'अजून खूप लढाई बाकी आहे', नोबेल विजेती कादंबरी 'द व्हेजिटेरियन' आणि भारतातील महिलांचं वास्तव - ब्लॉग

नोबेल विजेती लेखिका हान कांग यांनी लिहिलेली 'द व्हेजिटेरियन' ही कादंबरी साऊथ कोरियामध्ये घडते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नोबेल विजेती लेखिका हान कांग यांनी लिहिलेली 'द व्हेजिटेरियन' ही कादंबरी साऊथ कोरियामध्ये घडते.
    • Author, अ‍ॅड. अभिधा निफाडे.
    • Role, बीबीसी मराठीसाठी

तिच्या ओठांवरून रक्त हळूहळू गळत होतं. तिचा नवरा , आई, बहीण, मेहुणा सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे केंद्रित झालेले होते. आश्चर्य, चिडचिड, घृणा आणि भीती अशा अनेक छटा त्यांच्या डोळ्यात दिसत होत्या. यॉन्ग-ह्ये मात्र शांत उभी होती!

तिच्या वडिलांनी जबरदस्तीने मांस तिच्या तोंडात कोंबलं होतं - तिच्या संमतीशिवाय, तिच्या इच्छेच्या विरुद्ध. 

तोंडातून मांसाचा तुकडा बाहेर काढत ती फक्त एकच वाक्य बोलली, "मी मांस खाणार नाही!" त्या क्षणी खोलीत स्मशानशांतता पसरली, मात्र यॉन्ग-ह्येच्या आयुष्यात एक वादळ सुरू झालं होतं !

नोबेल विजेती लेखिका हान कांग यांनी लिहिलेली 'द व्हेजिटेरियन' ही कादंबरी साऊथ कोरियामध्ये घडते. मांसाहार हा तिथल्या जीवनपद्धतीचा एक अविभाज्य भाग आहे.

अशा वातावरणातील कादंबरीची नायिका यॉन्ग-ह्ये ही तिला पडलेल्या एका भयावह स्वप्नानंतर अचानक एक दिवस मांसाहार सोडते !

खरंतर मांसाहार सोडणं ही एक अतिशय वैयक्तिक निवड. पण ही साधी कृती तिच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी क्रांतीकारक ठरते. तिच्या नवऱ्याला ती अस्वस्थ करणारी वाटते, वडिलांना तिचं हे पाऊल अवहेलनेसारखं वाटतं, आणि समाजाला तिचं वर्तन मानसिक विकृतीसारखं दिसतं.

जसजसं कथानक पुढे सरकतं, तिचं स्वातंत्र्य, तिचं शरीर, आणि तिला मिळणारा आदर सगळं तिला नाकारलं जातं.

कथेच्या सुरुवातीला 'माझी बायको व्हेजिटेरियन होण्याआधी मी तिला प्रत्येक बाबतीत अतिसामान्य समजायचो' असं म्हणणारा तिचा नवरा जेव्हा आपल्या मांस न खाण्याच्या असामान्य निग्रहावर ठाम राहते, तेव्हा मात्र ते सहन न होऊन तो तिच्याशी घटस्फोट घेतो.

नोबेल विजेती लेखिका हान कांग यांनी लिहिलेली 'द व्हेजिटेरियन' ही कादंबरी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नोबेल विजेती लेखिका हान कांग यांनी लिहिलेली 'द व्हेजिटेरियन' ही कादंबरी

स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारी एक कार्यकर्ती म्हणून मला यॉन्ग-ह्येचं आयुष्य हे अशा प्रत्येक स्त्रीचं प्रतीक वाटलं, जिचे स्वतःच्या शरीरावर, निर्णयांवर आणि आयुष्यावर असलेले हक्क पद्धतशीरपणे हिरावले जातात.

मग ते गर्भधारणेचा अधिकार असो, लग्नाचे निर्णय असोत किंवा रोजच्या जगण्यातली स्वायत्तता. या कादंबरीत तिचं शाकाहारी होणं हे प्रतिकात्मक वापरलं आहे, त्याचा अर्थ मात्र अतिशय व्यापक आहे.

तिच्या मौनातल्या बंडाने खरंतर मला जास्त हादरवलं. आजही, जेव्हा एखादी स्त्री स्वतःसाठी निर्णय घेते, तेव्हा ती 'हट्टी', 'चिडचिडी', किंवा 'अविवेकी' ठरवली जाते.

किती वेळा आपण ऐकतो, "असं कोण करतं?", "तिला काही समजत नाही", किंवा "ती खूप वाईट वागते". तिच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह लावलं जातं, कारण ती पुरुषप्रधान समाजाच्या नियम चौकटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते.

नोबेल विजेती लेखिका हान कांग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नोबेल विजेती लेखिका हान कांग

सगळ्यात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे, ही कथा केवळ दक्षिण कोरियासाठीच नव्हे, तर भारतासाठीही तितकीच लागू होते, किंबहुना अधिक तीव्रतेने!

भारतात, बहुतेक स्त्रिया अजूनही स्वतःचे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत. जरी त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्या, तरी समाज आणि संस्कृती त्यांना मानसिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ देत नाही.

'नाही' म्हणणं अजूनही गुन्हा मानलं जातो , मग तो लग्नाच्या प्रस्तावाला असो, एखाद्या नोकरीच्या कामाला असो किंवा नको त्या स्पर्शाला विरोध करताना.

कामाच्या ठिकाणी स्त्रियांची सुरक्षितता यावर काम करत असताना अनेकदा हे अनुभवायला मिळतं, जेव्हा स्त्रिया आपल्या हक्कांसाठी आवाज उठवतात, तेव्हा पुरुषांचा त्याला प्रखर विरोध असतो.

ऑफिसमधलं वातावरण असो, की असंघटित क्षेत्र - स्त्रीचं स्वतःचे निर्णय स्वतः घेणं अनेक पुरुषांसाठी अस्वस्थ करणारा अनुभव ठरतो. सत्ता आपण हातून निसटते की काय , ही भीती त्यांना सतावते.

सगळ्यात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे, ही कथा केवळ दक्षिण कोरियासाठीच नव्हे, तर भारतासाठीही तितकीच लागू होते, किंबहुना अधिक तीव्रतेने!

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सगळ्यात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे, ही कथा केवळ दक्षिण कोरियासाठीच नव्हे, तर भारतासाठीही तितकीच लागू होते, किंबहुना अधिक तीव्रतेने!

'द व्हेजिटेरियन' मधली एक वेदनादायक बाब म्हणजे, यॉन्ग-ह्ये हिचं शरीर संघर्षाचं रणांगण बनतं. ती मांसाहार न करण्याचा निर्णय घेते, पण तिच्या शरीरावर नियंत्रण मिळवण्याचा, तिचा निर्णय येनकेनप्रकारे बदलण्याचा प्रयत्न सगळेजण वेगवेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतात.

मग तो काळजीपोटी केलेला वैद्यकीय हस्तक्षेप असो, तिला वठणीवर आणण्यासाठी नवऱ्याने केलेला लैंगिक अत्याचार असो किंवा यासर्वात कुटुंबाकडून होणारी तिची मानसिक ससेहोलपट असो. तिच्या या निर्णयाला मान्यता तर मिळत नाहीच , उलट तिला त्याची शिक्षा मिळते.

माझ्या कामात याचं प्रतिबिंब प्रत्यक्षात पाहायला मिळतं. विवाहासाठी नकार देणाऱ्या मुली, समान वेतनाची मागणी करणाऱ्या कर्मचारी स्त्रिया, किंवा लैंगिक हिंसेनंतर न्याय मागणाऱ्या महिला यांना समाजाकडून आणि व्यवस्थेकडून त्या गुन्हेगार असल्यासारखी दिलेली वागणूक.

यॉन्ग-ह्येची कथा मला अशा अनेक स्त्रियांची आठवण करून देते. ज्या हल्लेखोरांपेक्षा अधिक जास्त दोषी ठरवल्या जातात, केवळ या अन्यायाला त्यांनी विरोध केला म्हणून.

भारतात, बहुतेक स्त्रिया अजूनही स्वतःचे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतात, बहुतेक स्त्रिया अजूनही स्वतःचे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हे पुस्तक वाचून संपवल्यावर एक प्रश्न मनात घोळत राहिला, जर यॉन्ग-ह्येऐवजी तिच्या नवऱ्याने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला असता, तर एवढा गदारोळ झाला असता का? त्याच्या कुटुंबाने त्याला बळजबरीने मांस खाऊ घातलं असतं का? त्याला वेड्यात काढून रुग्णालयात भरती केलं असतं का?

नक्कीच नाही! कारण जेव्हा पुरुष निर्णय घेतात, तेव्हा ते 'स्वतंत्र विचार' मानले जातात, पण जेव्हा स्त्रिया तेच करतात, तेव्हा त्यांना 'बंडखोर', 'अविचारी' ठरवलं जातं.

यॉन्ग-ह्येची कथा एक शोकांतिका आहे, पण ती एका ठाम स्त्रीच्या मनोबलाची सुद्धा कथा आहे. जी सामाजिक चौकटी मोडून स्वतःचं अस्तित्व जपते. घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांची तमा न बाळगता निग्रही राहते.

'द व्हेजिटेरियन' ही कादंबरी आपल्याला कोणतेही स्पष्ट उत्तर देत नाही, उलट ती एक अस्वस्थता निर्माण करते. समाजाचं स्त्रिया आणि त्यांच्या निवडींवर असलेलं नियंत्रण यावर विचार करायला लावते.

एकदा या सर्व प्रकरणावर विचार करताना कादंबरीच्या नायिकेला म्हणजे यॉन्ग-ह्येला एक जाणीव आश्चर्यचकित करून जाते ती म्हणजे 'ती जगलीच नाहीये खरंतर ! जेव्हापासून तिला आठवतंय तेव्हापासून तिने फक्त सहनच केलंय.

स्वतःच्या अंगभूत चांगुलपणाला जागून, मानवतेवर विश्वास ठेवत, कोणालाही आपल्यामुळे इजा होऊ नये हे जपत, योग्य मार्गाने गोष्टी मिळवता येतात यावर अढळ निष्ठा ठेवत ती जगत होती.

पण का बरं कोण जाणे आता मात्र तिच्या आजूबाजूच्या बदलणाऱ्या वातावरणात तिला, ती म्हणजे स्त्री म्हणून स्वतःच घालून घेतलेल्या चौकटीत बंदिस्त होत जगायचं राहून गेलेली एक लहान मुलगी वाटते' हा साक्षात्कार झाल्यावर तिचा हा निग्रह मग नकळत तिच्या अस्तित्वाची लढाई होऊन जाते .

यॉन्ग-ह्येची कथा एक शोकांतिका आहे, पण ती एका ठाम स्त्रीच्या मनोबलाची सुद्धा कथा आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, यॉन्ग-ह्येची कथा एक शोकांतिका आहे, पण ती एका ठाम स्त्रीच्या मनोबलाची सुद्धा कथा आहे.

माझ्यासाठी किंवा सर्व विचारी जणांसाठी, 'द व्हेजिटेरियन' ही केवळ एक कादंबरी नाही, ती एक जाणीव आहे की, अजून खूप लढाई बाकी आहे.

कामाच्या ठिकाणी तर आहेच पण घरात देखील. यॉन्ग-ह्येच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा जाणवलं, स्त्रियांच्या हक्कांसाठी जागरूकता, संरक्षण, आणि कायदेशीर आधार देणं किती गरजेचं आहे.

ही कादंबरी संपवताना मी खूप भारावले होते, पण त्याचवेळी एक नवी जिद्दही मिळाली. जर प्रचलित नियम रीती पाळल्या नाहीत तर हे परिणाम भोगावे लागत असतील, तर स्त्रियांचं खरंखुरं स्वातंत्र्य मिळवणं अजून किती दूर आहे हे विचार करायला लावणारं आहे.

म्हणूनच, जेव्हा स्त्रिया गप्प केल्या जातात, जेव्हा त्यांचं शरीर आणि मन यावर त्यांचा हक्क हिरावून घेतला जातो, तेव्हा मी आणि माझ्यासारख्या अनेकींनी सजगतेने, अधिक ठामपणे पुढे जायला हवं.

यावर्षीच्या या नोबेलविजेती ही कादंबरी एकच गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित करते ती म्हणजे, ही लढाई अजून संपलेली नाही !

(अभिधा निफाडे एक वकील असून त्या 'अरुणा' या संस्थेच्या माध्यमातून महिला आणि कामगार यांच्या हक्कांवर काम करतात.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)