मध्य प्रदेश : यंदाची निवडणूकसुद्धा शिवराज चौहान विरुद्ध ज्योतिरादित्य शिंदेच होणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी न्यूज
- Reporting from, भोपाळ, मध्य प्रदेश
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या महिनाभरात दोनदा मध्यप्रदेशचा दौरा केला. मध्य प्रदेशात यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात भाजपचं केंद्रीय नेतृत्व व्यग्र आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव, नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे निवडणुकीची रणनीती ठरवण्याची जबाबदारी देण्यात आलीय.
केंद्रीय मंत्री होण्यापूर्वी नरेंद्र सिंह तोमर यांनी मध्यप्रदेशातील संघटनेचं नेतृत्व केलं असलं तरी, निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडे राज्याची जबाबदारी सोपवणं महत्त्वपूर्ण आहे.
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनाही स्टार प्रचारक बनवलं आहे, जे काँग्रेसविरोधात बंडकरून भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत.
यावेळी भाजपचं केंद्रीय नेतृत्व सर्व जबाबदारी प्रदेश संघटनेवर टाकू इच्छित नाही, असं राजकीय विश्लेषकांचं मतं आहे.
ग्वाल्हेरच्या मुक्कामा दरम्यान अमित शाह यांनी ग्वाल्हेर -चंबळ विभागाच्या जिल्हा अध्यक्षांची बैठक घेतली. ते म्हणाले की, " प्रत्येक जागेवर दहा दावेदार आहेत, तर कुणाला तरी एकालाच तिकीट मिळणार आहे."
भारतीय जनता पक्षानं 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानं संघटनेतील कलह चव्हाट्यावर आला आहे. ते म्हणाले की, "नवरदेव कसाही असो, त्याच्या चुका काढत बसू नका, फक्त पक्षासाठी काम करा."
चेहरा कोण - मोदी की शिवराज?
अमित शाह हे 'नवरदेव' म्हणजे विधानसभा जागांसाठीच्या उमेदवारांबद्दल बोलले पण राज्यात पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेलं, हे स्पष्ट केलं नाही. या प्रश्नाला बगल देत अमित शहा यांनी 'सस्पेन्स' आणखी वाढवला आहे.
ग्वाल्हेर येथील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत 'मध्यप्रदेशच्या मनात मोदी' ( ‘एमपी के मन में मोदी’) हा नारा देत सदस्यत्व मोहिमेला सुरुवात केली.
भोपाळमध्ये मध्यप्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं '20 वर्षांचं रिपोर्टकार्ड प्रसिद्ध केल्यानंतर काही तासांनी त्यांनी हे वक्तव्य केलं.

फोटो स्रोत, ANI
भोपाळमध्ये रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा प्रामाणिक, लोकप्रिय आणि मेहनती असा उल्लेख केला.
त्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारलं असता ते म्हणाले, "पक्षाचं काम तुम्ही का करता? , शिवराज हे मुख्यमंत्रीचं आहेत. पक्षाचं काम पक्षातर्फे केलं जाईल."
पक्षाचे नेते आणि राजकीय विश्लेषक आपापल्या परीनं त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ लावत आहेत.
अखेर अमित शहांच्या या विधानाचा अर्थ काय असू शकतो ?
या प्रश्नाच्या उत्तरात राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार एन. के. सिंह सांगतात, "अमित शाह यांनी मध्यप्रदेशातील 20 वर्षांचं रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केलंय. त्यानंतर शहा यांनी राज्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांचं विस्तृत वर्णन केलं.
"विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार हे विधीमंडळ पक्ष ठरवेल, असं ते म्हणाले असते तर तर्कवितर्क लढवले गेले नसते. पण त्यांचे उत्तर टाळाटाळ करणारं होतं, पण त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की, राज्यात पंतप्रधान मोदींचा चेहरा समोर ठेऊनच ही निवडणूक लढवली जाईल."
ग्वाल्हेरमध्ये जिल्हाध्यक्षांना संबोधित करताना त्यांनी म्हटलं की,"केवळ योजना तोंडी सांगून काही होणार नाही."
याचा अर्थ तज्ज्ञांच्या मते लवकरच पंतप्रधान आणि त्यांनी मध्यप्रदेशसाठी जाहीर केलेल्या योजना आणि कल्याणकारी धोरणांचे ' कट आउट ' राज्यभर दिसू लागतील.
'सत्ता विरोधी लाट' आणि 'अंतर्गत वादाला तोंड ' देण्याची ही पक्षाची 'रणनीती' असू शकते, असं मानणारा एक वर्गही आहे.
भाजपमधील अंतर्गत कलहात वाढ
दैनिक संध्या प्रकाशचे संपादक संजय सक्सेना म्हणतात की, राजकारणात असाल तर प्रत्येकजण आपल्या भविष्याचा विचार करतो आणि वरच्या पदावर जाण्याचा प्रयत्न करत असतो.
संजय सक्सेना सांगतात की, "राजकारणात कपट-युक्तिशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे संघटनेत अनेक गट असणं स्वाभाविक आहे. कैलास विजयवर्गीय यांच्यासोबत त्यांचे निष्ठावान समर्थक पक्षात आहेत आणि ते फक्त त्यांच्यासोबत आहेत. "
"तसंच प्रल्हाद पटेल आणि नरोत्तम मिश्रा यांचे समर्थक आहेत ज्यांना त्यांच्या नेत्याला वरच्या स्थानावर जाताना बघायचं आहे. पण आधीच अनेक गटांमध्ये विभागलेल्या भाजपमध्ये एक नवीन गट सामील झाल्यानं पक्षांतर्गत स्पर्धा वाढली आहे. आणि ते नवा गट आहे ग्वाल्हेरचे 'महाराज' म्हणजेच ज्योतिरादित्य शिंदे यांचा होय."

फोटो स्रोत, Getty Images
विशेष म्हणजे 2018 च्या विधानसभा निवडणुका 'शिवराज विरुद्ध महाराज' या घोषणेवर लढल्या गेल्या होत्या.
सक्सेना सांगतात की, "अर्थात शिंदे भाजपमध्ये सामील झाले असतील, पण ही निवडणूक आता भाजपमध्ये शिवराज विरुद्ध महाराज ज्योतिरादित्य अशी झाली आहे. सर्वच मोठे नेते आपल्या समर्थकांना तिकीट मिळावं यासाठी लॉबिंग करत आहेत."
ग्वाल्हेर -चंबळ विभागात शिंदे यांचा दबदबा आहे. काँग्रेसच्या काळापासून या भागात त्यांचं वर्चस्व राहिलं आहे.
भाजपमध्ये आल्यानंतर त्यांचे समर्थक आमदार यांना संघटनेत सहभागी करून घेतलं. त्यातील अनेक जण मंत्री झाले आणि अनेकांना महामंडळं, मंडळांमध्ये महत्त्वाची पद देण्यात आली.
सक्सेना म्हणतात " आता तिकीटं वाटावी लागणार आहेत. एक जागा आणि 100 दावेदार आहेत. पण या पक्षांतगर्त गटबाजीला आळा घालण्यासाठी शेवटच्या क्षणी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना जबादारी देण्यात आली आहे."

फोटो स्रोत, ANI
पण ग्वाल्हेरच्या प्रदेश कार्यकारीणीच्या बैठकीच्या वेळी पत्रकारांशी बोलताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, "जो व्यक्ती जिंकण्याची अधिक क्षमता आहे, त्यालाच भारतीय जनता पक्ष तिकीट देईल. भाजपमध्ये तिकीट वाटपात ना माझा आहे ना तुमचा."
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे.
विशेषतः जे त्यांच्यासोबत आपल्याला मतदारसंघात तिकीट मिळेल या अपेक्षेनं भारतीय जनता पक्षात आले होते. पण त्यांचा सामना जुन्या भाजपशी आहे, जी कित्येक दशकांपासून शिंदेंविरोधात निवडणुका जिंकत आली आहे.
भोपाळमध्ये अशाच एका निराश नेत्याची भेट बीबीसीशी झाली. ते तिकिटाचे दावेदार असून त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
ओळख न सांगण्याच्या अटीवर ते सांगतात, "आमची फसवणूक झाल्यासारखं वाटतं. जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं. ज्योतिरादित्य शिंदे मुख्यमंत्री होतील. म्हणून आम्ही काँग्रेस सोडली आणि त्यांच्यासोबत भाजपात आलो. आता तिकिटासाठी आम्ही प्रयत्न करतोय तर हे उत्तर मिळत आहे."
गेल्या एका महिन्यात असे पाच ज्योतिरादित्य शिंदे समर्थक नेते काँग्रेसमध्ये परतले. त्यात सर्वात मोठ नाव समंदर पटेल यांचं आहे, जे भाजपच्या कार्यकारिणीचे सदस्य होते.
काँग्रेसची गटबाजी, तर मग भाजप किती एकजूट
पंकज चतुर्वेदी हे ज्योतिरादित्य शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत आणि त्यांनी काँग्रेस सोडून आपल्या नेत्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या भाजपचे ते प्रदेश प्रवक्ते आहेत.
बीबीसीशी बोलताना ते सांगतात की, काँग्रेसमध्ये गटबाजीचं दिसून आली आहे, काँग्रेसमध्ये जो पर्यंत नेते होते, तो पर्यंत त्यांनी गटासोबत राहणं पसंत केलं.
ते म्हणतात, “1885 ते 2023 पर्यंत काँग्रेस मध्ये गटबाजी सुरूच होती. मात्र भाजपमध्ये आल्यानंतर कळलं की इथं गटबाजीला थारा नाही."
पंकज चतुर्वेदी म्हणतात की, काँग्रेस कशी चालते हे तेच लोक सांगू शकतील.
मात्र त्यांच्या पक्षानं बूथ स्तरावरील बरीच कामं केली असल्याचं ते भाजपबद्दल सांगत होते. राज्यभरात 64 हजार शंभर बूथ डिजिटल झाल्याचा दावा त्यांनी केला.
भोपाळमधले ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक राजेश जोशी यांच्या म्हणण्यानुसार, भाजपसमोर ज्योतिरादित्य शिंदे यांचं नाव पुढे करण्याबाबत अडचण आहे, कारण शिंदे यांचं नाव पुढे केलं तर जुन्या नेत्यांच्या नाराजीला समोर जावं लागेल.
एक लोकनेता म्हणून शिंदे यांचा प्रभाव ग्वाल्हेर आणि चंबळच्या पलीकडे गेला नाही, असं जोशी यांचं मत आहे. उर्वरित राज्यात त्यांचं पकड नाही. मागील लोकसभा निवडणूक ते त्यांच्याच ओएसडीकडून पराभूत झाले होते
ते सांगतात की, "आता संस्थानांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. ते काँग्रेसमध्ये असताना संघटनेत त्याचं वजन होतं. महत्त्वाची पदं होती. पण आता ते एका मंत्रालयात मंत्री आहेत. आणि ज्या विभागाकडे आता सरकारी विमानसेवा ही नाही त्या खात्याचे ते मंत्री आहेत. विमानतळं ही खाजगी कंपन्यांकडे जात आहेत, त्यामुळं त्यांच्याकडे फार काम उरलं नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








