लिओनेल मेस्सी दिएगो मॅराडोनाची बरोबरी करणार का?

    • Author, गॅरी लिनेकर
    • Role, माजी फूटबॉलपटू

या वर्ल्डकपमध्ये मेस्सीनं सहा सामने खेळले आहेत आणि त्यापैकी चार सामन्यांत तो मॅन ऑफ द मॅच ठरलाय.

फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेची अंतिम सामना अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात होतोय. या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी, वर्ल्डकप फुटबॉलमध्ये लिओनेल मेस्सीचा प्रवास इथंच थांबणार हे नक्की.

त्याच्या अनुपस्थित फुटबॉलचा आनंदही नक्कीच काहीसा कमी होईल, यात मला शंकाच नाही.

या अंतिम सामन्यात कोणीही विजयी झालं तरीही, मेस्सीनं आतापर्यंतच्या त्याच्या कामगिरीनं जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या मनामध्ये कायमचं अढळ स्थान निर्माण केलंय.

क्रोएशियाच्या विरोधात विजय मिळवल्यानंतर एका पत्रकारानं मेस्सीला, "तू सर्वांच्या जीवनावर एक वेगळा प्रभाव टाकला आहे. फ्रान्सच्या विरोधात सामना जिंकून पहिला विश्वचषक जिंकण्याच्या तुलनेतही, ते अधिक महत्त्वाचं आहे,'' अशी प्रतिक्रिया दिली. हा एक अत्यंत खास असा क्षण होता.

त्या पत्रकारानं अगदी योग्य म्हटलं होतं.

लोक असंही म्हणतात की, मी मेस्सीबाबत खूप काही बोलत असतो. पण त्यात मला काहीही गैर वाटत नाही. कारण मेस्सीला खेळताना पाहणं, हे माझ्यासाठी गेल्या दोन दशकांमधील सर्वांत आनंददायी असे क्षण होते.

35 वर्षांचा मेस्सी आता फार काळ फुटबॉल खेळू शकणार नाही. त्यामुळं तो खेळत असलेल्या प्रत्येक क्षणातून मिळणाऱ्या आनंदाची अनुभुती आपण घ्यायला हवी.

या विश्वचषकात मेस्सीनं सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी चारमध्ये त्यानं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय. त्यानं संघासाठी पाच गोल केले असून तीन गोलसाठी त्यानं मोलाची मदत केलीय.

गोल आणि त्यासाठीची अनमोल मदत

मेस्सीची स्पर्धेतील इतर फुटबॉलपटूंशी तुलना करता, तो सर्वांपेक्षा वेगळा असा उठून दिसला आहे.

मैदानावर तर अनेकदा प्रतिस्पर्धी संघाच्या तीन-चार खेळाडुंनी त्याला घेरल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातून तो कसा बाहेर पडणार असंच नेहमी वाटतं, पण मेस्सी प्रत्येक वेळी ते कडं तोडण्यात यशस्वी ठरला.

मी अनेकदा म्हटलं आहे की, तो आतापर्यंतचा सर्वांत महान फुटबॉलपटू आहे. मी हे त्याच्या गोलच्या आकड्यांवरुन म्हणत नाही, तर त्याचं वजन, जागरुकता आणि निर्णय घेण्याची क्षमता यामुळं मी म्हणतो. कायम असं वाटत असतं की, तो खेळत नसून मैदानाच्या वरून खेळ पाहत असावा.

या वर्ल्ड कपमध्ये जेव्हाही चेंडू त्याच्याकडं गेला, तेव्हा लोकांच्या नजरा त्याच्यावरच खिळल्याचं पाहायला मिळालंय. लोकांना त्याची जादू पाहण्याची प्रचंड इच्छा असते आणि तो प्रत्येकवेळी सर्वांच्या अपेक्षांवर खरादेखील उतरत असतो.

त्याला खेळताना पाहताना तर अनेकदा श्वास थांबलाय की काय असं वाटतं. अत्यंत उत्तमपणे ड्रिब्लिंग करत तो जसा नेदरलँड्स च्या विरोधात गोलसाठी अचूक पास देतो किंवा मेक्सिकोच्या विरोधात अगदी खास असा गोल करतो तेव्हा असाच अनुभव येतो. याच गोलमुळं या वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाचं नशीब पालटलेलं आहे.

सेमिफायनल सामन्यात त्यानं ज्युलियन अल्वारेझला ज्या पद्धतीनं गोलसाठी पास दिला, तोही अविश्वसनीयच होता. अगदी पापणी लागावी एवढ्या काळात, मेस्सीनं जगातील सर्वात शक्तीशाली डिफेन्सला फक्त पार केलं नाही, तर आता पुढं काय करायचं याचाही विचारही केला आणि चेंडू अल्वारेझकडं पासही केला.

मेस्सीचा एक्स फॅक्टर

मेस्सीनं अविश्वसनीय, अद्वितीय खेळाडू असल्याचं गेल्या अनेक वर्षांमध्ये सिद्ध केलंय. तुम्ही त्याला फक्त याच वर्ल्ड कपमध्ये खेळताना पाहिलं असलं तरीदेखील, तो एक वेगळ्या प्रकारचा आणि खास फुटबॉलपटू असून, आजच्या काळात त्याच्या आसपासही येऊ शकेल असं कोणी नसल्याचं, तुमच्या लक्षात येईल.

एखाद्या खेळाडुची दुसऱ्याबरोबर तुलना करायची असेल तर शक्यतो आपण गोलची संख्या पाहून ही तुलना करू लागतो. पण महान खेळाडू म्हणजे, तो माझ्यापेक्षाही उत्तम खेळाडू आहे. जर या आधारावर विचार केला तर मी स्वतःला दिएगो मॅराडोनापेक्षा थोडं उत्तम समजतो, पण हे कोणालाही अगदीच बिनडोकपणाचं वाटू शकतं.

सध्या मेस्सी विरुद्ध क्रिस्टियानो रोनाल्डो याबाबतही चर्चा पाहायला मिळत आहे. गोलच्या संख्येचा विचार करता दोघंही जवळपास सारखेच आहेत. पण माझ्या मते, मेस्सीमध्ये खूप जास्त एक्स फॅक्टर आहे.

रोनाल्डो कधीही अगदी खास गोल करू शकतो, किलियन एम्बापे त्याच्या वादळी वेगानं हा कारनामा करू शकतो. पण जे मेस्सी करू शकतो, ते या दोघांनाही शक्य नाही.

मेस्सी अगदी काही क्षणांमध्ये चार-पाच डिफेंडर असतानाही त्यांना केवळ चुकवत नाही तर अगदी काही मीटर अंतरावरून गोल करण्यासाठी कोणालाही अचूक पास देऊ शकतो. अगदीच कोणी नसेल तर तो स्वतःच गोलपर्यंतची कामगिरी फत्ते करू शकतो.

त्यानं संपूर्ण करिअरमध्ये अनेकदा असं केलंय. या स्पर्धेतही केलं आहे. काही समीक्षकांनी त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्हं नक्कीच उपस्थित केलं होतं, कारण सेंट जर्मनसाठी खेळताना तो संघर्ष करत होता. पण तसं काहीही नव्हतं.

मेस्सीला खेळताना पाहणं मला आवडतं. त्यामुळं मी पीएसजीचे सर्व सामने पाहिले आहेत. या हंगामात मेस्सी संघासाठी चांगला खेळत होता.

त्याचा वेग आता पहिल्यासारखा नाही, हे खरं असलं तरी त्याची खेळण्याची नैसर्गिक शैली कायम आहे. एवढ्या दीर्घ काळापासून शिखरावर असला तरी, खेळाप्रती असलेली त्याची बांधिलकी अजूनही तशीच आहे.

1986 मध्ये चॅम्पियन बनला होता अर्जेंटिना

खेळाडू म्हणून मेस्सीच्या एका वैशिष्ट्याकडं सर्वांची नजर गेली असेल. तो मैदानात अॅक्शनमध्ये नसतो तेव्हा त्याला पाहा. तो काय करतोय याचं कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं. असं वाटतं जणू तो खेळाचा अभ्यास करत असेल, किंवा प्रत्येक पोझिशनवर खेळणाऱ्या खेळाडूचा तो अंदाज घेत असावा किंवा त्या क्षणी तो आराम करत असतो?

तो कायम असं काहीतरी करताना दिसत असतो. पण बार्सिलोनाकडून खेळताना जेव्हा तो सर्वाधिक आक्रमक होता, त्यावेळी तो सर्वाधिक वेळा अशी कामगिरी करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. माझ्या मते, अर्जेंटिनाच्या संघाबरोबरही मेस्सीनं तशी केमिस्ट्री तयार केली आहे. त्यामुळंच कदाचित हा संघ 1986 च्या वर्ल्ड चॅम्पियनसारखा भासतो.

1986 च्या वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीममध्ये ऑस्कर रगेरी आणि जोसे लुई ब्राऊज सारखे डिफेंडर होते. मिडफिल्डमध्ये ज्युलियो ओलार्टिकोहेया आणि जॉर्ज बुरुचागा होते. त्या सर्वांबरोबरच जॉर्ज वालडानोदेखील होते. मॅराडोना तर होतेच.

2022 च्या अर्जेंटिनामध्ये इतर पोझिशनसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील चेहरे कदाचित नसतीलही, पण संपूर्ण संघ एकटवटलेला दिसून येत आहे. शिवाय अल्वारेझसारखे फॉरवर्ड खेळाडूही अत्यंत उत्तम खेळत आहेत.

त्याशिवायही या दोन संघांमध्ये साम्य दिसण्याचं कारण म्हणजे, मेस्सी.

मेस्सी संघासाठी तीच कमाल करू शकतो, जी मॅराडोनानं 1986 मध्ये करून दाखवली होती.

मेस्सी आणि मॅराडोनाची तुलना

सर्वकालीन महान फुटबॉलपटूच्या नावावर चर्चा करणं हे कायमच रंजक असतं. कारण याबाबत प्रत्येकाचं स्वतंत्र असं एक मत असतं. पण तुम्ही ज्यांना खेळताना पाहिलं आहे, त्यांचा तुमच्यावर अधिक प्रभाव असतो.

मी अशा सर्वकालीन महान खेळाडुंमध्ये पेलेचा समावेश करत नाही, कारण मी त्यांना फार खेळताना पाहिलेलं नाही. 1970 च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी त्यांच्या संघाला चॅम्पियन बनवलं तेव्हा मी 9 वर्षांचा झालो होतो, तरीही मी त्यांना फार पाहिलेलं नाही.

माझ्यासाठी तर या यादीत दोनच खेळाडू आहेत, मॅराडोना आणि मेस्सी. दोघेही एकाच देशाचे आहे, दोघेही डाव्या पायानं खेळणारे फुटबॉलपटू आहेत आणि दोघेही फारसे उंच नाहीत. कमी उंचीमुळंच दोघंही खेळाच्या मैदानात बरंच काही रंजक पद्धतीनं करत असतात.

असं असलं तरी, दोन वेगळ्या कालखंडातील खेळाडुंची तुलना होऊ शकत नाही. कारण या दरम्यान खेळात बरेच बदल झालेले असतात. मॅराडोना सातत्यानं चेंडू किक करत असायचे.

मी जेव्हा बार्सिलोनाकडून खेळायचो, तेव्हा मला 1987 मध्ये फुटबॉल लीगच्या शतक सोहळ्यात त्यांच्याबरोबर रेस्ट ऑफ द वर्ल्ड टीमकडून खेळण्याची संधी मिळाली होती. ते आमच्याबरोबर ड्रेसिंग रूममध्ये आले तेव्हा, आम्हाला सर्वांना विश्वासच बसत नव्हता. कारण आमच्या प्रत्येकावरच त्यांचा प्रभाव होता.

आम्ही सराव सामना खेळत होतो तेव्हा मॅराडोना यांना चेंडू मिळाला, त्यावेळी हाफलाईनपासून हवेत जवळपास 150 फूट उंच किक मारली, आणि चेंडू खाली आला तेव्हा पुन्हा चेंडूचा ताबा त्यांच्याकडंच होता. त्यांनी अशी किमया किमान 12 वेळा केली होती.

मी बार्सिलोनाच्या इतर खेळाडूंशी या स्टाईलबाबत बोलत होतो. त्यानंतर आम्ही जेव्हा स्पेनला परतलो तेव्हा आम्ही सर्वांनी मिळून याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आमच्यापैकी सर्वोत्तम धावू शकणाऱ्याला केवळ तीनवेळा असं करणं शक्य झालं होतं.

मेस्सी प्रमाणंच मॅराडोना यांना खेळताना पाहणं ही पर्वणी असायची. दोघांमध्ये अनेक प्रकारची साम्यं असली तरीही हे लक्षात घ्यायला हवं की, मॅराडोना यांना केवळ सात वर्ष सर्वोत्तम फुटबॉल खेळता आला होता. कारण मैदानाबाहेरचेही त्यांचे काही विषय होते.

फुटबॉलपटू म्हणून दीर्घकाळ सर्वोत्तम कामगिरी करणं हाच दोघांमध्ये कोण श्रेष्ठ हे ठरवण्याचा मापदंड असू शकतो. क्लब फुटबॉल आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये जेवढं यश मेस्सीनं मिळवलंय, त्याच्या आसपास कोणीही नाही.

माझ्या मते तो कतारमध्ये अत्यंत उत्तम खेळतोय याचं आणखी एक कारण म्हणजे, त्यानं अर्जेंटिनासाठी 2021 चा कोपा अमेरिका चषक जिंकला आहे. त्यामुळं त्याला फारसा दबाव जाणवत नसावा. पण तरीही त्याला वर्ल्डकप जिंकायचा असणारच. माझ्या मते या स्पर्धेचा यापेक्षा चांगला समारोप होऊ शकणार नाही.

(गॅरी लिनेकर यांनी दोहामध्ये बीबीसी स्पोर्ट्सचे प्रतिनिधी क्रिस बेवन यांच्याशी बोलताना ही मते मांडली.)