ज्योतिरादित्य सिंधिया यंदा मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आली तर मुख्यमंत्री होतील का?

ज्योतिरादित्य सिंधिया

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मध्य प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबरला त्याचे निकाल लागणार आहेत.

काँग्रेसची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होईल हे जवळपास निश्चित आहे. पण यंदा भाजपानं मात्र त्यांचा मुख्यमंत्रि‍पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

त्यामुळे जर का भाजपची पुन्हा सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यात एक नाव आहे ज्योतिरादित्य सिंधिया.

मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया हे नाव घेतलं की लोक लगेचच चर्चा करायला लागतात ती ‘शिवराज भाजपा, महाराज भाजपा आणि नाराज भाजपा’ या समि‍करणाची. त्यांचं सांगण्याचं तात्पर्य हे असतं की मध्य प्रदेशातली भाजपा सध्या तीन भागांमध्य्ये वाटली गेली आहे.

पहिली शिवराज भाजपा म्हणजे ते भाजप कार्यकर्ते आणि नेते जे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याबरोबर आहेत.

दुसरी महाराज भाजपा म्हणजे ते भाजप कार्यकर्ते आणि नेते जे आधी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये होते आणि आता ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबरोबर भाजपामध्ये गेले आहेत.

ज्योतिरादित्य यांना मध्य प्रदेशात महाराज म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच त्यांच्यावर टीका करण्यासाठी भाजपानं 2018 मध्ये ‘माफ करो महाराज हमारा नेता शिवराज’ हे घोष वाक्य आणलं होतं. अर्थात भाजपा तेव्हा ‘माफ करो महाराज’ असं का म्हणाली होती ते आपण पुढे पाहुयाच.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तिसरी नाराज भाजपा म्हणजे भाजपाचे असे सगळे जुने कार्यकर्ते जे शिवराजसिंह चौहान यांच्यावर आधीपासून नाराज आहेत. त्यात ज्योतिरादित्य सिंधियांच्या एन्ट्रीमुळे ते आणखी नाराज झालेत. हे कार्यकर्ते सध्या त्यांना डावललं जात असल्याच्या मनस्थितीत आहेत.

या विभागणीमुळे मध्य प्रदेशात भाजपची ताकद कमी झाल्याचं काही राजकीय विश्लेषकांना वाटतंय. भाजप मध्यप्रदेशात सत्तेत आली नाही तर हे कारण सर्वांत मोठं असेल असंही काहींना वाटतंय. जर ही स्थिती नसती तर ऍन्टी इंकबन्सी असूनसुद्धा भाजपा यंदा सत्तेत येण्याची शक्यता जास्त होती, असंही बोललं जातंय.

पण ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपात आल्यानंतर फक्त ही एकमेव स्थिती फेस करावी लागतेय असं नाही. तर त्यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ग्वाल्हेर, चंबळ आणि आचल क्षेत्रात त्यांचा प्रभाव कमी होताना दिसत आहे.

गुना हा ज्योतिरादित्य यांचा पांरपारिक मतदारसंघ. तिथून ते सतत लोकसभेवर निवडून जात राहिले आहेत. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत के पी यादव या त्यांच्याच जुन्या कार्यकर्त्यानं भाजपात जाऊन त्यांचा पराभव केला.

मध्य प्रदेशातल्या सध्याच्या शिवराजसिंह सरकारविरोधात असलेली नाराजी आता ज्योतिरादित्य यांच्याविरोधातसुद्धा जाताना दिसत आहे. गुनामध्ये राहाणारे सामान्य लोक ज्योतिरादित्य यांच्या मागे नसल्याचं चित्र आहे. ज्योतिरादित्य यांना पुन्हा मतदान करणार का असा सवाल केल्यावर ते हो किंवा नाही असं कुठलंही उत्तर देणं ते टाळतात.

मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर, चंबळ आणि आचल क्षेत्रात 34 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी फक्त 10 जागांवरच आपल्या समर्थकांना तिकीट मिळवून देण्यात ज्योतिरादित्य यांना यश आलं आहे.

राकेश आचल
फोटो कॅप्शन, राकेश आचल

काँग्रेसमध्ये असताना या भागातले लोक तिकिटासाठी ज्योतिरादित्य यांच्याकडे रांग लावायचे. पण, आता भाजपामध्ये मात्र त्यांची तशी स्थिती नाही.

भाजपमध्ये या भागात नरेंद्रसिंह तोमर यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. त्यामुळे सिंधियांची पहिली राजकीय लढाई ही तोमर यांच्याशी आहे, असं स्थानिक पत्रकारांना वाटतं.

ज्योतिरादित्य सिंधिया भाजपामध्ये गेल्यानं सिंधियांना फायदा झाला, पण भाजपाला मात्र त्याचं नुकसानच होत असल्याचं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राकेश आचल व्यक्त करतात.

ते सांगतात, “यातून भाजपाचं नुकसानच झालं आहे. त्यांच्या संघटनात्मक ढाचामध्ये समस्या निर्माण झाली आहे. भाजपा केडरबेस पार्टी आहे. त्यांच्या या केडरमध्ये अजूनही ज्योतिरादित्य सिंधियांना म्हणावं तसं स्वीकारलं जात नाहीये. तसं पाहिलं तर ज्योतिरादित्य यांच्या आजी विजयाराजे सिंधिया या भाजपाच्या संस्थापकांपैकी एक होत्या. पण त्याला एक मोठा कालावधी उलटून गेला आहे. गेल्या 50 वर्षांपासून सिंधियांचे समर्थक काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे एकमेकांशी जुळवून घेणं भाजपा आणि सिंधियांच्या कार्यकर्त्यांना कठीण जात आहे. परिणामी ग्वाल्हेर-चंबळच्या या भागात जिथं 34 विधानसभा मतदारसंघ आणि 8 जिल्हे आहेत तिथं भाजपच विखुरलेली दिसते.”

शरदकुमार साद
फोटो कॅप्शन, शरदकुमार साद

चंदेरी साड्यांसाठी प्रसिद्ध असलेलं चंदेरी शहर देखील याच भागात येतं. इथली नगरपालिका सध्या भाजपाच्या ताब्यात आहे. त्याआधी ती काँग्रेसच्या ताब्यात होती. पण, सिंधिया भाजपात गेल्यानंतर तिथले अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते त्यांच्याबरोबर भाजपात गेले.

शरदकुमार साद हे त्यांच्यापैकीच एक. गेले 5 वर्षं ते चंदेरीचे नगराध्यक्ष होते. ज्योतिरदित्य सिंधिया भाजपात गेल्यानंतर त्यांनी भाजपच तिकीट मिळवून निवडणूक लढवली. पण ते निवडणूक हारले. त्यांच्या जागी अपक्ष उमेदवार निवडून आला जो आता भाजपामध्ये आहे.

ते अजूनही भाजपामध्ये म्हणावे तसे मिक्स होऊन गेल्याचं दिसून येत नाही. त्यांच्या घरात गेल्या गेल्या दिसतो तो ज्योतिरादित्य सिंधियांचा फोटो. भाजपाच्या कुठल्याही नेत्यांचा फोटो त्यांच्या घरात दिसत नाही.

“महाराजच आमचे नेता आहेत. आम्ही त्यांच्या म्हणण्यांनुसारच चालतो,” असं त्यांनी मला सांगितलं.

मग तुम्ही भाजपात जाऊन खूष आहात का असा सवाल केल्यावर “तुम्ही दुसऱ्याच्या घरात गेल्यावर त्यांच्या म्हणण्यानुसारच वागाल ना,” असा प्रतिसावल मला करतात. आता आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आता त्यांच्यानुसार काम करत आहोत, असं पुढे ते सांगतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

पण भाजपाबाबत चर्चा करताना ते ‘आमचं-तुमचं’ करत राहतात. ते सहज कुणाच्याही लक्षात येण्यासारखं आहे.

महाराज आणि शिवराज भाजपामध्ये मध्यप्रदेशात उघडउघड दुफळी दिसत असली तरी भाजपात जाऊन ज्योतिरादित्य यांची ताकद वाढल्याचं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश हिंदुस्तानी यांना वाटतं.

त्यांच्यामते सिंधिया आता भाजपामध्ये आल्यावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या खूप जवळ गेले आहेत.

नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्वाल्हेरमध्ये सिंधियांच्या शाळेच्या कार्यक्रमाला आले होते. तेव्हा त्यांनी त्यांचा उल्लेख आमचे गुजरातचे जावई असा केला होता. तर अमित शहा आजकाल ज्या ज्यावेळी ग्वाल्हेरला येतात तेव्हा तेव्हा ते सिंधियांच्या घरी जातात. त्यांच्या घरी जेवतात.

मग प्रश्न उरतो तो वरिष्ठांची मर्जी राखून ज्योतिरादित्य मुख्यंमंत्रिपदाची खुर्ची गाठू शकतात का?

ज्योतिरादित्य सिंधिया मुख्यमंत्री होतील?

"एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ते म्हणजे भाजपामध्ये फेसव्हॅल्यूला फार महत्त्व आहे. सिंधिया घराण्याच्या पुण्याईमुळे भाजपाला संपूर्ण मध्य प्रदेशात सर्वांना अपिल होईल असा चेहरा मिळाला आहे. मध्य प्रदेशातल्या प्रत्येक भागात गर्दी खेचण्याची ताकद त्यांच्यात आहे. पण मुख्यमंत्रि‍पदापेक्षा केंद्रातल्या राजकारणात जम बसवण्याचा सिंधियांचा जास्त प्रयत्न आहे", असं निरिक्षण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राकेश आचल नोंदवतात.

“सिंधियांना मुख्यमंत्रि‍पदाचं वचन भाजपानं दिलं असेल तर त्यांना तेव्हाच मुख्यमंत्री केलं असतं तेव्हा ते काँग्रेससोडून भाजपात आले होते,” असं ते म्हणतात.

विजयाराजे सिंधिया

फोटो स्रोत, Getty Images

काँग्रेसमध्ये त्यांना मुख्यमंत्रिपद काही मिळालं नाही. आता राहता राहिला प्रश्न तो भाजपा त्यांना मुख्यमंत्री करेल का? तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल.

राजमाता विजयाराजे सिंधिया यांचा जनसंघ आणि भाजपाच्या स्थापनेमध्ये मोलाचा वाटा होता. त्यांनी पक्षाला पडत्या काळात मोठी साथ दिली होती. एवढंच नाही तर त्यांनी आरएसएस आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना देखील मोठी मदत केली आहे. त्यांना आर्थिक मदत देण्यापासून ते जागा उपलब्धकरून देण्यापर्यंत विजयाराजेंनी मदत केली आहे.

भाजपाला त्याची जाण आहे आणि वेळ पडली तर भाजपाचा सिंधिया कुटुंबियांकडे असलेला कल समोर येईल, असं राकेश आचल यांना वाटतं.

“सिंधिया कुटुंबीयांचे भाजपा आणि आरएसएसवर एवढे उपकार आहेत की त्यांच्यापुढे त्यांना वेळ पडली तर झुकावं लागतं. तुम्हाला आठवत असेल की 1998 मध्ये जेव्हा माधवराव सिंधिया काँग्रेसच्या बाहेर होते तेव्हा भाजपनं त्यांच्याविरोधात जाहीर केलेला उमेदवारवर मागे घेतला होता,” अशी आठवण आचल सांगतात.

ज्योतिरादित्य सिंधिया

फोटो स्रोत, X

ते पुढे सांगतात, “ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपात आणण्याचे प्रयत्न गेल्या 20 वर्षांपासून सुरू होते. जेव्हा माधवराव सिंधिया यांचं निधन झालं तेव्हापासून हे प्रयत्न सुरू होते. पण जेव्हा 2018 मध्ये जोतिरादित्यांसमोर पेच निर्माण झाला तेव्हा भाजपानं त्यांचे दरवाजे सिंधियांसाठी सताड उघडले.”

शिवराजसिंह यांच्यावर मात करणं किती शक्य?

भाजपचं केंद्रीय नेतृत्व सध्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर नाराज आहे हे उघड दिसतंय. शेवटच्या यादीपर्यंत भाजपनं त्यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केली नव्हती. शेवटच्या यादीत त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण त्यांना मुख्यमंत्रि‍पदाचा उमेदवार म्हणून यंदा जाहीर करण्यात आलेलं नाही.

म्हणूनच त्यांनी भरसभेत ‘ तुम्ही मला पुढचा मुख्यमंत्री पाहू इच्छिता का? तुम्ही मोदींना पुन्हा पंतप्रधान पाहू इच्छिता का?’ असे सवाल विचारून एक प्रकारे केंद्रीय नेतृत्वाला ब्लॅकमेल केल्याचं बोललं जातंय.

त्याचवेळी भाजपानं त्यांच्या सात खासदारांना मात्र आमदारकीचं तिकीट जाहीर केलं होतं. त्यापैकी 3 जण नरेंद्र सिंग तोमर, फग्गनसिंग कुलस्ते आणि प्रल्हादसिंह पटेल हे मंत्री आहेत.

यातले काही मंत्री आणि खासदार त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचारात मला मुख्यमंत्री होण्यासाठी आमदारकी लढवायला पाठवल्याचा दावा करत आहेत.

प्रचार

फोटो स्रोत, X

परिणामी शिवराज यांच्यासमोर भाजपाकडे किती पर्याय आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केंद्रीय नेतृत्वानं केल्याची चर्चा आहे.

शिवराजसिंह त्यांच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीआधी आतापर्यंत राज्यव्यापी यात्रा काढायचे. यंदा मात्र केंद्रीय नेतृत्वाने त्यांना ही यात्रा काढून दिली नाही.

अमित शहा यांना एका सभेनंतर तेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण असा सवाल केला तेव्हा ‘हे तर निवडून आलेले आमदार ठरवतात,’ असं उत्तर त्यांनी दिलं होतं.

म्हणजेच त्यांनी शिवराज यांचा पत्ता पुढच्यावेळी कट होऊ शकतो असे संकेत दिल्याचं बोललं जातंय.

शिवराज नाही तर मग कोण असा प्रश्न सध्या मध्य प्रदेशात लोकांना पडला आहे. भाजपाची सत्ता आली तर पुढचा मुख्यमंत्री दिल्लीतून पाठवला जाईल अशी चर्चा मध्य प्रदेशात जोरदार आहे.

त्यात आघाडीवर 2 नावं आहेत 1 नरेंद्रसिंह तोमर आणि दुसरं ज्योतिरादित्य सिंधिया.

पण नरेंद्र सिंह तोमर यांच्या मुलाचा पैशांच्या देवाणघेवाणीचा व्हीडिओ समोर आल्यानंतर ते अडचणीत आले आहेत. शिवाय त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसनं त्यांना तगडं आव्हान दिल्याचा स्थानिक पत्रकारांचा दावा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक कठीण होऊन बसली आहे.

अशात ज्योतिरादित्य सिंधियांची मोदी-शहांशी वाढलेली जवळीक त्यांना मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीच्याजवळ घेऊन जाईल अशी जोरदार चर्चा सध्या ग्वाल्हेर आणि चंबळ भागात आहे.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)