25 कोटींची लॉटरी लागूनही वैतागला, पैसे मागणारे संपेनाच

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मेरील सेबॅस्टियन
- Role, बीबीसी न्यूज
केरळच्या अनुप बी. यांना यावर्षी सप्टेंबरमध्ये 25 कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. आता एवढी मोठी लॉटरी जिंकलीय म्हटल्यावर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.
पण अशी लॉटरी जिंकणं आता त्यांच्यासाठी अवघड झालंय. अनुप 32 वर्षांचे आहेत. ही लॉटरी जिंकल्यावर त्यांना असं वाटलं होतं की, त्यांचं आयुष्य बदलेल. पण आत्ता जे काही बदललंय त्याची त्यांनी अजिबातच अपेक्षा केली नव्हती.
25 कोटींची लॉटरी जिंकल्यावर अनुप रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यामुळे घरातून बाहेर पडलं रे पडलं की लोक त्यांना ओळखतात. पण यात सगळ्यात मोठी अडचण ठरते आहे ती पैसे मागायला येणाऱ्यांची. आज प्रत्येकाला वाटत की अनुपने त्यांना पैसे द्यावेत. यात त्यांच्या मित्रमंडळींपासून नातेवाईकांपर्यंत सगळेच अनुपवर नाराज झालेत.
ऑटो चालक ते आता शेफ म्हणून काम करणारे अनुप सांगतात, "आमच्या जवळच्या लोकांनी आमच्याशी बोलणं बंद केलंय."
बीबीसीशी बोलताना अनुपने सगळा घटनाक्रम सांगितला.
ते सांगतात, "मी दुकानात माझ्या मुलासाठी बॅग घ्यायला गेलो होतो. बॅग विकत घेतल्यावर मी पैसे दिले आणि उरलेले पैसे परत देण्याची वाट पाहू लागलो. पण दुकानदार पैसे द्यायला तयारच होत नव्हता. तो म्हणे की, तुम्हाला आता पैशांची काय गरज आहे."
25 कोटींची लॉटरी जिंकल्यानंतर नॅशनल टेलिव्हिजनवर अनुपच्या बातम्या यायला लागल्या. मात्र यातून त्यांना मनस्तापचं सुरू झाला. दररोज सकाळी त्यांच्याकडे पैसे मागणाऱ्यांची लाईन लागते. शेवटी वैतागून त्यांनी एक व्हिडिओ बनवला.
त्या व्हिडिओमध्ये अनुप म्हणतायत की, 'पैशांसाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास देणं बंद करा. मी लॉटरी जिंकलो नसतो तर बरं झालं असतं."
होम लोन भरण्यापासून ते मुलीच्या लग्नासाठी पैसे मागणाऱ्यांची लाईन
याबाबत अनुपचं मत जाणून घेण्यासाठी बीबीसीने त्यांच्याशी संपर्क केला. बऱ्याच प्रयत्नांती ते बोलायला तयार झाले. त्यांनी यात त्यांचा फोटो छापू नये अशी विनंती केली कारण प्रत्येक बातमीगणिक त्यांचा त्रास वाढतानाच दिसतोय.
लॉटरी जिंकल्यावर अनुप यांची पत्नी माया यांनी एका टीव्ही चॅनेलशी बोलताना सांगितलं होतं की, "आम्हाला पैसे मिळाल्यावर आम्ही गरजूंना मदत करू."
लोकांनी त्यांचा हाच शब्द पकडला आणि नंतर वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्यांच्याकडे पैसे मागायला येऊ लागले. बरेच जण होम लोन फेडण्यासाठी पैसे मागायला आले तर काहींनी मुलीच्या लग्नासाठी मदत करा म्हणून पैसे मागायला सुरुवात केली.
यावर माया सांगतात, "गरजू सोडून बरेच जण येतायत. बँका आणि विमा कंपन्यांचे एजंट येऊ लागलेत. चेन्नईहून आल्यानंतर काही लोक आम्हाला फिल्मच्या फंडिंगसाठी पैसे मागू लागलेत."
त्या पुढं सांगतात, "एकदा तर एक माणूस दिवसभर आमच्या घरी येऊन बसला होता. त्याला रॉयल एनफिल्ड मोटरसायकल हवी होती आणि आम्ही ती खरेदी करून द्यावी असं त्याचं म्हणणं होतं."
अनूप सांगतात, "सर्वांनाच असं वाटतंय की आम्हाला पैसे फ्री मिळालेत. ते मला म्हणतात की, यासाठी तुम्हाला काहीच करावं लागलेलं नाही, तर मग ते इतरांना द्यायला काय हरकत आहे."

फोटो स्रोत, ANI
'घरातून बाहेर पडणं मुश्किल झालंय.'
काही अफवा तर अशा पसरल्यात की यामुळे या दाम्पत्याची झोप उडवलीय. अनुप सांगतात, "काही सोशल मीडिया पोस्ट्स मध्ये म्हटलंय की, मला लॉटरी लागलेली नाहीये. मी खोटं बोलतोय."
बरीच वृत्तपत्र, न्यूज चॅनेल्स आणि वेबसाईटवर नाव आणि फोटो छापून आल्यामुळे अनुपचं घरातून बाहेर पडणं मुश्किल झालंय.
ते घराबाहेर पडले की लोक त्यांना ओळखू लागतात आणि नंतर पैसे मागणाऱ्यांची गर्दी होते. पण अनुपलाच असा अनुभव आलाय असं नाहीये. तिथल्या लोकल टीव्ही चॅनलच्या गेम शोमध्ये अनुपची भेट 59 वर्षीय जयपालन यांच्याशी झाली होती.
जयपालनला 1 कोटी 20 लाख रुपयांची लॉटरी लागली होती आणि त्यांचंही नाव मीडियात गाजलं होतं.
त्यांनी अनुपला सांगितलं की, त्यांच्याकडे सुद्धा पैसे मागायला लोकांची रांग लागली होती.
जयपालन आजही ऑटो चालवतात. ते सांगतात, "पैसे दिले नाहीत म्हणून अनेक लोक आजही त्यांच्यावर नाराज आहेत."
जयपालन यांना धमकीची पत्र येऊ लागल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि घराभोवती सीसीटीव्ही कॅमेरे बसवले.
जयपालन यांनी अनुपला सुद्धा पैशाच्या बाबतीत सावध राहण्याचा सल्ला दिलाय.

फोटो स्रोत, Getty Images
आता अनुप पुढं काय करणार आहेत?
अनुप सांगतात, "लोकांना वाटतंय की लॉटरी जिंकल्याने माझ्या सर्वच अडचणी संपल्यात. पण अजूनही काही ठरलेलं नाही. टॅक्स वैगरे कापून हातात किती पैसे येणारेत याची मलाही कल्पना नाहीये."
राज्य सरकार यातला 30 टक्के टॅक्स करून अनुपला उरलेली रक्कम देईल. त्यानंतर लॉटरी एजंटचं कमिशन द्यावं लागेल. लॉटरी जिंकणाऱ्याला केंद्र सरकारला सरचार्ज आणि सेस द्यावा लागणार.
अनुपने लॉटरी जिंकल्याची बातमी पसरल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्यासाठी एक दिवसीय आर्थिक व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. जेणेकरून त्यांना त्या पैशाचा योग्य वापर करता येईल.
पण लॉटरीचे पैसे कुठेतरी लावण्याआधी अनुप काही वर्षं वाट बघतील.
ते सांगतात, "हे पैसे म्हणजे देवाने दिलेला आशीर्वाद आहे यात काही शंका नाही. पण या पैशांचं काही करण्याआधी किंवा लोकांना मदत करण्याआधी मला माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत का त्यांचं भविष्य सुरक्षित आहे का याची खात्री करावी लागेल."








