'माझ्या मुलाबाबत जे घडलं, ते कुणाबरोबरही घडू नये', त्रिपुराच्या विद्यार्थ्याबाबत डेहराडूनमध्ये काय घडलं?

    • Author, आसिफ अली
    • Role, डेहराडूनहून बीबीसी हिंदीसाठी

डेहराडूनमध्ये शिक्षण घेत असलेल्या त्रिपुराच्या 24 वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येमुळे उत्तर भारतात ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांसोबत होणाऱ्या भेदभावाच्या घटना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

9 डिसेंबर रोजी डेहराडूनच्या सेलाकुई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारपेठेत, खासगी विद्यापीठातून एमबीएच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या एंजल चकमावर हातातील कडे आणि चाकूने हल्ला करण्यात आला होता.

त्रिपुरातील आगरतळा येथील नंदनगरचा रहिवासी एंजल या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. 16 दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या वेळी त्याचा लहान भाऊ मायकलही तिथे उपस्थित होता.

डेहराडून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली असून सहावा आरोपी अद्याप फरार आहे.

स्थानिक पोलिसांनी फरार आरोपीला पकडण्यासाठी 25 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. या घटनेनंतर डेहराडून आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

'नेमकं काय घडलं होतं?'

मृत विद्यार्थी एंजल चकमाचा लहान भाऊ मायकल चकमा 21 वर्षांचा आहे. तो डेहराडूनमधील उत्तरांचल विद्यापीठात बीए प्रथम वर्षात शिकत आहे.

9 डिसेंबरची घटना आठवत मायकलने बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, त्या सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तो आपला मोठा भाऊ एंजल आणि त्याच्या दोन मित्रांसोबत सेलाकुईच्या बाजारपेठेत गेला होता.

मायकलच्या म्हणण्यानुसार, बाजारात उभी असलेली मोटारसायकल काढताना एंजल पुढे होता आणि तो फोनवर बोलत होता. त्याचवेळी समोर उभ्या असलेल्या काही तरुणांच्या टोळक्याने त्यांच्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली.

मायकलने सांगितलं की, "ते लोक त्यांना 'चिकना', 'चिंकी', 'चायनीज' असं म्हणत होते आणि जातीय अपशब्द वापरत होते. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा ते मोटारसायकलवर बसले, त्यावेळी ते तरुण त्यांच्यासमोर आले आणि शिवीगाळ करू लागले."

मायकलच्या म्हणण्यानुसार, त्यांनी शिवीगाळ का करताय असं विचारताच, त्या तरुणांनी लगेच त्यांच्यावर हल्ला केला.

त्यानं सांगितलं की, मला वाचवण्यासाठी एंजल पुढे आला तेव्हा हल्लेखोरांनी त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली.

मायकलनं म्हटलं की, "त्याला जमिनीवर पाडून लाथांनी मारहाण करण्यात आली. त्याच वेळी एका तरुणाने हातातील कड्याने त्याच्या डोक्यावर वार केला, त्यामुळे तो बेशुद्ध झाला. काही वेळाने तो शुद्धीवर आला, तेव्हा त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते आणि त्या तरूणांचं टोळकं त्याला मारहाण करून पुढे निघून गेलं होतं."

एंजल रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. भावाची ती अवस्था पाहून आपण खूपच घाबरून गेला होतो, असं मायकलने सांगितलं.

त्यानं सांगितलं की, "सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी कसंतरी रूग्णवाहिकेतून एंजेलला जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं. रुग्णालयात कळालं की, एंजलच्या डोक्यावर कड्याने वार झाला होता आणि पाठीच्या खालच्या भागावर चाकूने हल्ला झाला होता."

मायकलच्या म्हणण्यानुसार, तो 9 डिसेंबर ते 26 डिसेंबरपर्यंत एंजलसोबत रुग्णालयात राहिला, पण त्याच्या भावाचा जीव वाचू शकला नाही.

मायकल म्हणाला, "एखाद्या भारतीयाला 'चायनीज' म्हणणं चुकीचं आहे. आम्हीसुद्धा भारतीय आहोत आणि आपल्या देशावर तितकंच प्रेम करतो."

रविवारी 28 डिसेंबर रोजी एंजलवर उनाकोटी जिल्ह्यातील मचमरा या त्याच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

एंजल आणि मायकलचे वडील, तरुण प्रसाद चकमा, बीएसएफच्या फिफ्टी बटालियनमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून मणिपूरमध्ये कार्यरत आहेत. माझ्या मुलासोबत जे झाले, ते कोणाच्या मुलासोबतही होऊ नये, असं ते म्हणतात.

त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, "मणिपूर, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा असो सगळीकडून मुलं तिथे शिक्षण घेण्यासाठी येतात. दिल्ली, मुंबई, बंगळुरू… कोणी नोकरीसाठी, कोणी शिक्षणासाठी, कोणी कंपनीत कामासाठी जातो, त्यांच्यासोबत चुकीचं वागू नये."

"आम्हीही भारतीय आहोत. माझी सरकारकडे विनंती आहे की, सगळ्यांबरोबर सारखं वागावं. कोणीवर अन्याय होऊ नये. आम्ही ईशान्य भारतातून आलो आहोत म्हणून आमच्यासोबत चुकीचं वर्तन केलं जाऊ नये."

'FIR आणि पोलिस कारवाईवर प्रश्न'

एंजल चकमाच्या हत्येनंतर पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 9 डिसेंबरच्या घटनेनंतर एंजलचा भाऊ मायकल चकमाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी 12 डिसेंबरला काही अज्ञात लोकांवर दारूच्या नशेत जाणूनबुजून मारहाण केल्याच्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

एफआयआरमध्ये मारहाणीदरम्यान एंजल चकमावर चाकू आणि कड्याने हल्ला झाल्याचा तसेच जातीवाचक टिपण्णी करण्यात आल्याचा उल्लेख आहे. ही माहिती मायकल चकमाने पोलिसांना दिली होती.

तरीही एफआयआरमध्ये जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे कलम समाविष्ट करण्यात आलेले नाही.

पोलिसांनी 14 डिसेंबर रोजी पाच आरोपींना अटक केल्यानंतर जी प्रेस नोट काढली, त्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 109 म्हणजेच जीवे मारण्याच्या धमकीचा उल्लेख होता. मात्र 12 डिसेंबरला दाखल केलेल्या एफआयआरमध्ये या कलमाचा समावेश नव्हता.

मायकल चकमाने बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, "10 डिसेंबर रोजी ते सेलाकुई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते, पण तिथल्या पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही. उलट, जातीयवाद का वाढवता असं म्हणत पोलिसांनी नाराजी व्यक्त केली."

मायकलनं सांगितलं की, 12 डिसेंबरला एफआयआर दाखल करण्यात आला होता, पण भावावर चाकूने हल्ला झाला असतानाही त्यात 'हत्येचा प्रयत्न' हे कलम जोडलं गेलं नाही.

या प्रकरणी पोलिसांच्या कारवाईची राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानेही दखल घेतली आहे. 23 डिसेंबर 2025 रोजी आयोगाने उत्तराखंडचे पोलीस महासंचालक, डेहराडूनचे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना नोटीस पाठवून एफआयआर नोंदवण्यात उशीर केल्याबद्दल आणि निष्पक्ष कारवाई न झाल्याबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे.

आयोगाने ही कारवाई ऑल इंडिया चकमा स्टुडंट्स युनियनचे वरिष्ठ उपाध्यक्ष बिपुल चकमा यांनी केलेल्या तक्रारीवरून केली.

पोलिसांनी काय सांगितलं?

डेहराडूनचे सिटी एसपी प्रमोद कुमार यांनी सांगितलं की, "9 डिसेंबर रोजी त्रिपुराचे दोन भाऊ सेलाकुई पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही कामासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी तिथे आधीच उपस्थित असलेल्या काही तरुणांशी काही कारणावरून त्यांचा वाद झाला आणि नंतर त्यांच्यात हाणामारी झाली."

प्रमोद कुमार यांच्या म्हणण्यानुसार, "मारहाणीच्या वेळी एका तरुणाने दोघांवर चाकू आणि कड्याने हल्ला केला, त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मारहाण झालेल्याच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली."

त्यांनी सांगितलं की, "तपासादरम्यान पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात दोन अल्पवयीन आहेत. अल्पवयीनांना बाल न्यायालयात हजर केल्यानंतर सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. उर्वरित तीन आरोपींना न्यायालयात सादर केलं असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत."

एसपी सिटी प्रमोद कुमार यांच्या म्हणण्यानुसार, "या घटनेतील आणखी एक आरोपी अद्यापही फरार असून तो दुसऱ्या देशाचा रहिवासी आहे. त्याच्या अटकेसाठी 25 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे आणि पोलिसांसोबत एसओजीच्या पथकांकडून त्याचा शोध सुरू आहे."

एंजल चकमाच्या मृत्यूनंतर या प्रकरणी आता हत्येचं कलमही लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं.

घटनेनंतर विद्यार्थी आणि संघटनांची चिंता

सध्या डेहराडूनमध्ये त्रिपुराचे सुमारे 300 विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. तर ईशान्य भारतातून येऊन येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे 500 इतकी असल्याचे सांगितले जाते.

डेहराडूनमध्ये त्रिपुरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी युनिफाइड त्रिपुरा स्टुडंट्स असोसिएशन डेहराडून (यूटीएसएडी) सक्रिय आहे. ही संघटना विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काम करते.

त्रिपुराचा रहिवासी टोंगक्वचांगने अलीकडेच डेहराडूनमधील एका कॉलेजमधून बी-फार्मची पदवी पूर्ण केली आहे. सध्या तो डेहराडूनजवळील एका फार्मसी कंपनीत काम करत असून तो यूटीएसएडीचा प्रवक्ता देखील आहे.

एंजल माझ्यासाठी लहान भावासारखा होता, असं टोंगक्वचांगने बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना सांगितलं.

तो म्हणाला, "एंजल खूप चांगला मुलगा होता. त्याचं कोणाशीही कधी भांडण झालं आहे, असं मी ऐकलं नव्हतं. एखाद्याचा जीव घेणं ही मोठी गोष्ट आहे. ज्यांनी त्याची हत्या केली, त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. आम्हाला न्याय हवा आहे."

टोंगक्वचांगनं सांगितलं, "28 डिसेंबरला आम्ही पुन्हा सेलाकुई पोलीस ठाण्यात गेलो होतो. पोलिसांनी सांगितलं की सहा पैकी पाच आरोपींना अटक केली आहे, तर एक मुख्य आरोपी नेपाळला पळून गेला आहे आणि त्याचा शोध सुरू आहे."

त्याने आरोप केला की, एंजल ज्या कॉलेजमध्ये एमबीए करत होता, त्या कॉलेजकडून काहीही मदत मिळाली नाही. टोंगक्वचांगच्या म्हणण्यानुसार, कॉलेजच्या प्रिन्सिपलला फोन केला तेव्हा त्यांनी कॉलसुद्धा उचलला नाही.

या खासगी कॉलेजकडून या संपूर्ण प्रकरणावर आम्हाला कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

टोंगक्वचांगच्या म्हणण्यानुसार, वांशिक भेदभावाची समस्या फक्त डेहराडूनपुरती मर्यादित नाही.

त्याच्या म्हणण्यानुसार, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादसारख्या शहरांमध्येही ईशान्य भारतातील लोकांना भेदभाव आणि वांशिक भेदभावाचा सामना करावा लागतो.

तो म्हणाला, "आम्हाला समजत नाही की, आम्हाला 'चिंकी', 'मिंकी' किंवा 'चायनीज' का म्हणतात? आमची नागरिकता भारताची आहे आणि त्यासंबंधीची सर्व कागदपत्रं आमच्याकडे आहेत."

त्याने सांगितलं की, त्याला कॉलेजच्या दिवसांपासून आतापर्यंत वांशिक भेदभावाचा सामना करावा लागला आहे.

तो म्हणाला, "मला तू चायनीज आहेस, भारतातून परत जा, असं म्हणण्यात आलं. कधी कधी त्रिपुरा… जपानमध्ये आहे की भूतानमध्ये?, असं विचारलं गेलं."

तो पुढे म्हणाला, "डेहराडूनला एक शांतताप्रिय आणि शिक्षणासाठी चांगलं शहर मानलं जातं, पण जर मी माझा अनुभव कुठं सांगितला, तर शहराची प्रतिमा खराब होईल. पण मी असं करणार नाही, कारण मी काहीतरी बनण्यासाठी घरातून बाहेर पडलो आहे," असं त्याने म्हटलं.

टोंगक्वचांगच्या म्हणण्यानुसार, एंजलच्या हत्येनंतर डेहराडूनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तो म्हणाला, "आम्हाला आता सुरक्षित वाटत नाही. एंजलची हत्या होऊ शकते, तर आमच्यापैकी कोणासोबतही काहीही होऊ शकतं."

त्यानं म्हटलं, ईशान्य भारताचे विद्यार्थी दूर-दूरून चांगल्या शिक्षणाच्या आशेनं येथे येतात. त्यांच्या कुटुंबाला आपल्या मुलाचा किंवा मुलीचा इथून मृतदेह घेऊन न्यावा लागेल अशी इच्छा नसते.

तो म्हणतो, "आम्हीही भारतीय आहोत. आम्हाला 'चिनी' किंवा 'चायनीज' म्हटलं जाऊ नये, असा कायदा व्हायला हवा."

प्रादेशिक पक्षांनी सुरक्षेवर उपस्थित केले प्रश्न

त्रिपुराचा प्रादेशिक पक्ष टिपरा मोथा पार्टीच्या टिपरा महिला फेडरेशनच्या पश्चिम जिल्हा सचिव नाइशा मारी देबबर्मा यांनी एंजल चकमाच्या मृत्यूचं वर्णन अत्यंत दुःखद घटना असल्याचे केलं.

एंजल त्रिपुराहून डेहराडूनला शिक्षणासाठी गेला होता, आपला जीव गमावण्यासाठी नाही, असं त्या म्हणाल्या.

नाइशा मारी देबबर्मा यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, त्यांनी स्वतः डेहराडूनमध्ये सात वर्षे राहून शिक्षण घेतलं आहे, त्यामुळे हे शहर त्यांच्यासाठी दुसऱ्या घरासारखं आहे.

त्यांनी सांगितलं की, डेहराडूनमध्ये शिकत असलेल्या त्रिपुराच्या विद्यार्थ्यांची वरिष्ठ म्हणून त्यांच्याशी संबंधित समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी त्यांना येथे सतत ये-जा करावी लागते.

त्या म्हणाल्या की, 11 डिसेंबरला त्या एंजलला भेटण्यासाठी रुग्णालयात गेल्या. त्यावेळी त्याला आयसीयूमध्ये मध्ये दाखल करण्यात आलं होतं.

नाइशा यांच्या म्हणण्यानुसार, "डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की, एंजलच्या पाठीवर दोन ठिकाणी चाकूने वार करण्यात आला होता आणि मानेवर हातातील कड्याने वार करण्यात आला होता."

त्यानंतर त्या 20 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा एंजलला पाहण्यासाठी रूग्णालयात गेल्या होत्या. त्यावेळीही त्याच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा झाली नव्हती.

त्यांनी सांगितलं की, ईशान्य भारताचे लोक शांतताप्रिय असतात, पण जेव्हा त्यांना 'चायनीज', 'चिंकी' किंवा 'चिंकू' असं म्हणतात, तेव्हा ते खूप वेदनादायक असतं.

त्या जेव्हा स्वतः डेहराडूनमध्ये शिकत होत्या त्यावेळी त्यांनाही तीन-चार वेळा अशा अनुभवांना सामोरं जावं लागलं होतं, त्यामुळे त्या समजू शकतात की, हे किती दुखावणारं असतं, असं त्या म्हणाल्या.

त्यांच्या म्हणण्यानुसार, ईशान्य भारताचे विद्यार्थी डेहराडूनला शांत आणि सुरक्षित शहर मानून इथे शिकायला येतात, पण या घटनेनंतर ही भावना कमी झाली आहे. हे शहर पूर्वीसारखं सुरक्षित आहे का असा, आता प्रश्न उपस्थित झाला आहे.

त्रिपुरा येथील टिपरा मोथा पक्षाचे संस्थापक प्रद्युत किशोर माणिक्य यांनी एंजल चकमाच्या कुटुंबीयांना 3 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.

धामी सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर काँग्रेसचे गंभीर प्रश्न

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (29 डिसेंबर) डेहराडूनमधील त्रिपुराच्या विद्यार्थ्याच्या हत्येचं वर्णन 'द्वेषातून झालेला भीषण गुन्हा' असं केलं आहे.

'द्वेष एका रात्रीत जन्माला येत नाही,' असं त्यांनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

त्यांनी लिहिलं, "डेहराडूनमध्ये एंजल चकमा आणि त्याच्या भावासोबत जे घडलं, तो द्वेषातून झालेला भीषण गुन्हा आहे."

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले, "गेल्या काही वर्षांत विशेषतः तरुणांमध्ये, विषारी गोष्टी आणि जबाबदारीशून्य विधानांद्वारे, अशा गोष्टींना सतत प्रोत्साहन दिलं जात आहे."

यावर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी एक्सवर लिहिलं, "डेहराडूनमध्ये त्रिपुराच्या एका विद्यार्थ्याची हत्या हा द्वेषपूर्ण लोकांच्या अत्यंत घृणास्पद मानसिकतेचा दुष्परिणाम आहे."

अखिलेश यादव म्हणाले, "विघटनकारी विचार रोज कुणाचा तरी जीव घेत आहेत. आणि सरकारचा आधार मिळालेल्या लोकांनी हे वाईट विचार फुलवले आहेत. अशा नकारात्मक गोष्टींमुळे देश आणि त्याची एकता-अखंडता धोक्यात आली आहे."

काँग्रेसच्या नेत्या आणि ज्येष्ठ प्रवक्त्या गरिमा मेहरा दसौनी यांनी ही घटना राज्यातील कमकुवत कायदा आणि सुव्यवस्था आणि प्रशासनाचं अपयश दाखवणारी असल्याचं सांगितलं.

त्यांनी सांगितलं की, अलीकडे राज्यात गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ, विशेषतः विद्यार्थ्यांविरुद्ध आणि अल्पसंख्यांकांविरुद्ध होणारी हिंसा ही गंभीर चिंतेचा विषय आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या प्रकरणावर म्हटलं की, राज्यात अशाप्रकारच्या घटना कधीही मान्य केल्या जाणार नाहीत. फरार आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं.

ते म्हणाले, "कायदा आणि सुव्यवस्थेशी खेळ करणाऱ्यांनी सरकारकडून दयेची अपेक्षा करू नये. अशा बेशिस्त लोकांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे."

सामाजिक कार्यकर्ते अनुप नौटियाल म्हणाले की, डेहराडूनची ओळख अनेक दशकांपासून शिक्षणाचे केंद्र म्हणून आहे. पण एंजल चकमाची ज्या पद्धतीने हत्या झाली, त्याची चर्चा आता संपूर्ण ईशान्य भारतात पोहोचली आहे.

डेहराडूनमधील खासगी कॉलेजांमध्ये मोठ्या संख्येने ईशान्य भारतातील विद्यार्थी शिकतात आणि त्यांच्याबाबतीत अशा वांशिक छळाच्या घटना रोजच्या जीवनाचा भाग बनल्या आहेत, असा त्यांनी आरोप केला आहे.

"सरकारसोबतच लोकल इंटेलिजन्स युनिट (एलआययू) आणि पोलीस काय करत होते? ईशान्य भारत आणि आफ्रिकेतील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे लक्ष्य केलं जात आहे, याची माहिती या यंत्रणांना नव्हती का? ईशान्येकडूल विद्यार्थ्यांमध्ये आणि स्थानिक लोकांमध्ये संवाद आणि सलोखा वाढवण्यासाठी कधी काही पावलं उचलली गेली आहेत का?" असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)