Eng vs Pak: पाकिस्तान दौऱ्यावर आलेले इंग्लडचे 14 खेळाडू मॅचच्या 24 तास आधी पडले आजारी

पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये होणारी बहुप्रतिक्षित क्रिकेट टेस्ट सीरिज आता पुन्हा एकदा अडचणीत आली होती.

आधी सुरक्षेच्या कारणास्तव ही सीरिज होऊ शकली नव्हती. आता पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या टीममधले तब्बल 14 जण आजारी पडले आहेत. आजारी पडलेल्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमध्ये कप्तान बेन स्टोक्सचासुद्धा समावेश आहे.

सर्व आजारी लोकांना त्यांच्या हॉटेलमध्येच विंश्राती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

फक्त हॅरी ब्रुक, झॅक क्राउली, केटॉन जेनिंग, ओली पोप आणि जो रूट हे पाच जण फिट आहेत.

गुरुवारी म्हणजे उद्यापासून पहिली टेस्ट सुरू होणार आहे पण खेळाडू आजारी असल्यास ही टेस्ट पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

पण आजारी पडलेल्या खेळाडूंना कोव्हिडची लक्षणं नाहीत. ते 24 तासांमध्ये बरे होतील, असं सांगण्यात आलं आहे.

वर्ल्डकपसाठी तयारी म्हणून खेळवण्यात आलेली मालिका इंग्लंड क्रिकेट संघाच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे.

पाकिस्तानचे खेळाडू, त्यांच्या खेळातले कच्चे दुवे, त्यांची रणनीती हे समजून घेण्यासाठी इंग्लंडला ही मालिका अतिशय उपयोगाची ठरली.

वर्ल्डकप फायनलच्या मुकाबल्यात इंग्लंड आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने होते. पाकिस्तान संघाची इत्यंभूत माहिती घेऊन आलेल्या इंग्लंडने या माहितीला जागत खेळ केला आणि दुसऱ्यांदा ट्वेन्टी20 वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं.

काय घडलं होतं तेव्हा?

सप्टेंबर 2021- इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पुरुष आणि महिला संघाचा पाकिस्तान दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द केला. त्याआधी तीन दिवस न्यूझीलंड संघानेही पाकिस्तान संघाचा रद्द करत असल्याची घोषणा केली होती.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद पाकिस्तानमध्ये उमटले होते. खेळाडू, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि चाहते यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे खेळाडूंची सुरक्षा हेच सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ईसीबीने म्हटलं.

कोरोना काळात खेळाडूंना प्रदीर्घ काळ बबलमध्ये राहून खेळावं लागलं. त्याचा ताण त्यांच्यावर होता. सुदैवाने आता तो धोका कमी झाला आहे. या दौऱ्यासाठी त्यांच्यावर सुरक्षेचा ताण टाकायचा नाहीये, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं. आमच्या या निर्णयाचा फटका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बसणार आहे. चाहते नाराज होणार आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूंना घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार नाही.

आम्ही या सगळ्यासाठी दिलगीर आहोत. भविष्यात आम्ही नक्कीच पाकिस्तानचा दौरा करू, असं इसीबीने आपल्या पत्रकात म्हटलं.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीज राजा यांनीही इसीबीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी रोष व्यक्त केला होता

सप्टेंबर 2022- इंग्लंड क्रिकेट संघ सात सामन्यांच्या ट्वेन्टी20 मालिकेसाठी पाकिस्तानात दाखल झाला. अभूतपूर्व सुरक्षा यंत्रणेत त्यांचं स्वागत झालं. विदेशी राष्ट्राध्यक्षाला जी सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात येते तशी सुरक्षा इंग्लंडच्या संघाला देण्यात आली. सर्वसाधारणपणे दोन संघांदरम्यान दोन किंवा तीन सामन्यांची ट्वेन्टी-20 मालिका खेळवण्यात येते पण आगामी वर्ल्डकप लक्षात घेऊन 7 सामन्यांची मालिका खेळवण्यात आली.

कराची आणि लाहोर या दोन्ही ठिकाणी चाहत्यांच्या भरघोस प्रतिसादात सामने झाले.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या मालिकेत पाहुण्या इंग्लंड संघाने 4-3 अशी बाजी मारली.

आयोन मॉर्गन निवृत्त झाल्यामुळे संघात स्थान मिळालेल्या हॅरी ब्रूकला मालिकावीर पुरस्कराने गौरवण्यात आलं.

दुखापतीमुळे जोस बटलर मालिकेत एकही सामना खेळू शकला नाही, त्याच्या अनुपस्थितीत मोईन अलीने संघाचं नेतृत्व केलं. वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी उत्तम रंगीत तालीम झाली. योगायोग म्हणजे वर्ल्डकप फायनलमध्ये आता हेच दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)