You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'या' 5 कारणांमुळे टीम इंडियावर पराभवाची नामुष्की
गेल्या वर्षी युएईत झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान जोडीने भारतीय आक्रमणाची हवाच काढून टाकली. शब्दश: त्याच धर्तीवर अलेक्स हेल्स आणि जोस बटलर जोडीने भारतीय बॉलर्सवर तुटून पडले.
बटलर-हेल्स जोडीच्या झंझावाताच्या बळावर इंग्लंडने भारतावर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत फायनल गाठली.
फायनलमध्ये रविवारी इंग्लंड आणि पाकिस्तान आमनेसामने असतील. भारतीय संघ या लढतीत नेमका कुठे कमी पडला याचा घेतलेला आढावा.
1. रोहित-राहुलचा खराब फॉर्म
कर्णधार रोहित शर्मा आणि के.एल.राहुल यांचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी निराशाजनक ठरला. स्ट्राईकरेटच्या मुद्यावरून राहुलच्या खेळावर सातत्याने टीका होत होती.
भारतीय संघाने राहुलचा बचाव केला. राहुलऐवजी पर्यायी सलामीवीराचा विचार भारतीय संघाने केलाच नाही. राहुलऐवजी विशेषज्ञ सलामीवीर भारतीय संघाकडे नव्हता ही गोष्टही अधोरेखित झाली.
पॉवरप्लेच्या ओव्हर्समध्ये जोरदार आक्रमण करण्याऐवजी टुकटुक खेळासाठी राहुलवर सोशल प्रचंड टीकेला सामोरं जावं लागत होतं. बांगलादेशविरुद्ध राहुलने अर्धशतक झळकावलं पण मोठ्या लढतीत अपयशी होण्याची परंपरा राहुलने कायम राखली.
सेमी फायनलच्या लढतीत राहुल 5 रन्स करून तंबूत परतला. 2019 वर्ल्डकपमध्ये रोहितने 5 शतकांची पखरण केली होती. मात्र या वर्ल्डकपमध्ये रोहितला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
रोहितची स्पर्धेतली कामगिरी 4, 53, 15, 2, 15, 27 अशी झाली आहे. रोहितला अनुनभवी नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक झळकावता आलं.
वर्ल्डकपसारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धेत दोन्ही सलामीवीर अपेक्षित सलामी देऊ न शकल्याने मिडल ऑर्डरवरचं दडपण वाढलं. राहुलच्या संथ खेळामुळे रोहितवर एका बाजूने टिकून राहत खेळण्याचं दडपण वाढलं.
2. कर्मठ संघरचना
भारतीय संघाने विशेषज्ञ खेळाडूंवर नेहमीच विश्वास ठेवला. भारतीय बॅट्समनपैकी राहुल, रोहित, विराट, सूर्या हे बॉलिंग करत नाहीत तर भुवी, शमी, अर्शदीप, चहल हे बॅटिंग करत नाहीत.
बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळण्याची क्षमता हार्दिकने दाखवली.
अक्षर आणि अश्विन हे प्रमुख फिरकीपटू आहेत पण त्यांच्या बॅटिंगकडूनही मोठ्या अपेक्षा ठेवता येत नाहीत.
एखाद्या बॉलरचा वाईट दिवस असेल तर संघासाठी पर्याय असणं चांगलं असतं तसंच ट्वेन्टी20 सारख्या वेगवान प्रकारात जेवढे जास्त बॅट्समन संघात असतील तेवढं फायदेशीर असतं.
भारतीय संघाने काहीशा कर्मठ संघरचनेवर विश्वास ठेवला
3. अक्षर पटेलचा समावेश?
संपूर्ण स्पर्धेत अक्षर पटेलला पुरेशी बॉलिंग करता आली नाही, बॅटिंगची वेळ फारशी आलीच नाही. अक्षरच्या बॉलिंगवर सातत्याने आक्रमण केलं गेलं.
अक्षरऐवजी एखादा अतिरिक्त बॅट्समन किंवा अतिरिक्त बॉलर खेळवता आला असता. अक्षरऐवजी लेगस्पिनर युझवेंद्र चहल किंवा हर्षल पटेलला खेळवण्याची मागणी होत होती.
भारतीय संघाने अक्षरवरच विश्वास ठेवला पण सेमी फायनलच्या लढतीत इंग्लंडने सगळ्याच बॉलर्सना निष्प्रभ ठरवलं.
4. दडपण हाताळण्यात अपयशी
आयसीसी स्पर्धांमध्ये 2013 नंतर अपयशाची परंपरा कायम राहिली. सामन्यानंतर बोलताना रोहित शर्माने या मुद्यावर बोट ठेवलं.
नॉकआऊट सामन्यात दडपण हाताळण्यात आम्ही कमी पडलो असं रोहित शर्माने सांगितलं.
सेमी फायनलच्या लढतीत ज्या पद्धतीने आम्ही बॉलिंगची सुरुवात केली त्यातून आम्ही दडपणाखाली असल्याचं स्पष्ट झालं.
हे सगळे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. तिथे त्यांना दडपणाखाली खेळण्याचा सराव आहे. पण आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांना त्या पद्धतीने खेळता येत नाही.
5. पॉवरप्लेत फ्लॉप
बॅटिंग आणि बॉलिंग करताना पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त रन्स करणं आणि जास्तीत जास्त विकेट्स घेणं आवश्यक असतं.
भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये 38 रन्स केल्या तर इंग्लंडने एकही विकेट न गमावता 63 रन्स चोपल्या. भारतीय संघाने बॉलिंग करताना पॉवरप्लेमध्येच मॅच गमावली.
पॉवरप्लेमध्ये विकेट्स पटकावल्या तर प्रतिस्पर्धी संघावर दडपण येतं. सेमी फायनलच्या लढतीत तसं काहीही झालं नाही. बटलर-हेल्स जोडीला रोखण्यासाठी भारतीय संघाकडे काहीही उत्तर नव्हतं.