सकाळ-संध्याकाळ ब्रश करूनही दात का खराब होतात? जाणून घ्या योग्य उपाय

फोटो स्रोत, Getty Images
- Author, यास्मिन रुफो
- Role, बीबीसी न्यूज
दात कसे घासायचे हे माहित असल्याचं आपल्या सर्वांना वाटतं. यात सकाळी आणि रात्री दात घासणे, पाण्याने स्वच्छ धुणे आणि कदाचित अधिक काळजी म्हणून माउथवॉशरचा वापर करणे याचा समावेश असतो.
असं असलं तरी, दंतचिकित्सकांच्या मते, काळजीपूर्वक ब्रश करणारे देखील काही चुका करू शकतात. त्यामुळे त्यांची मेहनत वाया जाऊ शकते.
बर्मिंगहॅम विद्यापीठातील दंतचिकित्सा महाविद्यालयातील डॉ. प्रवीण शर्मा म्हणतात की, यूकेमधील अर्ध्या प्रौढांना कधीतरी हिरड्यांचा आजार होऊ शकतो आणि त्याचे सुरुवातीचे लक्षण हिरड्यांमधून रक्त येणे असेल.
"जर तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा हिरड्या सुजल्या असतील तर तुम्हाला योग्यपद्धतीने ब्रश करण्याची आवश्यकता आहे," असं डॉ. शर्मा नमूद करतात.
नियमितपणे डेंटिस्टकडे जाण्याशिवाय चार गोष्टी करता येतील. याबाबत डॉ. शर्मा आणि बीबीसीचे व्हॉट्स अप डॉक्स पॉडकास्टचे होस्ट डॉ. झँड आणि डॉ. ख्रिस व्हॅन टुलेकेन माहिती देत सांगतात की, आपल्यापैकी बरेच जण सध्या चुका करत आहेत. त्या दुरुस्त केल्या तर आपल्या दातांचे आरोग्य सुधारू शकते.
1. दोनदा घाईत ब्रश करण्यापेक्षा एकदा चांगले ब्रश करणे चांगले
दिवसातून दोनदा ब्रश करणे, ही डेंटिस्टकडून मिळणारी खूप महत्त्वाची सूचना आहे. यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्विसनेही (एनएचएस) हीच शिफारस केली आहे.
मात्र, डॉ. शर्मा म्हणतात की, महत्त्वाचा मुद्दा किती वेळा दात घासता (प्रमाण) हा नाही, तर कसे दात घासता (गुणवत्ता) हा आहे.
"जर तुम्हाला वेळ मिळाला तर दिवसातून दोनदा ब्रश करा. मात्र, दिवसाला दोनदा घाईत ब्रश करण्यापेक्षा एकदा व्यवस्थित ब्रश करणे चांगले," असं डॉ. शर्मा सांगतात.
जर तुम्ही दिवसातून एकदा ब्रश करत असाल, तर संध्याकाळी करा. तसेच फ्लॉसिंगही करा, अशी शिफारस ते करतात.
अर्थात, कोणालाही फ्लॉसिंग आवडत नाही, परंतु रबरी इंटरडेंटल ब्रश वापरणे सोपे आणि कमी वेदनादायक असू शकते, असं डॉ. शर्मा म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
ब्रश कसा करायचा याचा विचार करताना प्रत्येक दाताला बाहेरचा पृष्ठभाग, चावणारा पृष्ठभाग आणि आतील पृष्ठभाग असतो हे लक्षात घेतले पाहिजे. या तिन्ही ठिकाणी ब्रश करणे आवश्यक आहे.
डॉ. शर्मा ब्रश जोराने न दाबता दाताच्या प्रत्येक पृष्ठभागावर लहान गोलाकार पद्धतीने दात घासण्याचा सल्ला देतात. दात आणि हिरड्यांना जोडणाऱ्या भागाला व्यवस्थित घासण्यासही ते सांगतात. कारण याच भागात हिरड्यांचे आजार होऊ शकतात.
डॉ. झॅन म्हणतात, "दात घासताना ब्रशच्या दातांवर लक्ष देणे, फोनवर स्क्रोल करत दात न घासणे आणि काळजीपूर्वक दात घासणे महत्वाचे आहे."
2. नाश्त्यापूर्वी ब्रश करा, नंतर नाही
बरेच लोक जेवल्यानंतर लगेच दात घासतात, परंतु त्यामुळे तुमच्या दातांच्या वरच्या थराला काही फायदा देत नाही.
"नाश्त्यापूर्वी ब्रश करा, तोंड अॅसिडिक असताना करू नका," असं डॉ. शर्मा सांगतात.
"जर तुम्ही खाल्ल्यानंतर ब्रश करत असाल, तर खाण्यात आणि ब्रश करण्यात अंतर ठेवा."
कारण अन्नपदार्थ आणि फळांचा रस किंवा कॉफीसारख्या पेयांमधील आम्ल (अॅसिड्स) दातांच्या वरच्या थराला (इनॅमल) मऊ करू शकतात. मात्र, खाल्ल्यानंतर लगेच ब्रश केल्यानं मऊ होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येईल.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. क्रिस असे सुचवतात की, खाल्ल्यानंतर तोंडातील आम्लता कमी करण्यासाठी चुळ भरा. तसेच नाश्त्यानंतर ब्रश करत असल्यास किमान 30 मिनिटे वाट पहा.
3. ब्रश केल्यानंतर गुळण्या करू नका
जर तुम्ही प्रत्येक ब्रशनंतर थुंकत असाल, चुळ भरत असाल आणि गुळण्या करत असाल, तर तुम्हाला शेवटच्या कृतींवर पुनर्विचार करावा लागेल.
"तुम्ही थुंका, पण गुळण्या करू नका,", असा सल्ला डॉ. शर्मा देतात. गुळण्या केल्यानं टूथपेस्टमधील फ्लोराइड गुळणीसोबत तोंडाबाहेर जाते.
याचा अर्थ दात घासताना फक्त तोंडातील जास्तीची टूथपेस्ट बाहेर टाकावी आणि दातांचे संरक्षण करण्यासाठी फ्लोराइडचा पातळ थर मागे ठेवावा.
4. टूथपेस्टचा ब्रँड महत्त्वाचा नाही
केवळ महागड्या टूथपेस्टच चांगले असतात, असं गृहीत धरणं सोपं आहे. पण डॉ. शर्मा यांच्या मते, तुमच्या टूथपेस्टमध्ये फ्लोराईड असेल, तर तुम्ही कोणता ब्रँड निवडता हे महत्त्वाचे नाही.

फोटो स्रोत, Getty Images
"तुमच्या टूथपेस्टमध्ये फ्लोराईड असेल, तर ब्रँडनं फारसा फरक पडत नाही. स्वस्त किंवा उपलब्ध असलेली कोणतीही टूथपेस्ट खरेदी करू शकता."
फ्लोराईड दातांच्या बाहेरील थराचे संरक्षण करण्यास मदत करते आणि दात ढिसूळ होणं रोखण्यासही मदत करते. तेच खरोखर महत्त्वाचे आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











