पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाहमध्ये वाहनांवर झालेल्या गोळीबारात 38 लोकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाह प्रांतातील दुर्गम जिल्हा कुर्रम येथे प्रवासी वाहनावर गोळीबार करण्यात आला आहे.

गोळीबाराच्या या घटनेत 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर या गोळीबारात 19 लोक जखमी झाले आहेत. जखमींना ताल आणि पेशावर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कुर्रम जिल्ह्यातील मदारवी भागात पोलिसांच्या देखरेखीखाली काही वाहनं चिनार भागातून येत होती. त्याचवेळी वाहनांवर हल्ला करण्यात आला.

मदारवीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. मुहम्मद नवाज यांनी बीबीसी प्रतिनिधी इफ्तिखार खान यांना सांगितलं की सहा महिलांसह 33 लोकांचे मृतदेह आणले गेले आहेत.

याशिवाय आणखी पाच मृतदेह अलीजी रुग्णालयात पाठवले आहेत. अलीजी रुग्णालयात आठ जखमींनाही दाखल करण्यात आलं आहे.

या ताफ्याची सुरक्षा करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की आम्ही पाच ते सहा अधिकारी होतो. गोळीबार कुठून सुरू झाला हे कळलंही नाही. गोळीबारात आमचा एक सहकारीसुद्धा जखमी झाला आहे,

ताफ्यातील प्रवांशांमधून एक पीर हुसैन शाह यांनी पत्रकार जुबैन खान यांना सांगितलं की मोठ्या शस्त्रातून बेछूट गोळीबार केला जात होता.

याआधीच्या काही घटना

गेल्या काही दिवसात पाकिस्तानातून अशा अन्नेक हल्ल्यांच्या घटना समोर येत आहेत.

बलूचिस्तानातील क्वेटा रेल्वेस्थानकावर 9 नोव्हेंबरला झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 25 जण मृत्युमुखी पडले होते. तर, 46 हून अधिक लोक जखमी झाले होते. क्वेटा रेल्वे स्टेशनवरून पाकिस्तानमधील पेशावरकडे निघणारी रेल्वे निघायच्या वेळेसच हा आत्मघातकी हल्ल्याच्या माध्यमातून हा स्फोट घडवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

त्याआधी 24 ऑगस्टला बलुचिस्तानमधल्या जवळपास 10 जिल्ह्यांत केलेल्या हल्ल्यात 39 जणांचा मृत्यू झाला होता. मुसाखेल भागातील हल्ल्यात 22 जणांची हत्या करण्यात आली आहे.

तर 11 जणांची कलात आणि 6 जणांची बोलान भागात हत्या करण्यात आली होती. लोकांना बळजबरीने वाहनांबाहेर काढून, त्यांची ओळखपत्रं पाहून ओळख पटल्यानंतर त्यांची हत्या केल्याचं पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

बंदी घालण्यात आलेली पाकिस्तानमधल्या कट्टरतावादी 'बलोच लिबरेशन आर्मी’ या संघटनेने हे दोन्ही हल्ले घडवून आणले होते. बलुचिस्तानवर कब्जा करू पाहणाऱ्या पाकिस्तानी लष्कराविरोधातल्या संघर्षातून हे हल्ले होत असल्याचं संघटनेने मागे सांगितलं होतं.

कराची विमानतळावर घडवून आणलेल्या अशाच एका आत्मघातकी हल्ल्यात पाकिस्तानात विकासाचे प्रकल्प राबवण्यासाठी आलेल्या दोन चिनी नागरिकांचाही समावेश होता. या घटनेची जबाबदारीही बलोच लिबरेशन आर्मीनेच घेतली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)