महादेव ॲपमुळे छत्तीसगडचं राजकारण तापलं, जाणून घ्या आतापर्यंतच्या घडामोडी

फोटो स्रोत, VIRAL VIDEO
- Author, आलोक प्रकाश पुतुल
- Role, बीबीसी हिंदीसाठी, रायपूरहून
ऑनलाइन सट्ट्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘महादेव बुक बेटिंग ॲप’चा कथित मालक शुभम सोनीच्या विधानाने छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या काळातच खळबळ माजली आहे.
शुभम सोनी याने राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिल्याचा आरोप करत नाट्यमय पद्धतीने स्वतःचा एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे.
मात्र, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हे आरोप फेटाळून लावत त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. निवडणुकीत केवळ आपल्या सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.
मुख्यमंत्री बघेल म्हणाले की, शुभम सोनीला कुणीही ओळखत नव्हतं, ‘महादेव बुक बेटिंग ॲप’चा मालक म्हणून अचानक त्याचा उदय कसा झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र निवडणुकीच्या सभांमध्ये या मुद्द्यावर भाष्य करत आहेत.
छत्तीसगडमधील सरगुजा भागात भाषण करताना नरेंद्र मोदी म्हणाले, “आज इथल्या मुख्यमंत्र्यांच्या जवळचे लोक तुरुंगात आहेत. छाप्यांमध्ये नोटांचा मोठा साठा सापडलाय; पुराव्यांसह कोट्यवधी रुपये जप्त करण्यात येत आहेत.”
"या घोटाळ्यातील जो सर्वात मोठा आरोपी आहे, तो टीव्हीवर येऊन म्हणतोय की त्याने मुख्यमंत्र्यांना 500 कोटींहून अधिक रुपयांची लाच दिली आहे. आता तुम्हाला पुराव्याची गरज आहे का? देणारा स्वत: म्हणतोय की तो त्यांना पैसे देतोय आणि मग ते तुमच्याकडे पुरावे मागत आहेत.”
सर्वात आधी भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शुभम सोनीचा हा व्हीडिओ पत्रकारांना दाखवला होता.
महादेव ॲपच्या कथित मालकाचा आरोप
ऑनलाइन सट्टेबाजीसाठी दुबईतून चालवल्या जाणा-या ‘महादेव बुक बेटिंग ॲप’चा मालक-प्रवर्तक म्हणून आतापर्यंत भिलाई, छत्तीसगढ इथल्या सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांचीच नावं समोर येत होती.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये सौरभ चंद्राकरच्या भव्य लग्नसोहळ्यासाठी 200 कोटी रुपये खर्च केल्याचा आणि त्यात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या चित्रपट कलाकारांचा मुद्दा समोर आला, तेव्हापासून सौरभ आणि रवीची नावं चर्चेत आहेत.
शुभम सोनीचं नाव गेल्या आठवड्यात ईडीच्या निवेदनात पहिल्यांदा समोर आलेलं, ज्यामध्ये ईडीने रायपूर आणि भिलाई येथील असीम दास या व्यक्तीकडून 5.39 कोटी रुपये जप्त केल्याचा दावा करत म्हटलेलं की ‘महादेव बुक बेटिंग ॲप’च्या प्रवर्तकांनी आतापर्यंत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिलेत.

फोटो स्रोत, VIRAL VIDEO
ईडीच्या या प्रसिद्धी पत्रकामध्ये असंही म्हटलंय की, असीम दासची चौकशी आणि त्याच्याकडून जप्त केलेल्या फोनची फॉरेन्सिक तपासणी आणि शुभम सोनी (महादेव नेटवर्कच्या उच्चपदस्थ आरोपींपैकी एक) याने पाठवलेल्या ईमेलच्या तपासणीतून अनेक धक्कादायक खुलासे झालेत. असं असलं तरी ईडीने तपास अद्याप सुरू असल्याचं सांगितलं आहे.
ईडीने शुभम सोनीबद्दल इतर कोणतीही माहिती दिलेली नाही. भिलाईच्या स्थानिक लोकांनाही शुभम सोनीबद्दल कसलीच माहिती नाही.
महादेव ॲपचा मालक असल्याचा दावा करणा-या शुभम सोनीचा जो व्हीडिओ समोर आलाय त्यात त्याने आपलं कथित पॅनकार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट आणि कंपनीच्या कथित कागदपत्रांच्या छायाप्रती दाखवत म्हटलंय, की 2021 साली त्याने ‘महादेव बुक बेटिंग ॲप’ सुरू केलं आहे.
या प्रकरणी कुणीतरी वर्मा नामक व्यक्ती, मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांच्या मुलासोबत कथितपणे बैठक आयोजित करण्यात आलेली, असा दावा व्हीडिओतील व्यक्तीने केला आहे.
स्वत:ला शुभम सोनी आणि ‘महादेव बुक बेटिंग ॲप’चा प्रवर्तक म्हणवणाऱ्या या व्यक्तीने असंही सांगितलं की, मुख्यमंत्र्यांनी दुबईला जाऊन काम करायला सांगितलं आणि त्याने केलंही. तिथे त्याची भेट भिलाईचे सौरभ आणि रवी यांच्यासोबत झाली, ज्या दोघांची नियुक्ती त्याने आपले वैयक्तिक सल्लागार म्हणून केली.
भूपेश बघेल यांनी आरोप फेटाळले
राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना शुभम सोनी ही ईडीने रचलेली एक गोष्ट वाटते.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “शुभम असा मालक आहे जो आपल्या नोकराच्या लग्नावर 250 कोटी रुपये खर्च करतो. रमणसिंग यांच्या कार्यकाळात दोन अधिकारी कायम अशाच प्रकारच्या गोष्टी रचायचे. ही ठरवून केलेला बनाव आहे. भाजपने पराभव स्वीकारलाय. त्यांची ही शेवटची धडपड सुरू आहे.”

फोटो स्रोत, ANI
कोणतीही चौकशी न करता, केवळ एका कथित विधानाच्या आधारे ईडीने प्रसिद्धीपत्रक काढून माझ्यावर 508 कोटी रुपये घेतल्याचा खोटा आरोप केलाय, याबाबतही मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केलेत.
भूपेश बघेल म्हणाले की, “आता ईडी आणि आयकर विभागाचे लोक 17 तारखेनंतर ब्रेक घेतील. त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी ते पुन्हा एकदा आपल्या सहलीचं (धाडसत्राचं) नियोजन करतील.
भूपेश बघेल म्हणतात, “मी प्रत्येक वेळी म्हणतो की भाजप स्वतः निवडणूक लढवत नाही, ते ईडी आणि आयकर विभागाच्या माध्यमातून निवडणूक लढवतात.
भारत सरकारने या आठवड्यात महादेवसह 22 ऑनलाइन सट्टेबाजी ॲप्सवर बंदी आणल्याचा दावा केला असला तरी मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की, ही सर्व बेटिंग ॲप्स अजूनही वापरात आहेत.
‘महादेव बुक बेटिंग ॲप’ काय आहे?
भिलाई येथील रहिवासी सौरभ चंद्राकर आणि त्याचा साथीदार रवी उप्पल यांच्यावर दुबईतून ‘महादेव बुक बेटिंग ॲप’ नावाचे ऑनलाइन सट्टेबाजी अॅप चालवल्याचा केल्याचा आरोप आहे. त्याची वार्षिक उलाढाल 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं.
या प्रकरणी ईडीने देशातील अनेक शहरांमध्ये छापे टाकून शंभर कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. पोलिसांसह अनेकांना अटक करण्यात आलेय.
छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निकटवर्तीयांसह शेकडो लोकांची चौकशी सुरू आहे.
उच्चपदस्थ पोलीस कर्मचारी, नोकरशहा, चित्रपट उद्योगातील बड्या व्यक्ती, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमातील लोक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
सौरभ चंद्राकर याने सुरुवातीला मित्रासह शहरात सट्टेबाजीचा व्यवसाय सुरू केला होता, असा भिलाई पोलिसांचा दावा आहे.
पण नंतर जेव्हा त्याला दक्षिण भारतातील रेड्डी अण्णांबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्याने त्याच धर्तीवर आपलं ‘महादेव गेमिंग ॲप’ तयार केलं.

फोटो स्रोत, ANI
अनेक मित्र या व्यवसायात सहभागी होऊ लागले. राज्यातील पोलीस कर्मचारीही मोठ्या संख्येने या व्यवसायाला केवळ आश्रय देत नसून ते या व्यवसायाचा एक भागही असल्याचा आरोप केला आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये, सौरभ आणि रवी यांनी त्यांचा संपूर्ण व्यवसाय दुबईमधून चालवण्यास सुरुवात केली. त्यासाठी छत्तीसगडमधील शेकडो लोकांना दुबईत नोकरी देण्यात आली.
अवघ्या काही महिन्यांत 12 लाखांहून अधिक सट्टेबाज ‘महादेव बुक बेटिंग ॲप’मध्ये सामील झाले, ज्यापैकी एक मोठा वर्ग छत्तीसगडचा होता.
या व्यवसायाचा विस्तार करण्यात सोशल मीडियाने सर्वात मोठी भूमिका बजावली आहे. सोशल मीडियावर त्याचा प्रचार करून जगातील अनेक देशांमध्ये त्याचे वापरकर्ते तयार करण्यात आले.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 2020 मध्ये कोरोनाच्या काळात ‘महादेव बुक बेटिंग ॲप’चा व्यवसाय दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वेगाने वाढला.
आयपीएल क्रिकेट मैदानात प्रेक्षकांशिवाय सुरू असताना ‘महादेव बुक बेटिंग ॲप’वर दोन हजार कोटींहून अधिक रुपयांची सट्टेबाजी करण्यात आली.
या व्यवसायातून मिळालेली कमाई काही चित्रपटांमध्येही गुंतवली गेली. याशिवाय हॉटेल व्यवसायातही काही कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचीही चर्चा होती.
200 कोटींचं लग्न
या वर्षी ऑगस्टमध्ये मनी लाँड्रिंगशी संबंधित कायद्यांतर्गत छत्तीसगडचे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रभूषण वर्मा, सतीश चंद्राकर, हवाला ऑपरेटर अनिल दममानी आणि सुनील दममानी यांना अटक केल्यानंतर ईडीने पहिल्यांदाच ‘महादेव बुक बेटिंग ॲप’शी संबंधित प्रकरणांची माहिती सार्वजनिक केली.
यानंतर, 15 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात ईडीने सांगितलं की, कोलकाता, भोपाळ, मुंबईसह 39 शहरांमध्ये छापे टाकून 417 कोटी रुपयांची रोकड, मालमत्ता आणि इतर पुरावे जप्त करण्यात आलेत.
ईडीने दावा केला आहे की सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्या मालकीची मेसर्स महादेव ऑनलाइन बुक ही कंपनी यूएई मधील एका मुख्य केंद्रीय कार्यालयातून चालवली जाते आणि 70:30 च्या नफा गुणोत्तराने त्याच्या ओळखीच्या सहकाऱ्यांना 'पॅनल/शाखा' फ्रेंचायझिंगद्वारे संचालित केली जाते.
ईडीच्या म्हणण्यानुसार, सट्टेबाजीतून मिळणारे उत्पन्न परदेशी खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हवाला ऑपरेशन्स चालवले जातात. यासोबतच भारतात सट्टेबाजी करणाऱ्या वेबसाइट्सच्या जाहिरातींसाठीही मोठ्या प्रमाणात रोख रक्कम खर्च केली जाते.
सौरभ चंद्राकरने फेब्रुवारी 2023 मध्ये रास अल-खैमाह, संयुक्त अरब अमिराती येथे लग्न केलं.
‘महादेव बुक बेटिंग ॲप’ च्या प्रवर्तकांनी या विवाह सोहळ्यासाठी जवळपास 200 कोटी रुपये रोख खर्च केल्याचा आरोप आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कुटुंबातील सदस्यांना नागपूरहून यूएईला नेण्यासाठी खासगी विमानं भाड्याने घेण्यात आलेली.
या लग्नात सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलेलं.
रायपूर पोलिसांनी असंही म्हटलंय की त्यांनी महादेव ॲपशी संबंधित 36 प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवली आहे.
या प्रकरणांमध्ये, ओडिशा, मध्य प्रदेश, दिल्ली, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश व्यतिरिक्त छत्तीसगडमधून आतापर्यंत 235 जणांना अटक करण्यात आलेय. याशिवाय 500 हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
मात्र या सर्व दाव्या-प्रतिदाव्यांमध्ये ‘महादेव बुक बेटिंग ॲप’च्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद इतक्यात थांबेल असं वाटत नाही.
ईडीच्या दाव्यांमध्ये आणि आरोपांमध्ये काय लिहिलं गेलेलं नाही हे ज्यांना समजलंय, त्यांनी हे गृहित धरलंय की हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








