बुरख्याआडून गाणी गात तालिबानला आव्हान देतायत या बहिणी, वाचा लढवय्या स्वरांची कहाणी

    • Author, कावून खामूश
    • Role, बीबीसी 100 वुमन

ऑगस्ट 2021 मध्ये संपूर्ण जग अफगाणिस्तानात तालिबानचं सत्तेत पुनरागमन झालेलं पाहत होतं.

अफगाणिस्तानातील लाखो महिलांना नवं सरकार त्यांच्यावरचा फास आवळत असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. या लाखो महिलांमध्ये काबूलमधल्या दोन बहिणींचा समावेशही होता.

पण महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा येत असताना शांतपणे उभं राहून पाहत राहणं त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी सर्वांच्या नकळत विरोधासाठी त्यांच्या गाण्याचा वापर करायला सुरुवात केली.

संगीतकारांना अटक केली जाण्याची शक्यता असलेल्या देशात हे सर्व करत त्यांनी मोठा धोका पत्करला होता. तरीही या बहिणींनी सोशल मीडियावर 'द लास्ट टॉर्च' नावानं गाण्याच्या माध्यमातून चळवळ सुरू केली.

"आम्ही हे गाणं गात आहोत, पण त्यामुळे आमच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो," असं एका व्हीडिओमध्ये गाणं सुरू करण्याआधी या बहिणींपैकी एकीनं म्हटलं.

हे गाणं तालिबाननं ताबा घेतल्यानंतर काही दिवसांतच म्हणजे ऑगस्ट 2021 मध्ये रिलीज झालं होतं. त्यानंतर फेसबूक आणि व्हाट्सअपवर ते गाणं वेगानं व्हायरल झालं.

गायनाची काहीही पार्श्वभूमी नसताना ओळख लपवण्यासाठी बुरखा परिधान करणाऱ्या या बहिणी संगीत क्षेत्रातला चर्चेचा विषय बनल्या आहेत.

"आमचा लढा तालिबानच्या विरोधात आणि तोही तालिबानच्या झेंड्याच्या खालीच सुरू आहे," असं दोन्ही बहिणीमधली धाकटी शाकायेक (बदललेलं नाव) हिनं सांगितलं.

"तालिबान सत्तेत येण्यापूर्वी आम्ही एकही कविता लिहिलेली नव्हती. पण तालिबानमुळं हे घडलं."

सत्तेत परतल्यानंतर तालिबानला अफगाणिस्तानसाठीच्या त्यांच्या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी 20 दिवसांपेक्षाही कमी कालावधी लागला.

त्यामध्ये दैनंदिन जीवनात शरिया (मुस्लिम धार्मिक कायदा) लागू करून महिलांच्या शिक्षणावर निर्बंध लादणं हे त्यांच्या प्राधान्यक्रमात अग्रस्थानी होतं. या विरोधात महिला काबूलच्या आणि इतर शहरांच्या रस्त्यांवर उतरल्या पण त्यांना कठोर कारवाईचा सामना करावा लागला.

"महिला याच आम्हाला दिसणारा आशेचा अखेरचा किरण होता," असं शाकायेक म्हणाल्या.

"त्यामुळेच आम्ही स्वतःला 'द लास्ट टॉर्च' असं म्हणायचं ठरवलं. आम्हाला कुठंही बाहेर जाता येणार नाही, या विचारानं आम्ही गोपनीय पद्धतीनं विरोध करण्याचा निर्णय आम्ही घेतला."

या दोघींनी लवकरच त्यांचं दुसरं गाणंही रिलीज केलं. पहिल्या गाण्याप्रमाणंच त्यांनी निळ्या बुरख्याच्या अडून हे दुसरं गाणंही सादर केलं.

यापैकी एक नादिया अंजुमन यांची एक प्रसिद्ध कविता होती. त्यांनी 1996 मध्ये तालिबाननं पहिल्यांदा ताबा मिळवण्याच्या आधी विरोध करण्यासाठी लिहिलं होतं.

तालिबाननं महिलांच्या शिक्षणावर निर्बंध लादल्यानं नादिया अंजुमन आणि त्यांच्या मैत्रिणी एका तळघरातील शाळेत भेटायच्या. त्याठिकाणी त्या शिवणकाम करत असल्याचं दाखवायच्या. पण प्रत्यक्षात त्या तिथं पुस्तकं वाचायच्या. त्यादेखील निळा बुरखाच परिधान केलेल्या असायच्या. अफगाणिस्तानात त्याला चादरी म्हटलं जातं.

या दोघींपैकी मोठी बहीण मशाल (बदललेलं नाव) यांनी बुरक्याची तुलना चालत्या-फिरत्या पिंजऱ्याबरोबर केली.

"हजारो महिला आणि मुलींची स्वप्न पुरली गेलेलं ते एकप्रकारचं कब्रस्तान आहे," असं त्या म्हणाल्या.

"हा बुरखा म्हणजे तालिबाननं 25 वर्षांपूर्वी महिलांवर फेकून मारलेला दगड आहे. ते सत्तेत परतले तेव्हा त्यांनी पुन्हा तेच केलं, असंही शाकायेक म्हणाल्या.

"त्यांच्या निर्बंधांच्या विरोधात लढा देण्यासाठी ते जी शस्त्रं आमच्या विरोधात वापरतात तीच आम्हाला त्यांच्या विरोधात वापरायची इच्छा आहे."

या दोन बहिणींनी आतापर्यंत फक्त सात गाणी रिलीज केली आहेत. पण प्रत्येक गाण्याला देशातील महिलांची मोठी पसंती मिळाली आहे. सुरुवातीला त्यांनी इतर कवींनी लिहिलेल्या गाण्यांचा वापर केला. पण त्या एका अशा स्थानावर पोहोचल्या जेव्हा त्यांना इतरांच्या गाण्यांमधून त्यांच्या नेमक्या भावना मांडता येत नव्हत्या. त्यानंतर त्यांनी त्यांनी स्वतःची गाणी लिहायला सुरुवात केली, असं शाकायेक म्हणाल्या.

महिलांच्या दैनंदिन जीवनावर लादलेले श्वास गुदमरून टाकणारे निर्बंध, चळवळीतील आंदोलन कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबणे आणि मानवाधिकारांचं उल्लंघन यावर त्यांची गाणी आधारित आहेत.

फॅन्स स्वतः सादरीकरण करून सोशल मीडियावर त्यांच्या गाण्यांना प्रतिसाद देतात. काही बाबतींत ते बुरका परिधान करूनही प्रतिक्रिया देतात. तर अफगाणिस्तानातील बाहेरच्या देशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटानं शाळेच्या ऑडिटोरियममध्ये सादरीकरण करून प्रतिसाद दिला.

तालिबानला जे हवं त्या अगदी उलट हे सर्व होतं.

सत्ता हाती आल्यानंतर त्यांनी केलेलं पहिलं काम म्हणजे, त्यांनी महिला मंत्रालयाच्या जागी सदाचाराचा प्रचार आणि दुराचारावर निर्बंधासाठीचं मंत्रालय तयार करण्याचं काम केलं. नवीन मंत्रालयानं बुरखा परिधान कण्याची सक्ती तर केलीच, पण त्याचबरोबर संगीत इस्लामची मूळं नष्ट करत असल्याचं म्हणत त्यांनी त्याचा निषेधही केला.

"गाणं आणि संगीत ऐकणं अत्यंत हानिकारक असतं. त्यामुळं लोक देवाच्या प्रार्थनेपासून दूर जातात. सर्वांनी त्यापासून दूर राहायला हवं," असं स्वाबगुल या अधिकाऱ्यानं मंत्रालयाच्या एका प्रोपगंडा व्हिडिओमध्ये म्हटलं.

त्यानंतर काही काळातच तालिबानचे सैनिक वाद्यं जाळताना आणि अटक केलेल्या संगीतकारांची परेड करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले होते.

शाकायेक म्हणाल्या की, तालिबान त्यांना शोधेल या भीतीनं त्यांची अनेक रात्रींची झोप उडाली आहे.

"आम्ही एकदा तुम्हाला शोधलं की, तुमच्या घशातून जीभ कशी बाहेर काढायची ते आम्हाला माहिती आहे, अशी त्यांची धमकी आम्ही सोशल मीडियावर पाहिली," असं मशाल म्हणाल्या.

"आमचे आई वडील या कमेंट्स वाचतात तेव्हा ते प्रचंड घाबरतात. आता पुरे झालं आहे आपण थांबलं पाहिजे, असं ते म्हणतात. पण आम्ही त्यांना अशाप्रकारे थांबू शकत नाही असं सांगतो. आम्ही अशाचप्रकारे जगत राहू शकत नाही."

सुरक्षेच्या मुद्द्यावरून या दोघींनी गेल्यावर्षी देश सोडला. पण त्यांना लवकरच परत देशात येण्याची आशा आहे.

अफगाणिस्तानातील प्रसिद्ध रॅपर सोनिता अलिझादा कॅनडात राहतात. त्यांनीही द लास्ट टॉर्चच्या व्हिडिओंचं कौतुक केलं आहे.

"मी जेव्हा दोन तरुणी बुरखा परिधान करून गात असल्याचं पाहिलं तेव्हा खरं म्हणजे मला रडू आलं," असं त्या म्हणाल्या.

तालिबाननं पहिल्यांदा सत्ता मिळवली तेव्हा म्हणजे 1996 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्या लहान असतानाच त्यांचं कुटुंब इराणला गेलं होतं. त्याठिकाणी त्यांच्या आईनं त्यांना बळजबरी विवाह करण्यासाठी विकण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी संगीताच्या माध्यमातून मार्ग शोधला. द लास्ट टॉर्चच्या दोन बहिणींप्रमाणेच आंदोलन करणाऱ्या महिला आशेचा किरण असल्याचं त्या म्हणतात.

या दोघींच्या एका गाण्यात थेट आंदोलकांचा उल्लेख करण्यात आला आहे.

"आपण अनेक दशकांत केलेली प्रगती गमावली आहे, त्यामुळं सध्या अफगाणिस्तानात प्रचंड निराशाजनक परिस्थिती आहे. पण या अंधारातही आशेचा किरण आहे. लोक त्यांच्या पद्धतीनं वैयक्तिक लढा देत असल्याचं आम्हाला दिसत आहे," असं सोनिता म्हणाल्या.

बीबीसीनं अफगाणिस्तानातील प्रसिद्ध गायिकांपैकी एक असलेल्या फरिदा महवाश यांनाही या बहिणींच्या गाण्याचा एक व्हिडिओ दाखवला. फरिदा यांनी नुकतीच निवृत्ती घेतली असून, त्यांची कारकिर्द सुमारे 50 वर्षांची आहे.

"या दोघींचे चार होतील आणि नंतर 10 आणि 1000 होतील. ज्या दिवशी त्या दोघी स्टेजवर जातील, मीही त्यांच्याबरोबर जाईल. अगदी काठी टेकत जावं लागलं तरी चालेल," असं त्यांनी म्हटलं.

काबूलमध्ये आंदोलनांवरील कारवाईला गेल्या वर्षात आणखी वेग आला आहे. अधिकाऱ्यांनी महिलांना रॅली घेण्यास निर्बंध लावले आहेत. तसंच त्याचं उल्लंघन करणाऱ्यांना अटक केली जात आहेत.

या गायिका बहिणींनी नवं गाणं महिला कार्यकर्त्यांवर सादर केलं आहे. तालिबाननं अटक करून अत्याचार केल्याचं वर्णन त्यात आहे.

"या कविता म्हणजे आमच्या वेदनांचा अगदी लहानसा भाग आहे," असं शाकायेक म्हणतात.

"अफगाणिस्तानच्या लोकांचा संघर्ष आणि वेदना तसंच त्यांनी गेल्या काही वर्षांत जे काही सहन केलं आहे, ते कोणत्याही कवितेच्या ओळींतून मांडता येणार नाही."

तालिबाननं सध्याची धोरणं कायम ठेवली तर त्यांना लैंगिक आधारावर भेदभावासाठी जबाबदार ठरवलं जाऊ शकतं. त्यावर तालिबाननं असं उत्तर दिलं आहे की, ते शरिया लागू करत असून देशांतर्गत मुद्द्यांमध्ये ते कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही.

शाकायेक आणि मशाल सध्या त्यांच्या नव्या गाण्यावर काम करत आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अफगाणिस्तानच्या महिलांचा आवाज आणखी बुलंद होईल अशी त्यांना आशा आहे.

"आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. आम्ही थकणार नाही. ही तर संघर्षाची फक्त सुरुवात आहे. "

(दोन्ही बहिणींची नावं त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बदलण्यात आली आहेत.)