'कधी-कधी माझ्या उपाशी मुलांना फक्त चहाच पाजावा लागतो' - अफगाणिस्तानातून ग्राऊंड रिपोर्ट

    • Author, योगिता लिमये
    • Role, बीबीसी न्यूज
    • Reporting from, अफगाणिस्तान

"माझ्या मुलासाठी दूध खरेदी करता आलं, त्यालाही आता दोन महिने झाले. शक्यतो नेहमी मी त्याला खाऊ घालण्याच्या बाटलीत चहाच भरून देत असते. नाहीतर चहामध्ये पोळी भिजवून त्याला खाऊ घालते"

पूर्व काबूल परिसरात एका डोंगरावर बसलेल्या सोहैला नियाझी सांगत होत्या.

त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी रस्ताही नाही. तुम्हाला दगडमातीतून तयार झालेल्या पायवाटेनं जावं लागतं आणि बाजूनं नालीचं पाणी वाहत असतं.

सोहैला विधवा आहेत. त्यांना सहा मुलं आहेत. त्यांची सर्वात लहान मुलगी 15 महिन्यांची आहे. तिचं नाव हुस्ना फकीरी.

सोहैला यांनी ज्या चहाचा उल्लेख केला, तो अफगाणिस्तानात पारंपरिकरित्या प्यायला जातो. त्यात दूध किंवा साखर नसते, तर हिरवी पानं आणि गरम पाणी यापासून तो तयार केला जातो. मुलांसाठी पोषक असं या चहात काहीही नसतं.

संयुक्त राष्ट्राच्या जागतिक खाद्य कार्यक्रम (WFP)द्वारे आणीबाणीच्या काळात खाद्य मदत पुरवली जात होती. पण गेल्या वर्षापासून 10 लाख लोकांना ही मदत मिळणं बंद झालं आहे.

सोहैलादेखील त्यांच्यापैकी एक आहेत. निधीच्या कमतरतेअभावी संयुक्त राष्ट्राला हे पाऊल उचलावं लागलं आहे. पण मदतीची गरज असलेल्यांना हा मोठा धक्का आहे. विशेषतः महिलांवर जबाबदारी असलेल्या अफगाणिस्तानातील 20 लाख घरांसाठी.

सोहैला यांच्या मते, तालिबान सरकारच्या नियमानुसार त्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी घराबाहेर जाऊ शकत नाहीत.

"अशा अनेक रात्री आल्या, जेव्हा आमच्याकडं खाण्यासाठी काहीही नव्हतं. मी मुलांना म्हणते की, रात्रीच्या वेळी कुठे भीक मागायला जाणार आहे? पण त्यांना जेव्हा भूक असहय्य होते, तेव्हा मी नेमकं काय करायला हवं, याचा विचार करू लागते.

"शेजारी मुलांसाठी खायला काही घेऊन आले तर मुलं - मला हवं, मला हवं - असं म्हणत भांडू लागतात. पण मी त्यांना शांत करण्यासाठी त्यांना ते वाटून देते," असं सोहैला म्हणाल्या.

उपाशी असलेल्या मुलीला शांत करण्यासाठी सोहैला "झोपेचं औषध" देतात.

सौहैला सांगतात, "तिनं उठून दूध मागू नये म्हणून मी औषध देते, कारण माझ्याकडं पैसे नसतात. औषध दिल्यानंतर ती पहिल्या दिवशी सकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत झोपून राहते. कधी-कधी तर ती जीवंत आहे की नाही, हे मी तपासून पाहत असते."

सोहैला मुलीला जे औषध देतात त्याची आम्ही चौकशी केली. तेव्हा समजलं की, ते साधारण अँटिहिस्टामाइन किंवा अॅलर्जीरोधक औषध आहे. बेशुद्ध होणं हा त्याचा, साईडइफेक्ट आहे.

डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की, हे औषण ट्रँक्विलायझर आणि नैराश्यरोधक औषधांपेक्षा कमी हानिकारक आहेत. पण अफगाण आईवडील त्यांच्या उपाशी मुलांना ते देत आहेत. याच्या अतिरेकी सेवनामुळं श्वसनासंबंधी अडचणी निर्माण होऊ शकतात.

सोहैला म्हणाल्या की, त्यांचे पती सामान्य नागरिक होते. 2022 मध्ये पंजशीर प्रांतात तालिबान आणि विरोधकांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता.

त्यांच्या मृत्यूनंतर सोहैला WFP कडून पुरवल्या जाणाऱ्या मदतीवर अवलंबून होते. या मदतीत पीठ, तेल, डाळी यांचा समावेश होता.

WFP नं ते आता फक्त 30 लाख लोकांनाच मदत करण्यास सक्षम असल्याचं सांगितलं आहे. पण हा आकडा प्रचंड उपासमारीचा सामना करणाऱ्या एकूण लोकांच्या एक चतुर्थांशपेक्षाही कमी आहे.

सोहैला पूर्णपणे नातेवाईक किंवा शेजाऱ्यांकडून मिळणाऱ्या दानावर अवलंबून आहेत.

आम्ही जेवढावेळ तिथं होतो, तेवढा वेळ चिमुकली हुस्ना शांत आणि निषक्रिय होती.

ती मध्यम कुपोषित आहे. युनिसेफच्या माहितीनुसार, सुमारे 30 लाख चिमुकली मुलं या स्थितिचा सामना करत आहेत. त्यांच्यापैकीच हुस्ना एक आहे. पण या सर्वांपैकी सुमारे एक चतुर्थांश मुलांची स्थिती त्यापेक्षाही वाईट आहे. ते गंभीर तीव्र कुपोषणाचा सामना करत आहेत. अफगाणिस्तानातील ही आतापर्यंतची सर्वात वाईट परिस्थिती आहे, असं संयुक्त राष्ट्रांचं म्हणणं आहे.

शिवाय, जेव्हा कुपोषण देशाच्या सर्वात तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहे, तेव्हाच ज्या मदतीमुळं आरोग्य सेवा तग धरून होती ती मदत बंद करावी लागत आहे.

रेड क्रॉसची आंतरराष्ट्रीय समिती (आयसीआरसी) आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार करत होती. तसंच 30 पेक्षा जास्त रुग्णालयांमध्ये औषधं आणि अन्नासाठी आर्थिक मदत पुरवत होती. 2021 मध्ये सत्तांतरानंतर लागू करण्यात आलेली ही एक आपत्कालीन उपाययोजना होती.

पण आता त्यांच्याकडं ही मदत सुरू ठेवण्यासाठी संसाधनं उपलब्ध नाहीत. त्यामुळं अफगाणिस्तानातील लहान मुलांचं एकमेव रुग्णालय इंदिरा गांधी बाल रुग्णालयासह बहुतांश आरोग्य सेवांची मदत मागं घेण्यात आली आहे.

"डॉक्टर आणि नर्सचा पगार आता सरकार देत आहे. त्या सर्वांचा पगार अर्धा करण्यात आला आहे," असं रुग्णालयाचे तालिबानद्वारे नियुक्त संचालक डॉ. मोहम्मद इकबाल सादिक यांनी सांगितलं.

रुग्णालयानं बाह्यरुग्ण विभाग बंद केला आहे. तसंच ज्यांना रुग्णालयात दाखल होणं गरजेचं आहे, त्यांनाच आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत.

कुपोषणाचा वार्ड पूर्णपणे भरलेला आहे. अनेकदा तर त्यांना एका बेडवर एकापेक्षा जास्त मुलांना ठेवावं लागत आहे.

सुमाया एका कोपऱ्यात बसलेली आहे. 14 महिन्यांची असताना तिचं वय एखाद्या नवजात बाळाएवढं आहे. तिच्या चिमुकल्या चेहऱ्यावर वृद्धासारख्या सुरकुत्या दिसत होत्या.

तिच्या शेजारी मोहम्मद शफी आहे. त्याचं वजन 18 महिन्यांत असावं त्यापेक्षा अर्ध होतं. त्याचे वडील तालिबानसाठी लढत होते. एका अपघातात त्यांचं निधन झालं होतं. तर त्याच्या आईचा आजारपणानं मृत्यू झाला होता.

आम्ही जेव्हा त्याच्या अंथरुणाच्या जवळून गेलो तेव्हा त्याची वृद्ध आजी हयात बीबी व्याकूळ होत आमच्याकडं आल्या आणि त्यांची कहाणी आम्हाला सांगू लागल्या.

तालिबाननं त्यांच्या नातवाला रुग्णालयात पोहोचवण्यात मदत केली. पण पुढं काय हे आम्हाला माहिती नाही, असं त्या म्हणाल्या.

"मला ईश्वराच्या दयेवर विश्वास आहे. माझ्याकडं कुठेही जाण्याचा मार्ग नाही. मी पूर्णपणे हरवून गेले आहे. मी स्वतःबरोबरच संघर्ष करत आहेत. माझं डोकं एवढं दुखत आहे की, वाटतं ते फुटून जाईल," असं सांगताना हयात बीबी यांचे डोळे भरून आले होते.

आंतरराष्ट्रीय समुदायानं अधिकाधिक मदत पुरवावी यासाठी त्यांना तयार करण्यासाठी काय केलं जात आहे, असं आम्ही तालिबान सरकारचे मुख्य प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहीद यांना विचारलं.

त्यावर ते म्हणाले की, "दान किंवा मदत पुरवणाऱ्या देशांच्या आर्थव्यवस्थेची स्थिती फारशी चांगली नसल्यानं मदत मिळणं कमी झालं आहे. त्यात कोव्हिड आणि युक्रेन युद्ध अशी दोन मोठी संकटंही आली. त्यामुळं आम्ही फार मदतीची अपेक्षा ठेवू शकत नाही. त्यांच्याशी बोलून आम्हाला मदत मिळणार नाही."

"आम्हाला स्वावलंबी बनावं लागेल. आमची अर्थव्यवस्था स्थिर झाली आहे. तसंच आम्ही खाणींचे करार करत आहोत. त्यातून हजारो नोकऱ्या निर्माण होतील. पण मी असंही म्हणत नाही की, मदतीमध्ये कपात करावी. कारण आमच्यासमोर अजूनही अनेक आव्हानं आहेत."

तालिबानची धोरणंदेखील अडचणीची ठरत आहेत, हे त्यांनी मान्य केलं का? कारण मदत करणाऱ्या देशांना कदाचित ज्यांनी महिलांवर कठोर निर्बंध लादलेले आहेत, अशा देशाला निधी द्यायचा नसेल ?

"मदतीचा वापर दबावासाठी केला जात असेल तर इस्लामिक अमिरातची स्वतःची काही मूल्ये आहेत आणि कोणत्याही प्रकारे आम्ही त्याचं संरक्षण करू. अफगाणिस्ताननं आमच्या मुल्यांचं रक्षण करण्यासाठी भूतकाळात मोठी बलिदानं दिली आहेत. त्यामुळं मदतीतील कपातही ते सहन करतील," असं मुजाहीद म्हणाले.

पण त्यांच्या बोलण्यानं अनेक अफगाणींना फारसं बरं वाटत नसणार. देशातील दोन तृतीयांश लोकांना तर हेही माहिती नाही की, त्यांचं पुढचं भोजनं कुठून येणार आहे.

काबूलच्या एका रस्त्याच्या जवळ एका थंड, ओलसर घरात आम्ही एका महिलेला भेटलो. तालिबाननं त्यांना रस्त्यावर फळं, भाज्या आणि इतर वस्तूंची विक्री करण्यापासून रोखलं असं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, त्यांना एकदा ताब्यातही घेण्यात आलं होतं. पतीचं युद्धात निधन झालं आणि त्यांना चार मुलांचं पालन-पोषण करायचं होतं. त्यांनी नाव सांगितलं नाही.

स्वतःच्या स्थितीबाबत बोलताना त्या काही मिनिटं सारख्या रडत होत्या.

"त्यांनी कमीत-कमी आम्हाला काम करण्याची आणि प्रामाणिकपणे उदरनिर्वाह करण्याची परवानगी द्यावी. आम्ही वाईट काम करण्यासाठी बाहेर जात नाही, हे आम्ही ईश्वराची शपथ खाऊन सांगतो. आम्ही फक्त मुलांसाठी अन्न मिळवण्यासाठी जातो आणि ते आम्हाला त्रास देतात," असं त्यांनी सांगितलं.

त्यांना नाईलाजानं 12 वर्षांच्या मुलाला कामावर पाठवावं लागलं.

"मी एका तालिबानी भावाला विचारलं की, मी कमावल नाही तर मुलांना काय खाऊ घालू? ते म्हणाले विष दे पण घराबाहेर जाऊ नको. तालिबान सरकारनं मला दोन वेळा पैसे दिले, पण ते पुरेसे नव्हते," असंही त्या म्हणाल्या.

तालिबानच्या ताब्यापूर्वी सार्वजनिक खर्चाचा तीन चतुर्थांश भाग आधीच्या सरकारला जे थेट विदेशी धन मिळालं त्यातून येत होता. ऑगस्ट 2021 मध्ये ती मदत थांबवल्यापासून अर्थव्यवस्था अडचणीत आलीय.

मदत संस्थांनी एक तातपुरती पण महत्त्वाची मध्यस्थी करण्यासाठी पुढं पाऊल टाकलं

पण त्या निधीचा बहुतांश भाग आता संपला आहे.

परिस्थितीचं गांभीर्य अतिशयोक्ती करून सांगणं कठिण आहे. गेल्यावर्षी आम्ही वारंवार ते पाहिलं आहे.

लाखो लोक शिळी वाळलेली पोळी आणि पाणी यावर जगत आहेत. काही लोक हिवाळ्यापर्यंत टिकू शकणार नाहीत.

(या वृत्तांकनासाठी इमोजेन अँडरसन यांनी सहकार्य केलं, तर आमीर पीरझादा यांनी फोटो काढले.)

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)