बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार काय होते आणि ते पुढे कोण नेत आहेत, शिंदे की ठाकरे?

बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images/Facebook

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी
    • Reporting from, नवी दिल्ली

महाराष्ट्रातील अभूतपूर्व बंडानंतर एकनाथ शिंदे गटाला ज्या ज्या वेळी ‘गद्दार’ म्हणून उद्धव ठाकरे गटाकडून हिणवलं गेलं, त्या त्या वेळी शिंदे गटानं ठाकरे गटाला उत्तर देताना ‘बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा पुढे नेतोय’ असं कारण दिलं.

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत गेल्यानं बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार धोक्यात आला होता, असं शिंदे गटाकडून वारंवार सांगण्यात आलंय आणि अजूनही सांगितलं जातंय.

अशावेळी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा नेमका विचार काय होता आणि तो नेमका कोण पुढे नेतोय, याची चर्चा आपण या वृत्तलेखातून करणार आहोत.

1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. हयात असेपर्यंत म्हणजे 2012 पर्यंत बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदावर होते. ते सांगतील ती पक्षाची दिशा, हे धोरण पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी स्वीकारलं आणि मानलंही.

त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांबाबत निश्चितपणे काही सांगता येणं कठीण होऊन बसतं. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या राजकीय भूमिकाही काळ-स्थळ-प्रसंगनिहाय बदलत गेलेल्या दिसून येतात.

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, शिवसेनेची वाटचाल आणि बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणाऱ्यांशी बातचित केल्यानंतर, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांमधील एक समान धागा किंवा समान सूत्र आपल्या हाती लागतं. ते या वृत्तलेखातून आपण अधिक समजून घेऊ.

जेणेकरून एकनाथ शिंदेंचा ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्ष असो किंवा उद्धव ठाकरेंचा ‘शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्ष असो, यातील नेमका कोण बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेत आहे, हे कळण्यासही मदत होईल.

प्रबोधनकार, बाळासाहेब आणि ‘हिंदुत्वाचे विचार’

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते जेव्हा ‘बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांचा’ उल्लेख करतात, तेव्हा आपल्याला सर्वांत आधी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची मूळं शोधावी लागतात.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते विचार बाळासाहेबांकडे कुठून आले, हे समजून घेऊ आणि त्यासाठी ‘रिंगण’ अंकाचे संपादक सचिन परब यांनी बीबीसी मराठीसाठी लिहिलेल्या लेखाचा आधार घेऊ.

सचिन परब लिहितात, ‘बाळासाहेब ठाकरेंचे वडील म्हणजेच प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे हिंदुत्ववादी होते, हे विसरून चालणार नाही. गजाननराव वैद्य यांच्या 'हिंदू मिशनरी सोसायटी'चे ते एक प्रमुख नेते होते. धर्मचिकित्सा हा प्रबोधनकारांच्या लिखाणाचा गाभा आहे. त्यांनी हिंदू धर्माची जितकी चिरफाड केलीय, तितकी फार कमी जणांनी केली असावी.

‘अत्यंत निर्दय शब्दांत त्यांनी हिंदू धर्मातल्या ब्राम्हणी जातवर्चस्ववादी मानसिकतेवर टीका केलीय. 'आजचा धर्म हा हिंदूधर्मच नाही. प्रचलित भिक्षुकशाही धर्म हा बुळ्याबावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारं एक पाजी थोतांड आहे,' या त्यातल्या त्यात सोबर वाक्यातून प्रबोधनकारांच्या ब्राम्हणशाहीवरील हल्ल्याची कल्पना येऊ शकते.

‘पुरोहितशाही हे हिंदू धर्माच्या आणि पर्यायाने देशाच्या अवनतीचं सर्वांत महत्त्वाचं कारण असल्याचं त्यांनी वारंवार मांडलंय.

तेच प्रबोधनकारांचं हिंदुत्व असल्याची मांडणी ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांनी 'प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व' या पुस्तकात केलीय.

स्वतः हिंदू आणि हिंदुत्ववादी बनून हिंदू धर्मातल्या ब्राह्मणी वर्चस्वावर कोरडे ओढण्याचा प्रबोधनकारांचा पवित्रा अनेक हिंदुत्ववाद्यांसाठी अडचणीचा आहे.

प्रबोधनकार ठाकरे

फोटो स्रोत, PICTURE COURTSEY- PRABODHANKAR.ORG

फोटो कॅप्शन, प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे

‘'बहुजनवादी हिंदुत्वाचे मूळपुरुष' म्हणूनच प्रबोधनकारांचा शोध घ्यायला हवा. या हिंदू धर्माचा खूनच करायला हवा, इथपर्यंत टोकाचा विचार मांडूनही प्रबोधनकार हिंदुत्ववादी राहतात. कारण ते ना हिंदू धर्माचा विरोध करतात, ना हिंदुत्ववादाचा. ते विरोध करतात, हिंदुत्वाच्या नावाने बहुजनांचं शोषण करणाऱ्या ब्राम्हणी पुरोहितशाहीचा. ही सारी मांडणी निव्वळ अचाट आहे.

‘हे करताना ते कुठेच ब्राम्हणी हिंदुत्ववादाच्या वळचणीला गेलेले नाहीत. छत्रपती शाहूंच्या नंतर ब्राम्हणेतर चळवळीत मराठ्यांच्या दादागिरीला कंटाळून किंवा इतर कुठल्या कारणांमुळे वा. रा. कोठारी, रावबहाद्दूर सी. के. बोले यांसारखे ब्राम्हणेतर आंदोलनातले मोठे नेते हिंदूमहासभेत जाताना दिसतात. पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे प्रबोधनकार त्या वाटेकडे ढुंकूनही बघत नाहीत. उलट न. चिं. केळकर, सावरकर या हिंदू महासभेच्या अध्यक्षांवर अनेकदा टीका करतात.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर त्यांचं टीका करण्यासाठी आवडीचं गिऱ्हाईक असावं, असं त्यांचं लिखाण वाचताना वाटतं. विशेषतः गोळवलकर गुरुजींनी गोहत्येविरुद्ध केलेल्या आंदोलनावर त्यांनी जळगावच्या 'बातमीदार' साप्ताहिकात लिहिलेली लेखमाला आजच्या संदर्भात महत्त्वाची आहे.’

...आणि बाळासाहेबांनी हिंदुत्वाची कास पकडली!

आता बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांकडे आपण येऊ.

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराबाबत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील संशोधक सहाय्यक संजय पाटील यांच्याशी चर्चा केली. संजय पाटील हे शिवसेनेचे अभ्यासक आहेत.

संजय पाटील बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचं राजकीय आणि धार्मिक अंग, तसंच वेगळेपण अधोरेखित करतात. ते सांगतात की, “बाळासाहेबांनी स्पष्टपणे हिंदुत्वाची भूमिका ऐंशीच्या दशकानंतर घेतली. त्यातही धार्मिक भूमिका नव्वदीनंतर घेतल्याचं दिसून येतं.”

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराची जाहीररित्या निवडणुकीसाठी कास धरण्याचा क्रम सांगताना संजय पाटील म्हणतात की, “1975 सालची आणीबाणीला समर्थन करण्याची बाळासाहेबांची भूमिका शिवसैनिकांना आवडलेली नव्हती. त्यात तो शिवसेनेचा थोडा उतरणीचा काळ होता. त्याचवेळी भाजप पुढे येताना दिसत होता.

अगदी त्याच काळात म्हणजे, 1984 साली भिवंडीत दंगल झाली. या दंगलीत बाळासाहेबांनी भूमिका घेतली, त्याचा फायदा पक्षाला झाला. तिथून शिवसेनेचा पुनर्जन्म झाला. शिवसेनेला मुंबईच्या बाहेर न्यायचं होतं आणि त्यासाठी मराठीच्या पलिकडचा व्यापक मुद्दा हवा होता, तो हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे मिळाला. भाजपमुळे देशभरात हिंदुत्वाचं जे वारं वाहत होतं, त्यावर स्वार होण्याचा बाळासाहेबांनी निर्णय घेतला आणि ते हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे जाहीररित्या वळले.”

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाळासाहेब ठाकरे

पुढे 1990 साल येता येता बाळासाहेबांनी भाजपसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युतीही केली होती. मात्र, तरीही ते हिंदुत्वाचा मुद्दा जपून वापरताना दिसत होते.

याबाबत ज्येष्ठ विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात की, “बाळासाहेब ठाकरे हे मराठीजनांचेच नेते होते. मात्र, भाजपसोबत युती करण्याची वेळ आली, तेव्हा ते हिंदुत्वाकडे गेले. मात्र, ते हिंदुत्वही त्यांनी निवडणुकीपुरतंच वापरलं.”

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी बाळासाहेबांचं ऐंशी-नव्वदीच्या दशकातलं राजकारण पत्रकार म्हणून पाहिलं आणि अभ्यासलं आहे. ते सांगतात की, “बाळासाहेबांचं हिंदुत्व हे बरंचसं मुस्लीमद्वेष आणि पाकिस्तानद्वेष यापुरतंच मर्यादित होतं. ते पारंपरिक सनातनी हिंदू कधीच नव्हते. त्यामुळे शिवसेनेवर तसा कधीही शिक्का लागला नाही.

“एकजातीय पक्ष किंवा एकधर्मीय पक्ष असं कधीच शिवसेनेला होऊ दिलं नाही. ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करत असतानाही असं झालं नाही. याचं कारण त्यांचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक असेल.”

बाळासाहेबांचं हिंदुत्व सर्वसमावेशक होतं म्हणजे नक्की काय होतं?

हेमंत देसाईंच्या विश्लेषणात बाळासाहेबांच्या ‘सर्वसमावेशक हिंदुत्वाचा’ उल्लेख येता. हे हिंदुत्व नेमकं काय होतं आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं कसं होतं, हेही आम्ही विश्लेषकांकडून जाणून घेतलं.

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाकडे येण्यापूर्वी त्यांच्या कार्यपद्धतीतल्या भूमिकेवर सचिन परब नजर वेधतात. ते सांगतात की, “प्रस्थापितांना विरोध हा बाळासाहेबांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीचा समान धागा राहिलाय. बाळासाहेबांनी उजव्या आणि डाव्या सगळ्यांशी पंगा घेतला. ज्यांना राजकीय पार्श्वभूमी शून्य आहे, त्यांना सोबत घेऊन संघटना उभी केली.

“जातीपातीच्या पुढे जाऊन माणूस म्हणून नेतृत्त्व देणं हे बाळासाहेब ठाकरेंचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य आहे. ज्यांना कधीच राजकारणात मोठं होता आलं नसतं, त्यांना राजकीय प्रवाहात बाळासाहेबांनी आणलं. सर्व जाती-धर्मीयांना आणलं. बाळासाहेबांना जात कळायची. पण जाणीवपूर्वक ती नेते घडवताना आड आणली नाही. उपेक्षित समाजातल्यांना संधी देण्याचं काम त्यांनी केलं. एका अर्थानं ते सोशल इंजिनिअरिंग होतं.”

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

सचिन परबांच्या या विश्लेषणाशी सहमत होत संजय पाटील म्हणतात की, “बाळासाहेबांनी मराठी आणि प्रादेशिक अस्मितेला त्यांचं हिंदुत्व जोडलं होतं. बाळासाहेबांची हिंदुत्वाची भूमिका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हिंदुत्वाची भूमिका यात मुलभूत फरक आहे. तो फरक असा की, संघ किंवा भाजपची हिंदुत्वाची भूमिका सांस्कृतिक राष्ट्रवादातून येणारी आहे, तर शिवसेनेचा उदय हा मराठी माणसाला रोजगार, प्रादेशिक अस्मितेतून झालाय. त्यामुळे शिवसेनेचं मूळ हिंदुत्वात नाही. शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका राजकीय आहे. त्यामुळे संघाच्या हिंदुत्वाशी तुलना होऊ शकत नाही.”

संजय पाटील पुढे म्हणतात की, “आणखी निश्चित सांगायचं झाल्यास संघ किंवा भाजपचा हिंदू राष्ट्राचा अजेंडा आहे. शिवसेनेचा तसा अजेंडा नाहीय. शिवसेनेला भारत हे राष्ट्र मान्य आहे आणि त्याअंतर्गत ते हिंदुत्वाचा मुद्दा मांडतात.”

“बाळासाहेबांना सामाजिक, राजकीय परिस्थितीचं भान होतं. त्यातूनच त्यांनी हिंदुत्वाचं राजकारण करतानाही भूमिका घेतल्या आणि तसे नेते पुढे आणले,” असंही संजय पाटील म्हणतात.

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

संघ आणि शिवसेनेतील संबंध अधिक नेमकेपणानं सांगताना सचिन परब मात्र आताच्या स्थितीबाबतही निरीक्षण नोंदवतात.

परब म्हणतात की, “बाळासाहेबांनी प्रबोधनकारांचा धागा पकडून ब्राह्मणी हिंदुत्ववादाला केवळ वापरलं. संघाच्या हिंदुत्वाची नेहमी टवाळीच केली. संघवाल्यांना आपल्या जवळही येऊ दिलं नाही. अगदी सुरुवातीच्या काही घटनांनीच सावध होऊन त्यांनी संघवाल्यांना शिवसेनेच्या संघटनेत शिरू दिलं नाही. संघ हाच आपला संघटन बांधणीतला सर्वांत मोठा शत्रू आहे, हे त्यांना पक्कं माहीत होतं. त्यामुळेच बाळासाहेब असेपर्यंत संघ कधीच शिवसेनेपेक्षा वरचढ होऊ शकला नाही. पण आता पारडं पूर्ण फिरलंय.”

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वारसदार कोण, शिंदे की ठाकरे?

सचिन परब म्हणतात की, “हिंदुत्वाचं एक सर्वसमावेशक, शेंडी-जाणव्याचं नसलेलं हिंदुत्व बाळासाहेबांनी मांडलं. आज एकनाथ शिंदे शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व नाही, असं म्हणू शकतात का, तरच ते बाळासाहेबांचं हिंदुत्व मानतात, असं म्हणता येईल.

“बाळासाहेबांचं हिंदुत्व वेगळं नसतं, तर आज संघ परिवाराचा एक भाग असली असती. पण तशी कधीच झाली नाही. शिवसेनेचं कधीच ‘बजरंग दल’ झालं नाही. बाळासाहेब ठाकरे कधीच संघ किंवा भाजपसमोर शरण गेले नाहीत. एकनाथ शिंदे मात्र ‘मी मोदींचा माणूस आहे’ इथवर बोलण्यापर्यंत गेले आहेत.

किंबहुना, एकनाथ शिंदे ज्यांना गुरू मानतात, त्या आनंद दिघेंनी संघाचाच का प्रचार का केला नाही? त्यांनी शिवसेना का मान्य केली? दिघेंच्या डोक्यात कधीच भाजपसोबत जाणं आलं नाही. उलट जो ठाणे जिल्हा भाजपचा गड मानला जायचा, त्या ठाण्यातून भाजपचा प्रभावच मोडीत काढला.”

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे

संजय पाटील म्हणतात की, “एकनाथ शिंदे बाळासाहेबांचं हिंदुत्व बोलतात. मात्र, त्यांना व्याख्या करता आली नाही. त्याउलट राजकीय गरज म्हणून का होईना, पण उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या हिंदुत्वाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. आमचं हिंदुत्व भाजपच्या हिंदुत्वापेक्षा कसं वेगळं आहे ते सांगतात. कधी शेंडी-जाणव्याचं सांगतात, कधी सामाजिक ऐक्याचं सांगतात, कधी रोजगाराचं सांगतात. पण त्यांनी व्याख्या करण्याचा प्रयत्न केलाय.

“दुसरीकडे, उद्धव ठाकरेंची ही अपरिहार्यतासुद्धा आहे. भाजपच्या हिंदुत्वापेक्षा आपलं हिंदुत्व वेगळं आहे, हे उद्धव ठाकरे सांगू शकले नाहीत, तर त्यांच्या स्वतंत्र ओळखीचं काहीच उरणार नाही. कारण भाजपकडे आता हिंदूराष्ट्रवादाचे स्वत:चे नेते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) आहेत, जे राम मंदिर बांधतायेत, 370 रद्द केलंय. त्यामुळे वेगळं हिंदुत्व उद्धव ठाकरेंना सांगावंच लागेल.”

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे मात्र उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या मांडणीचं विश्लेषण करताना म्हणतात की, “उजव्या विचारसरणीची जागा पूर्ण भाजपनं व्यापल्यानं तिथं आपल्याला जागा मिळणार नाही, हे उद्धव ठाकरेंनी ओळखलं, म्हणूनच ते धर्मनिरपेक्ष जागेत आपली जागा शोधतायेत आणि हिंदुत्वाला अधिक उदारमतवादी करून ते तिथे स्थिर होऊ पाहतायेत.”