You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आईने लेकीच्या खुन्याला तब्बल 15 वर्षानंतर 'असं' शोधून काढलं
- Author, मोहम्मद हफद
- Role, पत्रकार
या गोष्टीची सुरुवात जवळपास 15 वर्षांपूर्वी झाली होती. पाकिस्तानच्या पंजाबमधील फैसलाबाद भागात बोले दी झुग्गी नावाचं गाव आहे. याच गावात तबस्सुमचा जन्म झाला होता. तिचे वडील घराजवळच्या मशिदीत इमाम म्हणून काम करायचे.
तबस्सुम हळूहळू मोठी होत होती. एव्हाना ती 16 वर्षांची झाली असेल. तिला अभ्यासाचं प्रचंड वेड होतं. तिची ही आवड बघून तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी एक पर्सनल ट्यूटर नेमला. पर्सनल ट्यूटर असणारे मोहम्मद सिद्दीक एका खासगी शाळेत शिक्षक म्हणूनही काम करायचे.
सिद्दीक रोज संध्याकाळी तबस्सुमला शिकवायला तिच्या घरी यायचे. तबस्सुमची आई हाफिजा बीबी सांगतात की, तिच्या अभ्यासाच्या वेळेत आम्ही तिला त्रास होईल असं काहीच करायचो नाही, जेणेकरून ती परीक्षेची चांगली तयारी करू शकेल.
त्या पुढं सांगतात की, असंच एका दिवशी अंधार पडल्यावर लक्षात आलं की घराचा हॉल रिकामा आहे. तबस्सुम सुद्धा कुठंच दिसत नव्हती. त्यांच्या घरचे तिथून जवळच राहणाऱ्या सिद्दीकच्या घरी पोहोचले पण त्यांचा दरवाजा देखील बंद होता. शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यावर समजलं की ते घर सोडून गेलेत.
तबस्सुमचं रोजचं लागणारं सामान घरात नव्हतं हे तिच्या आईवडिलांना कळून चुकलं होतं. त्यामुळे तबस्सुम तिच्या पर्सनल ट्यूटर सोबत पळून गेलीय हे सर्वांच्या लक्षात आलं.
तबस्सुमची आई सांगते, कुटुंबीयांनी तबस्सुमचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही सापडली नाही. नंतर सिद्दीकने तबस्सुमच्या कुटुंबीयांना फोन केला आणि सांगितलं की, त्या दोघांनी लग्न केलंय आणि ते सुखात आहेत.
तबस्सुम हत्या प्रकरण
मोहम्मद सिद्दीक हा 15 वर्षांच्या तबस्सुमला शिकवण्यासाठी तिच्या घरी जायचा.
15 वर्षांपूर्वी अचानकच एक दिवस मोहम्मद सिद्दीक आणि तबस्सुम पळून गेले. नंतर सिद्दीकने सांगितलं की त्या दोघांनी लग्न केलंय.
त्यानंतर 10 वर्ष लोटली, सिद्दीकने सांगितलं की ते दोघेही लाहोरमध्ये राहतात. नंतर त्याचा फोन स्विच ऑफ झाला.
तबस्सुमच्या आईला त्यांच्या मुलीची आठवण यायला लागली. त्यात त्यांनी सिद्दीक ज्या शाळेत शिकवायचा ती शाळा गाठली. तबस्सुमच्या आईला अचानक आलेलं पाहून सिद्दीक तिथून पळून गेला.
यानंतर तबस्सुम आणि सिद्दीक बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली.
चौकशी सुरू झाल्यावर सिद्दीकने सांगितलं की, त्याने 15 वर्षांपूर्वीच तबस्सुमची हत्या केली होती.
हत्या केलीय हे कोणाला समजू नये यासाठी त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचं पोलिसांना सांगितलं.
समाजात बदनामी होण्याची भीती
तबस्सुमची आई हाफिजा बीबी सांगतात की, तबस्सुम घरातून पळून गेली याचं तिच्या वडिलांना खूप मोठं दुःख झालं होतं. पण आजूबाजूच्या लोकांच्या भीतीने त्यांनी यावर एक चकार शब्द काढला नाही आणि मुलीशी असलेले सगळे संबंध तोडले.
त्या सांगतात, बदनामीच्या भीतीने त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली नाही. या घटनेच्या काही महिन्यांतच तबस्सुमच्या वडिलांना हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला.
त्या सांगतात, तिचे वडील वारल्यावर त्यांनी जवळपास 10 वर्ष तिच्याशी संपर्क केला नाही. पण दरम्यानच्या काळात असा एकही दिवस गेला नसेल जेव्हा मला तबस्सुमचू आठवण आली नसेल.
हफीजा बीबी सांगतात, "ती सतत माझ्या डोळ्यांसमोर यायची. प्रत्येक दिवस मी माझ्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी तरसायचे, बऱ्याचदा ती माझ्या स्वप्नात यायची. तिला होम ट्यूटर लावलेला दिवस आठवून त्या दिवसाला मी सतत दूषणं द्यायची."
त्या सांगतात की, त्यांच्या मनात त्यांच्या मुलीविषयी नको नको ते विचार यायचे. कधी कधी तर त्यांना भास व्हायचा की तबस्सुम त्यांना हाक मारते आहे. त्या सांगतात, "त्या दिवसांत प्राण कंठाशी यायचे, मी रोज रडायचे. बदनामीच्या भीतीने मी ही या विषयावर कोणाशी बोलायचे नाही."
शेवटी 10 वर्षानंतर तबस्सुमच्या मोठ्या बहिणीच्या पतीने सिद्दीकच्या फोनवर संपर्क केला. तेव्हा सिद्दीकने सांगितलं की, ते आता लाहोरच्या चौहांग भागात राहतात.
ही माहिती तबस्सुमच्या आईपर्यंतही पोहोचली आणि आपली मुलगी सुखरूप आहे हे ऐकताच त्यांच्या जीवात जीव आला. पण जे काही घडलं होतं त्याबद्दल त्यांच्या मनात खंत होतीच. पण एवढी वर्ष उलटल्यानंतर घरच्यांनी तबस्सुमशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा सिद्दिकने आजारी असल्याचा बहाणा करून भेटायला नकार दिला.
वेळ जातच होता आणि सिद्दीक बहाणेबाजी करतच होता. त्यानंतर एक दिवस अचानक सिद्दीकचा मोबाईल स्विच ऑफ यायला लागला, त्यामुळे त्यांच्यापर्यंत आता पोहोचायचं कसं ? हा प्रश्न उभा राहिला.
मनात शंकेच काहूर उठलं होतं..
हाफिजा बीबी सांगतात की, सिद्दीकच्या या बहाणेबाजीमुळे मनात नको नको त्या शंका यायला लागल्या होत्या. त्यांची मुलगी अडचणीत असेल का? असं त्यांना राहून राहून वाटायचं. शेवटी हजार प्रयत्न करून सुद्धा मुलीशी बोलता येत नाही म्हटल्यावर काहीतरी गडबड आहे अशी त्यांची खात्री पटली.
त्या सांगतात की, शेवटी 2022 च्या जानेवारी महिन्यात त्यांची मोठी मुलगी आणि जावई तबस्सुमच्या शोधात लाहोरच्या चौहांग भागात पोहोचले. इथूनच सिद्दीकने शेवटचा फोन केला होता.
तिथल्या स्थानिक लोकांकडे विचारपूस केल्यावर समजलं की, सिद्दिक बऱ्याच काळापासून लाहोरच्या सांदा भागात राहतो. तो तिथल्याच एका शाळेत शिकवतो आणि होमिओपॅथिक क्लिनिकही चालवतो. तबस्सुमची आई त्यांची मुलगी आणि जावई, लोकांनी सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन पोहोचले. पण तिथंही त्यांन सिद्दीक भेटला नाही.
हफीजा बीबींच्या मते, सिद्दीक काही केल्या सापडत नव्हता, त्यामुळे आता त्यांचा संशय बळावला होता. पण लाहोरमध्ये त्यांच्या दुसरं कोणीच ओळखीचं नव्हतं, त्यामुळे राहणार कुठं हा देखील हा प्रश्न होता.
त्यांनी या अडचणीवर देखील उपाय शोधला. त्यांनी त्या भागात राहण्यासाठी आणि मुलीची माहिती मिळवण्यासाठी लोकांच्या घरी धुणीभांडी करायचं काम मिळवलं.
त्या चौबरजी परिसरातील लोकांच्या घरी दिवसा काम करायच्या आणि संध्याकाळी आपल्या मुलीचा शोध घ्यायच्या. बघता बघता चार महिने निघून गेले.
असंच एक दिवस मुलीचा शोध घेता घेता त्या चौबरजी येथील एका माध्यमिक शाळेत पोहोचल्या. मोहम्मद सिद्दिक तिथं एका वर्गात मुलांना शिकवत होता. या प्रकरणात हाफिजा बीबीने जी एफआयआर नोंदवली आहे त्यात म्हटलंय की, हाफिजाला बघताच सिद्दीकला आश्चर्य वाटलं. तो अस्वस्थ झाला. तबस्सुमबाबत विचारणा केल्यावर मोहम्मद सिद्दीक बहाणा करत राहिला आणि यावेळी बोलत असताना अचानक पळून गेला.
सिद्दीक अचानक पळून गेल्यावर हाफिजा बीबी घाबरल्या. आपल्या मुलीचं काहीतरी वाईट घडलंय याची त्यांना आता खात्री पटली होती. त्यांनी ताबडतोब चौबरजी जवळ असणारं सांदा पोलीस स्टेशन गाठलं. तिथले एसएचओ आदिल सईद यांना त्यांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याविषयी आणि मोहम्मद सिद्दीक विषयी माहिती दिली आणि मदत मागितली.
त्यांनी सिद्दीकचे काही फोटो पोलिसांना दिले आणि त्याला शोधून काढण्याची मागणी केली. काहीच वेळात पोलिसांनी सिद्दीकला शोधून काढलं.
पोलिसांनी खुनाचा पर्दाफाश केला
याबाबत माहिती देताना एसएचओ अदील सईद सांगतात, आरोपी मोहम्मद सिद्दीकला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीला सुरुवात केली. सुरुवातीला तर त्याने अनेक बहाणे केले, खूप साऱ्या खोट्या कहाण्या रचल्या. पण नंतर पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने 15 वर्षांपूर्वीच तबस्सुमची हत्या केल्याचं सांगितलं.
पोलीस सांगतात की, मोहम्मद सिद्दिकने 2007 मध्ये तबस्सुमशी लग्न केलं. पण त्याआधी त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. त्या पत्नीपासून त्याला दोन मुलं होती.
पुढं सिद्दीकने पोलिसांना सांगितलं की, तबस्सुमला तो लाहोरला घेऊन आला सोबत त्याची दोन्ही मुलं होती. त्याच्या दोन मुलांमुळे घरात रोज वाद व्हायचा. शेवटी तबस्सुमने मुलांना घराबाहेर हाकलून द्यायला सांगितलं.
तबस्सुमशी लग्न होऊन अवघे पाच महिने झाले होते. अशातच एका रात्री त्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं. त्यादिवशी सिद्दीकचा संयम सुटला आणि त्याने तबस्सुमला गप्प करण्यासाठी तिला उचलून कॉटवर फेकलं. त्याचा राग अनावर झाला होता त्याने तबस्सुमचा गळा आवळला आणि आवाज बंद कर म्हणून ओरडू लागला.
तबस्सुमचा आवाज बंद झाला तसा सिद्दीक पण ओरडायचा थांबला. तबस्सुमचा जीव गेला होता. पोलिसांनी तपास केल्यावर समजलं की, लोकांना खून झाल्याचं समजू नये म्हणून सिद्दीकने तबस्सुमच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि त्याची विल्हेवाट लावली.
तपासातील वरिष्ठ पोलीस अधिकारी एस पी अम्मारा शिराझी सांगतात की, सिद्दीकने त्याच्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याचं कबूल केलं. तिच्या मृतदेहाचे लहान लहान तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. 2007 मध्ये बकरी ईदच्या तिसर्या दिवशी सिद्दीकने तबस्सुमची हत्या केली होती. कोणाला संशय येऊ नये म्हणून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून कुर्बानी दिलेल्या जनावरांच्या अवशेषांमध्ये फेकून दिले. यानंतर त्याने तिसरं लग्न केलं आणि तो लाहोरच्या सांदा भागात लपून राहू लागला.
एस पी अम्मारा शिराझी सांगतात की, तबस्सुम घरातून पळून गेल्यावर तिच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याबद्दल किंवा तिचं अपहरण झालंय म्हणून पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. त्यामुळे पोलिसांकडून तिचा शोध घेण्यासाठी कोणतीच कायदेशीर कारवाई करण्यात आली नव्हती. पोलिसांनी सिद्दीकचा जबाब नोंदवला असून प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. त्याला कलम 164 अन्वये त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करून जबाब नोंदवला आहे. त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून त्याची कॅम्प जेल मध्ये रवानगी करण्यात आली आहे. या केसचे अनुसंधान प्रभारी हसन रझा यांनी माहिती देताना म्हटलंय की, या केसचं आरोपपत्र सादर करण्यात आलं असून आरोपीला रिमांड देण्यात आलं. पण आरोपीची बाजू मांडायला त्याचा वकील आलेला नाहीये, किंबहुना त्याच्या जामिनासाठी देखील कोणी अर्ज केलेला नाहीये.
पुराव्यांच्या कमतरतेमुळे खटल्यावर परिणाम होईल का?
कायदेतज्ञ सांगतात त्याप्रमाणे, घटनास्थळावर जप्त केलेले पुरावे, मृतदेह, हत्येसाठी वापरलेली शस्त्र, आरोपीचा कबुलीजबाब यावरून आरोपपत्र तयार केलं जातं. या सगळ्या गोष्टी असतील तर आरोपीला कडक शिक्षा होऊ शकते.
तबस्सुम हत्या प्रकरणात आरोपीचा कबुली जबाब असेल तरी त्याने हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारं, मृतदेह अशा कोणत्याच गोष्टी उपलब्ध नाहीयेत. अशा प्रकरणात आरोपपत्र कमजोर होतं आणि आरोपीला त्याचा फायदा होतो. कारण आरोपी कोर्टात त्याचा जबाब बदलू शकतो. आणि मग असं प्रकरण वर्षानुवर्षे सुरूच राहतं. आणि शेवटी आरोपी निर्दोष सुटतो.
अॅडव्होकेट असद अब्बास बट सांगतात की, या प्रकरणात आरोपीने तबस्सुमच्या मृतदेहाचे तुकडे जिथे फेकले आहेत त्या ठिकाणी जाऊन ती हाडं शोधून काढल्यास, त्याची डीएनए टेस्ट केल्यास, आरोपीने हत्येसाठी वापरलेलं हत्यार जप्त केल्यास केस मजबूत होईल. आणि आरोपीला शिक्षा होऊ शकेल. पण याची शक्यता खूप कमी आहे कारण पंधरा वर्षांनंतर पुरावे मिळतीलच असं नाही.
दुसरीकडे, तबस्सुमच्या आईला वाटतं की, त्यांनी वेळीच पोलिसांत तक्रार दिली असती तर आज त्यांची मुलगी जिवंत असती.