You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मूळव्याध आणि गुदाशयाचा कॅन्सर यामध्ये काय फरक आहे? दोन्हींबद्दल महत्त्वाची माहिती
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
गेल्या तीस ते चाळीस वर्षांमध्ये आपल्या सर्वांच्या जीवनशैलीमध्ये बराच फरक पडलेला आहे. एकेकाळी चालणे, हालचाल असलेली आणि कमी प्रक्रिया केलेले अन्न यांचा समावेश असलेली जीवनशैली या दशकांमध्ये वेगानं बदलली.
रोजची कामं या काळात सोपी झाली, यंत्रांची, मोबाईल-कॉम्प्युटरची मदत यामुळे श्रम कमी झाले असले तरी यामुळे काही तोटेही झाले आहे.
या बदललेल्या जीवनशैलीमुळे काही आजार तयार झाले आणि काही आजार वाढलेही. अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे आजार संसर्गजन्य नसले तरी मोठ्या प्रमाणात ही जीवनशैली स्वीकारल्यामुळे तिला बळी पडणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
अपुरी झोप, सर्वच गोष्टींचा वाढलेला ताण, बैठं काम, श्रमांची कमतरता, व्यायामाचा अभाव, दारू-तंबाखूजन्य पदार्थांचे अतिरेकी सेवन, मसालेदार आणि इंस्टंट पदार्थांचं सेवन आणि प्रक्रिया केलेलं पाकिटबंद खाण्यात झालेली वाढ यामुळे अनेक परिणाम शरीर-मनावर होत आहेत.
या सवयी अनेक आजार सोबत घेऊन येतात.
अनियमित रक्तदाब, हृदयरोग, लठ्ठपणा, मासिक पाळीविषयक आजार आणि अनियमितता, पोटाचे आजार, मधुमेह, फॅटी लिव्हर, गाऊट अशा आजारांमध्ये वाढ झाल्याचं दिसतं.
यापैकीच एका स्थितीची माहिती इथं घेणार आहोत. तो आजार म्हणजे मूळव्याध. बहुतांशवेळा भीड असल्यानं किंवा अज्ञानापोटी या आजाराकडं दुर्लक्ष होते.
मूळव्याध आणि गुदाशयाचा कर्करोग याबद्दल अनेक गैरसमज पसरलेले दिसतात. त्यामुळे त्याची माहिती नीट असणे आवश्यक आहे.
मूळव्याध म्हणजे काय?
मूळव्याधाला इंग्रजीत Piles आणि hemorrhoid असे दोन शब्द वापरले जातात. आपल्या गुदद्वाराजवळील रत्कवाहिन्या जेव्हा फुगतात, त्यांना सूज येते तेव्हा हा त्रास सुरू होतो.
यामुळे शरीराच्या या भागात रक्तस्राव होणं, चिकट पदार्थ बाहेर पडणं, शौचाला गेल्यावर त्रास होणं, या भागात वेदना जाणवणं सुरू होतं. या रक्तवाहिन्यांची आणि तिथल्या स्नायूंची लवचिकता कमी झाल्यावर वेदना सुरू होतात.
मूळव्याधाची कारणं
मूळव्याधाच्या कारणांचा विचार केल्यास सर्वात आधी येतं ते कारण म्हणजे बद्धकोष्ठता.
मलत्यागामध्ये त्रास होणं, मलत्याग करण्यासाठी जोर लावावा लागणं. यामुळे या भागातल्या रक्तवाहिन्या सुजतात.
चेन्नईइथल्या एसआरएम ग्लोबल हॉस्पिटलमधील शस्त्रक्रिया विभागातील सीनियर कन्सल्टंट डॉ. एस. उदयम यांच्यामते काही दुर्बल जनुकांमुळेही हा आजार होतो.
"तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर कमी खाणं, दीर्घकाळ बसून राहाणं, बैठं काम, गरोदरपणामुळे येणारा ताण, गुदाशयाचा कर्करोग यामुळेही हा त्रास होतो", असं डॉ. उदयम सांगतात.
मूळव्याध, फिशर आणि फिश्चुला यात काय फरक आहे?
ही तीन नावं अनेकदा आपण वाचलेली असतात. बऱ्याचदा लोक स्वतःच स्वतःच्या आजाराचं निदान करुन उपचार घ्यायला सुरुवात करतात. ही सवय घातक ठरू शकते.
मूळव्याधामध्ये गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांना सूज येते. फिशर या आजारात गुदद्वाराला लहानशी चीर किंवा भेग पडते. यामुळे वेदना होतात आणि शौचाला गेले असताना रक्तही जाते.
फिश्चुला या आजारात गुदमार्ग आणि त्याच्याजवळील भागात एक मार्ग तयार होतो. त्वचेतून बाहेर पडणाऱ्या या छिद्रातून संसर्गामुळे सतत स्राव बाहेर पडत राहातो.
याबद्दल चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर दीपक सुब्रमणियन यांनी अधिक माहिती दिली.
ते म्हणाले, "पाइल्समध्ये वेदना आणि रक्तस्राव शक्यतो होत नाही. मात्र फिशरमध्ये वेदना आणि रक्तस्राव होतो. फिश्चुलामध्ये त्वचेतून चिकट स्राव तसेच रक्तमिश्रित स्राव बाहेर पडतो. ते सांगतात, याबरोबरच पेरिॲनल ॲबसेस नावाचाही एक आजार असतो.
यामध्ये गुदमार्गातील ग्रंथींमध्ये संसर्ग झाल्यामुळे हा त्रास होतो. यात गुदद्वाराजवळ सूज येते आणि ती वाढत जाते. यावर त्वरित उपचार केले नाहीत तर त्याचं रुपांतर फिश्चुलामध्ये होतं."
"पेरिॲनल ॲबसेसमध्ये गुदद्वाराच्या आजूबाजूचा भाग लाल होतो, वेदना होऊ लागतात आणि सूजही जाणवते. यात पस साठल्यामुळे त्रास वाढतो."
मूळव्याध आणि या आजारांवर उपचार काय?
डॉ. एस. उदयम यांनी यावरील उपचारांबद्दल अधिक माहिती दिली.
ते सांगतात, "मूळव्याध पहिल्या टप्प्यामध्ये असेल तर आहारात बदल करुन, दररोज योग्य प्रमाणात पाणी पिऊन आणि उपचारांनी तो बरा होतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये असेल तर रबर बँड लिगेशन, स्क्लेरोथेरपी, थर्मल कोग्युलेशन असे उपचार केले जातात.
या उपचारांनंतरही सूज गेली नाही तर शस्त्रक्रीया करावी लागते. तिसऱ्या टप्प्यामध्ये असणाऱ्या मूळव्याधावर रबर बँड लिगेशन किंवा शस्त्रक्रियेद्वारे उपचार होतात. चौथ्या टप्प्यात मात्र शस्त्रक्रीया हाच उपचार असतो."
मूळव्याधाचा त्रास कमी करण्यासाठी काय कराल?
मूळव्याधाचा त्रास कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीतला कोणता घटक यासाठी कारणीभूत आहे यावर लक्ष ठेवा आणि त्यात बदल करा असं डॉ. एस. उदयम सांगतात.
ते सांगतात, "दीर्घकाळ एकाच जागी बसून राहाणं टाळा, शौचाला गेल्यावर तेथे जास्त वेळ काढू नका, मलत्यागाच्यावेळेस जोर देऊ नका. गुदद्वाराजवळील जागा स्वच्छ ठेवा. सिट्झ बाथ म्हणजे सोसवेल इतक्या गरम पाण्याचा शेक घ्या.
तुमच्या डॉक्टरांना विचारुन वेदनाशामक औषधं तसेच संसर्ग असलेल्या जागेवर लावण्यासाठी क्रिम घ्या. हे उपचार डॉक्टरांच्या मदतीनेच करायला हवेत."
डॉ. दीपक सुब्रमणियन सांगतात, "बद्धकोष्ठता टाळण्यासाठी योग्य चौरस आहार घेणं आवश्यक आहे. भरपूर पाणी आणि तंतुमय पदार्थांचा समावेश आहारात केला पाहिजे."
आपले पचन चांगले राहावे तसेच पोट व्यवस्थित साफ राहावे यासाठी दररोज प्रक्रीया न केलेल्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात असला पाहिजे. फळे, भाज्या, डाळी, सॅलड यांचा योग्य वापर केला पाहिजे. मसालेदार पदार्थ, कॉफी, अल्कोहोल बंद केल्यास मूळव्याधाची लक्षणंही दूर होतात.
डॉ. एस. उदयम योगासनं, चालण्यासारखा व्यायाम करायला सुचवतात. यामुळे शरीराची हालचाल होते आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी उपयोग होतो असं ते सांगतात.
मात्र जड वजनं उचलण्याचा व्यायाम टाळावा अशी सूचना ते करतात.
बद्धकोष्ठता कशी टाळाल?
बद्धकोष्ठता हा त्रास बहुतेक सर्व वयोगटातल्या लोकांना होताना दिसून येतो. आपली जीवनशैली, आहारविहार यांच्यामुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागत आहे.
त्यापैकीच बद्धकोष्ठ हा एक आजार आहे. पुन्हा बद्धकोष्ठ हा एकमेव आजार नसून यामुळे पुढे अनेक आजारांची सुरुवात होते.
त्यामुळे वेळीच त्याला थांबवणं गरजेचं आहे आणि बद्धकोष्ठाची स्थिती येऊ नये यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. याला बद्धकोष्ठ, मलावरोध अशाही संज्ञांनी ओळखलं जातं.
पोटातील अन्न पचून ते वेळीच बाहेर पडत नसल्यास अनेक कारणं असू शकतात. त्य़ासाठी सर्वप्रथम आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
बद्धकोष्ठाची काही लक्षणं पुढीलप्रमाणे
- पुरेशा प्रमाणात पाणी आणि पातळ द्रव्यं आहारात नसणं
- तंतूमय पदार्थ म्हणजे फायबर्स आहारात नसणं.फळं, भाज्या तसेच तृणधान्यांचा आहारात अभाव
- सतत एकाजागेवर बसून राहाणं, व्यायाम किंवा हालचालीचा अभाव, बसून राहाण्याबरोबर सतत पडून राहाणं
- शौचाला जाण्याच्या भावनेकडे लक्ष न देणं
- ताणतणाव, चिंता तसेच नैराश्य
बद्धकोष्ठ दूर होण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम म्हणजे आपल्या रोजच्या आहारात पाण्याचं प्रमाण वाढलं पाहिजे. तसेच तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स मिळतील असे पदार्थ खाल्ले पाहिजेत. यात फळं, भाज्या, कठिण कवचाची फळं, पूर्ण तृणधान्य यांचा समावेश होतो.
आहारात अचानक फायबर्स वाढवणं त्रासदायक ठरू शकतं. काही लोकांना पोट फुगणं किंवा अस्वस्थ वाटू शकतं. त्यामुळे फायबर्सचं प्रमाण हळूहळू वाढवलं पाहिजे.
बद्धकोष्ठ होऊ नये किंवा बद्धकोष्ठ झालेल्या लोकांनी आपल्या शरीरातील बदलांचं निरीक्षण केलं पाहिजे. रोजचा ठराविक असा क्रम पाळण्याची गरज आहे. दारू पिणं टाळलं पाहिजे. शौचाला जाण्याची भावना झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
कमोडवर शौचाला बसणाऱ्यांनी आपले पाय थोडे उंचावर होतील असे लहानसे स्टूल पायाखाली घ्यावे यामुळे शौचाची क्रिया सोपी होईल. दररोज थोडा व्यायाम, चालणं फिरणं ठेवल्यास पोट साफ होण्यास मदत होते.
बद्धकोष्ठतेचे वेळीच व्यवस्थापन केल्यास मूळव्याध आणि फिशरसारख्या गुंतागुंत टाळता येते. जांभूळ, सफरचंद, चिया सीड्स, गाजर आणि बीट यांसह फायबरयुक्त आहार, नियमित शारीरिक हालचाली आणि पुरेसे पाणी पिणे हे आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत करते.
मल विसर्जन करताना जास्त ताण देणे टाळा आणि प्रोबायोटिक्सचा आहारात समावेश केल्याने आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते.
वेळेवर उपचार केल्याने दीर्घकालीन समस्या टाळता येते आणि मूळव्याध आणि गुदाशय आणि गुदद्वाराला भेगा पडणे यासारख्या गुंतागुंतीचा धोका कमी होतो.
तुमची विष्ठा तुमच्याबद्दल काय सांगते?
पचन झालेल्या तसेच ज्यातून पोषक घटक शोषून घेतले आहेत अशा अन्नातील टाकाऊ भाग म्हणजे विष्ठा. विष्ठेला शास्त्रीय भाषेत faeces म्हटलं जातं.
तुमच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी तसेच आजाराचे निदान करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या विष्ठेचा आकार, रंग, वास, त्याचा पोत यांचा विचार करतात.
सामान्य प्रकारची विष्ठा ही मऊ, सॉसेजसारखी असते. किंवा सॉसेजसारख्या दंडाकृती विष्ठेवर भेगा असू शकतात.
सुटी सुटी किंवा कठीण खडे असल्यास तुम्ही पाणी कमी पित आहात असा अर्थ होतो.
अगदी मुलायम किंवा द्रवरुप शी असेल तर तुम्हाला डायरिया असण्याची तसेच कसला तरी संसर्ग झाला असण्याची शक्यता असते.
गुदाशयाचा कर्करोग म्हणजे काय?
आपल्या मोठ्या आतड्याच्या शेवटच्या काही इंचाच्या भागाला गुदाशय असं म्हणतात. गुदद्वाराला अगदी लागून हा भाग असतो.
गुदाशयात अनियमित आणि अनियंत्रित पद्धतीनं उतींची वाढ झाली की तिथं घट्ट गाठीसारखा भाग तयार होतो. या कॅन्सरमध्ये हेच दिसून येतं. या कॅन्सरची जागा अत्यंत नाजूक ठिकाणी असल्यामुळे तसेच त्याच्याआजूबाजूला महत्त्वाचे अवयव असल्यामुळे त्यावर उपचार करणं फार आव्हानात्मक होऊन जातं.
याबद्दल अधिक माहिती मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील जनरल लॅप्रोस्कोपिक आणि कोलोरेक्टल सर्जन डॉ. मनोज मूलचंदानी यांनी दिली.
ते म्हणाले, "गुदाशयाचा कॅन्सर हा एक कोलोरेक्टल कॅन्सर आहे. अमेरिकेत निदान करण्यात येणाऱ्या कॅन्सरमध्ये तिसरा सर्वात मोठा कॅन्सर आहे. ते सांगतात, कोलोरेक्टल कॅन्सरपैकी 40 टक्के प्रमाण या कॅन्सरचं असतं.
यापैकी बहुतांश रुग्णांमध्ये सिगारेट ओढणं, चुकीची आहार पद्धती, दारू पिणं, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा या गोष्टी दिसल्याचं ते सांगतात. भारतामध्येही गेल्या दशकभरापासून पन्नाशी उलटललेल्या आणि पन्नाशीच्या आतल्याही लोकांमध्ये या आजाराचं प्रमाण वाढताना दिसत आहे. योग्य वेळेत निदान, उपचार केले तर यामुळे होणारे मृत्यू टाळता येतील."
मूळव्याध आणि गुदाशयाचा कॅन्सर यात काय फरक आहे?
मूळव्याध आणि गुदाशयाच्या कॅन्सरमध्ये कधीकधी गल्लत होण्याची शक्यता असते. हे आजार वेगवेगळे आहेत. मूळव्याधात गुदद्वाराच्या रक्तवाहिन्यांना सूज येते.
मात्र गुदाशयाच्या कॅन्सरमध्ये घट्टसर गाठ असते आणि ती पसरत जाते. मात्र योग्यवेळी निदान न झाल्यास याचा त्रास वाढतो. सुरुवातीच्या काळातच त्याची तपासणी आणि निदान होणं आवश्यक आहे.
गुदाशयाच्या कर्करोगाची लक्षणं
गुदाशयाच्या कॅन्सरच्या लक्षणांबाबत नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल येथे कार्यरत असणारे कॅन्सरतज्ज्ञ डॉ. राजेश शिंदे यांनी अधिक माहिती दिली.
ते सांगतात, "गुदाशयातून रक्तस्राव होणं, शौचामधून रक्त पडणं. मलत्यागाच्या सवयीत बदल होणं, कधी बद्धकोष्ठता तर कधी डायरिया असे बदल होणं. विष्ठेचा आकार बारीक होणं, अचानक कोणत्याही कारणाविना वजन कमी होणं. दमल्यासारखं वाटणं, दौर्बल्य अशी लक्षणं दिसणं. पोट साफ झाल्याशिवाय बरं वाटणार नाही असं वाचत राहाणं, पोटात सतत हालचाल सुरू आहे असं वाटणं, गुदद्वाराजवळ दुखणं अशी लक्षणं दिसतात."
डॉ. राजेश शिंदे सांगतात, "सुरुवातीची लक्षणं सौम्य असू शकतात किंवा ती मूळव्याधाची आहेत असं वाटू शकतं. मात्र यासाठीच योग्यवेळेत तपासणी व निदान होणं आवश्यक आहे."
डॉ. शिंदे सांगतात, "या कॅन्सरचं निदान करण्यासाठी रुग्णालयात तपासणी करणं आवश्यक आहे. यात डिजिटल रेक्टल एक्झामचा समावेश असतो. गुदाशयाची कोलोनोस्कोपी केली जाते तसेच तेथील उती तपासणीसाठी काढली जातात.
याशिवाय एमआरआय, सीटी स्कॅन, अल्ट्रासाऊंड या साधनांचा वापर केला जातो. तसेच रक्ताची चाचणीही करावी लागते. यामधून कॅन्सरचं प्रमाण किती आहे, तो किती पसरला आहे याचीही माहिती तज्ज्ञ डॉक्टर घेतात."
गुदाशयाच्या कॅन्सरवर उपचार
या कॅन्सरचे उपचार तो कोणत्या टप्प्यावर आहे आणि कोठे आहे यानुसार बदलतात. शस्त्रक्रीया करणं, रेडिएशन, केमोथेरपी असे अनेक उपचार करण्याचा निर्णय डॉक्टर तपासणी करुन घेतात.
हा कॅन्सर पसरू शकतो. डॉ. मनोज मूलचंदानी सांगतात, "हा कॅन्सर पसरला तर लसिका ग्रंथी म्हणजे लिंफनोड्सवर परिणाम होतो. यकृत, फुप्फुसं, पोटातल्या आतल्या अस्तरावरही त्याचा परिणाम होतो.
या टप्प्यावर लक्षणं नियंत्रित करणं यासाठी उपचार करावे लागतात. केमोथेरपी, लक्ष्यित म्हणजे टारगेटेड थेरपी यांचा यात समावेश असतो. काही केसेसमध्ये यकृत किंवा फुप्फुसावर शस्त्रक्रीयाही करावी लागते."
डॉ. मूलचंदानी सांगतात, 'रेक्टल कॅन्सर हा जीवावर बेतू शकतो. पण योग्यवेळेस म्हणजे सुरुवातीलाच त्याचं निदान झालं तर त्यावर उपचार करता येतात. मूळव्याध आणि हा कॅन्सर यातला फरक ओळखणं हा महत्त्वाचा भाग आहे.'
'गुदद्वारातून रक्त येणं, पचनामध्ये बिघाड होणं, कोणत्याही कारणाविना वजन कमी होणं अशी लक्षणं दिसल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे. पन्नाशी उलटल्यावर आरोग्याची नियमित तपासणी करुन घेणं आवश्यक आहे आणि कॅन्सरबद्दल जागरुकरता निर्माण करणं गरजेचं आहे.'
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.
आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.