You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'स्वाध्याय' परिवारातील साधकाच्या हत्येचं गूढ प्रकरण काय होतं? 'त्या' पत्रकात नेमकं काय म्हटलं होतं?
- Author, भार्गव पारिख
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
अहमदाबादच्या सत्र न्यायालयानं फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी (28 फेब्रुवारी) गुजरातमधील बहुचर्चित हत्या प्रकरणाचा निकाल दिला.
सत्र न्यायालयाचे, अतिरिक्त सत्र न्यायाधीश भरत जाधव यांनी या हत्या प्रकरणातील 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
त्यावेळेस न्यायाधीश भरत जाधव म्हणाले, "स्वाध्याय परिवारासारख्या संघटनेचे अनुयायी न्यायालयात खोटी साक्ष देत आहेत, ही दुःखद बाब आहे."
पंकज त्रिवेदी यांच्या हत्येच्या या प्रकरणात 19 वर्षांनी निकाल लागला आहे. 15 जून 2006 ला एलिसब्रिज जिमखान्याजवळ पंकज त्रिवेदी यांची हत्या करण्यात आली होती.
पंकज त्रिवेदी हे अनिवासी भारतीय होते. ते स्वाध्याय परिवाराशी जोडलेले होते. त्यांच्या हत्येची संपूर्ण गुजरातमध्ये चर्चा झाली होती.
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्वाध्याय परिवाराचे अनुयायी मोठ्या संख्येनं आहेत.
पंकज त्रिवेदी यांची हत्या कोणी केली, हत्या का करण्यात आली, हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि निकाल देताना न्यायालय काय म्हणालं? हे जाणून घेऊया.
पंकज त्रिवेदी यांनी मागितला स्वाध्याय परिवाराला दिलेल्या देणग्यांचा हिशोब
या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार पंकज त्रिवेदी अनिवासी भारतीय असून ते अमेरिकेत राहत होते. ते 30 वर्षांपासून स्वाध्याय परिवार आणि त्यांच्या कामांशी जोडले गेलेले होते.
2001 मध्ये गुजरातमध्ये भूकंप आला होता. त्या भूकंपामुळे गुजरातमध्ये झालेला विनाश पाहिल्यानंतर पंकज त्रिवेदी यांचं हृदय पिळवटून निघालं होतं.
ते आधीच स्वाध्याय परिवाराशी जोडलेले होते आणि पांडुरंग शास्त्री आठवले यांचे अनुयायी होते. त्यामुळे अमेरिकेतील गुजराती समुदायात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता.
पंकज त्रिवेदी यांनी अमेरिकेतील भारतीयांना भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी आवाहन केलं. त्यातून कोट्यवधी रुपये गोळा झाले होते.
त्यांनी ही रक्कम भूकंपग्रस्तांची मदत करण्यासाठी अमेरिकेतून अहमदाबादच्या स्वाध्याय परिवाराला पाठवली होती.
काही काळानंतर पंकज त्रिवेदी अमेरिकेतून गुजरातला आले. त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की त्यांनी अमेरिकेतून पाठवलेली आर्थिक मदत भूकंपग्रस्तांचं पुनर्वसन करण्यासाठी वापरण्यात आली आहे.
आरोपपत्रानुसार, पंकज त्रिवेदी यांना त्यावेळेस वाटलं की दान करण्यात आलेल्या पैशांमध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे. त्यामुळे त्यांनी अमेरिकेतून पाठवलेल्या कोट्यवधी रुपयांचा हिशोब मागितला. मात्र त्याबाबत त्यांना कोणतंही समाधानकारक उत्तर मिळालं नाही.
म्हणून, पंकज त्रिवेदी यांनी स्वाध्याय परिवारातील 'दीदी' जयश्री तळवलकर (पांडुरंगशास्त्रींच्या कन्या) आणि इतर उच्च पदाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं. त्यात त्यांनी त्यांच्या भेटीची मागणी केली. मात्र यापैकी कोणाचीही भेट त्यांना घेऊ देण्यात आली नाही.
त्यांना स्वाध्याय परिवाराच्या कामांविषयी शंका होती, म्हणून त्यांनी यासंदर्भात उत्तरं मागितली. मात्र त्यांना उत्तर मिळण्याऐवजी स्वाध्याय परिवारातूनच 'बहिष्कृत' करण्यात आलं.
त्यामुळे पंकज त्रिवेदी यांनी 'अशुब' हे पत्रक छापलं. त्यात भूकंपग्रस्तांसाठी आणि इतर कामांसाठी देण्यात आलेल्या आर्थिक मदतीचा खुलासा करण्यात आला होता. त्यांनी ते स्वाध्याय परिवाराच्या अनुयायांमध्ये वाटलं. तिथूनच पंकज त्रिवेदी यांच्या आयुष्यात मोठा 'भूकंप' आला.
पंकज त्रिवेदी यांची हत्या
या प्रकरणात न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे की, "पंकज त्रिवेदी यांनी ते पत्रक स्वाध्याय परिवाराच्या अनुयायांमध्ये वाटल्यानंतर, गुजरातमधील विविध ठिकाणांहून त्यांच्या विरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले. त्यांना एकदा राजकोटच्या तुरुंगात देखील जावं लागलं होतं."
पंकज त्रिवेदी यांनी या सर्व खटल्यांच्या विरोधात गुजरात उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं. त्यात त्यांनी दावा केला होता की ते निर्दोष आहेत.
त्यानंतर 9 मार्च 2006 ला गुजरात उच्च न्यायालयानं पंकज त्रिवेदी यांच्या विरोधातील सर्व खटले रद्द करण्याचा आदेश दिला होता.
अगदी याच्याआधीदेखील, पंकज त्रिवेदी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. ऑक्टोबर 2004 मध्ये त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याकडे त्यांना संरक्षण देण्याची मागणी केली होती.
नोव्हेंबर 2005 मध्ये त्यांनी राष्ट्रपतींना देखील पत्र लिहिलं होतं आणि संरक्षण पुरवण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी लिहिलं होतं की त्यांना काही लोकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, 'त्यात स्वाध्याय परिवारातील भारत भट्ट' यांचाही समावेश आहे.
पंकज त्रिवेदी यांनी अहमदाबादच्या सॅटेलाईट पोलीस स्टेशनमध्ये, त्यांना मिळत असलेल्या धमक्यांमुळे पोलीस संरक्षण पुरवण्यासाठी अर्जदेखील केले होते.
मात्र गुजरात उच्च न्यायालयाकडून पंकज त्रिवेदी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या खटल्यांविरोधात त्यांना 'क्लीन चीट' मिळाल्यानंतर तीन महिन्यांमध्ये त्यांची हत्या करण्यात आली.
पंकज त्रिवेदी त्यांच्या घरून अहमदाबाद जिममध्ये नियमितपणे जात असत.
पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, "चंद्रसिंह नावाच्या एका व्यक्तीला राजकोटहून अहमदाबादला बोलावण्यात आलं आणि त्याला साबरमती मधील रोशनी गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं."
"एका रुममध्ये चारजण राहत होते. तिथे एक डबल बेड आणि दोन अतिरिक्त बेड होते. तिथे राहत असताना 11 जून ते 13 जून दरम्यान या चार जणांनी पंकज त्रिवेदी यांची रेकी म्हणजे टेहळणी केली."
"पंकज त्रिवेदी दररोज त्यांच्या कारमधून अहमदाबाद जिमखान्यात जात असत. त्यावेळेस अहमदाबाद जिमखान्याच्या पार्किंगमध्ये दुरुस्तीचं काम सुरू होतं. त्यामुळे अहमदाबाद जिमखान्याच्या मागील बाजूस कार पार्किंग करावं लागत होतं. रस्त्याचा तो भाग अंधारात होता."
"रेकी झाल्यानंतर राजकोटहून बेसबॉल बॅट, काठ्या आणि सळ्या मागवण्यात आल्या. तसंच राजकोटहून एकूण सहा जण आले तर अहमदाबादमधील चार जण होते. मात्र तिथे भारत भट हजर नव्हता."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत भट्ट स्वाध्याय परिवारातील होता. पंकज त्रिवेदी यांनी पैशांबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यानं यांना धडा शिकवण्याचं ठरवलं होतं.
पोलिसांनी आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार, "15 जूनला हे लोक राजकोटहून अहमदाबादला कारमधून बेसबॉल बॅट, काठ्या आणि लोखंडी सळ्या घेऊन आले. अहमदाबादला आल्यावर त्यांना एक व्हॅन आणि दोन मोटरसायकल देण्यात आल्या."
"नेहमीप्रमाणे रात्री 8:15 वाजता पंकज त्रिवेदी जिमखान्यातून बाहेर आले. तेव्हा या लोकांनी त्यांच्यावर बेसबॉल बॅट, काठ्या आणि सळ्यांनी हल्ला चढवला."
"जिमखान्याचा वॉचमन विश्वकर्मा यानं तिथे आरडाओरडा ऐकल्यावर मुख्य सुरक्षा रक्षकाला बोलावलं. मात्र तोपर्यंत हल्लेखोरांपैकी दोन जण मोटरसायकलवरून आणि चारजण मारुती व्हॅनमधून पसार झाले होते."
घटनास्थळी पोलीस पोहोचण्यापूर्वीच पंकज त्रिवेदी यांचा मृत्यू झाला होता.
आरोपींचा कट न्यायालयात कसा उघडकीस आला?
जिमखान्याच्या सुरक्षा रक्षकानं हल्लेखोरांचे चेहरे पाहिले होते. तिथून घाईघाईनं पळताना हल्लेखोर घटनास्थळी बेसबॉल बॅट विसरले होते. पोलिसांनुसार, याचबरोबर इतरही पुरावे होते.
या प्रकरणाचा तपास व्ही. डी. गोहिल आणि बी. टी. कमारिया या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला. आरोपी एका व्हॅनमधून सौराष्ट्रला जात होते.
ती बेसबॉल बॅट कुठून आली हे शोधण्यास पोलिसांना 19 दिवस लागले.
पहिल्यांदा भुपतसिंह जडेजा या आरोपीला अहमदाबादहून अटक करण्यात आली. तर त्याच्या फोनच्या सीडीआरवरून दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्यांची ओळख पटवण्यात आली, तेव्हा जिमखान्याच्या वॉचमननं त्यांना ओळखलं.
तपासातून हे समोर आलं की हे आरोपी पंकज त्रिवेदी यांच्यावर नजर ठेवण्यासाठी किंवा रेकी करण्यासाठी साबरमतीमधील रोशनी गेस्ट हाऊसमध्ये राहत होते. तसंच हे देखील समोर आलं की आरोपी तिथे खोटे नाव आणि पत्ता दाखवून चार दिवस राहिले होते.
पोलीस तपासातून समोर आलं की, "गेस्ट हाऊसमधील टीव्ही व्यवस्थित चालत नसल्यामुळे या हल्लेखोरांनी गेस्ट हाऊसमध्ये भांडण केलं होतं. त्यामुळे या लोकांचे चेहरे गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकाच्या स्पष्ट लक्षात होते. त्यानं हल्लेखोरांना ओळखलंसुद्धा."
दुसऱ्या बाजूला आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर आणि मोबाईल टॉवरच्या लोकेशनमुळे हत्या झाली तेव्हा हे लोक तिथे हजर असल्याचं सिद्ध झालं.
कायद्याच्या कचाट्यातून किंवा कायद्याच्या पळवाटांद्वारे सुटण्याचे आरोपींचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे एकापाठोपाठ एक अशी श्रृंखला जुळत गेली आणि हे प्रकरण उघडकीस आले.
सरकारी वकील काय म्हणतात?
या प्रकरणात सुधीर ब्रम्हभट्ट सरकारी वकील होते. त्यांनी बीबीसीला सांगितलं, "या प्रकरणातील काही साक्षीदार पालटले होते. मात्र आमच्याकडे भक्कम पुरावे होते. मोबाईल फोनमधील सीडीआर तसंच आरोपींच्या कपड्यांवर सापडलेले पंकज त्रिवेदींच्या रक्ताचे डाग असे महत्त्वाचे पुरावे होते."
"हत्येच्या ठिकाणी सापडलेल्या बेसबॉल बॅटवरील हाताचे ठसे देखील जुळले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंकज त्रिवेदी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर त्यांनी लिहिलेली पत्रं न्यायालयानं विचारात घेतली होती. त्यामुळे खटला भक्कम झाला होता. आम्ही 84 साक्षीदार आणि भक्कम पुराव्यांच्या आधारे ही हत्या सिद्ध केली."
"हत्या झाल्यानंतर 19 वर्षांनी 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यात चंद्रसिंह जडेजा, हितेशसिंह चुडासामा, दक्षेश शाह, भुपतसिंह जडेजा, मानसिंह वधेर, घनश्यामसिंह चुडासमा, भारत भट्ट, भरतसिंह जडेजा, चंद्रकांत डाकी आणि जशुभा जडेजा असे हे 10 आरोपी आहेत."
पंकज त्रिवेदींच्या कुटुंबाला काय वाटतं?
पंकज त्रिवेदी यांचे बहुतांश नातेवाईक अमेरिकेत राहतात.
के. डी. रावल हे त्यांचे एक नातेवाईक आहेत. ते बीबीसीला म्हणाले, "पंकजभाई यांना न्याय मिळाल्याचं समाधान आम्हाला आहे. 2001 ते 2006 दरम्यान हा घोटाळा उघडकीस आणताना त्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं."
"त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये खटले दाखल करण्यात आलेले असल्यामुळे त्यांना अमेरिकेत परत जाता आलं नव्हतं. त्यामुळे त्याचा परिणाम होत त्यांना व्यवसायात खूपच नुकसान सोसावं लागलं होतं."
"गुजरात उच्च न्यायालयानं त्यांच्या विरोधातील सर्व खटले रद्द केल्यामुळे ते अमेरिकेत परत जाण्याचं नियोजन करत होते. मात्र त्याआधीच त्यांची हत्या झाली."
बीबीसीनं पंकज त्रिवेदी यांच्या पत्नी श्रुती त्रिवेदी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.
या प्रकरणात स्वाध्याय परिवारावर झालेल्या आरोपांसंदर्भात, बीबीसीनं जयश्री तळवळकर यांच्याशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही इथे त्याचा समावेश करू.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.