You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राष्ट्राध्यक्षांचा मृतदेह घेऊन दोन वैमानिकांनी केला होता 4 हजार किलोमीटर्सचा प्रवास, गोष्ट एका थरारक गुप्त मोहिमेची
- Author, बुशरा मोहम्मद
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
साधारण 31 वर्षांपूर्वी, केनियातील दोन वैमानिक- हुसेन मोहम्मद अंशूर आणि मोहम्मद अदान, नैरोबीजवळील विल्सन विमानतळावरील त्यांच्या कार्यालयात होते. त्याचवेळी अचानक एक व्यक्ती त्यांच्याकडे आला.
तो एक नायजेरियन डिप्लोमॅट होता. त्याने या दोघांना अत्यंत संवेदनशील आणि गुप्त अशा मोहिमेत सहभागी करून घेतलं.
सोमालियाचे माजी शासक सियाद बॅरे यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मायदेशी आणण्याची ही मोहीम होती. नायजेरियात निर्वासित अवस्थेत वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचं निधन झालं होतं.
अंशूर पूर्वी केनियन हवाई दलात कॅप्टन होते.
अंशूर आणि अदान दोघेही 'ब्ल्यूबर्ड एव्हिएशन' या कंपनीचे भागीदार आहेत. ही कंपनी केनियातील मोठ्या खाजगी विमान कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी त्यांनी काही वर्षांपूर्वी सुरू केली होती.
या गुप्त मोहिमेबद्दल प्रथमच प्रसारमाध्यमांशी बोलताना अंशूर यांनी बीबीसीला सांगितलं की, नायजेरियन अधिकारी 'थेट मुद्द्यावर' आला.
त्याने अंशूर आणि हुसेन यांना विमान भाड्याने घेऊन सियाद बॅरे यांचा मृतदेह गुप्तपणे नायजेरियातील लागोस शहरातून दक्षिण सोमालियातील त्यांच्या गारबहारेय या मूळगावी अंत्यसंस्कारासाठी नेण्यास सांगितले.
हा प्रवास आफ्रिकेच्या दुसऱ्या टोकाला साधारण 4,300 किलोमीटरचा होता.
अंशूर म्हणाले, ही विनंती ऐकून आम्ही थक्क झालो, "आम्हाला लगेचच लक्षात आलं की, हे नेहमीप्रमाणे चार्टर (विमान) भाड्याने देण्याचं काम नाही."
बंडखोर गटांनी सत्तेवरून हटवल्यानंतर 28 जानेवारी 1991 रोजी बॅरे सोमालियातून पळून गेले होते.
त्यामुळे त्यांचा मृतदेह परत आणणे राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील होतं. या प्रक्रियेत अनेक देशांची सरकारे, नाजूक प्रादेशिक संबंध आणि राजनैतिक वादाचा धोका होता.
'वैमानिकांना होती भीती'
अंशूर यांनी म्हटलं की, या मागणीचे परिणाम काय होतील याची त्यांना भीती वाटत होती. कारण अधिकाऱ्यांनी त्यांना नियमांबाहेर जाऊन हे उड्डाण करण्यास सांगितलं होतं.
अंशूर यांनी सांगितलं, "केनियाच्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट कळली असती तर गंभीर समस्या निर्माण झाल्या असत्या."
ही विनंती स्वीकारायची की नाही यावर दोन्ही वैमानिकांनी नंतर दिवसभर चर्चा केली.
विशेषतः त्या वेळचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल अराप मोई यांच्या नेतृत्वाखालील केनियन सरकारला आपली योजना समजली तर काय होईल, याचा धोका त्यांनी काळजीपूर्वक विचारात घेतला.
1969 मध्ये बॅरे यांनी कोणताही रक्तपात न करता सत्ता हस्तगत केली होती. त्यांचे समर्थक त्यांना पॅन-आफ्रिकन विचारांचे नेते मानत होते. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी 'अपार्थाइड व्यवस्थे'विरुद्धच्या लढ्याला त्यांनी पाठिंबा दिला होता, असे समर्थक सांगतात.
मात्र टीकाकारांच्या मते, ते एक हुकूमशहा होते आणि सत्तेत असताना त्यांनी मानवी हक्कांचे उल्लंघन केले होते. अखेरीस त्यांना सत्तेवरून हटवण्यात आलं.
बॅरे सुरुवातीला केनियात पळून गेले, पण त्यांना आश्रय दिल्याबद्दल त्या वेळच्या मोई सरकारवर संसद आणि मानवाधिकार संघटनांकडून जोरदार दबाव आला. त्यानंतर नायजेरियाने त्यांना राजकीय आश्रय दिला.
त्यावेळी देशाचे नेतृत्व जनरल इब्राहिम बाबांगिडा करत होते. बॅरे लागोसमध्ये राहिले आणि मधुमेहाशी संबंधित आजारामुळे अखेर त्यांचा मृत्यू झाला.
मोहीम संवेदनशील असल्यामुळे, वैमानिकांनी नायजेरियन अधिकाऱ्याला विचार करण्यासाठी आणखी एक दिवस मागितला. पैशांची ऑफर चांगली होती, त्यांनी रक्कम उघड केली नाही. पण या मोहिमेत जोखीम फार मोठी होती.
अंशूर यांनी सांगितलं, "आम्ही सुरुवातीला त्यांना नायजेरियन हवाई दलाचे विमान वापरण्याचा सल्ला दिला, पण त्यांनी त्याला नकार दिला."
त्यांनी सांगितलं की, "ही मोहीम खूप संवेदनशील आहे आणि केनियन सरकारला काहीही कळता कामा नये."
या मोहिमेबद्दल माध्यमांशी पहिल्यांदाच बोलताना, सोमालियाचे माजी शासक सियाद बॅरे यांचा मुलगा, आयानले मोहम्मद सियाद बॅरे, यांनी बीबीसीला सांगितलं की "ही गोपनीयता काहीही बेकायदेशीर लपवण्याबद्दल नव्हती".
त्यांनी स्पष्ट केलं की, इस्लामिक परंपरेनुसार मृतदेह शक्य तितक्या लवकर दफन करावा लागतो. त्यामुळे सामान्य नियम पाळले गेले नाहीत, तरी काही सरकारांना या योजनेची माहिती होती.
ते म्हणाले, "आमची लढाई वेळेशी होती. सर्व कागदपत्रे पूर्ण करायला गेलो असतो तर दफनाविधीला उशीर झाला असता."
त्यांनी म्हटलं की, नायजेरियन अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की गारबहारेयची धावपट्टी लष्कराच्या विमानासाठी 'खूप लहान' आहे.
"म्हणूनच ब्ल्यूबर्ड एव्हिएशनशी संपर्क साधण्यात आला," बॅरे यांच्या मुलाने बीबीसीला सांगितलं.
कशी आखली योजना?
त्या वेळी वैमानिकांचा बॅरे कुटुंबाशी काहीही संपर्क नव्हता. त्यांनी आपला निर्णय नायजेरियन राजनयिक अधिकाऱ्याला कळवला, असे अंशूर यांनी 10 जानेवारी 1995 रोजी सांगितले.
अंशूर यांनी या आठवणींना उजाळा देत सांगितलं की, "हा निर्णय घेणं सोपं नव्हतं. पण आम्हाला हा प्रवास पार पाडण्याची जबाबदारी जाणवत होती."
माजी राष्ट्राध्यक्षाशी त्यांचा हा पहिला संबंध नव्हता.
जेव्हा बॅरे आणि त्यांचे कुटुंबीय राजधानी मोगादिशूमधून पळाले, तेव्हा ते गारबहारेयच्या परिसरातील बुर्डुबो या शहरात आले.
त्या काळात, वैमानिकांनी बॅरे कुटुंबासाठी बुर्डुबो येथे अत्यावश्यक वस्तू घेऊन उड्डाण केलं होतं. यात अन्न, औषधं आणि इतर मूलभूत गरजेच्या वस्तू होत्या.
पण बॅरे यांचा मृतदेह घेऊन प्रवास सुरू करण्यापूर्वी, वैमानिकांनी नायजेरियन सरकारकडे हमी मागितली.
अंशूर म्हणाले, "जर राजकीयदृष्ट्या काही चूक झाल्यास, तर त्याची जबाबदारी नायजेरियाने घ्यावी. आम्हाला विमानात दूतावासाचे दोन अधिकारीही हवे होते."
नायजेरियाने त्याला मान्यता दिली. त्यानंतर वैमानिकांनी आपली मोहीम गुप्त राहण्यासाठी एक योजना तयार केली आणि ते त्यात यशस्वी झाले.
अंशूर म्हणाले की, 11 जानेवारी रोजी 3 च्या सुमारास बीचक्राफ्ट किंग एअर बी200 या त्यांच्या छोट्या विमानाने, विल्सन विमानतळावरून उड्डाण केले.
वैमानिकांनी उड्डाणाची नोंद करताना केनियाच्या पश्चिम भागातील सरोवराजवळील किसुमू शहराला आपले ठिकाण दाखवले.
अंशूर म्हणाले, "पण ते फक्त कागदावर होते. जेव्हा आम्ही किसुमूच्या जवळ पोहोचलो, तेव्हा आम्ही रडार बंद केला आणि विमानाची दिशा बदलून युगांडा मधील एंटेबेकडे वळलो."
त्या वेळेस, त्या भागातील रडार कव्हरेज मर्यादित होते, आणि वैमानिकांना माहीत होतं की, ते याचा फायदा घेऊ शकतात.
एंटेबे येथे उतरल्यावर, वैमानिकांनी विमानतळावरील अधिकाऱ्यांना सांगितलं की, विमान किसुमूमधून आले आहे. विमानातील दोन नायजेरियन अधिकाऱ्यांना त्यांनी शांत बसावं आणि बाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
अंशूर यांनी बीबीसीला सांगितलं की, विमानात इंधन भरलं गेलं आणि पुढचं ठिकाण कॅमेरूनमधील याऊंडे असं दाखवलं, जिथे मोहीमेचे समन्वय सांभाळणारे नायजेरियन मुत्सद्दी वाट पाहत होते.
थोडा वेळ थांबल्यानंतर विमान लागोसकडे निघाले. नायजेरियन हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी, नायजेरियन सरकारने वैमानिकांना शंका टाळण्यासाठी नायजेरियन हवाई दलाचा कॉल साइन 'डब्ल्यूटी 001' वापरण्याची सूचना दिली.
अंशूर म्हणाले, "ही गोष्ट खूप महत्त्वाची होती. ही वापरली नसती, तर आमची चौकशी झाली असती."
ते 11 जानेवारी रोजी साधारण दुपारी 1 वाजता लागोस येथे पोहोचले, तिथे बॅरे कुटुंब त्यांची वाट पाहत होते.
उरलेला दिवस विश्रांती घेतल्यानंतर, वैमानिकांनी प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरू करण्याची तयारी केली, म्हणजे बॅरे यांचा मृतदेह सोमालियातील गारबहारेयला पोहोचवणे.
12 जानेवारी 1995 रोजी, त्यांचा लाकडी ताबूत (पेटी) विमानात ठेवला गेला. या वेळी दोन नायजेरियन सरकारी अधिकारी आणि बॅरे कुटुंबातील सहा सदस्य, त्यात मुलगा आयानले मोहम्मद सियाद बॅरेही, विमानात होते.
वैमानिकांच्या दृष्टीने, गोपनीयता अजूनही खूप महत्त्वाची होती.
हुसेन म्हणाले, "कॅमेरून, युगांडा किंवा केनियामधील विमानतळ अधिकाऱ्यांना आम्ही मृतदेह घेऊन चाललो आहोत, हे आम्ही सांगितलं नाही. हे जाणूनबुजून केलं होतं."
विमान आपल्या मार्गावर परत आले, याऊंडे येथे थोड्या वेळासाठी थांबले आणि नंतर एंटेबेमध्ये जाऊन इंधन भरले. युगांडाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं की, अंतिम ठिकाण हे केनियाच्या पश्चिम भागातील किसुमू आहे.
जेव्हा ते किसुमूमध्ये पोहोचत होते, तेव्हा वैमानिकांनी विमानाचा मार्ग बदलून थेट गारबहारेकडे उड्डाण केले.
अंशूर म्हणाले की, ताबूत उतरवल्यानंतर ते आणि त्यांचा सह-वैमानिक अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले आणि नंतर विमानात दोन नायजेरियन अधिकारी घेऊन विल्सन विमानतळाकडे रवाना झाले.
'आणि सुटकेचा निःश्वास सोडला'
अंशूर म्हणाले की, हा त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा 'सर्वात तणावपूर्ण' टप्पा ठरला.
असं वाटतं, "इथे आम्हाला थांबवलं जाऊ शकतं."
पकडले जाण्याची भीती वाटत असल्याने, वैमानिकांनी विल्सन एअर ट्रॅफिक कंट्रोलला ते उत्तर-पूर्व केनियातील मंडेरा येथून येत आहेत, असं सांगितलं. त्यामुळे हे स्थानिक उड्डाण असल्याचा भास झाला.
अंशूर म्हणाले, "कोणी प्रश्न विचारले नाही. तेव्हाच आम्हाला कळलं की आता आम्ही सुरक्षित आहोत."
अशाप्रकारे, ही मोहीम संपली.
अंशूर यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही काय केलं, याची आम्हाला नंतर खरी जाणीव झाली."
त्यांना अशी मोहीम पुन्हा करणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, "मी आता 65 वर्षांचा आहे आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे 'नाही'. आज मी अशी मोहीम पार पाडणार नाही, कारण विमान तंत्रज्ञान खूप सुधारलं आहे आणि आता आफ्रिकेत पुरेसं रडार कव्हरेज देखील आहे."
"1995 मध्ये असलेल्या हवाई वाहतूक नियंत्रणातील त्रुटींचा फायदा आज जवळजवळ अशक्य आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.