माजी खासदार प्रज्वल रेवन्नाला बलात्कार प्रकरणात जन्मठेप

या प्रकरणात, सरकारी वकिलांनी 1632 पानांचे आरोपपत्र सादर केले होते (फाइल फोटो)

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, या प्रकरणात, सरकारी वकिलांनी 1632 पानांचे आरोपपत्र सादर केले होते (फाइल फोटो)
    • Author, इमरान कुरैशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
    • Reporting from, बंगळुरू

भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि कर्नाटकातील हासन मतदारसंघाचे माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना शुक्रवारी (1 ऑगस्ट) बंगळुरूतील विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं आहे.

न्यायालयाने आज म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तसेच 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. याचप्रमाणे पीडित व्यक्तीस 7 लाख रुपयांना देण्याचे आदेश कोर्टाने दिले.

निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी संबंधित खटल्यांची सुनावणी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने एफआयआर दाखल झाल्यानंतर 14 महिन्यांनी हा निकाल दिला आहे.

प्रज्वल रेवन्नांविरुद्ध पहिला गुन्हा हसन जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच, कर्नाटकातील भाजपा-जेडीएस आघाडीचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्या कथित लैंगिक शोषणाच्या शेकडो व्हीडिओ क्लिप समोर आल्या होत्या.

ऐन निवडणुकीच्या काळात कर्नाटकातल्या या कथित 'सेक्स स्कँडल'नं खळबळ उडवून दिली होती.

प्रज्वल रेवन्नाशी संबंधित हे स्कँडल एका पेन ड्राईव्हद्वारे उघडकीस आणण्यात आलं होतं. याआधी कर्नाटकमधील निवडणुकांच्या इतिहासात एखाद्या कथित स्कॅंडलला या पद्धतीने उघड करण्यात आलं नव्हतं.

सोशल मीडियाच्या व्यासपीठांचा वापर करण्याऐवजी पेन ड्राईव्हचं वाटप बस स्टॉप, बागा, गावातील जत्रा आणि इतर काय थेट घरांमध्ये करण्याच्या पद्धतीमुळे प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते निराश झाले होते.

हासन लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी फक्त पाच दिवस राहिलेले असताना, पेन ड्राईव्ह अशा वेळी लोकांसमोर आणण्यात आले होते.

कर्नाटकातील मतदानाच्या पहिल्या टप्प्यात आणि देशातील मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या राज्यातील 14 जागांमध्ये हसन मतदारसंघाचा समावेश होता.

अझीम प्रेमजी विद्यापीठात पॉलिसी अँड गव्हर्नन्सचे प्राध्यापक असणारे नारायणा यांनी बीबीसीला सांगितलं, "भारतात तंत्रज्ञानाचा वापर करून पॉलिटिकल इनोवेशन करण्यामध्ये वाढ होते आहे. मात्र जे घडलं आहे ते एक राजकीय चातुर्य आहे. हे सर्व बहुधा, जून 2023 मध्ये माध्यम समूहांना व्हीडिओचा काही भाग दाखवण्यास अटकाव करण्यासाठी प्रज्वल रेवन्ना यांनी केलेल्या प्रयत्नांवर मात करण्यासाठी करण्यात आलं आहे."

शिक्षेची तरतूद

प्रज्वल रेवन्नाला भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत दोषी ठरवण्यात आलं आहे.

प्रज्वल रेवन्ना याला आयपीसीच्या कलम 376(2) नुसार (प्रभावशाली व्यक्तीकडून बलात्कार), कलम 376(2) (वारंवार बलात्कार), कलम 354(अ) (एखाद्या महिलेला निर्वस्त्र करण्याच्या हेतूने केलेला हल्ला किंवा बळाचा वापर), कलम 354 (सी) (एखाद्या महिलेच्या विनयशीलतेला लक्ष्य करणे किंवा खासगी क्षण चोरून बघणे), कलम 506 (पुरावे नष्ट करणे) यासह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं आहे.

विशेष सरकारी वकील बी. एन. जगदीश यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "या कलमांतर्गत गुन्ह्यांसाठी किमान 10 वर्षांपासून तर जन्मठेपेपर्यंत शिक्षा ठोठावली जाऊ शकते. कोर्ट अन्य काही पुराव्यांची तपासणी करून शिक्षा ठरवेल."

प्रज्वल रेवन्ना

फोटो स्रोत, Facebook

सरकारी वकिलांनी या प्रकरणात 1632 पानांचं आरोपपत्र, इलेक्ट्रॉनिक आणि गैर-इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील पुराव्यांसह 183 कागदपत्रं न्यायालयासमोर सादर केली होती. न्यायालयाने खटला दाखल करणाऱ्या पीडितेच्या कुटुंबासह 26 साक्षीदारांची तपासणी केली.

न्यायालयाने 2 मे 2025 रोजी या प्रकरणाची सुनावणी सुरु केली होती आणि प्रकरण पूर्ण होईपर्यंत दररोज बैठक घेतली.

न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांच्या माहितीनुसार, न्यायाधीशांनी निकाल जाहीर केल्यानंतर प्रज्वल रेवन्नाला न्यायालयातच रडू कोसळले.

प्रज्वल रेवन्नानं मांडली बाजू

कथित लैंगिक शोषण व्हीडिओ प्रकरणी कर्नाटकमधील हसन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांनी आपली बाजू मांडली होती.

प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक शोषण, शेकडो सेक्स व्हीडिओ रेकॉर्ड करणे, धमकावणे आणि कट रचण्याचे आरोप आहेत. अनेक व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्वल रेवन्ना हे जर्मनीला निघून गेल्याचं समोर आलं.

सोशल मीडियावर आपली बाजू मांडताना त्यांनी लिहिलं की, “चौकशीमध्ये सहभागी होण्यासाठी मी बंगळुरूमध्ये नाहीये. त्यामुळे मी माझ्या वकिलांमार्फत सीआयडी बंगळुरूच्या संपर्कात आहे. सत्य जे आहे ते लवकरच समोर येईल.”

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

जनता दलाचे (सेक्युलर) आमदार एचडी रेवन्ना आणि त्यांचे पुत्र प्रज्वल रेवन्ना यांना विशेष तपास पथकाने मंगळवारी (30 एप्रिल) नोटीस बजावली होती.

ही नोटीस कथित लैंगिक शोषण प्रकरणात बजावण्यात आली आहे. दोघांनाही एसआयटी समोर हजर होण्यासाठी सांगण्यात आलं आहे.

या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटी नेमली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, "हासन जिल्ह्यात अश्लील व्हीडिओ सर्वत्र पसरत आहेत. महिलांचं लैंगिक शोषण करण्याचा प्रकार घडला आहे असं दिसून आलं आहे."

एसआयटीचे प्रमुख कर्नाटकचे एडीजीपी बीके सिंह आहेत. बीके सिंह यांनी याआधी पत्रकार गौरी लंकेश आणि सामाजिक कार्यकर्ते एमएम कलबुर्गी यांच्या हत्यांच्या तपासाचं नेतृत्व केलं होतं.

'असं' आलं प्रज्वल रेवन्नाचं हे प्रकरण समोर

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हासन जिल्हा हा भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला आहे.

मंड्याव्यतिरिक्त हसन जिल्ह्याला वोक्कालिगा या प्रभावशाली समाजाच्या शक्तीचं केंद्र मानलं जातं. अर्थात वोक्कालिगा समाज दक्षिण कर्नाटकातील इतर जिल्ह्यांमध्येदेखील विखुरलेला आहे.

2019च्या निवडणुकीत प्रज्वल रेवन्ना (एचडी रेवन्नाचा मुलगा) साठी एचडी देवेगौडा यांनी हासन मतदारसंघ सोडला होता आणि त्यांनी तुमकुर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आपल्या कुटुंबात संतुलन राखण्यासाठी त्यांनी असं केलं होतं. कारण त्यांचा दुसरा नातू निखिल कुमारस्वामी (माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामीचा मुलगा) मंड्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होता. मात्र, निखिल कुमारस्वामी आणि त्याचे आजोबा दोघांचाही निवडणुकीत पराभव झाला होता.

प्रज्वल रेवन्नाच्या कार्यकर्त्याने 21 एप्रिला हासन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पेन ड्राईव्ह वाटपाचं प्रकरण पहिल्यांदा समोर आलं होतं.

या तक्रारीत त्यांनी म्हटलं होतं की 'राजकीय कारणांमुळे अश्लील व्हीडिओ असणाऱ्या काही पेन ड्राईव्हचं बस स्टॉप आणि लोकांच्या घरात वाटप केलं जातं आहे. यामध्ये रेवन्ना यांचा मॉर्फ्ड केलेला व्हिडिओ आहे.'

 पंतप्रधान मोदींसोबत एचडी देवेगौडा, एचडी रेवण्णा, एचडी कुमारस्वामी आणि प्रज्वल रेवण्णा

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, पंतप्रधान मोदींसोबत एचडी देवेगौडा, एचडी रेवण्णा, एचडी कुमारस्वामी आणि प्रज्वल रेवण्णा

या तक्रारीमध्ये नवीन गौडा आणि इतर काही लोकांकडे बोट दाखवण्यात आलं होतं.

यानंतर रविवारी म्हणजे 28 एप्रिलला देवेगौडा कुटुंबावरील आरोपांचा हा नवा पैलू समोर आला.

एचडी रेवन्ना यांच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या एका 47 वर्षांच्या महिलेने होलेनरसिपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीत म्हटलं होतं की एचडी रेवन्ना आणि प्रज्वल रेवन्ना यांनी त्यांचं लैंगिक शोषण केलं आहे.

एचडी रेवन्नाही आरोपीच्या पिंजऱ्यात

तक्रार करणाऱ्या महिलेने सांगितलं की, त्या एचडी रेवन्नाच्या पत्नीच्या नातेवाईक आहेत. रेवन्नाचा मोठा मुलगा सूरज यांच्या विवाहाच्या वेळेस घरातील कामात मदत करण्यासाठी त्या रेवन्ना यांच्या घरी आल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या इथंच आचारी म्हणून काम करू लागल्या. इथं त्यांनी 2019 पासून 2022 पर्यत काम केलं होतं.

त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "मी जेव्हा तिथं काम करण्यास सुरूवात केली तेव्हा तिथल्या इतर सहा कर्मचाऱ्यांनी सांगितलं की त्या प्रज्वलला घाबरतात. तिथं काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांनीदेखील सांगितलं की ते रेवन्ना आणि प्रज्वलपासून सांभाळून राहा."

"जेव्हा एचडी रेवन्ना यांच्या पत्नी भवानी घरी नसायच्या तेव्हा रेवन्ना मला वाईट पद्धतीने स्पर्श करायचे. त्यांनी माझ्यावर लैंगिक हल्लादेखील केला. ते इतर लोकांना सांगायचे की त्यांची तेल मालिश करण्यासाठी माझ्या मुलीला घेऊन यावं. प्रज्वल माझ्या मुलीला व्हिडिओ कॉल करून तिच्याशी अश्लील बोलायचे."

एचडी रेवण्णा

फोटो स्रोत, ANI

त्या महिलेनं सांगितलं की त्यांच्या मुलीनं प्रज्वलचा नंबर ब्लॉक केला होता. यानंतर त्यांनीदेखील तिथलं काम सोडलं होतं.

तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की "मी व्हीडिओ पाहिला आणि त्यातील एका महिलेला मी ओळखते."

मात्र एचडी रेवन्ना यांनी या प्रकरणाबाबत पत्रकारांना सांगितलं की "आता एसआयटी नेमण्यात आली आहे. मी एसआयटीसमोर हजर होईल. जेव्हा बोलावलं जाईल तेव्हा प्रज्वल देखील जातील. एफआयआर काल नोंदवण्यात आली आहे. ही गोष्ट चार-पाच वर्षे जुनी आहे."

नाराज असलेल्या एचडी कुमारस्वामी यांनी पत्रकारांना सांगितलं, "या बातम्यांमध्ये तुम्ही सर्व देवेगौडांचं नाव का टाकत आहात. जर कोणी चूक केली असेल तर त्याला त्या चुकीची फळं भोगावी लागतील."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)