'अचानक पूर आला, सगळं वाहून गेलं; माझ्या घरातील लोकांचे मृतदेह रस्त्यावर आलेले मी पाहिले'

    • Author, यामा बारीज़ आणि कॅरोलिन डेव्हिस
    • Role, बागलान प्रांत, अफगाणिस्तान

पूर ओसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या प्रियजनांच्या शोधात निघालेल्या नूर मोहम्मद यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह रस्त्यावर आणि परिसरातल्या शेतात विखुरलेले आढळून आले.

अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील बागलान प्रांतात 75 वर्षांचे नूर मोहम्मद राहतात. घरापासून 100 मीटर दूर असताना नूर मोहम्मद यांना या महाभयंकर पुराचा आवाज ऐकू आल्याचं ते सांगतात.

हा आवाज ऐकून घाबरलेले नूर लगेच त्यांच्या घराकडे पळाले कारण त्या घरात त्यांच्या पत्नी, बहीण, मुलगा आणि दोन नातवंडं आराम करत होती. पण ते वेळेत पोहोचू शकले नाहीत.

अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात त्यांचं कुटुंब आणि संपूर्ण घरच वाहून गेलं.

कोरड्या हिवाळ्याच्या हंगामानंतर अतिवृष्टी आणि वादळामुळे हा पूर आला होता. त्यामुळे अचानक आलेलं एवढं पाणी जमिनीत झिरपू शकलं नाही. या पुरामुळे अफगाणिस्तानात मोठा विध्वंस झाला आहे.

अफगाणिस्तानच्या बागलान प्रांताचं या पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. तसेच या भागात सर्वाधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. हजारो लोक या पुरानंतर बेघर झाले आहेत आणि त्यांच्यापर्यंत तात्काळ अन्न आणि उपचार पोहोचवण्याची गरज आहे. बेघर झालेल्या लोकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जागतिक अन्न उपक्रम (वर्ल्ड फूड प्रोग्राम)ने दिलेल्या माहितीनुसार या पुरात 300पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि दोन हजारांहून अधिक घरांचं नुकसान झालं. या पुरामुळे उत्तर अफगाणिस्तानातील पाच जिल्ह्यांना फटका बसला असून. अचानक आलेल्या या पुरामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या वाढण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.

'मी हतबल झालो होतो, पूर भयंकर होता'

बदख्शान, घोर आणि पश्चिम हेरात या राज्यांनाही पुराचा मोठा फटका बसला आहे.

नूर मोहम्मद म्हणतात, "मला असहाय्य वाटत होतं."

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या कुटुंबातील सदस्यांना 75 वर्षांचे नूर मोहम्मद वेड्यासारखे शोधत होते. बागलान प्रांतातल्या गझ नावाच्या गावात त्यांचं घर होतं. नूर यांनी कुटुंबीयांचा बराच शोध घेतला पण त्यांना संध्याकाळपर्यंत काहीही मिळालं नाही.

अखेर मध्यरात्रीपर्यंत शोध घेऊन थकलेले नूर त्यांच्या गावापासून तीन तासांच्या अंतरावर राहत असलेल्या त्यांच्या मुलीच्या घरी गेले. दुसऱ्यादिवशी त्यांनी परत गझमध्ये शोध सुरु केला आणि अखेर त्यांना त्यांच्या कुटुंबियांचे मृतदेह आढळून आले.

त्या प्रसंगाबाबत बोलताना नूर म्हणतात की, "ते दृश्य भयंकर होतं."

नूर म्हणतात की त्यांनी त्यांच्या 75 वर्षांच्या आयुष्यात एवढं मोठं संकट कधीच बघितलं नव्हतं. नैसर्गिक संकटं त्यांना नवीन नाहीत. ते म्हणतात की यापूर्वी कधीच एखाद्या नैसर्गिक संकटामुळे किंवा युद्धामुळे एवढं नुकसान झालं नव्हतं.

त्या दिवशी आलेल्या पुराच्या जोरदार प्रवाहामुळे नूर मोहम्मद यांच्या घरी मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 25 वर्षीय सईदा यांची मुलगीही होती. त्या म्हणतात की, पुराचा आवाज ऐकून त्या भेदरल्या होत्या. तो आवाज खूप मोठा होता.

पुरामुळे नूर मोहम्मद यांच्या गावाचा रस्ता तुटला आहे. या गावातील प्रत्येकाने दोन-तीन नातेवाईक पुरात गमावले असून, सध्या त्यांना मदतीची नितांत गरज आहे.

'चहा प्यायला एक ग्लासही उरला नाही'

रौजतुल्ला हे एक आरोग्य कर्मचारी आहेत. पुरामुळे ज्या गावाचं सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे अशा फलूल नावाच्या गावात ते आणि त्यांची टीम नुकतंच जाऊन आले आहेत.

रौजतुल्ला म्हणतात की, "आम्ही ज्या भागाचा दौरा केला तिथे काहीही उरलं नाही, सगळं नष्ट झालं आहे."

फलूलमध्ये उन्मळून पडलेली झाडं, तुटलेले खडक, विखुरलेल्या विटा आणि चिखलात अडकलेल्या, तुटलेल्या गाड्या आहेत. साचलेल्या पुराच्या पाण्यातून तयार झालेला चिखल उन्हामुळे कोरडा होऊ लागलाय . जे लोक अजूनही खोदकाम करत आहेत आणि आपले सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्यासाठी हे काम आता आणखी कठीण होऊन बसलंय.

मोहम्मद गुल आपल्या घराच्या दोन खोल्या खोदण्यासाठी फावडे वापरत आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "आता आमच्याकडे साधा चहा प्यायलाही भांडं शिल्लक नाहीये. आमच्याकडे काहीच उरलं नाही."

या सगळ्यातून ते फक्त एकच गोष्ट वाचवू शकले आहेत आणि ती म्हणजे त्यांची मोडून पडलेली सायकल. आता मोहम्मद गुल यांनी त्या सायकलीला त्यांच्या गाढवाच्या पाठीवर लादलं आहे.

हा पूर येऊन बरेच दिवस झाले तरी अजूनही काही कुटुंब त्यांच्या घरातील नातेवाईकांचे मृतदेह शोधत आहेत. एका घरात खूप गर्दी जमलीय. तिथे एका मुलीचा मृतदेह सापडलाय. एक अँब्युलन्स तो मृतदेह चादरीत गुंडाळून घेऊन जातीय.

एकाच कुटुंबातील 16 व्यक्तींचा मृत्यू

रौजतुल्ला त्यांच्या संपूर्ण टीमला घेऊन पुराने नुकसान झालेल्या भागात पोहोचले आहेत. त्यांच्या टीममध्ये त्यांच्याव्यतिरिक्त 15 आरोग्य कर्मचारी, पॅरामेडिकल टीम आणि डॉक्टरही आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 200 हून अधिक जखमी लोकांना मदत केली आहे, ज्यात एक व्यक्ती असाही होता ज्याच्या कुटुंबातील 16 लोकांचा या पुरात मृत्यू झाला आहे.

अजूनही पुरामुळे प्रभावित झालेल्या दुर्गम भागात रौजतुल्ला आणि त्यांचे सहकारी पोहोचू शकले नाहीत. तिथेही मदत पोहोचवण्याची नितांत गरज आहे, असं रौजतुल्ला सांगतात.

रौजतुल्ला म्हणतात की, "इथे प्यायलाही पाणी नाही. जे पाणी आहे ते प्यायलं तर टायफॉइड आणि अतिसारासारखे आजार होऊ शकतात."

ज्या भागात तो पोहोचण्यात यशस्वी झाला आहे, त्यांच्या टीमने मोबाईल रिलीफ सेंटर्स स्थापन करण्यास सुरुवात केली आहे आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

या भागातल्या प्रत्येक गावात पुरामुळे नुकसान झालंय, लोकांचे जीव गेलेत. बीबीसीला प्रत्येक गावात हेच आढळून आलं.

त्यातल्या एकाने आम्हाला त्याच्या पाच वर्षांच्या पुतण्याचा फोटो दाखवला. त्या चिमुरड्याचं नाव अबू बकर असं होतं. पुराच्या पाण्याचा लोट त्यांच्यापर्यंत आला तेंव्हा अबू बकर त्याच्या आजोबांसोबत खेळत होता. त्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच झटापटीत अबू बकर पाण्यात वाहून गेला.

अबू बकरने त्याच्या आजोबाचा पाय एवढा घट्ट पकडला होता की त्याच्या पकडीचे व्रण आजोबांच्या पायावर अजूनही स्पष्ट दिसत होते. तो आजोबांच्या तावडीतून सुटला तेव्हा फक्त त्याच्या आईने अबू बकरला बघितलं होतं.

अब्दुल खालिक यांना पुराबद्दल कळलं तेव्हा ते शहरापासून दूर होते. ते त्यांच्या शहरात परतले तेव्हा त्यांचं संपूर्ण घर वाहून गेलं होतं आणि घराच्या जागी त्यांच्या बाथरूमच्या भिंतीचा एक छोटा तुकडा तेवढा उरला होता. त्यांच्या कुटुंबातील 18 जणांपैकी 10 जण या पुरात वाहून गेले आहेत.

ते म्हणतात, “आम्ही तासन्तास चिखलात कुटुंबीयांचा शोध घेत होतो, म्हणून आम्ही आमचे बूट काढले आणि शोध सुरू ठेवला. आम्हाला त्यांचे मृतदेह येथून काही मैल दूर सापडले."

या भागातले लोक या विध्वंसाचं वर्णन करताना म्हणतात की कुणीतरी ओरडून पाणी येत असल्याचं सांगितलं होतं. काही लोक पाण्याच्या प्रवाहातून स्वतःला वाचवू शकले पण त्यांचं सगळं सामान पुरात वाहून गेलं.

'शेतात चिखलाचं साम्राज्य आहे, वाहून आलेला गाळ साचला आहे'

पुरानंतर जोहरा बीबी आता एका ताडपत्रीपासून बनवलेल्या तंबूत राहतात. त्या म्हणतात की, "पूर आला तेंव्हा आम्ही घराच्या वरच्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला पण थोड्याच वेळात आमचं संपूर्ण घर आणि आमची सगळी गुरं वाहून गेली."

त्या म्हणतात की त्यांनीही त्यांच्या आयुष्यात असा प्रकार बघितला नाही. या भागात पूर येणं ही काही नवीन गोष्ट नाही पण काही लोकांनी आम्हाला सांगितलं की मागच्या 20, 40 आणि 60 वर्षात त्यांच्या भागात असा पूर कुणीच पाहिला नव्हता.

गडन बाला नावाच्या आणखीन एका गावात एका शेताच्या कडेला मोहम्मद रसूल त्यांची सिगरेट शिलगावत उभे होते. कधीकाळी ते याच शेतात शेती करायचे, वेगवेगळी पिकं घ्यायचे पण आता त्या शेतात चिखलाचं तळं तयार झालंय.

शेकडो एकर शेतातील कापूस, गहू पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. आम्ही गव्हाच्या शेतातून गेलो जिथे पाण्याच्या प्रवाहाने पिकाचे दोन तुकडे केले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हिरवीगार पिके उखडून टाकली आहेत आणि मागे फक्त ढिगारे आणि चिखल उरला आहे.

मोहम्मद रसूल स्वत:ला भाग्यवान मानतात की त्यांचे कुटुंब पुरातून वाचले, पण ते म्हणतात की त्यांनी बाकी सर्व काही गमावले.

ज्या शेतात त्यांची पिके नष्ट झाली आहेत ती त्यांनी आम्हाला दाखवली. ते म्हणाले की, "हा माझ्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत होता. आता मी असहाय्य आणि हतबल झालोय."

'पुराने आमचं सगळं काही हिसकावून घेतलं'

80 टक्के अफगाण नागरिकांप्रमाणे मोहम्मद रसूलही उदरनिर्वाहासाठी शेती करत होते. ते म्हणतात की आता त्यांचं पोट कसं भरेल हे त्यांना माहीत नाहीये. तिथून काही अंतरावर असलेल्या त्यांच्या घराचे अवशेष दाखवताना ते म्हणतात की पुराचं पाणी अजूनही ओसरलेलं नाही त्यामुळे आम्ही आमच्या घरी सध्या जाऊ शकत नाही.

ते म्हणतात की, “माझ्याकडे आता काहीच नाही, मी काय करू? माझे एक कुटुंब आहे पण त्यांना आधार देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही.”

पुरामुळे प्रभावित होण्यापूर्वीच, संयुक्त राष्ट्रांनी अंदाज व्यक्त केला होता की यावर्षी सुमारे 24 दशलक्ष लोकांना काही प्रकारच्या मानवतावादी मदतीची आवश्यकता असेल. हे अफगाणिस्तानच्या लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक आहे.

पुरामुळे केवळ पिकेच उद्ध्वस्त झाली नाहीत. मोहम्मद रसूल सांगतात की त्यांच्या शेजाऱ्याने त्यांच्या दोन गायी पुरात गमावल्या. त्याचं उत्पन्न त्या दोन गाईंमधूनच होतं.

आणि नूर मोहम्मद, जे त्यांच्या मुलीसोबत राहतात ते म्हणतात की त्यांच्याकडे फक्त एकच गोष्ट उरली आहे ती म्हणजे त्यांच्या अंगावरचे कपडे. या पुरात त्यांचं जे घर वाहून गेलं त्यातच ते लहानाचे मोठे झाले होते आणि सुमारे 65 वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी ते घर बांधलं होतं असं ते सांगतात.

नूर म्हणतात की, “मला भविष्याबद्दल आशा होती. माझा मुलगा आणि नात हे शिक्षक होते. मला त्याचा अभिमान वाटत होता कारण तो देशाच्या भविष्यात आपली भूमिका बजावत होता.”

ते म्हणतात की, "त्या दोघांचाही या पुरात मृत्यू झालाय, पुराने माझं सर्वस्व हिरावून घेतलं आहे."