'मारहाण करणाऱ्या नवऱ्याला मी सोडलं, ट्रक चालवून घर सांभाळलं'

फोटो स्रोत, LEIRE VENTAS
- Author, लीरे वेंटास
- Role, बीबीसी 100 वूमन
ट्रक मालक महिलांना सुरक्षित चालक मानत असले तरी जगभरात केवळ 3 टक्केच 'महिला ट्रकचालक' आहेत.
परंतु मेक्सिकोमध्ये जिथे लिंग आधारित हिंसाचार आणि बंदुकीचा धाक दाखवून दरोडे घालणं सामान्य बाब आहे तिथे महिलांना या व्यवसायाकडे आकर्षित करणं कठीण झालंय.
बीबीसी 100 महिलांनी देशातील काही अतिशय धोकादायक रस्त्यांवर महिला ट्रक चालकांसोबत प्रवास केला.
एका वर्दळीच्या रस्त्यापासून थोड्या अंतरावर झुडपाकडे तोंड करून पडलेल्या क्लारा फ्रॅगोसो यांनी विचार केला की, "आता ते मला तीन गोळ्या मारतील आणि मला या ब्लँकेटमध्ये गुंडाळतील आणि कुणीही मला शोधू शकणार नाही."
मध्यरात्र झालेली आणि ते मेक्सिकोच्या आखातावरील टक्सपॅनला तासापूर्वी पोहोचणार होते, पण एका माणसाने त्यांना बंदुकीचा धाक दाखवत ट्रकमधून बाहेर काढलं.
वाटेत एका गाडीने मागून दिवे चमकवत थांबण्याचा इशारा केला गेला. पोलिसांच्या गाडीसारखी दिसणारी ती गाडी प्रत्यक्षात पोलिसांची नव्हती.
हुड (टोपी) घातलेला एक माणूस ट्रकवर चढला आणि नंतर क्लाराला खाली उतरून जमिनीवर झोपायला सांगितलं. यादरम्यान त्यांनी ट्रकची तपासणी केली.
57 वर्षीय क्लारा म्हणतात, “मी मनातल्या मनात या जगाचा निरोप घेत होते."
घरगुती हिंसा आणि ट्रक चालवणं
पण त्या माणसाशी बोलल्यानंतर असं काही घडलं, ज्याचा क्लाराने विचारही केला नव्हता.
त्या म्हणतात, "बंदुकधारी व्यक्तीने मला माझं वय विचारलं. त्याची आईदेखील तिच्याच वयाची असल्याचं समजलं. त्याने विचारलं - तू ट्रक ड्रायव्हिंगच्या व्यवसायात कशी आलीस?"
क्लाराने त्याला सांगितलं की वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचं लग्न एका हिंसक माणसाशी झालेलं आणि शेवटी 15 वर्षांनी त्या त्रासदायक संसारातून बाहेर पडल्या.
त्या म्हणतात, पण पुन्हा सुरुवात करणं सोपं नव्हतं. वेट्रेस म्हणून दर आठवड्याला 50 डॉलर कमावत असताना मुलांचं संगोपन करणं कठीण व्हायचं.
ट्रकचालक चांगली कमाई करतात असं काही ग्राहकांकडून ऐकल्यावर त्यांनी हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
18 वर्षांपूर्वी त्या "ट्रोलेरा" बनल्या, मेक्सिकोमध्ये महिला ट्रक चालकांना याच नावाने ओळखलं जातं.
त्यांच्यासाठी ती सुखी आयुष्याची हमी होती, ते किती धोकादायक आहे याची त्यांना चांगली जाणीव असतानाही – जसं त्या त्यावेळी बंदुकीच्या धाकाने जमिनीवर पडल्या होत्या.
सुदैवाने बंदूकधारी व्यक्तीला मायेचा पाझर फुटला. तो जेमतेम पौगंडावस्थेतून बाहेर पडलेला. तो म्हणाला की त्याचे स्वतःचे वडीलदेखील त्याच्या आईला मारहाण करायचे आणि नंतर कुटुंब सोडून निघून गेले.

फोटो स्रोत, ÁLVARO ÁLVAREZ
तो म्हणाला की तो त्याच्या आईला मदत करण्यासाठी एका टोळीत सामील झालेला.
क्लारा म्हणतात, "आमच्यात कुठलातरी भावनिक बंध निर्माण झाला होता… आम्ही खूप वेळ बोललो, मी त्याला गुन्हेगारी सोडून त्यातून बाहेर पडण्याबाबत समजावण्याचा प्रयत्न केला."
शेवटी त्याने क्लाराला जाऊ दिलं पण हुड (डोकं झाकणारी टोपी) घातलेल्या त्या माणसाने ट्रक आणि त्यातील सामान चोरी केलं.
ट्रक चालकांची कमतरता, तरीही...
त्या म्हणतात, "आम्ही ट्रकचालक नेहमी म्हणतो की, आम्ही ज्या गुन्हेगारांचा सामना करतो, त्यात काही चांगले आणि काही वाईट असतात. मी भाग्यवान आहे की मला नेहमीच चांगली माणसं भेटली आहेत."
मेक्सिकोतील एकूण पाच लाख ट्रक चालकांपैकी केवळ 2% महिला आहेत. इतर देशांतही हीच परिस्थिती आहे.
‘इंटरनॅशनल रोड ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन’ म्हणते, "सगळीकडे 3% पेक्षा कमी ट्रकचालक महिला आहेत. तथापि, चीनमध्ये ही संख्या 5% आणि अमेरिकेमध्ये 8% आहे.”

फोटो स्रोत, ÁLVARO ÁLVAREZ
खरंतर या क्षेत्रात कुशल चालकांची कमतरता आहे.
म्हणूनच क्लारा आणि तिच्या इतर सहकाऱ्यांना विश्वास आहे की ते महिलांसाठी अधिक जागा निर्माण करून हा पॅटर्न बदलण्यात मदत करू शकतात.
लिझी हाइड गोन्झालेझ किंवा लिझीची कथा कौटुंबिक हिंसाचारातून सुटलेल्या महिलांसारखीच आहे आणि ट्रक चालक बनावं असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं.
“ट्रक चालक होण्याचं माझे स्वप्न नव्हतं,” 45 वर्षीय लिझी त्यांचा लाल ट्रक ‘डायवोलो’ सुरू करण्याची तयारी करत असताना सांगतात. मला माझ्या आर्थिक गरजा भागवण्याचा मार्ग यामध्ये दिसतो. रस्त्यावर लाल रंगाची कार चालवण्याचं माझं स्वप्न होतं. आता मी निदान लाल रंगाचा ट्रक तरी चालवतेय!”
'मृत्यूचा महामार्ग'
जर गोन्झालेझला अंधार होण्यापूर्वी नुएवो लारेडो या सीमावर्ती शहरात पोहोचायचे असेल, तर त्यांना मेक्सिको शहराच्या वायव्येकडील क्वेरेटारो हे त्यांचं मूळ गाव लवकर सोडावं लागेल.
मेक्सिकोहून अमेरिकेत जाणाऱ्या मालासाठी हे मुख्य ड्रायपोर्ट आहे, जिथे दररोज 80 कोटी डॉलर्सचा व्यापार होतो.

फोटो स्रोत, Getty Images
इथे जाण्यासाठी त्यांना 1,000 किलोमीटर अंतर पार करावं लागेल, ज्यात मॉन्टेरी मार्गे तीन तासांचा प्रवास आहे, ज्याला "मृत्यूचा महामार्ग" किंवा "बर्म्युडा ट्रँगल" म्हणून ओळखले जातं.
देशाच्या शक्तिशाली ड्रग माफियाचे राज्य असलेल्या मेक्सिकोमधील हा सर्वात धोकादायक रस्त्यांपैकी एक आहे.
"मी कोण आहे, मी कुठे आहे आणि मी काय घेऊन जातेय हे त्यांना माहीत आहे," गोन्झालेझ सांगतात. सरकारपेक्षाही जास्त माहिती त्यांच्याकडे असते.”
चालक आणि सुरक्षातज्ज्ञांनी बीबीसीला सांगितलं की या रस्त्यावर पोलीस चेकपोस्ट आणि गस्त पथकं असली तरी ते सुरक्षिततेची हमी देवू शकत नाहीत.
क्लाराप्रमाणेच, लिझी गोन्झालेझला एका सशस्त्र माणसाने थांबवलं आणि ट्रकमधील सामान तपासता यावं म्हणून रस्त्यापासून दूर नेलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी काहीही घेतलं नाही.
त्या म्हणतात, “ते काय शोधत होते ते मला कधीच कळलं नाही. मला सोडताना त्यांनी मला इथून निघून जायला आणि रस्त्यावर पोहोचल्यावरच लाईन चालू करण्याची सूचना केली.
महामार्गावर लूटमार
2023 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान, मेक्सिकोमध्ये ट्रक चोरीची 7,028 प्रकरणे नोंदवली गेली, जी 2022 च्या तुलनेत 10 टक्के जास्त आहेत.
राष्ट्रीय सार्वजनिक सुरक्षा प्रणालीच्या कार्यकारी सचिवालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, यापैकी 6,030 घटनांमध्ये हिंसाचार केला गेलेला.

फोटो स्रोत, LEIRE VENTAS
ज्या पाच प्रांतामध्ये मालगाड्या (कार्गो) लूटमारीच्या घटना सर्वाधिक घडतात त्यामध्ये मेक्सिको राज्य, पुएब्ला, मिसोआकन, सॅन लुईस पोटोसी आणि जलिस्को यांचा समावेश होतो
फोटो कॅप्शन: लिझी सकाळी लवकर त्यांच्या कामाला सुरूवात करतात.
फोटो कॅप्शन: लिझी यांची मुलगी लुईसा तिच्या आईच्या कामाचं कौतुक करते परंतु हे कार्यक्षेत्र निवडण्याची तिची अजिबात इच्छा नाही.
लुटीमुळे वर्षाला कोट्यवधींचे नुकसान
क्लारा फ्रॅगोसो काम करत असलेली एसटीआय कंपनी म्हणते की, दरवर्षी त्यांचे 12% ताफे दरोडेखोरांकडून लक्ष्य केले जातात.
तर मेक्सिकोच्या नॅशनल असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्सचा अंदाज आहे की कार्गो चोरीमुळे दरवर्षी $137 दशलक्षाचं नुकसान होतं.
कधी त्यांच्या इंधनाची चोरी होते तर कधी त्या भागावर नियंत्रण ठेवणाऱ्या टोळीला पैसे द्यावे लागतात.
तात्विकदृष्ट्या, हे सर्व थांबविण्याची जबाबदारी 2019 मध्ये मेक्सिकन सरकारने स्थापन केलेल्या नॅशनल गार्डवर आहे.
गेल्यावर्षी अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर म्हणाले की त्यांच्याकडे 100,000 अधिकारी आहेत.
“गुन्हेगारी रोखण्यासाठी नॅशनल गार्ड सर्व रस्त्यांवर आहेत.”, अशी घोषणा त्यांनी केली.
मात्र, याशिवाय क्लारा आणि तिच्या सहकाऱ्यांना इतर समस्यांनाही सामोरे जावं लागतं.
सन्मानाने जगण्याचा मार्ग
स्वत:ची तयारी आणि कामाची तयारी करण्यासाठी गोन्झालेझ यांना त्यांच्या केबिनचाच वापर करावा लागतो – केस विंचरण्यापासून ते बादली आणि कपचा वापर करण्यापर्यंत सर्वकाही.
परंतु मागच्या बाजूला दुमडणारा बेड असल्यामुळे त्यांना या छोट्या जागेत काळजीपूर्वक वावरावं लागतं.
आणि त्यांना सतत छळ होण्याची भीती असते.
"या पुरुष-प्रधान वातावरणात, म्हणजे तुम्हाला थेट शार्क माशांमधे जाऊन पोहायला शिकावं लागतंते,” असं गोन्झालेझ म्हणतात.
"त्यांच्याशी आदराने वागा म्हणजे ते तुमचा आदर करतील, तसंच हे म्हणण्यास अजिबात लाजू नका की - ही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करू नका."
त्या अशाकाही सहकर्मचाऱ्यांना ओळखतात ज्यांच्यावर बलात्कार झालेला आणि अनेक प्रसंगी पुरुषांनी त्यांच्यावर लैंगिक संबंधासाठी दबाव टाकला होता.
महिला ट्रक चालकांच्या दैनंदिन जीवनाविषयी या महिला सोशल मीडियावर पोस्ट करत असतात आणि या व्यवसायाबद्दलच्या गैरसमजांच्या विरोधात लढत राहतात.

फोटो स्रोत, ÁLVARO ÁLVAREZ
गोन्झालेझच्या ट्रकर्स लेडीज फेसबुक पेजचे 65,000 फॉलोअर्स आहेत, तर फ्रॅगोसो चे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिक टॉक वर एकूण 162,000 फॉलोअर्स आहेत.
क्लारा फ्रॅगोसो यांनी या व्यवसायात प्रवेश करणार्या नवीन महिलांना प्रोत्साहित करण्याला तिचं ध्येय देखील बनवलंय.
'आता मी स्वप्न रंगवतेय.’
अलिकडेच 9 नवीन स्त्रिया क्लाराच्या कंपनीत सामील झाल्या, ज्यात दोन मुलांची आई असलेली 37 वर्षीय मार्था पॅट्रिशिया ट्रेजो आहे. क्लारा या सर्वांना मदत करते आणि फोनवर नियमित बोलत असते.
क्लाराने एका व्हॉट्सॲप कॉलमध्ये ट्रेजोला सांगितलं की, "लक्षात ठेवा, विचलित होऊ नका, तुमच्या आहाराची काळजी घ्या, जीपीएस तपासा.” अनावश्यक गोष्टींवर ऊर्जा वाया घालवू नका, अशी वेळ आणि जागा मिळेल जिथे तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मजामस्ती करू शकता.
त्या ट्रेजोला या नोकरीतील धोक्यांमुळे येणाऱ्या भावनिक तणावाला सामोरं जाण्याचा सल्ला देतात.

फोटो स्रोत, LEIRE VENTAS
फ्रॅगोसो म्हणतात, "वाहतूक व्यवसायात अनेक समस्या आहेत ज्याबद्दल बोललं जात नाही." जोपर्यंत आपण वाईट सवयींबद्दल बोलत नाही तोपर्यंत त्या कधीही बदलणार नाहीत.”
या व्यवसायात अधिकाधिक महिला सहभागी झाल्यास कामगारांची कमतरता तर दूर होईलच शिवाय या क्षेत्रातही बदल घडून येतील, असा विश्वास त्यांना वाटतो.
ट्रक चालत बनू इच्छिणाऱ्या महिलांना गोन्झालेझ सोशल मीडियावर सल्लाही देतात.
त्या म्हणतात, “मी पत्नी आहे, मी मुलं वाढवली आहेत. मी अनेक गोष्टी केल्या आहेत. आता मी स्वप्नांची निर्मिती करत्येय.”
मॉन्टेरीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या त्यांच्या डायव्होलोला आणखी एका प्रवासाला घेऊन जाण्यासाठी त्या केबिनमध्ये शिरतात. मृत्यूच्या राजमार्गावरून अमेरिकन सीमेकडे जाणारा हा प्रवास आहे.
अतिरिक्त माहिती: अल्वारो अल्वारेझ, मॉन्टसेराट बुस्टोस
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








