पॉर्न स्टारचे फोटो वापरून ऑनलाईन फसवणूक, शेकडो जणांना घातला कोट्यवधींचा गंडा

- Author, हन्नाह अजाला आणि द लव्ह जेनेस्सा टीम
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
ही गोष्ट आहे अवैधरित्या फोटो वापरून केलेल्या फसवणुकीची.
वेनेस्सा या कधीकाळी पॉर्न स्टार होत्या. हल्ली त्यांना दररोज शेकडो मेसेज येतात.
मेसेज करणारे पुरुष आहेत. वेनेस्सासोबत आपण नात्यात असल्याचं या पुरुषांना वाटतं. काहींना तर वाटतं की, वेनेस्सा आपली पत्नी आहे.
तर यातले काहीजण संतप्त असतात, काहीजण गोंधळात असतात, काहीजण दिलेले पैसे मागत राहतात. त्यांनी दैनंदिन खर्चासाठी, हॉस्पिटलच्या बिलासाठी किंवा इतर गोष्टींसाठी पैसे दिले होते.
पण हे सर्व खोटं आहे. कारण वेनेस्सा या पुरुषांना साधं ओळखतही नाही.
वेनेस्सा जेव्हा अॅडल्ट एंटरटेन्मेटच्या स्टार होत्या. त्या काळातले त्यांचे फोटो आणि व्हीडिओ ऑनलाईन रोमान्ससाठी वापरले गेले आणि त्यातून फसवणुकीचे प्रकार केले गेले. वेनेस्सा यांचे फोटो आणि व्हीडिओ पाहत अनेकांना फसवलं गेलं आणि त्यांच्याकडून पैसे उकळले गेले.
डिजिटल युगातल्या या फसवणुकीला ‘कॅटफिशिंग’ म्हणतात.
आपले पैसे लुटले आणि आयुष्य उद्ध्वस्त केल्याच्या आरोपांच्या शेकडो मेसेजमुळे वेनेस्सा सुद्धा आता कंटाळल्या आहेत.
“मला एकप्रकारचं नैराश्य आलंय आणि मी स्वत:लाच दोष देतेय. जर माझे फोटो बाहेर आले नसते, तर कदाचित या लोकांची फसवणूक झाली नसती,” असं म्हणत वेनेस्सा स्वत:ला दोष देत राहतात.
वेनेस्सा यांनी जवळपास आठ वर्षे ‘कॅमगर्ल’ म्हणून काम केलं. कॅमगर्ल म्हणजे वेबकॅमद्वारे अंगप्रदर्शन. अॅडल्ट एंटरटेन्मेटमध्ये काम करण्याच्या सुरुवातीच्या काळात वेनेस्सा लाजाळू होत्या. त्यामुळे त्यांनी जेनेस्सा ब्राझिल असं नावही धारण केलं.
ब्राझील आडनाव घेण्याचं कारण त्या देशात जन्म झालं म्हणून नव्हे, तर इंटरनेटवर ब्राझिल शब्दाचा सर्च सर्वाधिक होता. “मला हे नाव अजिबात आवडत नव्हतं, पण त्या नावानं मला बरीच प्रसिद्धी मिळवून दिली,” असं वेनेस्सा सांगतात.
प्रत्येक कॅटफिशच्या मागे एक आमिष असतं.
काही काळासाठी सर्वकाही सुरळीत सुरू होतं. वेनेस्सा यांचं त्यांच्या चाहत्यांसोबत चांगलं नातं निर्माण झालं होतं. वेनेस्सा यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी चाहते दर मिनिटाला 20 डॉलर देत होते. वेनेस्सा म्हणतात, मी त्यांच्यासोबत मजामस्ती करायची आणि ते त्यात अडकत जायचे.
करिअरच्या सर्वोच्च स्थानी असताना वेनेस्सा लाखोंमध्ये अमेरिकन डॉलरची कमाई करत होत्या. जेनेस्साची स्वत:ची वेबसाईट होती, यशस्वी ब्रँड आणि व्हायब्रंट ऑनलाईन प्रेझेन्स होता. मात्र, 2016 मध्ये त्यांचं ऑनलाईन प्रोफाईल अचानक गायब झालं.
‘लव्ह, जेनेस्सा’ पॉडकास्टमध्ये सहभागी करून घेण्यासाठी वेनेस्सा यांना शोधण्यासाठी आम्हाला नऊ महिने लागले. शेवटी अमेरिकेच्या पूर्वेकडील समुद्रकिनारी असलेल्या अपार्टमेंटमध्ये वेनेस्साला आम्ही गाठलं.
माझे व्हीडिओ-फोटो वापरून फसवणूक करणाऱ्यांना रोखण्यासाठी मला माझं काम काही काळ थांबवावं लागलं, असं वेनेस्सा सांगतात.
एकदा लाईव्ह शो दरम्यान एका व्यक्तीनं पती असल्याचं सांगितलं. त्यावेळी वेनेस्सा यांना वाटलं की, ही व्यक्ती मस्करी करतेय. पण नंतर तिने त्या व्यक्तीला ईमेल करण्यास सांगितलं आणि हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
नंतर अनेक पीडित एकामागोमाग एक पुढे येऊ लागले. हे सर्वजण वेनेस्सा यांच्या लाईव्ह शो दरम्यान कमेंटमधून आपली गाऱ्हाणी सांगू लागले. शिवाय, वेनेस्सा यांना त्यांची ओळख सिद्ध करण्याचं आवाहनही करू लागले. काहीजण तर अश्लिल मेसेज करू लागले.

सातत्यानं येणाऱ्या मेसेज आणि ईमेल्समुळे वेनेस्सा यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला.
“हे सगळं एखाद्या भयानक स्वप्नासारखं होतं. मला त्या पुरुषांबाबत खरंच वाईट वाटतं. मी काय करायला हवं होतं?” असं त्या म्हणतात.
सुरुवातीला वेनेस्सा यांनी प्रत्येक ईमेलला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला. यात त्यांचा बराच वेळ जाऊ लागला. मग त्यांनी पतीला सांगितलं. त्यांचा पती त्यांचा मॅनेजरच होता. मग पतीने वेनेस्सा यांना येणारे मेसेज मॉनिटर करण्यास सुरुवात केली. वेनेस्सा यांच्या पतीने मेसेज करणाऱ्यांना स्पष्ट सांगितलं की, मी किंवा वेनेस्सा तुमच्या फसवणुकीला जबाबदार नाही.
“फसवणूक करणाऱ्यांना या लोकांनी पाठवलेले सर्व पैसे जर मला मिळाले असते, तर मी आज अब्जाधीश झाले असते, इथे माझ्या छोट्याशा अपार्टमेंटमध्ये बसले नसते,” असं वेनेस्सा म्हणतात.
वेनेस्सा म्हणतात की, स्त्रियांची काळजी घेण्याची इच्छा अनेक पुरुषांच्या स्वभावात असते. त्यामुळे न भेटलेल्या स्त्रियांनाही मदत लागल्यास ते पैसे पाठवतात.
“स्वत:बद्दल चांगलं वाटावं, यासाठी जरी त्यांच्या पैसा नसेल, तरी ते आर्थिक मदत करू इच्छित असतात,” असंही त्या म्हणतात.
इटालियन रॉबर्टो मरिनी या 30 वर्षीय व्यक्तीलाही फसव्या जेनेस्सानं आमिष दाखवलं होतं. हनाह नावाच्या महिलेनं फेसबुकवर मेसेज करून या सगळ्याची सुरुवात झाली. सार्डिनिया बेटावरील त्याच्या शेतीविषयक स्टार्टअपचं कौतुक करून संवादाला सुरुवात झाली.
तीन महिन्यानंतरच्या प्रेमळ संवादानंतर एकमेकांचे फोटोही एकमेकांना पाठवले गेले. त्यानंतर त्या हनाह नामक महिलेनं पैशांची मागणी सुरू केली. सुरुवातीला फोन खराब झालाय, म्हणून दुरुस्तीसाठी पैसे हवेत, अशा छोट्या गोष्टींपासून याची सुरुवात झाली. नंतर तिने पैशाची मागणी वाढवली. नंतर तिने तिला आयुष्यात बऱ्याच अडचणी सहन कराव्या लागत असल्याचं सांगितलं. त्यामुळे अॅडल्ट एंटरटेन्मेटकडे वळल्याचंही तिने सांगितलं.
रॉबर्टोला तिच्याबद्दल सहानुभूती वाटत गेली आणि एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीप्रमाणे तिची काळजी करू लागला. पण ती कधीच प्रत्यक्ष बोलण्यास तयार होत नसे. जेव्हा कधी फोनवर बोलण्याचं नियोजन होत असे, तेव्हा तेव्हा तिचा फोन खराब होत असे किंवा आणखी कुठलंतरी कारण ती पुढे करत असे.
एकेदिवशी रॉबर्टोला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हनाहचे हजारो फोटो आणि व्हीडिओ सापडले. पण ते जेनेस्सा ब्राझिलचे होते.
गोंधळात पडलेल्या रॉबर्टोनं जेनेस्सा ब्राझिलच्या ऑनलाईन लाईव्ह शोला हजेरी लावली. “ही तूच आहेस?” असा प्रश्न त्याने चॅटबॉक्समधून विचारला. त्याला उत्तर मिळालं नाही. तिथे प्रत्येक मिनिटाला पैसे द्यावे लागत असल्यानं तो जास्त वेळ तिथे थांबला नाही.
मग सत्य शोधण्याच्या हेतूने रॉबर्टोनंही ईमेल धाडला. अनेकांप्रमाणेच रॉबर्टोलाही जेनेस्सा खरी असेल.
पॉडकास्टमध्ये बोलताना वेनेस्सान सांगते की, इनबॉक्स पाहिल्यास हजारो मेसेज मला दिसतात.
“हाय, मला खऱ्या जेनेस्सा ब्राझिलशी बोलाचं आहे,” असं त्या मेसेज बॉक्समध्ये 2016 साली मेसेज होता. तिने त्यावर रिप्लाय दिला होता, “मी खरी जेनेस्सा ब्राझिल आहे.”
त्याने तिला आणखी काही प्रश्न विचारले आणि आधी कधी बोलणं झालंय का हे शोधण्याचा प्रयत्न केला. ईमेलवरील हा संवाद पहिला आणि शेवटचा होता.
मात्र, हा शेवट नव्हता. रॉबर्टो फसवणुकीच्या जाळ्यातून सुटला नव्हता. त्याने चार वर्षात एकूण अडीच लाख डॉलर पाठवले. सर्व बचत त्यातच संपवली, शिवाय मित्र आणि नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले, बँकेतून कर्ज घेतलं.
रॉबर्टो आता इतरांना सावध करत आहे की, जेनेस्साच्या चोरलेल्या फोटोंचा वापर करून फसवणुकीचे प्रकार केले जातायेत. मात्र, एवढं सारं होऊनही रॉबर्टोला अजूनही वाटतं की, जेनेस्सासोबत त्यांचं खरं नातं जुळलं होतं.
हेच तर एखाद्या यशस्वी फसवणुकीची लक्षणं आहेत, असं फिलाडेल्फियातील गुन्हेगारी कायद्यासंदर्भातील तज्ज्ञ डॉ. अंशुल रेगे म्हणतात. डॉ. रेगे यांनी ऑनलाईन रोमान्स घोटाळ्यांवर विशेष अभ्यास केला आहे.
त्या म्हणतात की, गुन्हेगारी नेटवर्ककडून पीडितांना मेसेज पाठवले जातात. फोटो आणि माहिती शेअर केली जाते. त्यांना असंही आढळलं की, यासाठी खास नियमावलीही तयार केली गेलीय. कधीही फोन कॉलवर बोलणं टाळावं, जेणेकरून उघडे पडू शकतात, असे नियमत त्यात असतात.
या सर्व फसवणुकीच्या घटनांचा पॅटर्न एकच असतो. सुरुवतीला प्रेमात पाडायचं, मग ब्रेकअपच्या धमक्या द्यायच्या आणि नंतर आर्थिक मदत मागायची.
“माणसं एकमेकांना मदत करू इच्छितात. त्याचा गैरफायदा या फसवणुकीच्या प्रकारात घेतला जातो,” असं डॉ. रेगे म्हणतात.

वेनेस्सा म्हणतात की, “या क्लृप्त्यांचा मला राग येतोय. ते प्रेम असल्याचं सांगून मग लुटतात. अशाने लोक अस्वस्थ होतात आणि काहीही करायला तयार होतात.”
डॉ. रेगेंना वाटतं की, रॉबर्टोबाबत जे झालं, ते एखाद्या संघटित गुन्हेगारांनी केलंय. जगभरात यासंबंधी मोठं नेटवर्क काम करतं. तुर्कस्थान, चीन, यूएई, यूके, नायजेरिया आणि घाना अशा देशांमध्ये असंख्यजण असं नेटवर्क चालवतात.
रॉबर्टोला पैसे पाठवण्यास सांगणाऱ्याचं एक ठिकाण घानामधील होतं. सकावा बॉईज् नावाचा हा गट घानातील आहे. अक्क्रा या घानाच्या राजधानीमध्ये आम्हाला त्यातील एकजण सापडला. ओफा नामक मितभाषी तरुण मुलगा. त्याने त्याचं काम वाईट असल्याचं कबुल केलं. त्याने 50 हजार डॉलरची कमाई केली.
ओफाला जेव्हा जेनेस्साचे फो दाखवण्यात आले, तेव्हा तिचे फोटो त्याने कधी वापरले नसल्याचं सांगितलं. मात्र, अशा प्रकारच्या फसवणुकीसाठी वेगवेगळ्या फोटोंचा वापर होतो, हे मान्य केलं. कधी स्वयंपाक करतानाचा फोटो, कधी व्यायाम करतानाचे फोटो वापरले जातात, असं तो म्हणाला.
रोज कॅमेऱ्यावर परफॉर्म केल्यानं वेनेस्साच्या मानसिक आरोग्यावर आता परिणाम होऊ लागलाय. तसंच तिच्या वैवाहिक नात्यातही अडचणी येऊ लागल्यात. लाईव्ह शोपूर्वी मद्य सेवनाची सवय तिला लागलीय.
2016 नंतर वेनेस्सा यांनी या क्षेत्राला पूर्णविराम दिला. इतकंच नाही, तर घर सोडून पतीसोबत त्या नव्या प्रवासाला निघाल्या. सध्या त्या थेरपिस्ट म्हणून प्रशिक्षण घेत आहेत आणि आठवणी लिहित आहेत.
वेनेस्सा कधीच पोलीस किंवा इतर प्रशासनाकडे फसवणूक करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करायला गेल्या नाहीत. प्रशासन योग्य कारवाई करेल, याची त्यांना खात्री वाटत नाही. त्या म्हणतात, “पोलीस प्रशासन माझ्याकडे असेच पाहतील की, ही पॉर्न स्टार आहे आणि माझ्याकडे पाहून हसतील.”
(हन्नाह अजाला, लॉरा रेगर, कॅटरिना ओन्स्ताद आणि सामयना राटा यांनी वृत्तांकन केलंय. तसंच, जेनी लॉ यांनी चित्र रेखाटली आहेत.)











