आग आणि अपघाताच्या बनावाचे रहस्य: एलआयसी मॅनेजरचा कार्यालयात मृत्यू; शेवटच्या कॉलमुळे सापडला संशयित

    • Author, विजयानंद अरुमुगम
    • Role, बीबीसी तमिळ

तामिळनाडूतील मदुराई येथील एलआयसी कार्यालयात रात्रीच्यावेळी भीषण आग लागली. या आगीत मॅनेजर ठार झाल्या तर दुसरा एक कर्मचारी जखमी झाला. वरवर अपघातासारखी ही घटना वाटत असली तरी पोलीस तपासात मात्र अनेक रहस्य उलगडत गेले. दिवसेंदिवस तपासात वेगवेगळी माहिती आणि पुरावे समोर येत आहेत. आता याप्रकरणी कार्यालयातीलच एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

ब्रँच मॅनेजर कल्याणी नंबी यांच्या मुलाने आणि तपास अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनाक्रमाबाबत माहिती दिली.

"मागील 30 वर्षांपेक्षा जास्त काळापासून माझी आई एलआयसीत काम करत होती. तिला दिलेली कोणतीही जबाबदारी ती निष्ठेने पूर्ण करायची. ती आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ होती. तिच्याबाबतील असं क्रूर पद्धतीने काही घडेल असं कधीच वाटलं नव्हतं," असं कल्याणी यांचे चिरंजीव लक्ष्मीनारायणन यांनी सांगितलं.

मदुराई येथील एलआयसीच्या कार्यालयात ब्रँच मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या त्यांच्या आई कल्याणी नंबी यांची 17 डिसेंबर 2025 रोजी हत्या झाली.

या प्रकरणात सहायक प्रशासकीय अधिकारी असलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणात नेमकं काय घडलं तरी काय होतं?

'आईचा तो शेवटचा कॉल'

मदुराईच्या एलआयसी शाखा कार्यालयात 17 डिसेंबर 2025 च्या रात्री आग लागली. या घटनेत ब्रँच मॅनेजर कल्याणी नंबी यांचा मृत्यू झाला. त्याच कार्यालयात काम करणारे सहायक प्रशासकीय अधिकारी राम हे देखील गंभीर जखमी झाले.

ही घटना अपघात असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला होता.

जखमी राम याच्यावर मदुराईच्या राजाजी सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. सुमारे 30 दिवसांनंतर महिला मॅनेजरला पेटवून ठार केल्याच्या आरोपावरून एलआयसी अधिकारी रामला पोलिसांनी अटक केली.

"त्या रात्री साधारण 8.27 वाजता माझ्या आईचा मला फोन आला. ती घाबरलेल्या आवाजात 'पोलिसांना फोन कर… पोलिसांना फोन कर' असं म्हणत होती," असं लक्ष्मीनारायणन सांगत होते.

बीबीसी तामिळशी बोलताना ते म्हणाले, "पोलिसांनी अटक केलेल्या त्या व्यक्तीमुळे माझ्या आईला आधीपासूनच त्रास होत होता. त्या व्यक्तीविरोधात अनेक तक्रारीही होत्या. पण हा त्रास इतका वाढेल की तिचा यात जीव घेतला जाईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं."

"तपासात फ्रिज किंवा विजेच्या वायरमध्ये कोणताही बिघाड नव्हता, हे स्पष्ट झालं आहे," असंही त्यांनी सांगितलं.

'17 डिसेंबरला नेमकं काय घडलं?'

याप्रकरणी कल्याणी नंबी यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून थिलाकर थिटल पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

"कल्याणी नंबी पोलिसांना बोलावण्यासाठी जोरजोरात ओरडत होत्या. जर ही घटना अपघाती असती, तर अशा प्रकारे पोलिसांना बोलव म्हणण्याची शक्यता नसती. त्यामुळेच आम्ही या प्रकरणाचा तपास त्या दिशेने पुढे नेला," असं थिलाकर थिटल पोलीस ठाण्याचे निरीक्षक अझगर म्हणाले.

या प्रकरणाच्या तपास करताना मिळालेली अधिकची माहिती त्यांनी बीबीसी तामिळला दिली.

"कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळी मिळालेले साहित्य आणि कर्मचाऱ्यांचे जबाब हे सगळे महत्त्वाचे पुरावे ठरले. विशेष म्हणजे, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी कार्यालयात फक्त तिघेच उपस्थित होते," असं अझगर म्हणाले.

"त्या वेळी कार्यालयात फक्त कल्याणी नंबी, शंकर आणि राम हे तिघेच उपस्थित होते."

"साधारण 8 वाजता आपलं काम संपल्याचं सांगून शंकर तेथून निघून गेला. त्यानंतर कार्यालयात फक्त कल्याणी आणि राम हेच होते."

पोलिसांच्या तपासात शंकरने याला दुजोरा दिला, असं अझगर यांनी म्हटलं.

"मदुराईच्या एलआयसी इमारतीत रात्री सुरक्षा रक्षक असतात. त्यामुळे कोणीही कल्याणी नंबींच्या वरच्या मजल्यावर जाऊ शकत नाही. मागे एक आपत्कालीन मार्ग आहे, पण त्यातूनही कोणी आत जाऊ शकत नाही," असंही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, "घटना घडलेल्या दिवशी राम समोरचं गेट बंद करून मागच्या दाराने बाहेर गेला, हे सुरक्षा रक्षकांनी पाहिलं होतं."

"रामच्या पायाला जखम झाली आहे. अग्निशमन दल आले तेव्हा तो तिथे एकटाच होता. दुखापतीमुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले," असं अझगर यांनी सांगितलं.

'या घटनेमागचं कारणं काय?'

"कल्याणी नंबी त्यांच्या कामात खूप काटेकोर होत्या. विमा काढलेल्या आणि मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबातील सुमारे 40 जणांनी रामकडे हक्क दाव्याचे अर्ज केले होते," असं अझगर यांनी सांगितलं.

"हा अर्ज संगणकावर नोंदवून, कागदपत्रांची तपासणी करून, शेवटी कल्याणी नंबींकडून सही घेण्याचे काम राम पाहत होता."

पोलीस निरीक्षक अझगर यांच्या म्हणण्यांनुसार, "या दाव्यांचे अर्ज पुढील टप्प्यात नेण्यासाठी रामने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे विमाधारकांच्या नातेवाईकांनी कल्याणी नंबी यांच्याशी वाद घातला होता."

अझगर म्हणाले, "कल्याणी नंबी या सातत्याने रामला याबाबत प्रश्न विचारत होत्या. त्यामुळे त्याला अधिक वेळ काम करावं लागत असत."

"मागील वर्षी मे महिन्यात, कल्याणी नंबी त्या ब्रँचला येण्यापूर्वी सायंकाळी 7 वाजण्याच्या आधीच राम घरी निघून जायचा."

कल्याणी नंबी तिथे आल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत त्याला काम करावं लागत, असे रामने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटल्याचे अझगर यांनी सांगितलं.

"कल्याणी नंबी यांनी दाव्यासाठीच्या अर्जांवर काहीही कारवाई न केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्या रागाच्या भरात पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे," पोलीस तपासात रामने सांगितलं.

"घटनेनंतर पोलिसांनी काही वस्तू जप्त केल्या होत्या. या प्रकरणात ठोस पुरावे मिळण्यासाठी ते वाट पाहत होते. तपासाच्या आधारे रामला अटक करण्यात आली आहे," असं अखिल भारतीय विमा कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष जी. आनंद यांनी सांगितलं.

'कोणतीही आर्थिक फसवणूक नाही'

"रामच्या एका डोळ्याला दृष्टीदोष आहे. त्यामुळे त्याला काम करताना अनेक अडचणी येत होत्या," असं पोलिस निरीक्षक अझगर यांनी सांगितलं.

"घटनेच्या दिवशी रामने आणलेला पेट्रोल कॅन जप्त केला गेला आहे. पेट्रोल कुठून घेतले यासह सर्व संबंधित पुरावे गोळा केले गेले आहेत," अशी माहितीही त्यांनी दिली.

"17 डिसेंबर रोजी कल्याणी नंबी यांच्या केबिनला लागलेली आग सीसीटीव्हीमध्ये दिसलेली नाही. ते आगीत जळून खाक झाले होते. पण या प्रकरणात कोणतीही आर्थिक फसवणूक झालेली नाही," असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

या प्रकरणी रामविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.