भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकली; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही धडक

अहमदाबाद इथे सुरू असलेली अनिर्णित झाली आणि भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर करंडक मालिका 2-1 अशी जिंकली. भारताने नागपूर आणि इंदूर कसोटी जिंकत मालिकेत 2-0 आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी जिंकली. अहमदाबाद कसोटी अनिर्णित झाल्याने भारताच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब झालं.

ऑस्ट्रेलियाने या कसोटीत 480 धावांचा डोंगर उभारला. उस्मान ख्वाजाने 180 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. कॅमेरुन ग्रीनने कारकीर्दीतील पहिलं शतक झळकावताना 114 धावांची खेळी केली. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने 6 विकेट्स पटकावल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताने 571 धावा केल्या. विराट कोहलीने तीन वर्षांचा कसोटी शतकांचा दुष्काळ संपवत 186 धावांची तडाखेबंद खेळी केली. सलामीवीर शुबमन गिलने 128 धावा करत त्याला चांगली साथ दिली. अक्षर पटेलने 79 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताने छोटेखानी आघाडी मिळवली.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 175/2 अशी मजल मारली. ट्रॅव्हिस हेडने 90 तर मार्नस लबूशेनने 63 धावांची खेळी केली. चहाच्या सत्रानंतर दोन्ही संघांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.

कसोटी प्रकारातलं 28वं तर कारकीर्दीतील 75वं शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर तर रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाला संयुक्तपणे मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

WTC फायनलमध्येही धडक

अतिशय चुरशीच्या ख्राईस्टचर्च टेस्टमध्ये न्यूझीलंडने श्रीलंकेवर 2 विकेट्सनी मात केली. न्यूझीलंडच्या थरारक विजयासह भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधलं स्थान पक्कं झालं.

इंग्लंडमध्ये ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 7 जूनपासून फायनल रंगेल.

गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला नमवत जेतेपदाची कमाई केली होती. यंदा न्यूझीलंड फायनलसाठी पात्र होऊ शकलं नाही. ऑस्ट्रेलियाने फायनलसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे. श्रीलंकेने न्यूझीलंडला 2-0 हरवलं असतं तर ते फायनलसाठी पात्र ठरू शकले असते पण न्यूझीलंडने ख्राईस्टचर्च कसोटी जिंकत श्रीलंकेच्या आशांवर पाणी फेरलं.

भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेत नागपूर आणि दिल्ली कसोटी जिंकली. इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. अहमदाबाद कसोटी अनिर्णित झाली.

श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात 355 धावांची मजल मारली. कुशल मेंडिसने 87 धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे टीम साऊदीने 5 विकेट्स घेतल्या. मॉट हेन्रीने 4 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

न्यूझीलंडने डॅरेल मिचेलच्या शतकाच्या बळावर 373 धावा करत अल्प आघाडी मिळवली. मिचेलने 102 धावांची शानदार शतकी खेळी साकारली. नवव्या क्रमांकावर खेळणाऱ्या हेन्रीने 72 धावा केल्या. श्रीलंकेतर्फे असिथा फर्नांडोने 4 विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेने अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाच्या बळावर दुसऱ्या डावात 302 धावा केल्या. मॅथ्यूजने 11 चौकारांसह 115 धावांची खेळी केली. ब्लेर टिकनरने 4 विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंडला विजयासाठी 285 धावांचं लक्ष्य मिळालं. चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडच्या 28/1 धावा झाल्या होत्या. पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. पाऊस थांबल्यावर केन विल्यमसन आणि डॅरेल मिचेल जोडीने न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला. मिचेलने 81 धावा करुन बाद झाला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली. धावगतीचं दडपण वाढत असताना न्यूझीलंडने सातत्याने विकेट्स गमावल्या. पण केन विल्यमसनने दिमाखदार शतकी खेळी करत सूत्रधाराची भूमिका निभावली. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला सात धावांची आवश्यकता होती.

तिसऱ्या चेंडूवर हेन्री धावचीत झाला. चौथ्या चेंडूवर विल्यमसनने सर्जनच्या शिताफीने जागा हुडकून चौकार लगावला. पाचवा चेंडू निर्धाव गेला. शेवटच्या चेंडूवर एका धावेची न्यूझीलंडला आवश्यकता होती. उसळता चेंडू केनने खेळायचा प्रयत्न केला. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज जीवाच्या आकांताने पोहोचला. केन विल्यमसनने प्रयत्नांची पराकाष्ठा करत धाव घेतली. फर्नांडोचा थ्रो स्टंप्सवर आदळला तेव्हा केनची बॅट क्रीझमध्ये असल्याचं रिप्लेत स्पष्ट झालं आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोष केला.

सामन्यात 102 आणि 81 धावांची खेळी करणाऱ्या डॅरेल मिचेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.