले की, ज्या स्त्रीसोबत पुरुष नाही, तिला आपल्या पितृसत्ताक व पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे वंचित ठेवले जाते. तिला डोहाळे जेवणाला निमंत्रण नव्हते, भावाच्या वा बहिणीच्या लग्नाला बोलावणे नव्हते, तिला वधुपासून लांब राहायला सांगितले होते, कारण विधवेची सावलीसुद्धा अशुभ मानली जाते."
वयाच्या 44 व्या वर्षी तिची आई पुन्हा एकदा प्रेमात पडली आणि पुनर्विवाह केला तेव्हा पुन्हा एकदा समाजाच्या रोषाला तिला सामोरे जावे लागले. "एका विधवेने दुःखी न राहण्याच्या, न रडण्याची, लैंगिक संबध न ठेवण्याची, आनंदापासून पारखे न राहण्याची हिंमतच कशी केली, कारण तिने तसेच राहणे अपेक्षित आहे. आपले निर्णय स्वतः घेण्याची हिंमत कशी दाखवली?"
तिच्या आईला सोसाव्या लागलेल्या अपमानाचा तिच्यावर सखोल परिणाम झाला.
"मी तर लग्न करण्यासाठी उतावीळ होते. लग्नामुळे मला स्वीकारले जाईल आणि माझ्या आयुष्यातील अंधार दूर होईल, या परीकथेवर माझा प्रचंड विश्वास होता."

फोटो स्रोत, SREEMOYEE PIU KUNDU
हे नाते आदर्श
मी दोन नात्यांमध्ये होते. दोन्ही नाती अयशस्वी ठरली, शारीरिक व भावनिक शोषण सहन करावे लागले आणि हे सगळे 26 वर्षापर्यंतच घडले. त्यामुळे ज्या लग्नात स्त्रीने पुरुषाच्या मर्जीने चालणे अपेक्षित आहे, ती लग्नसंस्था तिच्यासाठी नाही, याची त्यांना जाणीव झाली.
त्यांच्या मते संस्कृती, धर्म वा समुदायावर आधारलेले नसलेले आणि आदर, परस्परांची उपलब्धता व जाणीव यावर आधारलेले नाते त्यांच्यासाठी आदर्श आहे.
ही अपेक्षा अजिबातच वावगी नाही आणि रविवारी मला भेटलेल्या सर्व सिंगल स्त्रियांची हीच मागणी होती.
पण भारत हा बहुतांश प्रमाणात पितृसत्ताकच आहे. भारतात 90% विवाह कुटुंबांनी जुळवलेले असतात आणि आपली पती ठरविण्यात त्यांचे मत फारच कमी वेळा विचारात घेतले जाते. त्यांना लग्न करायचे आहे की नाही याबद्दलचे मत विचारणे फार दूर राहिले.
पण दिल्लीतील गुरुग्राम येथे राहणाऱ्या 44 वर्षीय अविवाहित भावना दहिया यांच्या मते आता बदल होऊ लागला आहे आणि सिंगल स्त्रियांची वाढती संख्या हा एक समारंभक्षण आहे.
"आम्ही या अथांग समुद्रातील एक थेंब असू, पण किमान थेंब तरी आहोत," असे त्या म्हणतात.
"एकल स्त्रियांची जेवढी जास्त उदाहरणे असतील, तेवढे चांगले राहील. पारंपरिक विचार करता पतीचे करिअर, त्याचे प्लॅन, मुलांचे शिक्षण याबद्दलच चर्चा होत असे आणि स्त्रीची आवडनिवड काय आहे, याचा फारसा कुणी विचारच केला नाही. पण यात आता बदल होत आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








