उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांनी केली युतीची घोषणा

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे
फोटो कॅप्शन, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली आहे. आज दुपारी या दोन्ही नेत्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघं एकत्र येत आहोत. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, याविषयी विचारविनिमय करुन आम्ही पुढे जाऊ."

"शिवशक्ती आणि भिमशक्तीचा प्रयोग याआधी झाला होता. पण प्रकाश आंबेडकर आणि मी पहिल्यांदाच या वास्तूमध्ये एकत्र आलो आहे. पुढे एकत्रित चालण्यासाठी एकत्र येतोय."

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीमुळे निवडणुकांमध्ये आता बदलाचं वातावरण सुरू होणार आहे."

"गेली अनेक वर्षे उपेक्षितांचं राजकारण अशी चळवळ अमलात आणण्याचा प्रयत्न आमचा होता. पण आमच्याच मित्र पक्षाने ही चळवळ गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला किंवा मर्यादित करण्याचा प्रयत्न केला."

"शरद पवार आणि आमचं भांडण जुनं आहे. पण ते आमच्याबरोबर येतील, अशी अपेक्षा मी बाळगतो," असंही आंबेडकर म्हणाले.

शिवसेना वंचित युती

"आपण कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. सर्वांचा अंत होणार आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींचाही एक दिवस अंत होणार आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील लीडरशीप संपवली," असंही आंबेडकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "बीबीसीची फिल्म आली. पण 2022 मध्ये आपण 15 वर्षांपूर्वी काय झालं हे सहन करू शकत नाही? याचा काय अर्थ आहे."

उद्धव ठाकरे आणखी काय म्हणाले?

उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्हाला काल स्वप्न पडलं आणि आज एकत्र आलो असं नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांच्याशी चर्चा केली आहे. सध्या ही व्यक्तीगत युती असली तरी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा घटक व्हावा अशी इच्छा आहे.”

मी शरद पवार आणि आंबेडकर यांचे संबंध सुधारतील यांचा निश्चितपणे मी प्रयत्न करेन, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “दुसर्‍याचं घर फोडून स्वत:चं घर सजवणाची औलाद आता राजकारणात दिसतेय. हे राजकारणी मोडीत काढायचं आहे.”

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीनं आज राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे.

दुसरीकडे आज विधीमंडळामध्ये राज्य सरकारच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं.

काँग्रेसची भूमिका काय?

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "युती शिवसेनेने केली आहे आमची काही हरकत नाही. पण जागा वाटपात शिवसेनेने त्यांना आपल्या कोट्यातील जागा द्याव्यात. आम्ही आमच्या जागा देणार नाही. शिवाय आमचे उमेदवार असतील तिथे त्यांना मदत करावी लागेल. नाहीतर आम्ही मदत करणार नाही.

"महाविकास आघाडीत स्थान देण्याबाबत अजून आमची बैठक झालेली नाही. पण काँग्रेस आपल्या जागा त्यांना देणार नाही."

याआधी कोण काय म्हटलं?

या युतीबद्दल बोलताना शिवसेना नेते सुभाष देसाईंनी म्हटलं होतं की, "आमचं मनातून सगळं ठरलं आहे, आता फक्त घोषणा बाकी आहे."

"माझी युती ही फक्त शिवसेनेसोबत असेल, महाविकास आघाडीमधील इतर दोन सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल काय ठरवायचं ते नंतर पाहू," असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं.

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, "वंचित आणि शिवसेना युतीवर शिवसेनेकडून घोषणा होऊ शकते. यावर अजूनही दोन्हीकडून चर्चा सुरू आहे.

"उद्धव ठाकरे यांनी या युतीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेतलं पाहिजे असं मत मांडलं होतं. सध्या वंचित आणि शिवसेना युती होईल. माझी युती ही शिवसेनेसोबत असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नंतर पाहून घेऊ."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)