इंदूरमध्ये साडेचार लाख मराठी माणसं, तरी एकही पक्षानं मराठी माणसाला उमेदवारी का दिली नाही?

इंदूर
    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

“आता या गोष्टीची चर्चा करायाला उशीर झाला आहे. थोडी आधी केली असती तर काहीतरी फायदा झाला असता, एका मराठी माणसाला तिकीट मिळालं असतं,” इंदूरमधले भाजपचे कार्यकर्ते जयंत भिसे यांचं हे वक्तव्य आहे.

मध्य प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला त्यांचे निकाल लागणार आहेत. इंदूर शहराची लोकसंख्या 40 लाखांच्या पुढे आहे. एका अंदाजानुसार त्यापैकी साडेचार लाख मराठी माणसं आहेत. काही संस्थांच्या मते हा आकडा आठ लाखांच्या पुढे आहे.

मध्य प्रदेशातल्या इंदूर, ग्वाल्हेर, देवास, धार याठिकाणी मराठी संस्थानं होती. परिणामी या भागात मोठ्या प्रमाणावर मराठी लोकवस्ती आहे. शिवाय नंतरच्या काळात कामानिमित्तदेखील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून इथं मराठी माणसांचं स्थलांतर झालं. आणि म्हणूनच इंदूर मध्य प्रदेशातल्या मराठी माणसांच्या लोकवस्तीचं सर्वांत मोठं केंद्र आहे.

इथल्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रावर मराठी माणसांचा मोठा प्रभाव आहे. शहरातल्या नेहरू स्टेडिअम या सर्वांत महत्त्वाच्या भागात असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा त्याचीच साक्ष देतो. शहरात फेरफटका मारताना सहज मराठी माणसं भेटतात. वेगवेगळे उद्योगधंदे, नोकरी आणि व्यवसायात इथला मराठी माणूस स्थिरावला आहे.

2019 पर्यंत इंदूरमध्ये सुमित्रा महाजन यांच्या रुपानं मराठी नेतृत्व होतं. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं त्यांना तिकीट नाकारल्यानंतर तिथून अमराठी खासदार निवडून गेला. तेव्हापासून इंदूरमध्ये ना मराठी खासदार आहे ना आमदार.

इंदूर

पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत इंदूरमधल्या 5 पैकी एका मतदारसंघात एकातरी मराठी माणसाला तिकीट मिळेल अशी आशा होती. पण ती काही पूर्ण झाली नाही. खरंतर इंदूरमधल्या 3 विधानसभा क्षेत्रांमध्ये मराठी मतं निर्णायक आहेत. इंदूरमधला मराठी भषिक मतदार भाजपची पारंपरिक व्होटबँक म्हणून ओळखला जातो. इथल्या अनेक मराठी भाषकांचा कल उजव्या विचारसरणीकडे दिसतो.

अनेकजण आरएसएस आणि त्यांच्या संलग्न संस्थांशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे अनेक इच्छुकांना भाजपकडून तिकीटाची अपेक्षा होती. पण, भाजप नेतृत्वाने त्याकडे फारसं लक्ष दिलं नसल्याचं दिसून येतं.

त्यातल्या काही इच्छुकांना नंतर काँग्रेसनं विचारणा केली खरी पण, त्यांनी साफ नकार दिला. गौरव रणदिवे सध्या इंदूरचे भाजपचे अध्यक्ष आहेत. आतापर्यंत इंदूरच्या भाजपच्या अध्यक्षांना विधानसभेचं तिकीट मिळत होतं हा इतिहास आहे, पण यंदा प्रथमच गौरव रणदिवे यांचाही तिकीटासाठी विचार करण्यात आला नाही.

जयंत भिसे
फोटो कॅप्शन, जयंत भिसे

म्हणूनच भाजपचे कार्यकर्ते असलेले जयंत भिसे याला उशीर झाल्याचं म्हणतायत. ते म्हणतात, “आज आपण जेव्हा चर्चा करतोय तेव्हा निवडणुका सुरू झाल्या आहेत. सर्वांचे फॉर्म भरले गेले आहेत. जेव्हा या तिकिटांवर विचार सुरू होता, जेव्हा राजकीय पक्ष तिकिटं वाटप करत होते तेव्हा जर का माध्यमांनी हे दाखवलं असतं तर जो कुणी तिकीट मागतोय त्याला मदत मिळाली असती. आज या गोष्टीची चर्चा फक्त दुफळी माजवण्याच्या पलिकडे काही नाही करणार. त्यामुळे आता हा विषय निरर्थक आहे.”

यावेळी भिसे आवर्जून गौरव रणदिवे यांचा उल्लेख करतात. ते म्हणतात, “अनेक मराठी मंडळी चांगलं काम करत आहेत. सध्याचे भाजपचे इंदूरचे अध्यक्ष गौरव रणदिवे यांना तिकीट मिळालं असतं तर ते निव़डून आले असते.”

जयंत भिसे राजकारणात सक्रिय असले तरी त्यापेक्षा त्यांची ओळख इथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात जास्त आहे. ते सानंद न्यास नावाची संस्था चालवतात. जिचे 4000 सक्रिय सदस्य आहे. मराठी रंगभूमीवरील गाजलेली नाटकं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ही संस्था संपूर्ण इंदूरमध्ये प्रसिद्ध आहे.

इंदूर

त्यांच्यासारखी अनेक मराठी मंडळी सध्या इंदूरमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. असं असताना मराठी माणसाला तिकीट न मिळण्याची अनेक कारणं असू शकतात. पण एक महत्त्वाचं कारण म्हणजे दुसऱ्या फळीतलं नेतृत्व तयार न होणं किंवा त्याला म्हणावी तशी उभारी न मिळणं हे आहे.

सक्षम मराठी नेतृत्वाचा अभाव की आपआपसातील वैमनस्य?

मग प्रश्न उभा राहतो की सुमित्रा महाजन त्यांच्या कार्यकाळात दुसऱ्या फळीचं सक्षम नेतृत्व उभं करण्यात कमी पडल्या का? हाच प्रश्न आम्ही शेखर किबे यांना विचारला.

शेअर किबे 2003 ते 2008 दरम्यान इंदूरमध्ये भाजपचे नगरसेवक होते. इंदूरमधल्या प्रसिद्ध रामबाग परिसरात राहतात. हा इंदूरमधला मराठीबहुल भाग म्हणून ओळखला जातो. दुपारच्या वक्ताला मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा ते त्यांच्या आंगणात काही कार्यकर्त्यांशी चर्चा करत होते.

ते सांगतात, “2019 पर्यंत इथं सुमित्रा महाजान खासदार होत्या. त्यामुळे मराठी लोकांचा इथल्या राजकारणात मोठा दबदबा होता. पण, दुर्दैवाने इथं ताईंच्या नेतृत्वात कुणी मराठी आमदार निवडला गेला नाही. पण नगरसेवक मात्र निवडले गेले. पुढचं नेतृत्व तयार करण्यात ताई कमी पडल्या हे आपण म्हणू शकतो. हे स्वीकारायला हरकत नाही. त्यांनी मराठी नेतृत्व पुढे येण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे होता तो केला असता तर ठीक झालं असतं.”

अर्चना चितळे
फोटो कॅप्शन, अर्चना चितळे

पण इथल्या मराठी समाजातली आपआपसातील स्पर्धा हेसुद्धा त्याच्यामागचं एक कारण असल्याचं समोर येत आहे. अर्चना चितळे भाजपच्या नगरसेविका होत्या. सध्या त्या पक्षासाठी प्रचार करत आहेत. येत्या निवडणुका लढवण्यासाठी त्या इच्छूक होत्या. पण पक्षानं त्यांचाही विचार केला नाही.

आता परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नसल्याचं त्या सांगतात. मराठी माणूस इथल्या राजकारणात पुढे न जाण्यासाठी आपआसपातलं वैमनस्य कारणीभूत असल्याचं त्यांना वाटतं.

व्हीडिओ कॅप्शन, जवळपास साडेचार लाख मराठी मतदार, तरी एकही मराठी उमेदवार का नाही?

पण त्याचवेळी मराठी मतदारांना पक्ष गृहीत धरत असल्याची खंतही त्या व्यक्त करतात. “इथं मराठी मतदार खूप आहेत, पण त्यांना गृहीत धरलं जातं. मराठी माणसाची इथली न्यूसेन्स व्हॅल्यूसुद्धा फार कमी आहे. दुसऱ्या कम्युनिटीमध्ये प्रत्येकजण एकमेकांना मदत करतात, आपल्याकडे स्पर्धेची भावना जास्त आहे. इथला मराठी माणूस एकमेकांना बरोबर घेऊन चालत नाही,” असं त्या सांगतात.

अर्चना चितळे यांचं घर नारायणबाग या दुसऱ्या मराठी बहुल भागात आहे. हा संपूर्ण भाग इंदूर-3 मतदारसंघात येतं. इथं मराठी मतदारांचा बोलबाला आहे.

तरीही भाजपानं तिथून यंदा गोलू शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. आमच्याशी चर्चा सुरू असताना अर्चानाताईंची लगलब सुरू होती. पक्षानं त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी दिली आहे. त्यासाठीच बाहेर पडण्याची त्यांची तयारी सुरू होती.

मराठी एकजूट कुठे हरवली?

मग ही एकजूट नेमकी कुठे हरवली आहे? ती जातींमध्ये विभागली गेली आहे का? तर त्याचं उत्तर होसुद्धा आहे आणि नाही सुद्धा. हे असं का तेही समजून घेऊया.

इंदूरमधलेच सुनील गणेश मतकर इतिहास अभ्यासक आणि नाटककार आहेत. इंदूरच्या पश्चिमेला असलेल्या सुदामानगर भागात ते राहतात. हादेखील इंदुरमधला मराठीबहुल भाग आहे.

चंद्रकांत पराडकर यांच्या घरी माझी आणि त्यांची भेट झाली.

बीबीसीशी बोलताना ते सांगतात की “लोक जातीच्या पातळीवर विखुरलेले आहेत. वेगवेगळ्या जातींच्या वेगवेगळ्या संस्था इथं आहेत. पण, ज्या ज्या वेळी एकत्र येण्याचं आवाहन केलं जातं तेव्हा मात्र सर्व एकत्र येतात.” त्यासाठी ते सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची उदाहरणं देतात.

सुनील गणेश मतकर
फोटो कॅप्शन, सुनील गणेश मतकर

पण इंदूरमधली मराठी माणसं राजकारणात मागे पडण्याची हीच काही कारणं नाहीत. त्याला राजकारणाचा बदलता पोतसुद्धा कारणीभूत आहे. रामबागेतले माजी नगरसेवक शेखर किबे नेमकं त्यावरच बोट ठेवतात.

“मराठी माणूस इथल्या राजकारणात मागे पडल्याचं एक कारण बदलतं राजकारण देखील आहे. राजकारणात अर्थकारण आणि गुंडशाहीचा प्रभाव वाढला आहे. राजकारणात उतरल्यानंतर सर्व प्रकारच्या लोकांना जवळ बाळगावं लागतं, जे मराठी माणसाच्या स्वभावात नाही.”

मराठी माणूस हा मुळात नोकरी आणि धंद्यावर लक्ष केंद्रीत करण्यात जास्त धन्यता मानतो. इंदूरमधल्या मराठी माणसांमध्ये शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे. त्यामुळे चांगलं शिक्षण घेऊन नोकऱ्यांसाठी इतरत्र स्थलांतरीत होण्याकडे देखील लोकांचा सध्या कल वाढत आहे. इथली मराठी माणसांची घटती संख्या हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे.

किर्तिश धामारीकर

किर्तिश धामारीकर मध्यप्रदेश मराठी अकादमीचे सहसचिव आहेत. कामानिमित्त त्यांचा वेगवेगळ्या स्तरातल्या मराठी लोकांशी त्यांचा संपर्क येतो. ते त्यांचं निरिक्षण नोंदवताना सांगतात, “मराठी माणसाची शिक्षणाकडे जास्त ओढ आहे. आधी होतं हम दो हमारे दो आता काय झालंय की हम दो हमारा एक. त्यात शिक्षण-नोकरीसाठी मुलं मुंबई-पुणे किंवा देशाच्या बाहेर जात आहेत. त्यात त्यांच्या परतीची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे मराठी माणसाची संख्या कमी होत आहे. आधी इंदूरमध्ये सात-आठ मराठी नगरसेवक असायचे आता मात्र ही संख्या 2-3 वर आली आहे.”

किर्तीश आता इंदूर पूर्वमध्ये बिचौली मर्दाना भागात राहतात. आधी ते मराठीबहुल भागात राहत होते. आता मात्र ते इंदूर शहराच्या थोड्या बाहेरच्या भागात राहतात.

एक मुलगा आणि पतीपत्नी एवढंच त्याचं कटुंब. त्यांचा मुलगादेखील शिक्षणासाठी पुण्यात असते. तोही पुढे नोकरीसाठी इंदूरच्या बाहेर जाऊ शकतो याची किर्तिश यांना कल्पना आहे.

इंदूरवर आतापर्यंत मराठी माणसांचंच वर्चस्व

इतिहास अभ्यासक गणेश मतकर यांना मात्र इंदूरमधला मराठी माणूस इथल्या नेतृत्त्वात मागे पडल्याचं वाटत नाही. ते सांगतात, “इथं 1728 मध्ये होळकरांचं राज्य स्थापन झालं. तेव्हापासून इथलं नेतृत्व मराठी माणसांच्याच हातात आहे. अगदी अलीकडे सुमित्रा महाजनांपर्यंत. वर्षानुवर्ष इथलं नेतृत्व मराठी माणूसच करत आला आहे.”

त्यांच्यामते फक्त गेल्या 5 वर्षांमध्ये ही स्थिती निर्माण झाली आहे.

इतिहासात डोकवून पाहिलं तर कृष्णमुरारी मोघे, नानासाहेब किबे, राजेंद्र धारकर, वासुदेवराव लोखंडे, डॉ. केळकर, कुशाभाऊ ठाकरे ते सुमित्र महाजन यांसारख्या मराठी नेत्यांनी इंदूरचं नेतृत्व केलं आहे.

प्रकाश हिंदुस्तानी
फोटो कॅप्शन, प्रकाश हिंदुस्तानी

मराठी माणसं इथं राजकारणाच्या केंद्रस्थानी असल्याचं कारण मराठी माणसाच्या स्वभावात असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश हिंदुस्तानी मांडतात. बीबीसीशी बोलताना ते सांगतात, “इथं मराठी भाषकांना कुणी वेगळं मानतच नाही. ते इथल्या संस्कृतीमध्ये चांगलेच मिसळून गेले आहेत. सुमित्रा महाजन यांना त्या मराठी आहेत म्हणून तिकीट नव्हत मिळतं. हे इंदूरचं एक वैशिष्ट्य आहे की इथं मराठी भाषिक लोक हिंदी भाषिकांमध्ये एवढे मिसळून गेले आहेत की त्यांच्यात कुठलंच अंतर नाही.”

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)