पहिल्याच प्रयत्नात सीए झालेल्या मुंबईतल्या जुळ्या बहिणींची गोष्ट

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
- Author, शार्दुल कदम
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, मुंबई
'पहिल्यांदा रिझल्टसाठी आम्हाला ICAIच्या अध्यक्षांचा फोन आला. तेव्हा तर विश्वासच बसला नव्हता. थोडा वेळ लागला हे जाणवायला, की हे खरंच झालंय...'
बीबीसी मराठीशी बोलताना मुंबईच्या संस्कृती परोलियाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
मुंबईच्या कांदिवलीत राहणाऱ्या परोलिया कुटुंबात सध्या दुहेरी यश साजरं होतंय.
संस्कृती आणि श्रृती परोलिया या जुळ्या बहिणींनी पहिल्याच प्रयत्नांत चार्टड अकाऊंटन्सीची म्हणजे CAची परीक्षा पास तर केलीच पण भारतभरातून पहिल्या दहामध्ये नंबरही पटकावला.
नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या सीए परीक्षेत संस्कृती परोलिया देशात दुसरी तर तिची जुळी बहिणी श्रृती देशात आठवी आलीय. निकाल चांगला लागेल याची आपल्याला अपेक्षा होती, पण पेपर कठीण असल्याने पहिल्या दहांत रँकची अपेक्षा नव्हती, असं दोघीही सांगतात.
सीए फायनलसाठीच्या दोन्ही ग्रृप्सचे पेपर त्यांनी दिले आणि दोघीही पहिल्याच प्रयत्नांत सीए झाल्या.
या दोघींचे वडील, मोठा भाऊ आणि वहिनीही पेशाने सनदी लेखापाल - चार्टर्ड अकाऊंटंट आहेत.
जुळ्या बहिणी ते स्टडी पार्टनर्स
चार्टर्ड अकाऊंटंट होणं हेच आपलं ध्येय आणि स्वप्नं होतं - असं दोघीही सांगतात. संस्कृती म्हणते, "मला जेव्हापासूनचं आठवतंय तेव्हापासून मला सीएच व्हायचं होतं. मी कायमच बाबांना पाहिलं होतं. सीए म्हणजे काय हे मला जेव्हा माहितीही नव्हतं, तेव्हाही मला सीए व्हायचं होतं. अगदी लहान असल्यापासूनच मला आकडे, आकडेवारी गणितं आवडायची. म्हणून मला सीए व्हायचं होतं."
शाळेपासूनच या दोघींनी सगळ्या गोष्टी एकत्र केल्याचं श्रृती सांगते. "मी आणि माझी बहीण आम्ही सगळ्या गोष्टी सोबतच करतो. कारण आमच्या आवडी, छंद सेमच आहेत. फ्रेंड्सही तेच आहेत. आम्ही एकाच शाळेत, एकाच कॉलेजमध्ये होतो. आर्टिकलशिप एकाच कंपनीत केली. त्यामुळे आमचं सर्कल सेम आहे."

फोटो स्रोत, Sanskruti and Shruti Paroliya
सीएसारख्या कठीण परीक्षेचा अभ्यास करतानाही एकत्र अभ्यास करण्याचा फायदा झाल्याचं दोघीही सांगतात.
"सुरुवातीपासूनच, अगदी 5-6वी पासूनच आमची अभ्यासाची पद्धत सेम होती. आम्ही सारख्याच धड्यांचा, टॉपिक्सचा अभ्यास एकाचवेळी करायचो. ती सवयच होती. आम्ही स्टडी पार्टनर होतो. शंका असली तर एकत्र सोडवायचो. आमचे स्टडी प्लान सेम होते. कोणता विषय कधीपर्यंत संपवायचा आहे हे आम्ही ठरवायचो. ही सुरुवातीपासूनची सवय होती," संस्कृती सांगते.

फोटो स्रोत, Sanskruti and Shruti Paroliya
सीए परीक्षेचा अभ्यास कसा केला?
सनदी लेखापाल परीक्षा ही भारतातल्या कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. सीए फाऊंडेशन, सीए इंटरमीजिएट आणि सीए फायनल अशा तीन टप्प्यांमध्ये या कोर्सच्या परीक्षा वर्षातून दोनदा होतात.
यातल्या इंटरमीजिएट आणि फायनलच्या परीक्षांमध्ये दोन ग्रूप असतात. शिवाय हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 वर्षांची आर्टिकलशिप करावी लागते.
नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या सीए फायनलच्या परीक्षेत 32,907 विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रूप्सची परीक्षा दिली. यापैकी 3,099 विद्यार्थी पास झाले. एकूण 8,650 विद्यार्थी या परीक्षा निकालानंतर चार्टर्ड अकाऊंटंट झाले.

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBc
पहिल्याच प्रयत्नांत दोन्ही गट परीक्षा उत्तीर्ण करणं ही अतिशय कठीण गोष्ट या दोन्ही बहिणींनी कशी साध्य केली?
सीए इंटरची परीक्षा पास झाल्याचं समजल्यावर दुसऱ्याच दिवशी आपण फायनलचा अभ्यास सुरू केल्याचं संस्कृती सांगते.
कालावधी लांबचा असला तरी हळूहळू सुरुवात करून मग आवाका वाढवत नेल्याचं दोघी सांगतात.
मेहनत आणि सातत्य या सीएच्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी अतिशय आवश्यक गोष्टी असल्याचं दोघीही बोलून दाखवतात.
संस्कृती म्हणते, "CA कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहे. तुम्हाला मेहनत करावी लागते आणि त्यात सातत्य हवं. कारण हा पल्ला मोठा असतो. 3 वर्षांची आर्टिकलशिप असते. मला माझ्या सिनियर्सनी, वडिलांनी दिलेला सल्ला म्हणजे तुम्ही पहिल्या दिवसापासून सुरुवात करा. हळुहळू सुरुवात करा.
त्यानेच मोठा बदल घडतो. बाबांनी कायमच मला सर्वोत्तम प्रयत्न करायला सांगितले. म्हणजे नंतर खंत राहात नाही. ही कॉम्पिटिटिव्ह परीक्षा आहे. त्यामुळे निकाल निगेटिव्हपण असू शकतो. ते आपल्या हातात नाही. आपण काय करू शकतो, तर आपण आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करायचे. म्हणजे खंत राहात नाही. मी वैयक्तिकरित्याही ते पाळलं."

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBc
श्रृती म्हणते, "सीए फायलनचा पोर्शन खूपच जास्त आहे. म्हणूनच सीए इंटरचा रिझल्ट लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी मी फायनलची तयारी सुरू केली होती. सुरुवातीला वेग कमी होता पण तो नंतर वाढला.
इतका जास्त अभ्यासक्रम असल्याने कदाचित एकदाच वाचून तुमच्या लक्षात राहणार नाही. तुम्हाला पुन्हापुन्हा वाचावं लागेल. म्हणून आधीच सुरुवात केली तर तुम्हाला रिव्हीजनसाठी वेळ मिळेल. सातत्य आणि मेहनत हे या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे.
कोणताही शॉर्टकट नाही यासाठी. एक आहे की सगळे दिवस सारखे नसतील. काही दिवशी तुमच्याकडून कमी अभ्यास होईल. तितकं मन लावून अभ्यास होणार नाही. पण ते ठीक आहे. स्वतःला तितकी मुभा द्या. हे सगळ्यांसोबतच होतं. पण प्रयत्न सुरू ठेवा. थांबू नका."

फोटो स्रोत, Shardul Kadma/BBC
कुटुंबातले 3 सदस्य चार्टर्ड अकाऊंटंट असल्याने या बहिणींना त्यांचाही सल्ला मिळाला.
संस्कृती म्हणते, "माझे वडील, भाऊ, वहिनीही चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. याची आम्हाला अभ्यासातही मदत झाली. शंका असल्यास मी त्यांना विचारायचे. आर्टिकलशिपच्या काळातही त्यांची मदत झाली, कारण त्यांनीही हे सगळं केलंय. तो इमोशनल सपोर्ट ही होता."
तर बहिणीसोबतच अभ्यास केल्याने त्याचाही फायदा झाल्याचं श्रृती सांगते.
"बहीणही सोबत अभ्यास करत असल्याने मला शंका विचारता यायच्या, दुसरं म्हणजे या संपूर्ण प्रवासात तुमच्या सोबत कुणी आहे, हे माहिती असलं की एकप्रकारचा भावनिक आधार मिळतो. शैक्षणिक आधार तर असतोच."
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









