आधार कार्डमध्ये केले जाणार मोठे बदल, जाणून घ्या कसे असणार नवे कार्ड?

आधार कार्ड

फोटो स्रोत, ANI

आधार कार्ड सध्या सर्वत्र वापरलं जातं. ओळखपत्रापासून ते पत्त्याच्या पुराव्यापर्यंत त्याचा वापर होतो.

तुम्हाला कर्ज हवे असेल, पासपोर्ट काढायचा असेल किंवा पॅन कार्ड घ्यायचे असेल, आधार कार्ड सर्वत्र मागितले जाते. बहुतांश शालेय मुलांनाही त्यांचे आधार क्रमांक मिळाले आहेत.

मात्र आधारचा व्यापक प्रमाणात वापर होत असल्यामुळे त्याचा गैरवापरही होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

कारण यात व्यक्तीची ओळख, जन्मतारीख, पत्ता इत्यादी माहिती असते. हे टाळण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) नवीन ओळखपत्र आणण्याचा विचार करत आहे.

यामध्ये व्यक्तीचा पत्ता किंवा जन्मतारीख दाखवली जाणार नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, नवीन आधार कार्डमध्ये फक्त फोटो आणि QR कोड दिला जाईल. म्हणजेच 12 अंकी आधार क्रमांकही छापला जाणार नाही.

आधारमधील नवीन बदल आणि दुरुस्त्यांची माहिती आपण जाणून घेऊयात.

आधारमध्ये कोणते बदल होणार?

आधार कार्डमध्ये मोठे बदल, जाणून घ्या नवीन कार्ड कसे बनवले जाईल?

फोटो स्रोत, Getty Images

UIDAI चे सीईओ भूवनेश कुमार यांनी अलीकडेच एका ऑनलाइन परिषदेत सांगितले की, ते डिसेंबरपासून नवीन नियम आणण्याचा विचार करत आहेत.

याचा उद्देश आधारची ऑफलाइन पडताळणी कमी करणे हा आहे. विशेषतः हॉटेल्स आणि इव्हेंट आयोजकांकडून होणारी ऑफलाइन पडताळणी कमी करण्याची योजना आहे.

जर आधारची पडताळणी ऑनलाइन झाली तर व्यक्तीच्या ओळखीची गोपनीयता राखली जाईल.

ते म्हणाले, "आधार कार्डवर कोणती माहिती असावी याबाबत विचार सुरू आहे. त्यावर फक्त फोटो आणि QR कोड असावा.

जर आपण (इतर माहितीची) छपाई सुरू ठेवली तर लोक छापलेल्या माहितीसह कार्ड स्वीकारत राहतील. त्यामुळे ज्यांना त्याचा गैरवापर करायचा आहे ते करत राहतील."

(हे थांबवण्यासाठी नवे बदल करण्यात येत आहेत.)

आधार प्रमाणीकरणासाठी नवीन ॲप

सध्याच्या आधार कायद्यानुसार, ऑफलाइन पडताळणीसाठी आधार क्रमांक किंवा बायोमेट्रिक माहिती गोळा करणे, वापरणे किंवा साठवणे याला बंदी करण्यात आली आहे.

आधार कार्डमध्ये मोठे बदल, जाणून घ्या नवीन कार्ड कसे बनवले जाईल?

फोटो स्रोत, Getty Images

तरीही अनेक ठिकाणी तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत ठेवली जाते. उदाहरणार्थ, हॉटेलमध्ये चेक-इन करताना सर्व पाहुण्यांच्या आधार कार्डची फोटोकॉपी घेतली जाते आणि जतन केली जाते. अशा प्रकारे आधार क्रमांक आणि माहिती साठवली जाते.

आता आधारच्या कागदी प्रतींची ऑफलाइन पडताळणी कमी करण्यासाठी नवीन नियम येऊ शकतो.

हा प्रस्ताव 1 डिसेंबरला पुनरावलोकनासाठी ठेवला आहे.

आधार प्रमाणीकरणासाठी नवीन ॲप

फोटो स्रोत, Getty Images

UIDAI चे सीईओ भूवनेश कुमार यांनी असेही सांगितले की, आधार कधीही दस्तऐवज म्हणून वापरू नये.

त्याचे प्रमाणीकरण फक्त आधार क्रमांकाद्वारे किंवा QR कोडद्वारे पडताळणी करून करावे. अन्यथा ते बनावट दस्तऐवज ठरू शकते.

नवीन आधार ॲपची वैशिष्ट्ये काय?

UIDAI ने नवीन आधार ॲपही सुरू केले आहे, ज्याद्वारे पत्त्याचा पुरावा अपडेट करता येईल, मोबाईल नसलेल्या कुटुंबातील सदस्यांना जोडता येईल आणि फेस ऑथेंटिकेशन फीचरद्वारे मोबाईल क्रमांक अपडेट करता येईल.

पुढच्या काळात हे आधार ॲप चित्रपटगृहात प्रवेश, कोणत्याही कार्यक्रमात प्रवेश, हॉटेलमध्ये चेक-इन, विद्यार्थ्यांची पडताळणी आणि निवासी सोसायटीत प्रवेश यासाठीही वापरले जाऊ शकते.

आधार नेमका कशाचा पुरावा?

आधार कोणत्या गोष्टीचा पुरावा आहे? याबाबत अनेक लोक गोंधळलेले आहेत.

खरं तर, आधार हा फक्त ओळखीचा पुरावा आहे. तो नागरिकत्वाचा पुरावा मानला जात नाही, तसेच जन्मतारखेचा पुरावाही नाही.

अलीकडेच निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की फक्त आधारच्या आधारे मतदार यादीत नागरिक म्हणून नाव जोडता येणार नाही.

तसेच, आधार हा पत्त्याचा पुरावा नाही. त्याऐवजी पासपोर्ट, वीज बिल, बँक स्टेटमेंट, भाडेकरार हे पत्त्याचा पुरावा म्हणून मानले जातात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.