कार्लोस अल्काराझने जोकोविचचा पराभव करत काय संदेश दिला आहे?

फोटो स्रोत, Getty Images
काल विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्काराझ ने नोवाक जोकोविचचा पराभव करून इतिहास रचला.
गेल्या अनेक दिवसांपासून एक प्रश्न विचारला जात होता, “नवीन पिढी जोकोविचला का थांबवू शकत नाही?”
मूळच्या स्पेनच्या अल्काराझने जोकोविचचा पराभवच केला नाही तर जोकोविचचं अबाधित स्थान त्याने डळमळीत केलं.
सेंटर कोर्टवर झालेल्या रंगतदार सामन्यात 20 वर्षीय अल्काराझ जेतेपदावर आपलं नाव कोरलं.
अनेक प्रेक्षकांसारखं नऊ वेळ विम्बल्डन डबल्सचं विजेतेपद पटकावणाऱ्या टॉड वूडब्रिजने अल्काराझचा विजय एक नवी सुरुवात असल्याचं सांगितलं आहे.
“मी हे टेनिसच्या पिढीसाठी नाही तर माझ्यासाठी केलं, अगदी प्रामाणिकपणे सांगतो.” असं अल्काराझ सामन्यानंतर म्हणाला. जोकोविचचा 2013 नंतर पहिल्यांदाच सेंटर कोर्टवर पराभव झाला आहे.
जोकोविच सध्या त्याच्या करिअरच्या सर्वोच्च स्थानी आहे. ज्या कोर्टवर त्याला 10 वर्षं कोणी हरवू शकलं नाही तिथे त्याचा पराभव केल्यानंतर हे माझ्यासाठी फार भारी आहे. नवीन पिढीसाठीसुद्धा हे महत्त्वाचं आहेय कारण मी हे करू शकतो तर तेसुद्धा करू शकतात.” अल्काराझ पुढे म्हणाला.

फोटो स्रोत, Getty Images
जोकोविचनंतर कोण हा प्रश्न वारंवार विचारला जात होता. कारण राफेल नादाल पुढच्या वर्षी निवृत्त होणार आहे. रॉजर फेडररने गेल्या वर्षीच निवृत्ती जाहीर केली आहे.
जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन या ग्रँड स्लॅम स्पर्धा या आधीच जिंकल्या आहेत. गेल्या 9 ग्रॅँड स्लॅमपैकी सातव्या विजेतेपदावर त्याचा डोळा होता.
मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात अल्काराझ जायबंदी झाला होता, तर पॅरिस मध्ये झालेल्या सामन्यात जोकोविचची घोडदौड तो रोखू शकला नव्हता.
अल्काराझ आणि जोकोविचमध्ये गेल्या महिन्यात एक सामना झाला होता. तेव्हाच खरंतर त्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र शरीरात गोळे आल्यामुळे त्याला हा विजय साध्य करता आला नाही.
तर 22 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या जोकोविचची एक वेगळीच कथा आहे. त्याचं, तंत्र, खेळण्याची पद्धत, टेनिसकोर्टवरचा वावर वेगळ्याच प्रकारचा आहे. त्याने एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्याचे तरुण प्रतिस्पर्धी भारावून गेले होते.
गेल्या पाच मोसमात 23 वर्षाखालील प्रतिस्पर्ध्यांबरोबर झालेल्या सामन्यात जोकोविचचा 52 पैकी फक्त 8 सामन्यात पराभव झाला आहे.
2021 मध्ये डॅनिअल मेद्वेदेवने त्याचा अमेरिकन ओपन स्पर्धेत पराभव केला होता. त्यानंतर अल्काराझने त्याचा पराभव केला आहे.
जोकोविच, फेडरर, आणि नादालने गेल्या 20 वर्षांत टेनिस कोर्टवर निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. स्वित्झर्लंडच्या स्टॅन वाव्रानिका ने 2016 मध्ये जेतेपद मिळवल्यानंतर एकापेक्षा अधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा अल्काराझ हा दुसरा खेळाडू आहे.
2002 नंतर फेडरर, नादाल, जोकोविच किंवा अँडी मरे यांच्यानंतर विम्बल्डन जिंकणार अल्काराझ हा पहिलाच आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अल्काराझला खेळताना पाहणं आनंददायी आहे. त्याच्या खेळात जोकोविच, फेडरर आणि नादालचा मिलाफ आहे असं अनेकांचं मत आहे.
“मी सहमत आहे. त्याने या तिघांमधलं सर्वोत्तम जे आहे ते सगळं घेतलं आहे.” असं जोकोविच म्हणाला.
“स्पेनमध्ये असलेल्या लोकांकडे असलेली स्पर्धात्मकता त्याच्याकडे आहे, तो लढवय्या आहे आणि त्याच्याकडे नादालकडे असलेला डिफेन्ससुद्धा आहे. माझ्यासारखंच त्याच्याकडे बॅकहँडचं कौशल्य आहे. ही माझी कौशल्यं त्याच्याकडे सुद्धा आहे. त्याच्यासारख्या खेळाडूविरुद्ध मी कधीही खेळलेलो नाही. रॉजर, राफा यांची वेगळी बलस्थानं आहेत हा भाग आहेच” जोकोविच पुढे म्हणाला.
जोकोविच मे महिन्यात 36 वर्षाचा झाला. 36 म्हणजे नव्याने 26 वर्षाचं होण्यासारखंच आहे असं तो म्हणतो. रविवारी ज्या पद्धतीने तो खेळला ते पाहता निवृत्त होण्याचा त्याचा अजिबात इरादा नाही हे स्पष्टपणे दिसतं.
मात्र तरी आता त्याच्या करिअरचा अंतिम टप्पा दिसत असताना त्याच्या स्थानावर अल्काराझ दीर्घकाळ असेल.
अल्काराझने गेल्या वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आणि पुरुषांच्या मानांकनात तो प्रथम क्रमांकावर आला आणि आता त्याने विम्बल्डनही जिंकली आहे.
त्याचा उदय पाहता ज्या खेळाडूंना पुढच्या पिढीचे खेळाडू असं संबोधलं गेलं त्यांच्या छातीत नक्कीच धडकी भरली असेल.
“या मुलाची बरोबरी कोण करणार? मला तरी कोणी दिसत नाही?” 1987 चा विम्बल्डन विजेते पॅट कॅश म्हणतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








