You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तालिबानमुळे करिअर संपलं; अफगाणिस्तानातील 'सुशिक्षित महिलांची' गोष्ट
- Author, तुरपेकाई घरननाई
- Role, बीबीसी अफगाण सर्व्हिस
तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा परत मिळवल्यानंतर नादिया, लिझा आणि झाला यांच्यासाठी गेली तीन वर्षं अतिशय वेदनादायी आणि खूप मोठी होती.
तिघीही आता तिशीत आहेत. 2001 मध्ये तालिबानी लोकांना अफगाणिस्तानातून हुसकावण्यात आलं होतं. त्यानंतर स्त्रियांनी शिक्षण आणि नोकरी या क्षेत्रात मोठी झेप घेतली होती. या तिघी त्या पिढीचं प्रतिनिधित्व करतात.
काही जणींनी त्यांच्या क्षेत्रात चांगलीच प्रगती केली होती आणि महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं.
मात्र 15 ऑगस्ट 2021 ला तालिबानी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आले आणि त्यांनी महिलांवर बंधनं आणण्यास सुरुवात केली. तेव्हापासून अधोगतीला सुरुवात झाली.
आता हायस्कूल आणि विद्यापीठाची दारं मुली आणि स्त्रियांसाठी बंद आहेत. तालिबानच्या मते हे तात्पुरतं आहे. महिलांना बागा आणि जिममध्ये जाण्याची परवानगी नाही.
त्यांना काम करायला बंदी नाही पण नागरी सेवेतील बहुतांश पोस्टिंगपासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं आहे.
आरोग्य आणि शिक्षणातील काही क्षेत्रं त्याला अपवाद आहेत. अनेक महिलांना सरकारी मंत्रालयातून काढून टाकण्यात आलं आहे. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या खासगी क्षेत्रात त्यांना अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या संधी आहेत.
‘माझं नाव हाच सर्वांत मोठा धोका झाला आहे.”
नादिया 35 वर्षांच्या आहेत. त्या शासकीय पातळीवर उच्चपदस्थ अर्थतज्ज्ञ आहे. पण त्यांना काम करण्यास बंदी घातली आहे.
“मला माझा पगार येत होता. मी माझे खर्च स्वत: करायचे.” त्या सांगतात
“मला मित्रमैत्रिणी होते आणि आम्ही एकत्र वेळ घालवायचो. आम्ही आयुष्याचा आनंद घेत होतो. आम्ही जेवायला एकत्र जायचो. आता माझा भाऊ संध्याकाळच्या जेवणाला काही आणतो का याची वाट पाहते. याचं मला प्रचंड दु:ख होतं.”
त्या सांगतात.
त्या 90,000 अफगाणी (1 लाख रुपये) इतके पैसे दर महिन्याला कमवायच्या. त्या 15 जणांच्या कुटुंबाची काळजी घ्यायच्या. आता ते सगळे भावाच्या पैशावर अवलंबून आहेत. पण कंपनीत किती काम आहे यावर त्याचं उत्पन्न अवलंबून असतं.
नादिया म्हणतात की त्या स्त्रियांच्या हक्कांवर चेहरा न झाकता किंवा अज्ञात राहून बोलत असत. पण आता त्यांच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी असं करता येत नाही. “माझं नाव हाच माझ्यासाठी सर्वांत मोठा धोका झाला आहे.” त्या सांगतात.
त्या अनेक नोकऱ्यांसाठी अर्ज करतात. “बायकांसाठी संधी मर्यादित आहे आणि अर्जांची संख्या जास्त आहे.” असं त्या सांगतात. एका ठिकाणी त्यांचं शिक्षण गरजेपेक्षा जास्त आहे, असं सांगितलं गेलं.
“मी निराश झाले आहे. मी रोज फक्त स्वयंपाक करते. मला कोणाशीही बोलायची इच्छा होत नाही.”
जेव्हा हे सगळं असह्य होतं तेव्हा त्या म्हणतात की त्या जवळपास एखाद्या पर्वतावर जातात आणि दीर्घ श्वसन करतात.
नादिया म्हणतात की आता त्या “अपूर्ण स्वप्नांकडे टक लावून पाहत ” दिवस घालवतात.
“मी माझं दु:ख शब्दात व्यक्त करू शकत नाही.”
“स्वत:ला एका खोलीत कोंडून जोरजोरात ओरडावसं वाटतं’ असं 36 वर्षीय लिझा म्हणतात. त्या 36 वर्षाच्या आहेत आणि त्या उत्तरेला एका भागात विद्यापीठात लेक्चरर होत्या.
डिसेंबर 2022 मध्ये तालिबानने सर्व विद्यापीठांना महिलांचं शिक्षण अमर्यादित काळासाठी थांबवण्याचा आदेश दिला. महिला लेक्चररला घरी राहण्याचा सल्ला दिला.
लिझा यांना नोकरीवरून काढण्यात आलेले नाही. पण महिन्याकाठी त्यांचा 36000 अफगाणी (42000 रुपये) आता 4900 अफगाणीवर (5800 रुपये) आणला आहे. त्यांचा नवरा मेकॅनिक म्हणून काम करतो आणि त्यालाही तितकाच पगार आहे.
त्यांच्या विद्यापाठीतल्या मोजक्या महिला लेक्चरर पैकी एक असण्याचा त्यांना अभिमान होता. तसंच कुटुंबाला आधार द्यायच्या म्हणून त्या आनंदी होत्या. आता त्यांना बहिणीकडून पैसे घ्यावे लागतात. तेही परत करू शकतील की नाही याची त्यांना शाश्वती नाही.
लिझा यांनी लेक्चरर म्हणून 11 वर्षांपूर्वी काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी शिकवता शिकवता मास्टर्स डिग्री घेतली होती. या काळात आलेल्या तणावामुळे त्यांना गर्भपाताचा सामनाही करावा लागला.
“मी माझ्या शिक्षणासाठी आणि करिअरसाठी माझ्या बाळाचा त्याग केला. पण शेवटी ज्यासाठी काम केलं ते मी सगळं गमावून बसले.” त्या म्हणतात.
त्यांना तीन मुलं आहेत आणि त्या गरोदर आहेत. पण डॉक्टरांकडे जायला पैसे नाहीत. त्या म्हणतात त्यांची मुलं त्यांना रडताना पाहतात आणि रडण्याचं कारण विचारतात. पण ती त्यांना काहीही सांगता त्यांना मिठी मारते. “मला माहिती आहे की माझ्या वेदना मी शब्दात मांडू शकत नाही.” त्या सांगतात.
“मी माझ्या विचारांमुळे आणि काळजीमुळे आणि कुटुंबाच्या खर्चामुळे मला नैराश्य आलं आहे. माझ्या मुलांना चांगलं वागवण्याचा सुद्धा संयम नाही.” त्या म्हणतात.
जेव्हा तालिबान सत्तेवर आलं तेव्हा लिसा बाल्यावस्थेत होत्या. “तेव्हा संपूर्ण देशात दुष्काळ पसरला होता. लोक त्यांच्या कुटुंबाला पोसू शकत नव्हते. त्या सांगतात. “त्यांच्या पालकांनी त्यांना इराणला नेलं. ते तिथे सात वर्षं राहिले. मला माझ्या मुलांचे असेच हाल करायचे नाहीयेत” त्या पुढे सांगतात.
याही बातम्या वाचा :
“मी न्यायासाठी लढत होते.”
तीन वर्षांपूर्वी झाला या लष्कराच्या वकील होत्या. त्या आता 30 वर्षांच्या आहेत. त्या कायदा आणि राज्यशास्त्राच्या पदवीधर आहेत आणि त्या मास्टर्सचं शिक्षण घेत होत्या.
सैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करणं हे अतिशय त्रासाचं आणि आव्हानात्मक काम आहे. होतं असं त्या सांगतात. अनेकदा गुन्हेगारांनी त्यांना धमक्या दिल्या. मात्र स्वतंत्र असण्यात आणि न्यायसाठी लढण्यात त्यांना आनंद मिळायचा असं त्या सांगतात.
झाला त्यांच्या घरातली एकमेव कमावती व्यक्ती होती आणि त्या काबूल मध्ये राहतात. “काबूल कोसळलं त्याच्या दोन दिवसांआधी मिळालेला पगार माझा शेवटचा पगार होता.” त्यांना अंदाजे 36000 अफगाणी (511 डॉलर) इतका पगार मिळायचा. त्यांचं लग्न झालेलं नाही. मात्र त्या स्वत:चा आणि त्यांच्या सहा कुटुंबीयांचा आधार आहेत. “आता आमच्यापैकी कोणीही पैसा कमावत नाही.” माझ्या सेव्हिंग्सवर आता आम्ही जगतो आहोत. असं त्या म्हणाल्या.
त्या सकाळी लवकर जिमला जात असत. पण आता त्यावर बंदी आली आहे आणि पुढे शिकणं त्यांना परवडत नाही. “मी फक्त खोलीच्या एका कोपऱ्यात बसते. जेव्हा घरचे कामं संपतात तेव्हा मी सोशल मीडिया पाहते किंवा दिवसभर झोपते. मला काहीही करावंसं वाटत नाही. मला काहीही आशा नाहीत.” त्या सांगतात.
“आधीच्या सरकारमध्येही बायकांना धमक्या मिळत असत. पण तेव्हा कायदा होता आणि आमच्या हक्कांचं रक्षण व्हायचं आणि आम्ही बोलू शकत होतो. आम्हाला उडण्यासाठी पंख होते. तालिबानने ते पंख छाटले होते.” त्या म्हणतात.
“मी देशातल्या लोकांच्या हक्कासाठी लढायचे. आता आमच्याकडे काहीही उरलं नाही. आम्ही आमच्या आवडत्या रंगाचे कपडेही निवडू शकत नाही.”
“मी गोष्टी इतक्या वाईट थरापर्यंत गेलेल्या पाहिलेल्या नाहीत. आमचा वर्तमान आणि भविष्य अंधारात आहे. आम्हाला आशेचा एकही किरण दिसत नाहीये.”