You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'अफगाणिस्तानात राहिले असते तर त्यांनी मला ठार मारलं असतं...', शिक्षणासाठी पळालेल्या मुलींची गोष्ट
- Author, पीटर गिलिब्रॅंड
- Role, बीबीसी न्यूजबीट
अफगाणिस्तानमधील राजकीय परिस्थिती, तालिबान, त्यांनी महिलांवर लादलेले निर्बंध हे मुद्दे फक्त अस्वस्थ करणारेच नाहीत, तर त्याबद्दल जगभरात चिंता आणि निषेध व्यक्त केला जात आहे.
अफगाण महिला, मुलींना कशा प्रकारचा संघर्ष करावा लागत आहे आणि परदेशात पलायन करून त्या शिक्षण कसं पूर्ण करत आहेत, त्याबद्दलचा हा रिपोर्ट.
ब्रिटनमध्ये या आठवड्यात अनेकांची शाळा सुरू झाली आहे.
पण, अफगाणिस्तानातील परिस्थिती वेगळी आहे. अफगाणिस्तानातील महिला आणि मुलींना शिक्षण घेण्यास बंदी करण्यात आली आहे.
तसंच महिला आणि मुलींच्या सार्वजनिक आयुष्यावरही बरेच निर्बंध लादलेले आहेत.
ऑगस्ट 2021 मध्ये माह( वय वर्षे 22) नावाच्या तरुणीनं अफगाणिस्तानातून पलायन केलं होतं. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये तालिबानचं सैन्य शिरल्यानंतर तिनं हे पाऊल उचललं होतं.
माह सध्या युकेमध्ये शिक्षण घेत आहे. या आठवड्यात ती इंग्रजीमध्ये जीसीएसई (General Certificate of Secondary Education)ची म्हणजेच माध्यमिक शिक्षणाची सुरुवात करणार आहे.
बीबीसी न्यूजबीटशी बोलताना माह म्हणाली की, "मी खूप आनंदी आहे. मी इथं सुरक्षित आहे. मला स्वातंत्र्य आहे. आता मी मोकळेपणानं जगू शकते."
"पण, त्याचवेळी अफगाणिस्तानातील माझ्या मैत्रिणींना मात्र असं काही करता येणार नाही," याचं वाईटही तिला वाटतं.
निर्बंधांसह जगण्याचे संकट
अफगाणिस्तानची सत्ता तालिबानच्या हाती आल्यापासून गेल्या तीन वर्षात तिथं महिलांवरील बंधनं किंवा निर्बंध वाढले आहेत.
महिला आणि 12 वर्षांवरील मुलींच्या शाळेत जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बहुतांश विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा देण्यासही त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्या काम करण्यावरही बंदी आहे.
अफगाणिस्तानात ब्युटी सलून किंवा ब्यूटी पार्लरवर बंदी घालून ते बंद करण्यात आले आहेत. याशिवाय महिला आणि मुलींना पार्क, बाग, जिम आणि स्पोर्ट्स क्लबमध्ये जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
"मी जेव्हा आनंदी असते, मैत्रिणींबरोबर बाहेर जाते किंवा मी महाविद्यालयात जाते तेव्हा मी त्याचे फोटो व्हॉट्सअॅप किंवा इन्स्टाग्रामवर टाकत नाही," असं माह सांगते.
त्याचं कारण सांगताना माह म्हणाली की, मी आता युकेमध्ये आहे म्हणून मी स्वतंत्र आहे, असं माझ्या अफगाणिस्तानातील मैत्रिणींना वाटायला नको.
माह सध्या युकेतील कार्डिफ मध्ये आहे. इंग्रजीमध्ये जीसीएसई (GCSE) पूर्ण केल्यास त्यांच्यासाठी वेल्समध्ये मिडवाईफ (midwife) बनणं सोपं होईल. (मिडवाईफ म्हणजे आरोग्यसेवा क्षेत्रातील कर्मचारी. ज्या महिला गरोदर असताना किंवा बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांची काळजी घेतात)
"हे सर्व माझ्यासाठी कठीण आहे. कारण मी इथे महाविद्यालयात जाऊ शकते आणि कामावर जाऊ शकते. पण माझ्या मायदेशी, अफगाणिस्तानात माझ्याच वयाच्या माझ्या मैत्रिणींना घराबाहेरही पडता येत नाही."
तालिबाननं म्हटलं आहे की, त्यांनी घातलेले निर्बंध हे धार्मिक मुद्द्यांशी निगडीत आहेत.
सर्व समस्या सोडवण्यात आल्यानंतर महिला, मुलींना शाळा आणि महाविद्यालयात पुन्हा प्रवेश दिला जाईल, असं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात येत आहे. महाविद्यालयांमधील अभ्यासक्रम "इस्लामिक" असणार आहे, असंही ते सांगतात.
मात्र, अद्याप हे निर्बंध हटवण्याबाबत कोणतंही पाऊल उचलण्यात आलेलं नाही किंवा ते हटवण्यासाठी हालचाल करण्यात आलेली नाही. अशा प्रकारचे निर्बंध, बंधनं असलेला अफगाणिस्तान हा एकमेव देश आहे.
पलायन आणि युकेची वाट
पण माहचा कार्डिफपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
याची सुरुवात सांगताना ती म्हणाली की, तालिबाननं अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यावर तिनं अफगाणिस्तानच्या हेलमंड प्रांतातून पळ काढला आणि कंदहारला गेली. तिथून ती काबूलला गेली.
काबूलमध्ये पोहोचल्यानंतर तीन दिवसांनी मध्यरात्रीच्या सुमारास माहला जाग आली. तेव्हा तिला रस्त्यांवर तालिबानचे सैनिक दिसले.
"मी जर अफगाणिस्तानातच राहिले असते, तर कदाचित त्यांनी मला ठार केलं असतं. कदाचित त्यांनी माझ्याशी लग्न केलं असतं."
"मी माझ्या आईला फोन केला आणि म्हणाले, मी जाते आहे." त्यावर आईनं विचारलं की, "तू कुठे जात आहे?"
मी म्हटलं, "मला माहिती नाही."
अखेर इतर निर्वासिंताबरोबर माह युकेला गेली. त्यांना युकेमध्ये आश्रय मिळत होता.
माह पुढे म्हणाली की, "आम्ही इथं रिकाम्या हातानं आलो होतो. आमच्याकडं काहीही नव्हतं. मी आईचा नीट निरोपही घेऊ शकले नाही. ही गोष्ट मी कधीही विसरणार नाही."
"अफगाणिस्तान हे सध्या सुरक्षित ठिकाण नाही. पण, मी तिथंच लहानाची मोठी झाले, शाळेत गेले. मी माझा देश विसरू शकणार नाही. अफगाणिस्तानातील प्रत्येक गोष्टीची मला आठवण येते," असं माह म्हणाली.
उर्ड ची मदत आणि इंग्रजी बोलणारी माह
माह ला उर्द (Urdd)या संघटनेकडून मदत मिळाली. ही जगातील तरुणांच्या सर्वात मोठ्या संघटनांपैकी ही एक आहे. वेल्सची राजधानी असलेल्या कार्डिफमध्ये ते लोकांना मदत करत होते.
सायन लुईस (Sian Lewis)उर्दच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. वेल्समध्ये पळून आलेले आणि शिक्षण घेतलेले काहीजण आता वेल्समध्ये द्विभाषिक झाले आहेत, असं त्या सांगतात.
त्यांनी सुरुवातीला उर्दमध्ये (Urdd)शिक्षण घेतलं आणि अनेकजण वेल्सच्या विविध भागात राहण्यास गेले. या शिक्षणामुळे, मदतीमुळे त्यांच्यासाठी असंख्य दरवाजे खुले झाले, असंही त्या म्हणाल्या.
माह युकेमध्ये आली तेव्हा तिला इंग्रजी बोलता येत नव्हतं.
"तो काळ अत्यंत कठिण होता. इथं माझ्या परिचयाचं कोणीही नव्हतं. माझ्यासाठी सर्वकाही नवीन होतं," असं सांगितलं.
पण आता तीन वर्षांनंतर माहनं बीबीसी न्यूजबीटला इंग्रजीत मुलाखत दिली आहे. माह आता वेल्श भाषाही शिकत आहे.
अफगाणिस्तानातील नागरिक आणि विशेषतः महिलांचं जीवन, तिथली बंधनं यांच्या पार्श्वभूमीवर माहला युके म्हणजे जणू स्वर्गासमानच वाटतो.
त्याबद्दल ती म्हणते की, "इथल्या नागरिकांनी (युकेतील) दररोज ' ईश्वराचे आभार' मानले पाहिजेत. इथे महिलांना अधिकार आहेत. लोकांना इथं मोकळीक आहे. ते हवं ते करू शकतात. सुरक्षित आहेत. त्यामुळं त्यांनी आनंदी असायला हवं. ते खूपच नशीबवान आहेत."
अकदासचा संघर्ष
अफगाणिस्तान सोडणारी आणखी एक तरुणी म्हणजे 17 वर्षांची अकदास (Aqdas).
ती सध्या अमेरिकेत आहे. न्यू मेक्सिकोतील एका महाविद्यालयाची शिष्यवृत्ती तिला मिळाली आहे. मायदेशापासून 12,000 मैलांपेक्षाही अधिक अंतरावर सध्या की आहे.
तालिबाननं काबूल ताब्यात घेतलं, तो दिवस तिला आजही आठवतो.
"मला आठवतं की, आता काय करायचं हे मला कळत नव्हतं. ते माझे अधिकार हिरावून घेतील का? माझ्या आईनं 20 वर्षांपूर्वी जसा हिंसाचार अनुभवला तशाच हिंसाचाराचा अनुभव मलाही येईल का? असं मला वाटत होतं. "
"आई रडत असल्याचं माझ्या लक्षात आलं. तिनं माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला म्हणाली की तालिबानमुळं तिला शिक्षण सुरू ठेवता आलं नाही."
पण, तिनं अकदासला म्हटलं की, "तालिबान किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळं तू तुझ्या जीवनाची दिशा बदलू देऊ नकोस."
त्यानंतर अकदासनं हेरात ऑनलाइन स्कूलच्या मदतीनं लपून ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवलं.
"ऑनलाइन असो की इतर मार्गानं मी शिक्षण कधीही थांबवलं नाही," असं ती सांगते.
तिच्यासाठीही हे जीवनातील प्रचंड कठिण क्षण होते. तिला अमेरिकेत शिष्यवृत्ती मिळाली, तेव्हा व्हिसा मिळवणं आवश्यक होतं.
पण, अफगाणिस्तानातील अमेरिकेचा दूतावास बंद झाला होता.
ती म्हणते की, मग वैद्यकीय व्हिसाचा वापर करून ती तिच्या वडिलांबरोबर पाकिस्तानात गेली. कारण महिला असल्यानं तिला अफगाणिस्तान सोडण्याची परवानगी नव्हती.
अकदासचे क्लासेस आता सुरू झाले आहेत. ती म्हणते की अफगाणिस्तानात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याकडं फार दुर्लक्ष केलं जातं.
"अनेकांना वाटतं की, अफगाणिस्तानातील एकमेव समस्या म्हणजे मुलींचं शिक्षण ही आहे. पण तिथं मानसिक आरोग्यासारख्या इतरही समस्या आहेत."
"अफगाणिस्तानातील मुली दररोज नैराश्य आणि तणावाला सामोऱ्या जात आहेत. यासाठी त्यांना कोणतीही मदत उपलब्ध नाही."
युके सरकारनं बीबीसी न्यूजबीटला सांगितलं की "अफगाणिस्तानात महिलांच्या शिक्षणावर जी बंदी घालण्यात आली आहे, त्याचा त्यांनी तीव्र निषेध केला आहे. तालिबाननं त्यांचे निर्णय मागे घ्यावेत आणि अफगाण मुलींच्या अधिकारांचं रक्षण करावं असं आवाहन करण्यात आलं आहे."
अफगाणिस्तानात महिला आणि मुलींनी शिक्षण घेण्यावर बंदी घालण्यात आल्याच्या मुद्द्याबाबत बीबीसी न्यूजबीटनं तालिबानशी संपर्क केला. मात्र तालिबानकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.