AI वापरून 'फेक आयडेंटिटी स्कॅम : तुमच्या ओळखीचा गैरवापर कसा टाळाल?

फोटो स्रोत, Maharashtra Cyber/Getty Images
- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आधुनिक तंत्रज्ञानामुळे डिजिटल युगातलं आपलं आयुष्य जसं दिवसेंदिवस सोपं होत चाललंय, तसंच ते आव्हानात्मकही होत चाललं आहे.
कारण या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांची प्रकरणं आणि त्यांचे नवे नवे प्रकार सतत कानावर येत असतात.
यामुळे अनेकांना मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान यांचा सामना करावा तर लागतोच, पण आता त्याच्या जोडीला तंत्रज्ञानाचा गैरवापर करणाऱ्यांमुळे वैयक्तिक आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत ही प्रश्न निर्माण झाले आहेत.
अलीकडच्याच काळात चॅट जीपीटी आणि इतर एआय मॉडेल्सच्या मदतीनं बनावट कागदपत्रं, विशेषतः आधार आणि पॅन कार्ड सहज तयार करता येत असल्याची धक्कादायक प्रकरणं समोर आली आहेत.
एआय टूल्सचा वापर करून तयार केलेलं आधार आणि पॅन कार्ड अगदी खऱ्यासारखं दिसतं. कारण आता एआयचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे फोटो, चित्रं सहज तयार करता येतात.
म्हणजेच एकप्रकारे सायबर गुन्हेगार तुमची व्हच्युअल आयडेंटिटी किंवा ओळख चोरून त्याचा गैरवापर करत आहेत.
यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की, विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असलेल्या एआय टूल्स आणि डीपफेक या शक्तिशाली साधनाच्या वाढत्या वापरामुळे, आयडेंटिटी थेप्ट म्हणजेच ओळख चोरी सहज शक्य झाली आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं नवा धोका निर्माण झाला आहे.
खरंतर आधार कार्ड आणि पॅन कार्डचा भारतीय नागरिकांच्या महत्त्वाच्या ओळखपत्रांमध्ये समावेश होतो.
त्यामुळे ओळख चोरी करून गुन्हेगारांना आर्थिक फसवणूक तर करता येईलच, पण या बनावट ओळखपत्रांचा वापर करून गुन्हेगारी टोळ्या, दहशतवादी संघटना आणि शत्रूराष्ट्रं या तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक स्थैर्य उद्ध्वस्त करण्यासाठी देखील करू शकतात.
आधार कार्ड भारत सरकारच्या 'युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया' (UIDAI) द्वारा दिलं जातं.
तर पॅन कार्ड आयकर विभागाद्वारे दिलं जातं. पण एआयचा वापर करून इतकी हुबेहुब बनावट कागदपत्रं तयार केली जातात, की बनावट आणि खऱ्या कागदपत्रांमध्ये फरक करणं अवघड होत आहे. कोणीही सहज याला बळी पडू शकतं.

त्यामुळेच नागरिकांना पोलीस खात्याच्या सायबर क्राइम विभागानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
शिवाय आपण काय काय काळजी घ्यायला हवी, एखादं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड बनावट आहे की नाही हे कसं ओळखावं, याबाबत सायबर क्राईम विभागाच्या वतीनं काही सूचना देण्यात आल्या आहेत.
तसंच, बनावट ओळखपत्रांसंबंधित जागरूकता वाढवणं, त्याचे धोके आणि परिणाम तसेच कागदपत्रांची पडताळणी आणि कायदेशीर कारवाईचं महत्त्व देखील सायबर क्राईम विभागाच्या वतीनं अधोरेखित करण्यात आलं आहे.
तुमची ओळख चोरण्याचे धोके काय?
गुन्हेगार एआय, डीपफेक, टेम्पलेट एडिटिंग आणि बनावट क्यूआर कोडचा वापर करून तुमचं बनावट ओळखपत्र तयार करू शकतात. या बनावट ओळखपत्रांवरील नावं, क्रमांक आणि डिझाइन खऱ्या ओळखपत्रांसारखेच दिसतात.
या बनावट कागदपत्रांचा वापर बँकेत खातं उघडण्यासाठी, कर्ज मिळवण्यासाठी तसेच मनी लाँडरिंग यांसारखे आर्थिक गुन्हे करण्यासाठी केला जाऊ शकतो.
ओळख चोरी करून त्यातील वैयक्तिक माहितीचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे करण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच बेकायदेशीरपणे सरकारी लाभ मिळवण्यासाठीही अशाप्रकारचा दावा केला जाऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
एआय टूल्स तसेच डीपफेकचा वापर करून, आधार किंवा पॅन कार्डवरील फोटो बदलता येतात, यामुळे तुमचा कार्ड नंबर आणि नावांचा वापर गुन्हेगार स्वतःच्या फायद्यासाठी करू शकतात.
यामुळे तुम्हाला वैयक्तिक आणि राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात गंभीर संकटाचा सामना करावा लागू शकतो.
एआय टूल्स आणि qrcode, segno यांसारख्या पायथॉन लायब्ररीचा वापर करून, खोटे क्यूआर कोड तयार करता येतात, जे खऱ्यासारखे दिसतात.
यामुळे माहितीत फेरफार करणं किंवा बनावट युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया' (UIDAI) वेबसाइट्स बनवणं शक्य होतं.
यामुळे फसवणूक करताना व्हेरिफिकेशन करणारी प्रोसेस म्हणजेच पडताळणी करणाऱ्या प्रक्रियेतून गुन्हेगारांना सहज निसटता येणं शक्य होतं.
हे धोके टाळण्यासाठी काय कराल?
आधार आणि पॅन कार्डवरील तपशीलाची पडताळणी करण्यासाठी नेहमी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ( UIDAI)/नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा.
फोटो किंवा क्यूआर कोड स्कॅन करून किंवा डिजिटल स्वाक्षरी करून आधार आणि पॅन कार्डवरील तपशीलाची पडताळणी करणं टाळा.
तुम्हाला कोणी आधार किंवा पॅन कार्डचा फोटो शेअर करत असेल, तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. ते बनावट असू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
तसेच तुम्हाला संशय आला तर अधिकृत सरकारी वेबसाईटवर जाऊन त्या ओळखपत्राची माहिती तपासून घेऊ शकता.
तुमची स्वतःची महत्त्वाची कागदपत्रं कोणालाही सहजपणे देऊ नका, त्यांचे फोटोही सोशल मीडियावर टाकू नका. त्याचा गैरवापर होऊ शकतो, म्हणून बनावट ओळखपत्रांबाबत सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
बनावट ओळखपत्रांवरील कृत्रिम प्रतिमा, अक्षरांचा चुकीचा फॉन्ट ओळखण्यासाठी असलेल्या खास एआय टूल्सचा वापर करा.
एआय आधारित बनावट ओळखपत्र ओळखण्यासाठी बँक कर्मचारी, पोलिसांना प्रशिक्षण द्यायला हवं.
बनावट ओळखपत्र कसं ओळखायचं?
एआयनं बनवलेलं आधार आणि पॅन कार्ड हे अगदी खऱ्यासारखंच दिसतं. पण तरी काही गोष्टींची बारीक निरिक्षण केलं तर खऱ्या खोट्या ओळखपत्रातील फरक लक्षात येऊ शकतो.
सगळ्यात आधी आधार कार्ड आणि पॅन कार्डवरील फोटो तपासून घ्या. कारण खऱ्या फोटोआणि एआयनं बनवलेल्या फोटोमध्ये अगदी थोडा फरक आढळून येऊ शकतो.
त्यासाठी तुम्हाला बारीक निरिक्षण करावं लागेल. कारण हा फरक सुद्धा सहज लक्षात येईलच असं नाही किंवा कदाचित बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्डवरील फोटो अगदीच वेगळा असण्याची ही शक्यता असू शकते.
आधार कार्ड आणि पॅन कार्डवर भारत सरकारचा लोगो असतो, तो तपासून घ्या. एआयच्या मदतीनं बनवलेल्या कार्डवर वेगळा लोगो असू शकतो किंवा खऱ्या लोगोमध्ये काहीसा फरक असलेला बनावट लोगो असू शकतो.
जसं की लोगोचं डिझाइन, रंग, लोगोवरील अक्षरं, अक्षरांचा रंग असे काही बदल आढळून येऊ शकतात.

फोटो स्रोत, Maharashtra Cyber/Getty Images
आधार कार्ड आणि पॅन कार्डवर क्यूआर कोड देखील तुम्ही पाहिला असेल. तो स्कॅन करून तो काय माहिती देतोय किंवा माहिती देतोय का नाही हे तपासून पहा.
आधार कार्ड आणि पॅन कार्डवर असलेल्या हिंदी आणि इंग्रजी अक्षरांच्या फॉन्टच्या प्रकारात फरक असू शकतो. एआयच्या मदतीनं तयार केलेल्या कार्डवरील अक्षरं थोडी वेगळी दिसू शकतात.
आधार कार्ड आणि पॅन कार्डवर दिलेले स्वल्पविराम, अर्धविराम, वेगवेगळ्या रेषा योग्य ठिकाणी आणि योग्य रंगात-आकारात आहेत का ते तपासून घ्या.
कारण बनावट कार्डमध्ये ती चुकीच्या ठिकाणी वापरलेली असू शकतात.
(स्रोत : Maharashtra Cyber)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











