You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानमध्ये 46 जणांचा मृत्यू; तालिबानचा दावा
अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारनं म्हटलं आहे की, 24 डिसेंबरच्या रात्री पकतीकामधील बरमल जिल्ह्यात पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामध्ये 46 जणांचा मृत्यू झाला आहे.
या मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलं आहेत.
बर्मल जिल्हा दक्षिण वझिरिस्तानमधील वाना आणि रझमक परिसराजवळ आहे. तलिबानमधील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये "वझिरिस्तानमधील निर्वासितांना लक्ष्य करण्यात आलं आहे."
तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे की, पकतीका प्रांतातील चार भागांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
दुसऱ्या बाजूला पाकिस्तान सरकार अथवा सैन्याने अधिकृतपणे या हल्ल्याबाबत काहीही वक्तव्य केलेलं नाही. मात्र, काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी आपलं नाव न छापण्याच्या अटीवर माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, त्यांच्या सैन्याने बरमाल जिल्ह्यातील 'दहशतवाद्यांना' ठार केलं आहे.
या हल्ल्यामध्ये महिला आणि लहान मुलांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप तालिबान सरकारचे उप प्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी केला आहे.
हमदुल्ला फितरत म्हणाले, "पकतीका प्रांतातील बरमल जिल्ह्यातील चार जागांवर बॉम्बचा वर्षाव करण्यात आला. त्यामध्ये 46 जणांचा मृत्यू झाला. ही फारच दु:खद गोष्ट आहे. 6 लोक जबर जखमी झाले आहेत तर अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलांचा समावेश आहे."
पकतीका हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 22 मृतदेह आणि 46 जखमींना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. यातील काहींना चांगले उपचार मिळावेत यासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज असलेल्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.
तालिबान सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात या हल्ल्याचा निषेध करण्यात आला असून, याला 'क्रूर हल्ला' असं म्हटलं आहे.
"इस्लामिक अमिराती या क्रूर हल्ल्याला प्रत्युत्तर देईल. आमच्याकडे आमच्या भूमीचं आणि परिसराचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे," असंही प्रत्युत्तर या निवेदनाद्वारे तालिबानकडून देण्यात आलं आहे.
पाकिस्तानने या घटनेवर काय म्हटलं?
पाकिस्तान सरकार अथवा सैन्याने अधिकृतपणे या हल्ल्याबाबत काहीही वक्तव्य केलेलं नाही. मात्र, काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी आपलं नाव न छापण्याच्या अटीवर माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, त्यांच्या सैन्याने बरमाल जिल्ह्यातील 'दहशतवाद्यांना' ठार केलं आहे.
या अधिकाऱ्यांनी असा दावा केला की, त्यांनी एका प्रशिक्षण केंद्राला उद्ध्वस्त केलं. तसंच या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी तालिबानशी संबंधित अनेक प्रमुख सशस्त्र कमांडर्सना ठार केलं.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचे प्रवक्ते अशी आपली ओळख सांगणारे मुहम्मद खोरासानी यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं, "आम्हाला अत्यंत दु:खद अशी माहिती मिळाली आहे की, पाकिस्तानवर आपला ताबा ठेवू पाहणाऱ्या वर्चस्ववाद्यांच्या अत्याचारी सैन्याने असहाय्य निर्वासितांच्या घरांवर हल्ले केले आहेत."
"2014 मध्ये पाकिस्तानी सैन्याच्या एका ऑपरेशनमुळे (ज़र्ब ए अज़्ब) पाकिस्तानने इस्लामी आणि आंतरराष्ट्रीय नियमांविरुद्ध या असहाय्य निर्वासितांच्या घरांना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने निर्वासितांना पलायन करावे लागले."
तहरीक-ए-तालिबानच्या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानी सैन्याचा उल्लेख करत असं म्हटलं गेलं की, हे सैन्य गेल्या काही दशकांपासून बलूचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वाहमधील निर्दोष लोकांविरुद्ध हिंसा करत आहे.
'हे सार्वभौमत्वाचं उल्लंघन'
अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हामीद करजई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या हल्ल्यावर कठोर टीका केली. तसेच हा हल्ला म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचं स्पष्ट उल्लंघन असल्याचंही म्हटलं.
करजई यांनी दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाला पाकिस्तानलाच जबाबदार धरलं. त्यांनी "या भागात दहशतवाद बळकट होण्यासाठी पाकिस्तानची धोरणे कारणीभूत" असल्याचं म्हटलं.
एकेकाळी तालिबानसोबत शांतता संवाद करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अमेरिकेचे माजी विशेष प्रतिनिधी जलमई खलीलजाद यांनी म्हटलं की, जर असा हल्ला खरोखरच झाला असेल, तर तालिबान या हल्ल्याला प्रत्त्युत्तर देऊ शकतो.
पाकिस्तानमधील तालिबान सरकारचे माजी राजदूत अब्दुल सलाम जईफ यांनी पकतीकामधील हल्ल्याविषयी बोलताना म्हटलं, "अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्त्वाविरोधात केलेली क्रूर कारवाई म्हणजे हा हल्ला आहे."
अफगाणिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री मोहम्मद हनीफ अतमार यांनीही बरमाल जिल्ह्यामध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.
त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं, "हे हल्ले रोखण्यासाठी तालिबान सरकारकडे कोणतंही साधन नाहीये, ही अत्यंत दु:खद बाब आहे. सरकारकडे कोणतीही वायू सेना अथवा संरक्षण दल नाही."
अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांशिवाय अनेक अफगाणी नागरिकांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
काय आहे पाकिस्तानचे 'जर्ब ए अज़्ब' ऑपरेशन?
2014 मध्ये, पाकिस्तानच्या सैन्याने 'कट्टरतावाद्यांना' नेस्तनाबूत करण्यासाठी उत्तर वझिरिस्तानमध्ये 'ज़र्ब ए अज़्ब' नावाची दीर्घकाळ चालणारी एक मोठी लष्करी मोहिम राबवली होती.
या ऑपरेशनमध्ये शेकडो कट्टरतावाद्यांना मारण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, लाखो स्थानिक रहिवाशांनाही युद्धाच्या भीतीमुळे आपली गावे सोडून स्थलांतरित व्हावं लागलं होतं.
यामधील अनेक जण पाकिस्तानमधील इतर शहरांमध्ये पळून गेले, तर अनेक जण 'ड्यूरंड रेषा' पार करुन अफगाणिस्तानमधील 'वझिरिस्तान निर्वासितां'च्या छावणीमध्ये स्थायिक झाले.
गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर वझिरिस्तान आणि पख्तूनख्वाहच्या इतर भागात सुरक्षा परिस्थिती तुलनेने चांगली होती. परंतु अलीकडे पाकिस्तानी लष्कराकडून हल्ले वाढले आहेत.
पाकिस्तान सरकारचं असं म्हणणं आहे की, तालिबानी चळवळ अथवा 'टीटीपी'च्या कट्टरतावाद्यांमध्ये अधिक अशांतता निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये त्यांचा तळ असून ते तिथून पाकिस्तानवर हल्ला करतात.
मात्र, दुसऱ्या बाजूला, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने नेहमीच हे आरोप फेटाळले आहेत. तसेच, आम्ही कुणालाही अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कुणाच्याही विरोधात करू देत नाही, असं म्हटलं.
असा हल्ला पहिल्यांदाच झालेला नाही
अफगाणिस्तानच्या काही भागांवर पाकिस्तानच्या सैन्याने हल्ला करण्याची अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. यावर्षीच्या मार्च महिन्यामध्ये, तालिबान सरकारनं पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी पकतीकाच्या बरमाल आणि खोस्तच्या सपर जिल्ह्यांतील नागरिकांच्या घरांवर बॉम्ब वर्षाव केला असल्याचं म्हटलं होतं.
तालिबान सरकारच्या संरक्षण मंत्रालयानं त्यावेळी एका निवेदनात दावा केला होता की, त्यांनी या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ड्युरंड रेषेवरील पाकिस्तानी लष्करी तळांवर मोठा गोळीबार केला होता.
पकतीका आणि खोस्त प्रांतावर पाकिस्तानी लष्करी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून तालिबान सरकारनं पाकिस्तानी दूतावासाच्या अधिकाऱ्यांना बोलावून निषेध पत्रदेखील सादर केलं होतं.
तालिबान सरकारचे प्रभारी गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी आणि कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुट्टाकी यांनी सोमवारी (23 डिसेंबर) पाकचे विशेष प्रतिनिधी मुहम्मद सादिक खान यांची भेट घेतली होती. त्यानंतरच पाकिस्तानी सैन्याकडून हा हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)