आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकरी जाईल अशी भीती तुम्हाला वाटते का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जॉसी कॉक्स
- Role, बीबीसी वर्कलाइफ
क्लेअर ही एका पीआर मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्ममध्ये गेल्या सहा वर्षांपासून लंडनमध्ये काम करते. ती 34 वर्षांची आहे, तिचं काम उत्तमरित्या सुरू आहे, तिला ते आवडतं आणि पगारदेखील चांगला आहे. पण गेल्या सहा महिन्यांपासून तिला एक चिंता सतावते आहे. करिअरचं काय होईल याची तिला काळजी लागली आहे. याचं कारण आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स.
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपली नोकरी जाणार, करिअरमध्ये आपली प्रगती होणार नाही अशी चिंता अनेकांना भेडसावत आहे. त्यापैकी क्लेअरदेखील एक आहे.
ती सांगते की मला नाही वाटत की मी ज्या प्रकारचं काम करू शकते, माझ्या कामाची गुणवत्ता जशी आहे त्या प्रकारचं काम एखाद्या मशीनकडून यावेळी करून घेता येईल.
पुढे ती म्हणते की पण मला हे देखील वाटतं की चॅटजीपीटीने काहीच काळात किती भरपूर प्रगती साधली आहे. त्याचं मला आश्चर्य वाटतं. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे.
थोड्या वर्षांचा अवधी आणि मला तर हे निश्चितपणे वाटतं की सध्या ज्या प्रकारचं काम मी करते त्याच प्रकारचं काम बॉट करू शकेल. अगदी जसं मी करते तसं. आणि यामुळे माझ्या जॉबचं काय होईल याचा विचार केला की पोटात गोळा उठतो.
गेल्या काही वर्षांत अशा अनेक बातम्या आल्या आहेत ज्यात असं लिहिलं आहे की रोबोनी मानवाची अनेक कामं चोरली आहेत. आणि चॅटजीपीटी सारखं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं टुल्सचा वापर अधिक सुलभ झाला आहे.
यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या मनात अशी चिंता आहे की त्यांच्या नोकरीचं काय होणार. त्यांनी अशा प्रकारची चिंता व्यक्त केल्याची देखील अनेक उदाहरणं आहेत. आपली कौशल्यं ही काळानुसार प्रासंगिक राहतील की नाही, येत्या काही वर्षांत नोकरीच्या बाजारात आपल्या कौशल्यांना काही किंमत राहील की नाही याची चिंता त्यांना भेडसावत आहे.
मार्च महिन्यात गोल्डमन सॅक्सने एक अहवाल प्रकाशित केला होता त्यात त्यांनी म्हटलं होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अंदाजे 30 कोटी पूर्ण वेळ नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.

PwC या संस्थेनी एक सर्व्हे प्रसिद्ध केला होता. त्यात त्यांनी सांगितलं की त्यांनी प्रश्न विचारलेल्या तीन पैकी एका व्यक्तीने असं उत्तर दिलं आहे, त्यांना अशी भीती वाटते की येत्या तीन वर्षांत त्यांच्या कामाच्या जागी एखादं प्रगत तंत्रज्ञान येईल आणि त्यानंतर ते बेरोजगार होतील.
'क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करणारे अनेक लोक चिंतेत आहेत,' असं 29 वर्षीय एलिस मार्शल सांगते. एलिस ब्रिस्टल शहरात कॉपीराइटरचे काम करते. ती म्हणते मी फक्त अशी अपेक्षा करू शकते की आमच्या कामाची कदर आमच्या क्लायंट्सनी करावी. त्यांच्या हे लक्षात यावं की आमचं काम हे आर्टिफिशिएल इंटेलिजन्स टुलच्या तुलनेत मिळणाऱ्या कामाहून अधिक अस्सल आहे.
या घडीला करिअर सल्लागार आणि मनुष्यबळ तज्ज्ञ सांगतात की काही प्रमाणात या गोष्टीबद्दल चिंता करणे योग्य आह पण कर्मचाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की सध्या आपलं ज्या गोष्टीवर नियंत्रण आहे त्या गोष्टींवरच आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
आपल्याला आपली नोकरी तंत्रज्ञानामुळे गमावावी लागेल असा विचार करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी नवीन काही शिकण्यावर भर द्यावा. तंत्रज्ञानाच्या पावलांशी पावलं मिळवून चालण्याचा प्रयत्न करण्यावर त्यांनी आपली ऊर्जा खर्च करावी.
जर येणारं तंत्रज्ञान हे आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरेल, या तंत्रज्ञानामुळे काम अधिक सोपं होईल असा विचार जर तुम्ही केला तर येत्या काळासाठी तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध राहतील आणि तुमची चिंता कमी होईल असं तज्ज्ञ सांगतात.
अज्ञाताचे भय
काही जणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स टुल्सची भीती अधिक प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी या टुल्सचा उद्रेक हा तीव्रगतीने झालाय.
ओपन एआय कंपनीचे चॅटजीपीटी रातोरात पसरले आणि त्याच्या स्पर्धेत अनेक टुल्स पण आले. एकप्रकारे ही जणू शस्त्रास्त्रांचीच स्पर्धा आहे. त्यातून कर्मचाऱ्यांच्या मनात भीतीचं आणि अनिश्चतेचं वातावरण निर्माण झालंय.

फोटो स्रोत, Getty Images
कॅरोलिन मॉन्ट्रोज या करिअर कोच आणि न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. त्या ही गोष्ट कबूल करतात की अतिशय वेगानं विकसित होणारं तंत्रज्ञान भीतीदायक वाटू शकतं.
त्या सांगतात की "आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल वाटणारी भीती ही साहजिक आहे. कारण या तंत्रज्ञानाची उत्क्रांती ही अत्यंत प्रवाही आहे आणि ते कसं वापरलं जाऊ शकतं याबद्दल अनभिज्ञता आहे."
पण तंत्रज्ञान कितीही जरी प्रवाही असलं तरी कर्मचाऱ्यांनी आपल्या अस्तित्वालाच धक्का पोहचेल अशी भीती बाळगणं योग्य नाही. एखाद्या गोष्टीविषयी नेमकी किती चिंता करायची याचा निर्णय घेण्याची शक्ती त्यांच्याच हातात आहे. एकतर ते या गोष्टीची चिंता करत बसू शकतात किंवा नवीन गोष्टी शिकून त्याचा आपल्या फायद्यासाठी काय उपयोग होईल याचा ते विचार करू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
PwC चे स्कॉट लायकेन्स हे तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानातील होणारे बदल या संबंधांचा अभ्यास करतात. ते सुद्धा कॅरोलिन यांच्याप्रमाणेच तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचा सल्ला देतात. तंत्रज्ञानाने हे आपल्याला वेळोवेळी दाखवून दिलं आहे की प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर काम करण्याच्या पद्धतीत बदल होतो.
मनुष्यबळावरील अवलंबित्व कमी होतं. पण जर योग्य कौशल्यं असतील तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच आपण आपली प्रगती देखील साधू शकतो हे देखील तितकंच खरं आहे.
पुढे ते सांगतात की आर्टिफिशिएल इंटेलिजन्सबाबत मनातील चिंतेचं धुकं कमी करायचं असेल तर कर्मचाऱ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे. शिक्षण आणि प्रशिक्षणातून कर्मचाऱ्यांना आर्टिफिशिएल इंटेलिजन्स आत्मसात करता येऊ शकतं.
नवीन तंत्रज्ञानामुळे आपल्या कामावर काय परिणाम होईल याचा अंदाज घेऊन नवीन कौशल्य आत्मसात करावं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून दूर पळण्याऐवजी याचे स्वागत करून कर्मचाऱ्यांनी आपल्याला अधिक काळानुरूप बनवावे.

फोटो स्रोत, Getty Images
लायकेन्स पुढे सांगतात ही काही पहिलीच वेळ नाहीये जेव्हा आपण मोठ्या औद्योगिक बदलाला सामोरं जात आहोत. यांत्रिकीकरण आणि उत्पादन, असो की इ कॉमर्स आणि रिटेल व्यवसाय असो, आपण बदलाला सामोरं गेलो आहोत. नव्या गोष्टींशी कसं जुळवून घ्यायचं हे आपण शिकलो आहोत.
नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे काही लोकांच्या उत्साहावर विरजण पडतं पण कॅरोलिन माँट्रोज सांगतात पण भूतकाळाकडे पाहिलं तर तंत्रज्ञानाच्या बदलामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडल्याचं दिसतं. यामुळे समाजाची प्रगती होते.
माँट्रोज सांगतात की तुम्ही आर्टिफिशियल तंत्रज्ञानावर कशीही प्रतिक्रिया द्या पण हे तंत्रज्ञान येणारच आहे, त्याला कुणी रोखू शकत नाही. आणि यामुळे तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास मदत होते. जर लोकांनी आपली कौशल्यं वाढवण्याचा विचार न करता आर्टिफिशिएल इंटेलिजन्सबद्दलची चिंता केली तर याचा त्रास त्यांनाच होईल.
काही प्रमाणात चिंता असणं हे ठीक आहे. पण आताच पॅनिक बटन दाबायची गरज नाही असं काही तज्ज्ञ म्हणतात. काही संशोधन असेही आहेत ज्यात त्यांनी हे सांगितलं की रोबोंच्या हाती मानवाच्या नोकऱ्या जाणं हे अतिशयोक्तिपूर्ण आहे.
मानवातील अद्भूत शक्ती
नोव्हेंबर 2022 मध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक एरिक डाहलिन यांनी एक संंशोधन प्रसिद्ध केले होते. ते अमेरिकेतील युटाह या ठिकाणी असलेल्या ब्रिगम यंग युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आहेत.
काही लोकांना वाटतं की अतिशय वेगाने रोबोंमुळे मानवाच्या नोकऱ्या जात आहे हा तर समज चुकीचाच आहे.
पण त्याच बरोबर लोक अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जाण्याचे प्रमाण आहे त्याबद्दल लोकांच्या मनात असलेली धारणा देखील चुकीची आहे.
त्यांच्या संशोधनातून त्यांना असं लक्षात आलं की 14 टक्के कर्मचाऱ्यांनी म्हटलं की त्यांची नोकरी रोबोमुळे जाऊ शकते. पण ज्यांच्या नोकऱ्या कधी तंत्रज्ञानाच्या बदलामुळे गेल्या किंवा ज्यांच्या गेल्या नाही अशा दोन्ही गटातील लोकांची भीती ही अवास्तवच होती.
त्यांच्या अभ्यासात त्यांना दिसलं की ज्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या नाहीत त्यांना जर विचारलं की तुम्हाला काय वाटतं तर वास्तविक जो आकडा नोकऱ्या जाण्याचे जे प्रमाण आहे त्या पेक्षा ते दुप्पट आकडा सांगताना दिसतात आणि ज्यांचा जॉब खरंच गेलाय तो हाच आकडा तिपटीने सांगतात.
थोडक्यात असे की प्रत्यक्ष जे प्रमाण आहे त्याहून अधिकच्या संख्येबद्दल बोलल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होतं.

फोटो स्रोत, Getty Images
डाहलिन सांगतात की काही नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो हे सत्य आहे. एखाद्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी केला जाऊ शकतो असं म्हटलं जात असलं तरी याचा अर्थ असा नाही के ते वापरलचं जाईल.
येत्या काळात असं थेट वर्गीकरण करता येणार नाही. की ही गोष्ट तंत्रज्ञानचलित आहे आणि ही मानवचलित. म्हणजे मानव आणि रोबो असं दोघांनी मिळूनच काम करावं लागेल असं स्टेफनी कोलमन सांगतता. EY या कन्सल्टन्सी फर्मच्या प्रमुख आहेत.
व्यवसायामध्ये मानवातील जे वैशिष्ट्यपूर्ण गुण आहेत त्यांचा समावेश करण्याकडे आपला भर असावा. हे काम तर रोबो करू शकत नाही. म्हणजे नातेसंबंधांमध्ये सुधारणा करणे, संरचनात्मक कार्य आणि भावनांक या गोष्टींवर भर द्यावा.
कोलमन सांगतात की असे गुण ओळखा जे मनुष्याला एखाद्या मशीनपासून वेगळं बनवतात. हे नव्या बदलाला सामोरं जाण्याचं आणि आपली तंत्रज्ञानाविषयी असलेली भीती घालवण्याचं पहिलं पाऊल ठरू शकतो.
आता पुन्हा क्लेअरकडे येऊ. या लेखाच्या सुरुवातीला तिने भीती व्यक्त केल्याचं तुम्हाला आठवत असेल. ती सांगते की मी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या क्षेत्रात काय बदल घडत आहेत यावर मी लक्ष ठेवून आहे. ती काही ऑनलाइन कोर्सेस पाहत आहे ज्यात तिला कोडिंग शिकता येऊ शकेल.
आणि ती तिच्या अनुभवाबद्दल सांगते, की "तंत्रज्ञानाचं नाव ऐकलं की मी घाबरून जायचे. म्हणून मी ते नेहमी टाळतच आले. पण आता जे अनुभवलं त्यावरून तर माझ्या लक्षात आलं की त्या गोष्टी टाळणं हा वेडेपणाच होता. आणि माझ्या लक्षात आलं की जर मी या गोष्टी शिकले तर नवीन जे काही येईल त्यातला बदल हा एकदम वेगळा वाटणार नाही. यामुळे नव्या तंत्रज्ञानाची भीती थोडी कमी झाली असं म्हणता येईल आणि कदाचित यामुळे मला फायदा देखील होईल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








