कुठलं अंडं खायला जास्त पौष्टिक, पांढरं की तपकिरी? दोन्हींच्या किंमतीत फरक का असतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अंशुल सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे!' अशी टॅगलाइन असलेली जाहिरात आपण अनेक वर्षांपासून पाहत आणि ऐकत आलो आहोत.
अंडी खाणं किती आरोग्यदायी असतं हे सांगणाऱ्या जाहिराती आजही टीव्ही आणि वृत्तपत्रातून आपल्याला पाहायला मिळतात.
बाजारात आपल्याला पांढरी अंडी तर सर्रास पाहायला मिळतात. पण ब्राऊन म्हणजेच तपकिरी अंडीही कमी-अधिक प्रमाणात दिसतात.
जेव्हा अंडी खरेदी करत असतो तेव्हा आपण संभ्रमातही पडतो, म्हणजे पांढरं अंडं घ्यावं की तपकिरी म्हणजे ब्राऊन?
काही लोक म्हणतात तपकिरी अंडं चांगलं, तर काही पांढऱ्यालाच पसंती देतात. पण खरंच या रंगामध्ये पोषणमूल्यांबाबत काही फरक आहे का?
विशेष म्हणजे आपण पांढऱ्या आणि तपकिरी अंड्यांबद्दलचा वाद किंवा चर्चा ऐकलेली असते.
दोन्ही प्रकाराच्या अंड्यांची तुलना करताना लोकांचा हमखास प्रश्न असतो, पांढरं अंडं की तपकिरी, कोणतं अंडं जास्त पौष्टिक आहे?
तपकिरी अंडी बाजारात पांढऱ्या अंड्यांपेक्षा महाग मिळतात, म्हणूनच अनेक लोकांना वाटतं, हे खरंच जास्त चांगलं असतं का? हा प्रश्न त्यांच्यासमोर एक कोडं बनून उभा राहतो.
अनेक लोकांना वाटतं की, तपकिरी अंडी ही नैसर्गिक किंवा ऑर्गेनिक असतात, म्हणून ती पांढऱ्या अंड्यांपेक्षा जास्त पौष्टिक असतात. काही जण तर चवीमध्येही फरक पडतो असं सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
तपकिरी अंडं हे अधिक समृद्ध आणि त्याची चव खूप चांगली असते त्याचबरोबर ते आरोग्यासाठीही जास्त फायदेशीर असतात, असं ही काही लोक मानतात.
ही काही प्रमुख कारणं आहेत, ज्यामुळे लोक पांढऱ्या आणि तपकिरी अंड्यांची तुलना करतात. पण या सगळ्या दाव्यांमध्ये खरंच कितपत तथ्य आहे?
अंड्याचा रंग कशावर अवलंबून असतो?
बाजारात पांढरी आणि तपकिरी अशी दोन्ही प्रकारची अंडी सहज मिळतात. पण प्रश्न असा पडतो की या अंड्यांचा रंग वेगळा का असतो? आणि याचा पोषणमूल्यांशी काही संबंध आहे का?
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अंड्याच्या कवचाचा रंग फक्त कोंबडीच्या जातीवर अवलंबून असतो.
अमेरिकन मॅगझिन 'फूड अँड वाईन'मधील वृत्तानुसार, पांढरी पिसं आणि पांढऱ्या कानाच्या कोंबड्या पांढरी अंडी देतात, तर लालसर पिसं आणि लाल कान असलेल्या कोंबड्या तपकिरी अंडी घालतात.
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडचे पोल्ट्री तज्ज्ञ आणि एक्स्टेंशन स्पेशलिस्ट डॉ. जोनाथन मॉयल यांच्या मते, "अंड्याच्या कवचाचा रंग कोंबडीची जात ठरवते. तो पूर्णपणे आनुवंशिक म्हणजेच जनुकांवर अवलंबून असतो."

फोटो स्रोत, Getty Images
यूसी डेव्हिस विद्यापीठातील पोल्ट्री संशोधक डॉ. रिचर्ड ब्लॅचफोर्ड सांगतात की, "बहुतेक अंड्यांचा 'मूळ रंग' हा पांढराच असतो. पण अंडं जेव्हा कोंबडीच्या प्रजनन प्रणालीतून जातं, तेव्हा काही विशिष्ट जाती अंड्याच्या कवचावर रंगद्रव्याचा (पिग्मेंट) एक थर तयार करतात, त्यामुळे अंड्याच्या कवचाचा रंग बदलतो."
म्हणजे अंड्याचा बाहेरचा रंग कोंबडीच्या आनुवंशिक गुणांवर (जेनेटिक्सवर) अवलंबून असतो.
काही जातीच्या कोंबड्या निळसर किंवा हिरवट रंगांची अंडीही घालतात, पण हेही त्यांच्या जनुकीय (जेनेटिक) रचनेमुळेच होतं.
तपकिरी अंडी अधिक पौष्टिक असतात का?
अमेरिकेच्या कृषी विभागानुसार (यूएसडीए), पांढऱ्या आणि तपकिरी अंड्यांमध्ये पोषणाच्या दृष्टीने जास्त काही फरक नसतो.
'मेडिकल न्यूज टुडे' या आरोग्यविषयक वेबसाइटनुसार, "पांढऱ्या आणि तपकिरी या दोन्ही रंगांच्या अंड्यांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन (ए, डी, बी12) आणि खनिजे जवळपास सारख्याच प्रमाणात असतात.
मात्र, खुल्या जागेत फिरणाऱ्या कोंबड्यांची अंडी (फ्री-रेंज) किंवा ओमेगा‑3 युक्त अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी आणि ओमेगा‑3 फॅटी अॅसिड थोडं जास्त असू शकतं."

यूएसडीएनुसार, अंड्याचा रंग नव्हे तर त्याचा आकार पोषणावर अधिक परिणाम करतो.
यूएसडीएनुसार, मोठ्या आकाराच्या अंड्यांमध्ये सुमारे 90 कॅलरीज आणि 8 ग्रॅम प्रोटीन असतं, तर मध्यम आकाराच्या अंड्यांमध्ये सुमारे 60 कॅलरीज आणि 6 ग्रॅम प्रोटीन असतं.
अमेरिकेतील 'युनायटेड स्टेट्स नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या (एनएलएम)' एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, मोकळ्या जागेत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी जास्त असतं, कारण त्या कोंबड्यांना नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळत असतो.
तपकिरी अंडी महाग का असतात?
दोन्ही अंड्यांमधील पोषक तत्वं जवळपास सारखीच असतील, तर तपकिरी अंडं पांढऱ्या अंड्यापेक्षा थोडं महाग का असतं?
आहारतज्ज्ञ अनु अग्रवाल यामागे प्रमुख दोन कारणं सांगतात.
त्यांच्या मते, "पहिलं कारण म्हणजे बाजारात तपकिरी अंडी कमी प्रमाणात मिळतात. दुसरं कारण असं की, तपकिरी अंडी देणाऱ्या जातीची कोंबडी मोठी असते आणि त्यांना जास्त अन्न लागतं. त्यामुळे उत्पादन खर्चही वाढतो, आणि म्हणूनच ती अंडी थोडी महाग मिळतात."
तपकिरी अंडी देणाऱ्या कोंबड्या जास्त अन्न खातात, म्हणून त्यांची बाजारात जास्त किंमतीला विक्री केली जाते हे यूएसडीए देखील मान्य करतं.

फोटो स्रोत, Getty Images
चवीतही काही फरक असतो का?
काही लोक म्हणतात की, तपकिरी अंड्यांची चव वेगळी असते, तर काहींना पांढऱ्या अंड्यांची चव जास्त आवडते, त्यामुळे ते पांढऱ्या अंड्याला प्राधान्य देतात.
अमेरिकन मीडिया संस्था 'हेल्थलाइन'च्या एका अहवालानुसार, पांढऱ्या आणि तपकिरी अंड्यांच्या चवीत पोषणमूल्यांप्रमाणेच फारसा काही फरक नसतो.
पण याचा अर्थ असा नाही की, सगळी अंडी एकसारखाच स्वाद किंवा चवीसारखी असतात.
अहवालानुसार, "कोंबडीची जात, ती काय खाते, अंडं किती ताजं आहे आणि ते कसं शिजवलं जातं, या सगळ्या गोष्टी अंड्याच्या चवीवर परिणाम करतात.
घरी पाळलेल्या कोंबड्यांना वेगळं खाद्य मिळतं, जे पारंपरिक शेतीतल्या कोंबड्यांच्या आहारासारखं नसतं, त्यामुळे अंड्याची चवही थोडी वेगळी असू शकते."
कोणतं अंडं निवडावं?
खूप वेळा लोक असाही दावा करतात की, पांढऱ्या अंड्यांच्या तुलनेत ब्राऊन अंडं ऑर्गेनिक असतं.
मात्र, अमेरिकन एग बोर्डचे कम्युनिकेशन डायरेक्टर मार्क ड्रेस्नर हा दावा फेटाळून लावतात.
त्यांचं म्हणणं आहे, "तपकिरी अंडी जास्त हेल्दी किंवा 'नैसर्गिक' आहेत असं समजलं जातं, पण तसं नाही. सगळी अंडीच आरोग्यासाठी चांगली असतात.
ऑर्गेनिक अंडी पांढरीही असू शकतात आणि तपकिरी ही. पण सगळी तपकिरी अंडी ऑर्गेनिक असतात असं समजणं चुकीचं आहे."

फोटो स्रोत, Getty Images
एकूणच, अंडी खरेदी करताना त्याचा रंग महत्त्वाचा मानण्यापेक्षा त्याचा ताजेपणा आणि गुणवत्ता याकडे लक्ष देणं जास्त आवश्यक आहे. अंडी खरेदी करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:
- स्वच्छ आणि न फुटलेली अंडी निवडा.
- वापरण्याची मुदत (एक्सपायरी डेट) संपलेली अंडी खरेदी करू नका.
- आपली गरज आणि बजेटनुसार योग्य आकाराची अंडी निवडा.
- खरेदी केल्यानंतर अंडी लगेचच फ्रिजमध्ये ठेवा.
- अंडी घेताना त्याचा ताजेपणा आणि ते कुठून आलं आहे (स्रोत) याला प्राधान्य द्या.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.










