महाराष्ट्रातल्या दुर्गम भागातली अशी शाळा, जी 365 दिवस सुरू असते; काय शिकवलं जातं इथे?

- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
"मी चौथीपर्यंत शिकले. मग पाचवीपासून टेका मांडव्याला शिकायला गेले. तिथं 4 किलोमीटर पायी चालत जावं लागत होतं. त्यामुळे आई-वडिलांनी घरी बसवलं. सातवीचे दिवाळीचे पेपर दिले आणि उन्हाळ्याच्या पेपरलाच लग्न झालं."
बालवयातच लग्न झालेल्या पालडोह इथल्या संगीता हटके शिक्षणाची इच्छा असूनही गावात शाळा नसल्यानं शिकायला मिळालं नाही ही खंत बोलून दाखवत होत्या.
संगीता या महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम जिवती तालुक्यातल्या पालडोह या बंजारा वस्तीतल्या रहिवासी.
माणिकगडचा डोंगर आणि जंगल पार केल्यानंतर अतिशय आतमध्ये हे पालडोह गाव वसलंय.
संगीता यांचं वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी लग्न झालं. संगीता हटके यांचं माहेर पालडोह असून नांदेड त्यांचं सासर आहे. पण पतीचं निधन झाल्यानं दोन्ही मुलींना घेऊन त्या भावाच्या पाठिंब्यानं पालडोहला राहायला आल्या.
गावात शाळा नसल्यानं त्या शिकू शकल्या नाही. त्यामुळे लग्नाला घरच्यांना विरोधही करता आला नाही, असं त्या सांगतात.
फक्त संगीताच नाही, तर स्थानिक प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, 2005 ते 2015 या काळात तब्बल 36 मुलींचे कमी वयातच लग्न झाले.

पण आता गावातली परिस्थिती बदलली आहे. संगीता यांची मोठी मुलगी कोमल बीएसस्सी नर्सिंग करतेय, तर लहान मुलगी वैष्णवी बारावीला आहे.
केवळ संगीता यांच्या मुलीच नाही, तर सध्या गावातल्या 15 मुली पदवीचं शिक्षण घेत आहेत.
या सगळ्या मुलींना गावातच शिकता आलं. कारण गावात एक-एक करत आठवीपर्यंत वर्ग तयार झाले आणि ही शाळा त्यांच्यासाठी 365 दिवस सुरू झाली.
होय, 365 दिवस!
पालडोह इथली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा 365 दिवस विद्यार्थ्यांसाठी सुरू असते. त्यामुळे शिक्षणाशिवाय आणखी बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना शिकता येतात आणि त्याचा फायदाही त्यांना नोकरी मिळवताना होतोय, असं याच शाळेतून शिकून गेलेली शिवकांता श्रीमंगले सांगतेय.

शिवकांता श्रीमंगले बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाली, "आमचे सर आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना पहाटे 4 वाजता धावायला घेऊन जायचे. तिथं आम्ही खो-खो, गोळाफेक अशा खेळांचा सराव करायचो. याचा फायदा मला पोलीस भरतीत झाला. मी याच वर्षी पोलीस भरती दिली. पहिल्याच शारीरिक परीक्षेत 50 पैकी 41 गुण मिळाले. शाळेतल्या सरावामुळे मी शारीरिक चाचणीमध्ये चांगले गुण घेऊ शकले."
शिवकांता सध्या बीएच्या द्वितीय वर्षाला असून ती चंद्रपूरला शिकतेय. ती 365 दिवस चालणाऱ्या जिल्हा परिषद पालडोह शाळेची 2018 मध्ये उत्तीर्ण झालेली आठवीच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी आहे.
पण ही शाळा 365 दिवस कशी सुरू झाली? आणि 365 दिवस या शाळेत काय काय शिकवलं जातं? हेही समजून घेऊया.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
‘डोंगर सपाट करून विद्यार्थ्यांसाठी मैदान तयार केलं’
पालडोहची जिल्हा परिषद शाळा 365 दिवस सुरू करण्याची कल्पना या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी यांची आहे. राजेंद्र परतेकी 2006 मध्ये या शाळेत शिक्षण सेवक म्हणून रुजू झाले.
त्यावेळी फक्त चौथीपर्यंत दोन खोल्यांची शाळा होती. एकाच वर्गखोलीत दोन वर्गाचे विद्यार्थी बसायचे. त्यावेळी शाळा कशी होती याचं वर्णन राजेंद्र परतेकी करतात.

ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "शाळेच्या समोर मोठा उतार होता आणि त्यावर मोठमोठी दगडं होती. विद्यार्थी या गावातले असल्यामुळे या उतरावरून चालायची, धावायची त्यांना सवय होती. पण आम्हाला शाळेत यायला अडचण व्हायची.
"इतकंच नाहीतर विद्यार्थ्यांना खेळायला साधं मैदान सुद्धा नव्हतं. मी 2009 ला डोंगराळ भाग खोदायला सुरुवात केली. इथले दगडं काढून, डोंगर सपाट करून विद्यार्थ्यांसाठी मैदान तयार केलंय. एकटा असल्यानं हे मैदान तयार करायला 6 वर्ष लागली."
शाळा 365 दिवस कशी सुरू झाली?
आता या शाळेत विद्यार्थी खेळू शकतील, त्यांना तिथं अभ्यास करता येईल, असं चांगलं आणि सपाट मैदान तयार झालंय. त्यावेळी 22 असणारी पटसंख्या आता 163 वर पोहोचली आणि एक एक करून वर्ग वाढत आता या शाळेत नववीपर्यंत वर्ग झालेत.
आता शेजारच्या टेका मांडवा, शेणगाव, धोंडा अर्जुनी, पाटागुडा, हिमायतनगर, पिटीगुडा या गावाचे विद्यार्थी या शाळेत शिकायला येतात. त्यांच्यासाठी बसची सोयही करण्यात आली आहे. पण हे सगळं कसं शक्य झालं?
तर राजेंद्र परतेकी सांगतात, "आमच्या शाळेत चौथीपर्यंत शिकण्याची सोय होती. त्यानंतर मुलं 3 किलोमीटरवर असलेल्या टेका मांडव्याला शिकायला जायचे. डोंगर, दगडांचा रस्ता पार करून त्यांना जावं लागत होतं. मी सुद्धा टेका मांडव्याला राहायला होतो."

राजेंद्र परतेकी पुढे सांगतात, "मी जाणं-येणं करताना ही मुलं शाळेत न जाता रस्त्यात कुठंतरी खेळत दिसायची, तर काही विद्यार्थी प्रामाणिकपणे शाळेत जायची. पण तिथं पायी चालत जायचं असल्यानं मुली मध्येच शाळा सोडायच्या. बालविवाहाचं प्रमाणही जास्त होतं.
"मी शिक्षणसेवक म्हणून रुजू झालो तेव्हा ज्या मुलींना पहिली, दुसरीत शिकवलं आज त्यांचे मुलं माझ्या मुलापेक्षा मोठे आहेत. माझा मुलगा तिसरीत शिकतो आणि त्यांची मुलं सातवीत आहेत. त्यामुळे गावातच विद्यार्थ्यांसाठी वर्ग कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न करत होतो."
इतक्यात सरकारचा जीआर निघाला की चौथ्या वर्गाला पाचवा वर्ग जोडता येतो. त्यावेळी राजेंद्र परतेकी यांनी 2015 ला चौथीला पाचवा वर्ग जोडला. पण विद्यार्थी संख्या वाढत होती आणि शाळेत फक्त दोन शिक्षक होते.


इतक्या विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं? हा प्रश्न होता. त्यामुळे परतेकी यांनी या विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात वेळ द्यायला सुरुवात केली. उन्हाळ्यात या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शक्य तितका पूर्ण करायचा असं ठरवलं. विद्यार्थीही आवडीनं शाळेत येऊ लागली. त्यानंतर सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थी आनंदानं शाळेत येत असल्यानं मी त्यांना शिकवत होतो.
विद्यार्थी सण-उत्सवाच्या दिवशीही शाळेत येऊ लागले. असं करता करता न कळत आमची शाळा 365 दिवस सुरू झाली, असं राजेंद्र परतेकी सांगतात.
'ग्रामस्थांनी शाळेसाठी जमीन घ्यायला कापूस दिला'
शाळेचे वर्ग वाढले होते. पण वर्गखोल्या कमी होत्या. मग पाचवीपासून पुढील वर्गातल्या विद्यार्थ्यांना झाडाखाली शिकवलं जायचं. पाऊस आला की सगळे विद्यार्थी दोन वर्गखोल्यांमध्ये बसवायचे आणि पाऊस गेला की खाली प्लास्टीक टाकून या विद्यार्थ्यांना शिकवलं जात होतं.
राजेंद्र परतेकी आपल्या मुलांना शिकविण्यासाठी मेहनत घेत आहेत हे बघून ग्रामस्थही पुढे सरसावले. त्यांनी जंगलातून लाकडं तोडून आणली आणि शाळेत एक मांडव तयार केला. पुढे या मांडवात पाचवी, सहावीचे वर्ग भरू लागले. यानंतर सरकारकडून शाळा बांधायला परवानगी मिळाली. पण शाळेकडे शाळा बांधायला जागा नव्हती.

त्यानंतर शाळेजवळची एक शेतजमीन घ्यायचं ठरलं. पण यासाठी पैसे नव्हते. त्यासाठी गावातल्या 80 घरांनी प्रत्येकी 2 हजार रुपये जमा केले. कोणाकडे पैसे नव्हते तर त्यांनी कापूस आणून दिला. पण तरीही 40 हजार कमी पडत होते.
त्यामुळे गावकऱ्यांनी मंदिराची दानपेटी फोडून त्यातले 40 हजार रुपये शाळेसाठी जमीन घ्यायला दिले. लोकसहभागातून गावात शाळेसाठी नवीन इमारत उभी राहिली. आता या इमारतीत नववीपर्यंत वर्ग चालतात. ते देखील 365 दिवस.
या शाळेत 365 दिवस नेमकं काय शिकवलं जातं?
शाळेत दररोज पहाटे धावण्याचा आणि खेळाचा सराव घेतला जातो. उन्हाळ्यातच विद्यार्थ्यांकडून पुस्तकं परत घेतली जातात आणि ही पुस्तकं मागच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना वाटप केली जातात. त्यांचे उन्हाळ्यात वर्ग भरतात. यामध्ये त्यांचा काही अभ्यासक्रम पूर्ण होतो. शहरातले मुलं ट्युशन लावून अभ्यासाचा सराव करतात.
या शाळेत मात्र उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना जेवढा होईल, तेवढा अभ्यासक्रम शिकवला जातो.
याशिवाय उन्हाळ्यात या विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञानचे वर्ग होतात. त्यांना होमवर्क दिलं जातं. त्यानंतर दुपारी 2 वाजता विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते, असं या शाळेत योगिनी माने ही विद्यार्थी सांगतेय.

सण-उत्सवाच्या दिवशीही शाळा सुरू असते. विद्यार्थी शाळेत येऊन सगळे सण-उत्सव साजरे करतात. होळीच्या दिवशी होळी खेळतात. ग्रामस्थही शाळेतल्या सण-उत्सवामध्ये सहभागी होतात. पोळ्याला मातीची बैलं बनवून शाळेत पोळा भरवला जातो.
दिवाळीला विद्यार्थी अख्ख्या शाळेत दिवे लावतात. रांगोळ्या काढतात. त्यावरून त्यांना बक्षीसही दिलं जातं. अशा प्रत्येक सणाला आम्ही विद्यार्थ्यांना बक्षीस देतो, असं राजेंद्र परतेकी सांगतात.

याशिवाय या शाळेत विद्यार्थी एक बचत बँकही चालवतात, ज्यामध्ये सध्या 20 हजार रुपये जमा आहेत. विद्यार्थ्यांजवळ खाऊचे पैसे असले आणि त्यांना खर्च करायचे नसतील तर ते या बचत बँकेत जमा करतात. खऱ्याखुऱ्या बँकेसारखा या बचत बँकेचा व्यवहार चालतो.
विद्यार्थी पैसे जमा करतात तेव्हा पावती भरतात, त्या पैशांची विद्यार्थ्यांच्या पासबुकवर नोंद केली जाते. त्यानंतर शाळेतल्या एका आलमारीत हे पैसे ठेवले जातात. विद्यार्थ्यांना वही, पेन, शाळेची सहल, परीक्षा शुल्क अशा गोष्टींसाठी पैशांची गरज असेल तेव्हा विद्यार्थी या बचत बँकेतून पैसे काढून वापरतात.
या बचत बँकेचं व्यवस्थापन या शाळेची विद्यार्थिनी दिव्यांका बाजगीर बघते. या अनोख्या उपक्रमामुळे आम्हाला व्यावहारिक ज्ञान मिळत असल्याचं दिव्यांकांनं सांगितलं.
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











