16व्या वर्षी न्यूड सीन दिला, 70व्या वर्षी केला खटला दाखल

1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या रोमिओ अँड ज्युलियट या चित्रपटात कलाकारांकडून न्यूड सीन करुन घेतल्याप्रकरणी पॅरामाऊंट पिक्चर्स कंपनीविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेत हा खटला दाखल करण्यात आला आहे.

चित्रपटात न्यूड सीन करण्यासाठी त्यांना लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागल्याचा आरोप कलाकारांनी केला आहे. पॅरामाऊंट फिल्म प्रॉडक्शनच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन फ्रँको जैफ्रिली यांनी केलं होतं.

चित्रपटात लिओनार्दो व्हाइटनिंग आणि ऑलिव्हिया हसी यांनी काम केलं होतं. त्यावेळी त्यांचं वय अनुक्रमे 16 आणि 15 असं होतं. दोघंही आता सत्तरीत आहेत.

या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना दिग्दर्शक फ्रँको जैफ्रिलीन यांनी त्यांना न्यूड सीन करावा लागेल असं सांगितलं. आधी त्यांनी न्यूड सीन नसेल अशी हमी दिली होती. याच न्यूड सीनसाठी सत्तरीत असलेल्या या दोघांनी 50 कोटी डॉलरची नुकसानभरपाई मागितली आहे.

दोन्ही ब्रिटिश कलाकारांना या सीनमुळे भावनात्मक त्रासाला सामोरं जावं लागलं. पुढची अनेक वर्ष मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. चित्रपटाच्या प्रीमियरनंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांना खूपच कमी काम मिळत आहे.

तूर्तास पॅरामाऊंट कंपनीने यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही.

विश्वासघात झाला

चित्रपटाचे दिग्दर्शक जैफ्रिली यांचं 2019 मध्ये निधन झालं. न्यूड सीनमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांनी सांगितलं की, जैफ्रिली यांनी आम्हाला चित्रीकरणावेळी स्किन कलरचे अंडरवेअर परिधान करायला लागतील असं सांगितलं. ज्यादिवशी चित्रीकरण सुरु झालं, तेव्हा ते बॉडी मेकअपसह न्यूड सीन करा, असं म्हणू लागले. हा सीन केला नाहीत तर चित्रपट फ्लॉप होईल, असं दिग्दर्शकाने सांगितलं.

दोन्ही कलाकारांनी सांगितलं की," दिग्दर्शकाने कॅमेरा अशा ठिकाणी ठेवला जेणेकरुन शरीराचे गोपनीय भाग लोकांना दिसणार नाहीत. हा सीन करण्यावाचून आमच्याकडे पर्याय नव्हता." चित्रपटात व्हाइटनिंग यांच्या शरीराचा मागचा भाग आणि हसी यांच्या स्तनांचा काही भाग थोडा वेळ दाखवला गेला.

याचिकेत दोन्ही कलाकारांनी जैफ्रिली यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला आहे. पॅरामाऊंट पिक्चर्स कंपनीला ही गोष्टी माहिती होती. दोन्ही कलाकारांची नग्न शरीरं छुप्या पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने चित्रित करण्यात आली आहेत.

कलाकारांच्या दाव्यानिशी वकिलांनी सांगितलं की चित्रपटातील न्यूड दृश्यांनी अल्पवयीनांच्या शोषणाविरोधातील कॅलिफोर्निया आणि राज्यांच्या कायद्याचं उल्लंघन केलं आहे.

कायद्याचं उल्लंघन

लिओनार्दो व्हाइटनिंग आणि ऑलिव्हिया हसी यांचे बिझनेस मॅनेजर टोनी मॅरिनोजी यांनी सांगितलं की, "पॅरामाऊंट पिक्चर्स स्टुडिओने दोन्ही कलाकारांचा विश्वासघात केला आहे. कारकीर्दीला नुकसान होऊ नये या विचाराने घाबरुन दोघांनी कायदेशीर कारवाई केली नाही. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत असंही त्यांना वाटलं.

"ते दोघं या घटनेबद्दल सांगू शकतील असा कोणताच मार्ग नव्हता. लोक त्यांचं ऐकून घेतील याविषयीही साशंकता होती."

"आजच्या काळात मी टू तसंच लैंगिक शोषणाविरोधातील अन्य चळवळी उभ्या राहिल्या आहेत. मात्र त्यावेळी असं कोणतंही व्यासपीठ नव्हतं. त्यामुळेच या दोघांना या गोष्टीबाबत बोलण्यासाठी एवढी वर्ष गेली."

दोघांचे वकील सोलोमन ग्रेसन यांनी सांगितलं की, अल्पवयीन मुलामुलींची नग्न छायाचित्रं टिपणं बेकायदेशीर आहे. हे दृश्य दाखवायला नको होते.

1960च्या दशकात दोघेही अतिशय लहान होते. आपल्याबरोबर काय घडतं आहे याचा त्यांना अंदाजही आला नसेल. दोघांनाही अचानक लोकप्रियता मिळाली. मोठेपणी त्यांना कल्पनाही नसेल की लहान वयात असा प्रसंग चित्रित केला असेल. आता पुढे काय याचं उत्तर त्यांच्याकडे नसेल".

हसी यांनी न्यूड सीनची केली होती पाठराखण

अभिनेत्री हसी यांनी 2018 मध्ये व्हेरायएटी मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत न्यूड सीन आवश्यक होता असं म्हटलं होतं.

त्यांनी म्हटलं, "माझ्या वयाच्या कोणत्याही मुलीने हे केलं नव्हतं. जैफ्रिली यांनी खुबीने हा प्रसंग चित्रित केला. चित्रपटासाठी हे दृश्य आवश्यक होतं. त्याचवर्षी फॉक्स न्यूजने त्यांची मुलाखत घेतली. त्यात त्या म्हणाल्या, अमेरिकेत त्यावेळी अशा स्वरुपाच्या प्रसंगावर बंदी होती. पण युरोपातील चित्रपटांमध्ये अशी दृश्यं चित्रपटात असणं अनोखी गोष्ट नव्हती".

हसी पुढे म्हणाल्या, "ही फार मोठी समस्या नाही. लिओनार्दोला हा प्रसंग चित्रित करताना कोणचाही संकोच वाटला नाही. चित्रीकरण सुरु असताना मी विसरुनच गेले की लिओनार्दोने काही परिधान केलं आहे की नाही.

"त्यावेळी हा चित्रपट हिट झाला. शेक्सपिअरचं आयुष्य समजावून देण्यासाठी अनेक पिढ्यांना हा चित्रपट दाखवला जात असे. या चित्रपटाला चार ऑस्कर मानांकनं मिळाली होती. यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि आणि सर्वोत्कष्ट चित्रपट यांचाही समावेश होता. चित्रपटाने सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि बेस्ट कॉश्च्यूम डिझाईन यासाठी ऑस्कर पटकावला."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)