नितंब वाढवण्यासाठीची कॉस्मेटिक सर्जरी केली आणि जीव गमावण्याची वेळ आली

मेलिसा केर

फोटो स्रोत, NATASHA KERR

ब्रिटीश नागरिक असलेल्या मेलिसा केर आपल्या नितंबांचा आकार वाढवण्यासाठी 2019 साली तुर्कीच्या इस्तंबूलमधील एका खाजगी रुग्णालयात गेल्या होत्या. पण 31 वर्षीय मेलिसासाठी ही शस्त्रक्रिया जीवघेणी ठरली.

या शस्त्रक्रियेला 'ब्राझिलियन बट लिफ्ट' असं म्हटलं जातं.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटीश सरकारने म्हटलं आहे की, ते अशा वैद्यकीय आणि सौंदर्यप्रसाधन पर्यटनासाठी असलेल्या नियमांबाबत तुर्कीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील.

ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी यावर चिंता व्यक्त करताना म्हटलं आहे की, मेलिसासह इतर अनेकांनी अशी शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी प्रवास केला आहे. मात्र त्यांना शस्त्रक्रियेबद्दल अपुरी माहिती देण्यात आली होती.

ब्रिटनच्या आरोग्य मंत्री मारिया कॉलफिल्ड यांच्या मते सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे.

ब्राझिलियन बट लिफ्ट कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे काय?

नितंब मोठे करण्यासाठी जी शस्त्रक्रिया केली जाते त्याला 'ब्राझिलियन बट लिफ्ट' असं नाव देण्यात आलं आहे. कॉस्मेटिक सर्जरीच्या जगात या शस्त्रक्रियेचा ट्रेंड झपाट्याने वाढतो आहे. मात्र ही शस्त्रक्रिया धोकादायकही ठरू शकते.

ही जगातील सर्वांत प्राणघातक कॉस्मेटिक प्रक्रिया देखील मानली जाते. एका अंदाजाप्रमाणे 3000 शस्त्रक्रियांमागे एक व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.

या प्रक्रियेदरम्यान, शल्यचिकित्सक शरीराच्या इतर भागातून चरबी घेतात आणि नितंबांमध्ये इंजेक्ट करतात. किंवा सिलिकॉन इम्प्लान्टच्या मदतीने नितंब मोठे केले जातात.

मेलिसा केर

फोटो स्रोत, NATASHA KERR

तज्ज्ञांच्या मते, ज्या महिलांना आपलं शरीर सुडौल दिसावं असं वाटतं त्या महिला अशा धोकादायक आणि महागड्या प्रक्रियेची निवड करतात. खरं तर सेलिब्रिटी फॅशनला फॉलो करणाऱ्या महिला अशी शस्त्रक्रिया करून घेतात.

ब्रिटिश प्लॅस्टिक सर्जरी असोसिएशनच्या मते, या प्रक्रियेशी संबंधित जोखीम असूनही त्याची लोकप्रियता दरवर्षाला 20% ने वाढत आहे.

मेलिसा केरसोबत काय झालं ?

नॉरफोक येथील रहिवासी असलेल्या मेलिसा केर यांनी 2019 मध्ये या प्रक्रियेसाठी तुर्की गाठलं. शस्त्रक्रियेदरम्यान, त्यांच्या नितंबात चरबी इंजेक्ट केली जात होती. चरबीचा एक तुकडा त्यांच्या फुफ्फुसात गेला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

मेलिसाने या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाला जवळपास 3,200 युरो दिले होते. मात्र तपासणीत असं आढळून आलं की, शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांना अपुरी माहिती देण्यात आली होती.

हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की, विभागातील अधिकारी माहिती घेण्यासाठी तुर्कस्तानला जातील.

ब्रिटनमध्ये अशा शस्त्रक्रियांशी संबंधित धोक्यांमुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

योग्य माहितीमुळे वाचू शकतात प्राण

कोरोनर जॅकलिन लेक म्हणतात की, धोकादायक शस्त्रक्रियांसाठी परदेशात जाणाऱ्या नागरिकांना योग्य माहिती मिळाल्यास भविष्यात अशा प्रकारे होणारे मृत्यू रोखले जाऊ शकतात.

2020 मध्ये तुर्कीमध्ये लायपोसक्शन करण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला होता. तुर्कस्तानमध्ये वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या ब्रिटनच्या सात नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती बीबीसीने यापूर्वी दिली होती.

कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या आरोग्य मंत्री मारिया कॉलफिल्ड यांनी मेलिसाच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना म्हटलं आहे की, "तिच्यासोबत जे घडलं त्यातून आपण शिकलं पाहिजे आणि भविष्यात असे मृत्यू रोखले पाहिजेत."

नताशा केर

फोटो स्रोत, NATASHA KERR

त्या म्हणाल्या की, "सरकारला याची जाणीव आहे की काही देशांमधील वैद्यकीय पर्यटनाशी संबंधित नियम ब्रिटिश कायद्यांशी सुसंगत नाहीत. मात्र रुग्णांना असणारा धोका कमी करण्यासाठी पारदर्शकता आवश्यक आहे."

त्यांनी म्हटलं, "ब्राझिलियन बट लिफ्ट शस्त्रक्रिया करू इच्छिणाऱ्या लोकांना जोखमीची पूर्ण जाणीव असणे आणि निर्णयावर विचार करण्यासाठी पुरेसा वेळ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे."

मारिया कॉलफिल्ड यांनी इशारा देताना म्हटलंय की, "ब्राझिलियन बट लिफ्ट शस्त्रक्रियेमध्ये इतर कोणत्याही कॉस्मेटिक शस्त्रक्रियेपेक्षा मृत्यूचा धोका 10 पट जास्त असतो."

त्या पुढे म्हणाल्या की, ब्रिटीश सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय पर्यटनाच्या परिणामांचा आढावा घेत आहे. मात्र तुर्कीवर जास्त लक्ष केंद्रित करत आहोत कारण ब्रिटिश नागरिक मोठ्या संख्येने तेथे जात आहेत.

बीबीसीने इतर रुग्णांची स्थिती जाणून घेण्यासाठी तुर्कीच्या आरोग्य मंत्रालयाशी देखील संपर्क साधला, परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)